मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नावात काय आहे? – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ नावात काय आहे? – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(परत एकदा कस्टमर आले. पैसे देण्याघेण्यात परत पाच मिनिटे गेली. कस्टमर मराठी आहेत हे दिसूनही हा माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलत होता.) – इथून पुढे —- 

” साहेब याला कारण आपली मराठीच माणसं आहेत ” तो सांगू लागला ” दोन वर्षांपूर्वी हे हाॅटेल टाकलं तेव्हा मोठ्या हौसेनं हाॅटेलचं नाव समर्थ ठेवलं. वाटलं आपली मराठी माणसं स्वामी समर्थांचं नाव पाहून हाॅटेलला येतील. खुप जोरात चालेल आपलं हाॅटेल. पण हाॅटेलचं नाव मराठी, मालकही मराठी म्हणजे हे हाॅटेलही कमी दर्जाचं असा समज आपल्या मराठी माणसांनी करुन घेतला. तुम्हांला सांगतो साहेब आपल्या मराठी माणसांना मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी खाद्यपदार्थांचा जराही अभिमान नाही. तो जर असता तर मुंबईत नव्वद टक्के हाॅटेल्स परराज्यातील लोकांची दिसली नसती. तिथंच काय इथे मलकापूरातही परक्या लोकांचीच हाॅटेल्स जास्त आहेत. आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती निर्माण होतेय. महाराष्ट्राचे काय स्वतःचे खाद्यपदार्थ चांगले नाहीत? “

कस्टमर आले तसा तो थांबला. कस्टमर मराठी दिसत होते पण ते त्याच्याशी हिंदीत बोलत होते. ते गेल्यावर तो म्हणाला” बघितलं साहेब माणसं मराठी होती पण हिंदीत बोलत होती. का? कारण आम्हांला मराठी भाषेचा अभिमानच नाही. महाराष्ट्रात असूनही तुम्ही मराठी माणसाशी हिंदीत बोलता. मराठी भाषा काय नाॅन स्टँडर्ड आहे? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणे आणि इथे आम्हांला मराठीत बोलायचीही लाज वाटते. मराठी लोकांची मानसिकताच वाईट आहे साहेब” 

त्याचे मुद्दे मला पटत होते. बरेच मराठी डाॅक्टर्स मी मराठी आहे हे माहीत असूनही माझ्याशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलायचे. आणि माझ्यासारख्या एम. आर. ना फार्मा कंपन्यांचे प्राॅडक्टस् विकायचे असल्याने त्यांच्याशी आम्हांला नाईलाजास्तव हिंदीत बोलावं लागायचं.

” खरंय तुमचं म्हणणं ” मी म्हणालो ” बघा ना मराठी माणसं मराठी गाणी ऐकत नाहीत, मराठी चित्रपट पहात नाहीत. फक्त हाॅटेल्सच नाहीत तर जवळजवळ सगळे व्यवसाय नाॅन मराठी लोकांच्या ताब्यात गेले आहेत. आपल्याकडचे कॅटरर्स पहा. बहुतेक राजस्थानी आहेत. फॅक्टरीतले कामगार बिहारी आहेत. महाराष्ट्राची म्हणजे मराठी लोकांची राजधानी असूनही मुंबईत हिंदीच बोलणारे जास्त सापडतात. मराठी माणसांसोबत मराठी भाषाही मुंबईतून हद्दपार होतेय ” 

” अहो साहेब मुंबईचं सोडा. आमच्या विदर्भातही तेच होत चाललंय. एक दिवस बघा महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्रीही परप्रांतीयच असणार आहे. आणि ही संधी आपले आपापसात भांडणारे मराठी आमदारच त्यांना देणार आहेत हे नक्की ” 

” पण काहो तुम्ही हाॅटेल गुजरात हे नाव कसं ठेवलंत? “

” तुम्ही पाहीलंच की हाॅटेल फारसं चालत नव्हतं. कामगारांचे पगार सुद्धा करणं मला कठीण होऊन बसलं होतं. हाॅटेलमधले मराठी वेटर्स, कामगार सोडून गेले. गंमत बघा साहेब आपले मराठी कामगार मारवाडी, सिंध्यांकडे कमी पैशात निमुटपणे काम करतात. पण मराठी माणसाकडे जास्त पगार मिळूनही नखरे करतात. खाडे मारतात, मालकाला जमेल तसं छळून घेतात. माझी आई गुजरातची. त्यामुळे गुजराती भाषा आणि गुजराती पदार्थ आम्हांला चांगले येतात. मी हे हाॅटेल टाकतांना माल काढणारा मुख्य कारागीर मराठी ठेवला होता. पण तो दारु पिऊन यायचा आणि खुप खाडे करायचा म्हणून त्याला काढून मी गुजरातमधून कारागीर बोलावून आणला. तो मात्र मेहनती आणि इमानदार होता. माझ्या पडत्या काळातही तो मला सोडून गेला नाही. त्यानंच मला हाॅटेलचं नाव गुजरात करण्याचं सुचवलं. एकंदरीत परिस्थितीमुळे मलाही ते पटलं. मग मी नाव तर बदललंच पण आतलं इंटिरिअरही बदलून टाकलं. त्याच कारागीरानं गुजरातमधले कामगार बोलावून घेतले. आता माझ्याकडचा सगळा स्टाफ गुजराती आहे. हे लोक कधीच मराठी माणसांसारख्या दांड्या मारत नाहीत, दारु पिऊन येत नाहीत, पगार उशीरा दिला म्हणून भांडणं करत नाहीत. सध्या सगळं सुरळीत चालू आहे. हाॅटेलचं नाव गुजरात ठेवल्यामुळे लोकांना हाॅटेल उच्च दर्जाचं वाटून ते इथंच नाश्ता, चहाला येतात “

” खरंय. सध्या तर बसायला जागा मिळत नाहिये ” मी हसत म्हणालो तसा तोही हसला 

” तुम्हांला ते पुढच्या चौकातलं ब्रजवासी हाॅटेल माहीत आहे का? “

” हो. माहितेय पण मला ते आवडत नाही. गचाळ आहे ” 

” बरोबर. तरीही त्याच्याकडे अगोदर खुप गर्दी असायची. आता तिकडचे गिऱ्हाईक आपल्याकडे यायला लागलेत ” 

मी घड्याळाकडे पाहिलं. मला आता निघायला हवं होतं. साडेदहाची डाॅक्टरांची अपाॅइंटमेट होती. मी बिलाचे ८० रुपये काढून त्याच्यासमोर ठेवले. त्यानं ४० रुपये मला परत केले. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिल्यावर तो म्हणाला 

” असू द्या साहेब. तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात” 

मी ४० रुपये परत करत म्हणालो

” तुम्ही हाॅटेलचं नाव गुजरात केलं आता मराठी माणसांची मानसिकता सोडून गुजराती लोकांसारखे व्यवहारी व्हा. धंदा म्हणजे धंदा. कस्टमर कुणीही असो. नो डिस्काउंट ” 

त्यानं हसून ४० रुपये गल्ल्यात टाकून दिले. त्याच वेळी तिथं आलेल्या दोनतीन कस्टमरचेही पैसे त्यानं घेतले. ते गेल्यावर तो म्हणाला

” साहेब पुढच्या महिन्यापासून आपण वरच्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था करतोय. पंजाबी, गुजराती, मारवाडी, जैन सगळ्या प्रकारच्या थाली मिळतील. या कधी जेवायला “

” आणि महाराष्ट्रीयन थाळीचं काय? “

तो हसला

” काय करता साहेब. आपल्या मराठी माणसाला आपलं घरचं जेवण हाॅटेलमध्ये नको असतं. त्यांना हाॅटेलमध्ये जे जेवायला आवडतं तेच आपल्याला ठेवावं लागणार ना! ” 

अर्थातच त्याच्या या युक्तिवादावर माझ्याकडे उत्तर नव्हतं.

बडिशेप खाऊन मी निघालो.

रविवारी माझ्या घरी पाहूणे येणार होते. बायको मला म्हणाली. ” अहो उद्या त्या बिकानेर स्वीट मार्ट मधून एक किलो श्रीखंड घेऊन याल ” 

” का आपल्या जवळच्या दत्त डेअरीतही चांगलं श्रीखंड मिळतं. तिथून का नाही आणायचं? ” 

” नको तिथलं नको. राजस्थानी लोकांकडचे सगळे पदार्थ चांगले असतात ” 

” अहो मॅडम मराठी लोकांकडचे पदार्थ चांगले नसतात ही मानसिकता सोडून द्या आता. आपलेही लोक चविष्ट पदार्थ बनवतात. तू स्वतः मराठी आहे. तू काय चवदार पदार्थ बनवत नाहीस? दत्त डेअरीचा मालक मराठी असला तरी त्यांचं श्रीखंड बिकानेरवाल्यापेक्षा जास्त चांगलं असतं. आणि एक गोष्ट लक्षात घे. श्रीखंड हा महाराष्ट्रीय पदार्थ आहे. तो मराठी माणसं चांगला करतील की राजस्थानी? तूच तर म्हणतेस ना की इडली, डोसा साऊथ इंडियन जितका चांगला करतात तितका आपला नसतो. छोले भटूरे पंजाबी लोक जसे बनवतात तसे आपल्याला जमत नाहीत. मग हीच बाब श्रीखंडाला का लागू होत नाही? ” 

या प्रश्नावर बायको निरुत्तर होणार हे मला माहीत होतं. झालंही तसंच. माघार घेत ती म्हणाली 

” ठीक आहे, दत्त डेअरीतून आणा “

–  समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नावात काय आहे? – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ नावात काय आहे? – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

पॅसेंजरने उतरुन मी स्टेशनबाहेर आलो. डाॅक्टरांना सकाळी दहा वाजता भेटायचं होतं आणि आताशी नऊ वाजले होते. माझ्याकडे अजून एक तास शिल्लक होता. मला भुक लागली होती. मी स्टेशनजवळची हाॅटेल्स पाहिली पण ती एकजात सगळी गचाळ होती. मला आठवलं ज्या डाॅक्टरांकडे जायचं होतं त्यांच्या जवळच एक समर्थ रेस्टॉरंट होतं. मी एकदोनदा तिथं चहा प्यायलो होतो. तिथल्या गरमागरम पदार्थांच्या वासाने मला तेव्हा नाश्ता करायची इच्छा झाली होती. पण घाईत असल्याने मी नाश्ता केला नव्हता. आज मात्र माझ्याकडे वेळच वेळ होता शिवाय मला भुकही लागली होती. माझी पावलं आपसूकच त्या हाॅटेलकडे वळली. हाॅटेल बऱ्यापैकी मोठं होतं. स्वच्छही दिसत होतं पण तरीही तिथं अजिबात गर्दी नव्हती. वीसपंचवीस टेबलपैकी फक्त दोन टेबलवर दोन माणसं बसली होती. मागेही मी आलो तेव्हाही या हाॅटेलमध्ये गर्दी नव्हती. या हाॅटेलची क्वालिटी वाईट तर नाही? नाही तर अगदी मोक्याच्या ठिकाणी असूनही तिथं गर्दी का नसावी? प्रश्न पडून मी घुटमळलो आणि दुसऱ्या हाॅटेलमध्ये जाऊ असा विचार करुन मी पायऱ्या उतरणार तेवढ्यात गल्ल्यावरच्या माणसाने आवाज दिला. ” काहो साहेब काय हवं होतं? ” 

” काही नाही नाश्ता करायचा होता ” 

” अहो मग या ना. आलूवडा आहे, मिसळ आहे. भजी, पोहे, चहा, काॅफी सगळं आहे. या सगळं गरम मिळेल ” 

मी थोड्या नाराजीनंच आत येऊन एका टेबलवर बसलो

वेटर लगबगीने पुढं आला.

” काय आणू साहेब? ” त्यानं विनम्रतेनं विचारलं 

” गरम काय आहे? “

” मिसळ एकदम गरम आहे. बाकी वडा, भजेही ताजे आहेत”

” एक मिसळ आण “

तो गेला आणि दोनच मिनिटात मिसळपाव घेऊन आला‌. सोबत दही, चिरलेला कांदा, लिंबाची फोड आणि एका मोठ्या वाटीत मिसळीचा रस्सा. मिसळीचा वास तर खुप छान येत होता

मी कांदा टाकून मिसळीचा घास घेतला. मस्तच होती मिसळ. पावही एकदम साॅफ्ट आणि ताजे होते. मिसळ खाताखाता मी हाॅटेलमध्ये नजर टाकली. हाॅटेलच्या भिंती आणि फर्निचर जुनं दिसत होतं. यामुळे तर लोक इथं येत नसावेत? पण ती शक्यता मी फेटाळून लावली. बऱ्याच गावातली यापेक्षा जुनी आणि गचाळ हाॅटेलं जोरात चालत असलेली मी पाहिली होती. याचं हाॅटेलच्या पुढच्या चौकात एक ब्रजवासी नावाचं हाॅटेल होतं. तेही गचाळच होतं पण तिथं नेहमीच गर्दी दिसायची. काही हाॅटेल्सचं नशीबच वाईट असतं. नाहीतर इतकी चांगली चव असतांना लोकांनी याकडे पाठ नसती फिरवली.

मिसळ खाऊन झाल्यावर मी चहा मागवला. गवती चहा टाकल्यामुळे तोही खुप चांगला होता. मी तिथं पडलेलं मेनू कार्ड पाहिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या पदार्थांचे रेटस् बरेच कमी होते. मी खाल्लेली मिसळ तर फक्त तीस रुपयाची होती. इतका छान चहा तोही फक्त दहा रुपयाचा होता.

मी पैसे द्यायला काऊंटरवर आलो. चाळीस रुपये देऊन तिथल्या माणसाला म्हणालो.

” मिसळ आणि चहा दोन्हीही छान होते ” 

तो कसानुसा हसला मग म्हणाला 

” येत जा साहेब. तुम्ही मागेही एकदोनदा येऊन गेले होते ना? ” 

” हो. बरोबर. चहा प्यायला आलो होतो ” 

त्यानंतर जेव्हा जेव्हा मलकापूरला गेलो. तेव्हा तेव्हा त्याच हाॅटेलमध्ये जाऊन मी नाश्ता केला. तिथले सगळेच पदार्थ रुचकर होते. चहा तर नंबर एक होता. पण हाॅटेलमध्ये नेहमी दोनतीनच गिऱ्हाईक बसलेले दिसायचे. मला त्याचं खुप वाईट वाटायचं. एक दिवस हे हाॅटेल नक्की बंद पडणार याबद्दल माझ्या मनात शंका उरली नाही.

मध्ये तीनचार महिने कंपनीनं मला मराठवाड्याचं काम दिलं त्यामुळे मलकापूरला जायला मला जमलं नाही.

चार महिन्यांनी मी परत मलकापूरला गेलो. समर्थ हाॅटेलमध्ये जाऊनच नाश्ता करायचा हे मी ठरवलं होतं. त्यानुसार तिथं गेलो तर समर्थ रेस्टॉरंट कुठंच दिसेना. त्याजागी आता हाॅटेल गुजरात दिसत होतं. म्हणजे माझी शंका खरी ठरली होती. नावासोबत अर्थातच हाॅटेलचं बाह्यस्वरुपही बदललेलं दिसत होतं. आता आलोच आहे तर इथंच नाश्ता करु या विचाराने मी आत घुसलो. काऊंटरवर वेगळाच माणूस बसलेला दिसत होता. याचा अर्थ स्पष्टच होता. पुर्वीच्या मालकाने हे हाॅटेल कुणा गुजराती माणसाला विकलं होतं. आतमध्ये खुप गर्दी होती. एकही टेबल रिकामं दिसत नव्हतं. काय करावं याचा विचार करत असतांनाच वेटर आला. त्यानं मला एका माणसाला सरकावून बसायला जागा करुन दिली. हाॅटेलचा लूक पुर्णपणे बदलला होता. भिंतींना नवीन वाॅलपेपर लागले होते. फर्निचर नवीन दिसत होतं. मी मेनू कार्ड बघितलं. पुर्वीच्या टिपीकल भजे, मिसळ, बटाटावडा या पदार्थांसोबत आता खमण ढोकळा, पुरीभाजी, मसाला डोसा, इडली, मेदूवडा असे बरेच पदार्थ नवीन दिसत होते. पदार्थांचे रेटसही तगडे दिसत होते. मागील रेटपेक्षा जवळजवळ दुप्पट. मी मिसळ ऑर्डर केली. एकंदरीत वातावरणावरुन आणि गर्दीवरुन मराठी माणसाला धंदा जमत नाही हे अनेकांचं मत मलाही योग्य वाटू लागलं. मिसळ आली. त्यासोबत नेहमीचाच कांदा दही वगैरे मालमसाला होता पण खाण्याच्या प्लेट्स, चमचे वगैरे आकर्षक दिसत होते. मी चव घेतली. ती पुर्वीसारखीच छान होती. याचा अर्थ आचारी बदलला नव्हता. यावेळचा चहा मसाला घालून केलेला होता. तोही छानच होता. चला मालक बदलला तरी चव तीच पुर्वीची आहे याचं मला समाधान वाटलं. फक्त यावेळी मला दुप्पट पैसे द्यावे लागणार होते याची कुठंतरी खंत वाटत होती. मी काऊंटरवर पैसे द्यायला गेलो आणि चमकलोच. मघाशी तिथं बसलेला माणूस बाहेर उभा होता आणि काऊंटरवर पुर्वीच्या समर्थ रेस्टॉरंटचा माणूस बसलेला होता. मला पाहून तो हसला

” नमस्कार साहेब” 

” नमस्कार. तुमच्या मालकाने हे हाॅटेल गुजराती माणसाला विकलंय का? “

” नाही तर. मीच या हाॅटेलचा मालक होतो आणि आहे ” 

” तुम्ही गुजराती आहात का? “

तेवढ्यात कस्टमर पैसे द्यायला आले म्हणून मी बाजूला सरकलो. कस्टमर गेल्यावर मी परत तोच प्रश्न त्याला केला.

” नाही मी मराठीच आहे “

मी कोड्यात पडलो.

” पण मग तुम्ही हाॅटेलचं नाव का बदललं? “

परत एकदा कस्टमर आले. पैसे देण्याघेण्यात परत पाच मिनिटे गेली. कस्टमर मराठी आहेत हे दिसूनही हा माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलत होता.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुज सगुण म्हणो की… – भाग -२ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

🔆 जीवनरंग 🔆

☆ तुज सगुण म्हणो की… – भाग – २  ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(काकूंना वाटलं – “कालपासून हे सारखे ॲसिडिटी चा फार त्रास होत आहे म्हणत आहेत पण दाखवून या म्हटलं तर ऐकत नव्हते. बरं झालं शशांक आला ते! “

– – त्यांचा बसल्या बसल्या डोळा लागला. काही वेळाने शशांकच्या फोनमुळे त्यांना जाग आली.) इथून पुढे —

“काकू काकांची Angioplasty आजच करायचं ठरवलय. काळजी करू नका. Heart Attack आला नाही त्यांना हे महत्वाचं. आधीच लक्षात आलंय हा मोठा फायदा आहे. मी गाडी पाठवतो. शांतपणे या.”

मंगलाताई गडबडल्या. देवघरात जाऊन श्रीरामासमोर हात जोडले. “श्रीरामा सांभाळ रे बाबा!” म्हणाल्या व त्या गाडीतून हॉस्पिटल मधे पोचल्या.

हॅास्पिटलच्या लॅाबीमधे बसून त्या श्रीराम जयराम जय जय रामाचा जप करत शशांकची वाट बघत बसल्या.

लॉबीमध्ये केर काढणारा एक साठीतील कर्मचारी काकू जवळ आला.

“ताई, सगळं उत्तम झालं असेल” म्हणाला. काकूंनी त्याच्याकडे बघून कृत्रिम हास्य केलं. कुणाचा कोण हा पण बिचारा धीर द्यायचा प्रयत्न करत आहे.

“अरे आत्ता तर ह्यांना आत नेलय.. तुला काय माहित उत्तम झालं का ते? ” हे विचारायला त्या वळल्या पण तो तिथून निघून गेला होता.

“कुठे गेला एवढ्यात? ” म्हणून काकूंनी इकडे तिकडे बघितलं पण तो दिसला नाही.

काही वेळाने श्री आणि शशांक बाहेर आले. श्री ने वाकून काकूंना नमस्कार केला. “काकू उत्तम झाली प्रोसिजर. मी औषधं लिहून देतो. हा सदू घेऊन येईल. तुम्ही काकांजवळ बसा. ”

“अरे काय हे श्री! एवढा मोठा डॅाक्टर तू. मला कसला नमस्कार करतोस? “ काकूंनी श्री ला मिठी मारली. त्याला पुढचा पेशंट बघायला जायची घाई होती.

“काकू, तुमच्यामुळे श्री क्लिनिक उभे आहे. माझ्या ऑफिसमध्ये तुमचा आणि काकांचा फोटो आहे त्याला रोज नमस्कार करूनच माझा दिवस सुरु होतो. काका यातून व्यवस्थित बाहेर पडतील. जा भेटा त्यांना! ” म्हणून तो गेला आणि काकूंना आपण लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा सर्वाना सावली देणारा वटवृक्ष झाला आहे असं वाटलं.

काकूंनी खोलीत आणलेल्या काकांकडे बघितले.

त्यांच्या डोळ्यातले पाणी बघून काका म्हणाले, “ अग सगळं वेळेवर झालय. आता डोळ्यात पाणी कशाला? ९०% ब्लॅाक झालेली आर्टरी मोकळी केली बघ आपल्या श्री ने! अग हो.. तुझा श्रीराम माझ्या जवळ उभा होता असं वाटलं बघ. अगदी तोच मुकुटधारी राम, पिवळं पितांबर अन जांभळा शेला घेतलेला. तुझ्या फोटोत आहे ना तसा! ”

काकू काकांकडे एकटक बघत होत्या. सरळ साधे केशवराव मितभाषी आणि सज्जन होते.

छान केला त्यांनी संसार! कधी कशाची तक्रार केली नाही. ह्यांना ॲाप्रेशन थिएटरात चित्रातला मुकुटधारी राम भेटला? अगबाई!

पण तो विचार चेहऱ्यावर न दाखवता त्या म्हणाल्या “अहो मी घरून गरम गरम मुगाची खिचडी घेऊन येते.. काकू म्हणेपर्यंत तो केर काढणारा कर्मचारी तिथे आला व म्हणाला, ” ताई मी आहे इथं सोबतीला.. तुम्ही जाऊन या घरी. ”

त्या घरी आल्या. मन काहीसं बघीर झालं होतं.

डाळ तांदूळ घेऊन त्यांनी खिचडी टाकली व श्रीरामा समोर येऊन शांत बसल्या. समई लावली व हात जोडले.

“प्रभू सकाळी मी तुम्ही सगुण रूपात दर्शन देत नाही म्हणून तुमच्यावर रागावले होते. देवा मला माफ करा. मला थोडं थोडं समजायला लागलंय.

तुम्ही आज मला आशिष, शशांक, श्री, कर्मचारी या सर्व रूपात दर्शन दिलत.

मी रत्नजडित मुकुट घातलेल्या चित्रातल्या रामाला शोधत होते म्हणून आजवर मला तुझं दर्शन होत नव्हतं. पण आज हॅास्पिटलच्या लॅाबीमधे दोन तीन तासात मला तुझं विश्वरूप दर्शन झालं.

कधी तू डॅाक्टर असतोस, कधी नर्स, कधी वार्डबॅाय असतोस तर कधी झाड लोट करणारा कर्मचारी असतोस.

कधी ओळखीचा असतोस तर कधी अनोळखी. कधी लहानात लहान असतोस तर कधी मोठ्यात मोठा असतोस.. पण तू सतत आमच्या बरोबर असतोस हे खरं!

सात आंधळ्यांनी हत्तीच्या ज्या भागाला हात लावला त्या भागासारखा हत्ती असतो असे त्यांना वाटले. तसाच तू प्रत्येकाला वेगळा दिसतोस.. वेगळा भासतोस..

पण देवा जगात जिथे जिथे चांगुलपणा आणि सच्चेपणा आहे तिथे तिथे तू आहेस. तू सद्गुणांच्या रूपात जीवामधे वास करतोस असं मला वाटतं. दया, दान, क्षमेमध्ये जो आनंद निर्माण होतो तो तू आहेस.. भक्ती, शांती, करुणा यामधून मिळणारा दिलासा तू आहेस.

ह्यांच्या ९०% ब्लॅाक झालेल्या आर्टरी ची काळजी घेण्यासाठी शशांक होऊन आलास.. ज्या क्षणी माझ्या मनात वेडेवाकडे विचार आले त्या क्षणी तू तो कर्मचारी बनून मला धीराचे शब्द सांगितलेस..

मला वाटलं देवा, मी नैवेद्य दाखवायला विसरले.. पण आशिष च्या रूपात तू नैवेद्य पण घेतलास हे मला आत्ता कळतंय.

काकूंच्या डोळ्यातून भक्ती, भावना आणि कृतज्ञता अश्रू बनून वहात होती.

अष्टसात्विक भाव जागे होऊन मन भरून आलं होतं. आमच्या प्रत्येक प्रार्थनेला धावून मदतीस येतोस.. आणि तरी देखील कित्येक प्रश्न सतत पाठपुरावा करत असतात…

तव नामाची माळ माझिया क्लेश मनाचे जाळी

पण असशील ना रे माझ्या जवळी माझ्या अंतःकाळी।।

नचिकेताचा अंश असे मी, ब्रह्म ज्ञान ओंजळी

पण देशील ना धीर भ्रमित मनाला त्या शेवटच्या वेळी? ।।

हे सतत मनात येणारे सारे प्रश्न आता संपले रामा.. आता कशाची ही काळजी नाही!

कधीही लिखाण न करणाऱ्या काकूंच्या हृदयातून भक्ती रस कवितेच्या रूपात पाझरू लागला. सतत वाटणारी अंतःकाळाची भीती त्या भक्तिरसात विरघळून गेली.

दिलीस बकुळी, चाफा, तुळशी, सर्वोत्तम तू माळी

फुलवलास रे वेलू मोगरा, जो जाईल गगनावेरी।।

जीवन रथ हा अशाश्वताचा, वारू मनाचे उधळी

पण सावरशी मज, मी अडखळता, त्या उदास कातरवेळी।।

केशवरावांना ॲाप्रेशन थिएटरात मुकुटधारी राम कसा भेटला असेल याचे उत्तर मिळालं.

सर्वव्यापी म्हणजे काय थोडंसं कळू लागलं होतं. ज्याने एवढा मोठा विश्वाचा पसारा मांडला त्याला काय कठीण आहे? त्यांना खुदकन हसू आलं. गरम खिचडी डब्यात भरून त्या हॉस्पिटल ला जायला उठल्या. बघावे तर दारात आशिष पहिलं बक्षीस मिळालं हे सांगायला रामरायाच्या वेषात आला होता.

त्याला जवळ घेत काकू म्हणाल्या, “रामराया, किती रे तुझी तळमळ तुझ्या भक्तांसाठी! “

आशिष म्हणत होता, “अग, मी आशिष! काकू अशी कशी फसतेस ग?

काकू हसून म्हणाल्या, “राजा तू फसलास.. मी नाही! “

चित्रातला मुकुटधारी राम हा सोहळा बघत कौतुकाने हसत होता!

समाप्त –

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुरुकिल्ली आनंदी आयुष्याची… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ गुरुकिल्ली आनंदी आयुष्याची… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“आपल्या घराची एक ‘ extra’ किल्ली नेहमी शेजारी असावी. हे नक्की. पण आपल्या आयुष्याची किल्ली मात्र स्वतः कडेच ठेवावी. “•••• 

आज मी खूप उत्साहात आहे. काय कारण असावं माहीत नाही. पण आज भरपूर ऊर्जा आहे. मला छान वाटतय. खूप काम करावसं वाटतंय. मन गुणगुणतय. आजच्या या उत्साहपूर्ण दिवसांचा चांगला उपयोग करून घ्यायचा हे मी लगेच ठरवलं. आजकाल असे दिवस दररोज उगवत नाहीत. म्हणून मी सगळ्यात आधी मस्त चमचमीत जेवणाचा बेत ठरविला. घर अगदी चकाचक करायचे ठरविले. एकानंतर एकेक काम आठवतं गेली व आज जास्तीत जास्त काम करायची हे लगेच ठरविले. कामे केंव्हा, कशी करायची याची रूपरेषा मनात ठरवून टाकली. आता एवढ्या कामांची लिस्ट समोर म्हंटल्यावर कामाची स्पीड वाढवायलाच हवी. हे सर्व ठरवत असताना च मधे दोन मिनिटे काढून वॉशिंग मशीन लावली. म्हणजे आजची सकाळ वेगळीच उगवली. ••••

बहुतेक माझी झोप चांगली झाली होती. स्वप्न पण छान पडलं होतं. पावसाळी मन प्रसन्न करणारी हवा होती. त्यातच रेडिओ वर पहिलंच मस्त आवडीचे गाण ऐकलं. ••••

” मस्ती भरा है समा, ••••

हम तुम हैं दोनो यहां.

आंखो में आ जा, दिल में समा जा,

झूमें ज़मीं आसमां । ” •••••

वाढत्या उत्साहात भर पडली. तसे मागच्या पंधरा वर्षांपासून आम्ही दोघेच असतो पण “Today it’s different. ” •••••

कारण काहीही असू दे. लगेच हा दिवस cash करायचाच. असं मी ठरवलं. •••

सर्व अगदी मजेत सुरू होत. हळदीचे डाग पडतात व कपडे खराब होतात, असा रोजचा विचार आज बाजूला सारून, रोजपेक्षा वेगळा ड्रेस घातला. मनात म्हंटल पडले डाग तर पडू दे. ••••

” बहुत कपड़े हैं अपने पास । “

मन लावून एकेक पदार्थ लक्ष देऊन केला. पाहुण्यांसाठी जपून ठेवलेली क्रोकरी उत्साहाने काढणार, तेवढ्यात फोन वाजला, लगेचच घेतला. एका मैत्रिणीचा होता. •••••

वेळ आहे का ग.??? ••••

असं म्हणून आमच्या गप्पा नेहमी प्रमाणेच सुरू झाल्या. मी उत्साहात होतेच. लगेच आजचा माझा बेत मी तिला सांगितला. ••••

खीर, पूरी, बटाटा भाजी, चटनी, कोशिंबीर भजी, मसालेभात, मसाला ताक (मठठा) वगैरे वगैरे. ••••

बाप रे!! आज काय विशेष ग?? तिने विचारले. •••••

कोणाचा वाढदिवस की काय??

काही नाही ग सहजच.. सणवार, वाढदिवस वगैरे काहीच नाही. मी म्हंटल. ••••असच काहीतरी वेगळं करावं म्हणून करतेय. सर्व झालंय, फक्त मसालेभात तेवढा राहिलाय. येतेस का जेवायला?? मी सहज विचारलं. ••••

लगेच ती म्हणाली, अग! तुला कंटाळा नाही येत का?? मला तर आता एवढा कंटाळा आला आहे. रोज रोज, तेच ते, तोच तोच, आपल्या हातच जेवून स्वयंपाक करून करून मी थकलेय.. मी तर आता जेमतेम जेवढी गरज असेल तेवढंच काम करते व बाकी जास्तीची कामे तर अजिबात करतच नाही. कोणी येत जात नाही. त्यामुळे तर अजून काही करत नाही. कंटाळा तर रोजच येतो. ••••

अग! तू आणि मी एकाच वयाच्या ना, मग तुलाही आता कामाचा कंटाळा येतच असणार नाही का?? बघ बाई, खूप करायला जाऊ नको, नाही तर उद्या कंबर दुखायची. •••• 

झालं, एवढं पूरे होत. मलाही ते पटले. मनाने सहजच पलटी मारली. उत्साही मनाने कुलांटी मारली. अचानक घड्याळ उलटे सुरू झाले. आता विचारांची दिशाच बदलली. म्हणजे. ‘ Follow Me ‘ सारख तिच्या मागे माझे मन चालू लागले. ••••

मलाही थकल्या सारखे वाटू लागले. कुठे तरी ‘कंटाळा ‘ शब्द डोक्यात छान बसला. व आपला असरही दाखवू लागला. •••• 

आता मनात नवीन विचार येऊ लागले. मसालेभात राहू दे का?? बाकी एवढं सर्व आहेच ना. म्हणजे नाही केलं तरी चालेल. एवढं पचलही पाहिजे ना. आजकाल जास्त जेवले की त्रासही होतो. ‘कंटाळा’ शब्दाला साजेसे व स्वतःला सोईस्करपणे पटणारे विचार मनात येऊ लागले. स्वतः शी च बोलणे होत होते. ••••

गॅस बंद करून थोड्या वेळ शांत बसले.

एकदम विचारात बदल कसा काय झाला?? संगतीचा असर का? तरी संगत दुरुनच होती. फक्त फोनवर. तरी एवढा प्रभाव कोणाच्या तरी बोलण्याचा होऊ शकतो का?? मग माझ्या उत्साहपूर्ण दिवसाचे काय?? सर्व मुसळ केरात?? ••••

एकदम दिवस कंटाळवाणा वाटू लागला. थकल्या सारखे वाटू लागले. क्रोकरी वगैरे नकोच, राहू दे. उगीच फूटली तर सेट खराब व्हायचा. ••••

म्हणजे तिच्या म्हणण्याने माझी नकारघंटा सुरू झाली. एकदम विचारांची दिशाच बदलली. •••••

माझी अवस्था मलाच कळत नव्हती. मनात कुठेतरी तरी अस्वस्थता जाणवू लागली. मी हा असा विचार करणे योग्य आहे का??

म्हणतात ना, ••• “संगतीचा असर पडतो. “

हो बरोबर आहे. ती पण तर माझ्या संगतीत तेवढ्याच वेळ होती ना, मग तिला मी प्रभावित का करू शकले नाही.???? •••••

तिचा कंटाळवाणा दिवस उत्साहात मी का बदलू शकले नाही.???? मी पण सांगू शकले असते ना, ••••

अग! नाही, असं अजिबात नाही. वयाप्रमाणे थकवा येतो कधी कधी. नाही असं नाही. पण आजचा दिवस खुप छान उगवला आहे. म्हंटल आनंद घेऊया आज. कधी कधी काही तरी वेगळं असावं ना. आपल्यालाही छान वाटत असे प्रसंग स्वतः च निर्माण करायचे असतात. कशाला वाट बघायची वाढदिवसाची किंवा सणाची. आणि जेवढं पचेल तेवढच खायचं. अग! छान वाटत. स्वतः चीच पाठ थोपटावीशी वाटते. आनंदी दिवसाची वाट बघण्यापेक्षा हातात असलेला क्षण/ दिवस आनंदात कसा घालवता येईल यांचा विचार करावा. •••••

माझ्या अशा बोलण्याने तिच्यात कदाचित बदल झाला असता. बरे असो, ••••

माझ्या आनंदाची किल्ली मी तिला दिली आहे का?? घराची एक extra किल्ली शेजारी नेहमी द्यावी. हे बरोबर आहे पण आपल्या आयुष्याची किल्ली जर दुसऱ्या च्या हातात दिली तर बंदर च्या खेळाप्रमाणे तो डंबरू वाजवणार आणि आपण नाचायचं का?? ••• 

लगेच सर्व मरगळ झटकली. सर्व कंटाळा डिलीट केला. व पुर्वीच्या उत्साह मोड मधे आले. आरशात बघीतल. स्वतः चेच कौतुक केले मनात म्हंटल, ••• 

” अभी तो मैं जवान हूं ” ।••••

व लगेच उत्साहाने कामाला लागले. क्रोकरी काढली. टेबल सजवले. बगीच्यातून गुलाबाची फूल फ्लॉवर पॉट मधे सजवली. प्लेट मधे सर्व वाढले. छान गाणी लावली. फोटो काढला. काही लोकांचा कंटाळा जाऊन उत्साह यावा या उद्देशाने फेस बुक वर फोटो पोस्ट केला. ••••

रोज पेक्षा दोन घास जास्त खाल्ले. ••••

थोड्याच वेळात उत्साही फेस बुक active लोकांचे comments ही आलेच. ••••

* व्वा काकू मस्तच ••••

*Wow!! so tempting ••••

*Great, , Kaku You Rock••••

* मी पण उद्या नक्की करते ••••

*Enjoy Kaku n Kaka 

वाचून छान वाटल. मेहनतीचे चीज झाले, अस वाटल. •••••

मी स्वतः लाच धन्यवाद दिला. छान स्वयंपाक केला, हे कारण तर होतच. पण दुसरं म्हणजे नवीन सूत्र ” Follow yourself ” हे पाळल्या बद्दल. ••••

कोणी काय बोलावे?? काय सांगावे?? यावर आपलं नियंत्रण नसते. पण त्यांचे किती ऐकायचे?? किती नाही?? यावर आपल्याला नियंत्रण नक्की ठेवता येते. ••••

तरीही संगत महत्वाचीच. माझी आई नेहमी म्हणत असे, ••••तुम्ही ज्या प्रकारच्या व्यक्तिंच्या सहवासात राहाता, त्या सर्वांचे एव्हरेज व्यक्तिमत्त्व तुमच घडत जातं. नकळत त्यांचे विचार तुम्हाला पटत जातात. ••••

लोक निंदा करतात तर मी दुःखी होते. ••• लोक स्तुती करतात तर आनंद होतो. •••• म्हणजे माझ्या सुख दुःखाचे बटन दुसऱ्यांच्या हातात आहे का?? बटन आपल्या हातात असावे. स्वतःला जे पटेल तेच करावे. •••••

आत्मविश्वास, हीच आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे ••••

“Say Or Do what you feel. It is not being rude. It is called being real. “

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अबोला” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “अबोला” ☆ श्री मंगेश मधुकर

आमच्यात नेहमीप्रमाणे भांडणं झाली. समोर असताना तर भांडतोच पण फोनवर सुद्धा सुरूच होतं.

“खड्ड्यात जा” मी संतापले.

“तोंड सांभाळ”

“परत थोबाड दाखवू नकोस”

“तुझं नशीब चांगलंय. आत्ता समोर असतीस तर…. ”

“अंगाला हात लावून तर दाखव मग बघ. ” 

“काय करशील”

“फार महागात पडेल. ”मी 

“धमकी!! दिसते तशी नाहीये”

“सेम टू यू”

“आधी डोळे फुटले होते का?”

“मी पण हेच म्हणते. लग्नाची तर फारच घाई झाली होती. ” मी

“तिथंच माती खाल्ली ना”

“मग आता निस्तरायचं”

“अशी वागशील असं वाटलं नव्हतं”

“मलाही.. ”

“तुझ्या घरच्यांनी तर फार कौतुक केलं होतं आणि रियलमध्ये तू तर.. ”

“तू सुद्धा भोळा भाबडा होतास. लग्नानंतर खरे रंग दिसले. तू तर पक्का.. ”मी 

“वाट्टेल ते बोलू नकोस. हजारदा सांगितलंय की बोलताना विचार करत जा. ”

“कसं बोलायचं तू शिकवू नकोस. मी अशीच आहे. जे वाटतं ते बोलणार”

“तेच म्हणतोय. रागाच्या भरात स्वतःवर ताबा ठेवता येत नाही. त्यामुळे नक्की गोत्यात येशील. बोलताना काळजी घे. शब्दांचे वार खूप खोलवर लागतात. ”

“आय डोन्ट केअर. गो टू xx. ”

“पुन्हा तेच. जरा सबुरीनं घे. इतकंही तोडू नकोस की नंतर इच्छा असूनही जोडता येणार नाही”

“बास उगीच ज्ञानाचे डोस देऊ नकोस. यावेळेला चूक तुझी आहे. ”

“दरवेळेला माझीच असती. काहीतरी नवीन सांग. ”

“तेच खरंय!!जरा मनाविरुद्ध झालं की घर डोक्यावर घेतोस. ही घाणेरडी सवय सोड. मग मला शिकव. ”मी.

“हा!!हा!!हा!! घाणेरड्या सवयीबद्दल तू बोलावं हाच फार मोठ्ठा जोक. ”

आमची वादावादी बराच वेळ सुरू होती. मूळ विषयापेक्षा आपला मुद्दा रेटून दुसऱ्याची चूक दाखवणं चाललेलं. नवरा-बायकोच्या भांडणात नेहमी असंच होतं. भांडणाचं फलित म्हणजे अबोला. पंधरा दिवस झाले. एकमेकांशी बोलणं नाही. काही महत्वाचं असेल तर मेसेज करायचो अन्यथा आळी-मिळी गुपचिळी. खरंतर बोलण्याची इच्छा होती पण…. ईगो आडवा येत होता.

… आमचं लव मॅरेज, तीन वर्ष रिलेशनमध्ये होतो. परस्पर विरोधी स्वभाव तरीही प्रेमात पडलो. मी तडकू, संतापी, शिघ्रकोपी, फटकळ, बिनधास्त बोलणं याचं त्याला फार कौतुक अन त्याचा शांत, संयमी, समजून घेण्याचा गुण मला आवडला. घरच्यांच्या परवानगीनं धुमधडाक्यात लग्न केलं. सुरवतीचे गुलाबी दिवस संपल्यावर वास्तवाचे चटके बसायला लागले. ज्या गुणांचे कौतुक होतं तेच वादाचे कारण झाले. सततचे खटके. नंतर नंतर अशी परिस्थिती झाली की बोलणं कमी आणि भांडणं जास्त. मग बोलचाल बंद. कधी एक दिवस तर कधी दोन तर कधी आठ दिवस सुद्धा… अर्थातच मी हट्टी असल्यानं तोच माघार घ्यायचा. स्वतःहून बोलायचा, रुसवा काढायचा मग काही दिवस सगळं सुरळीत व्हायचं पण यावेळेला वेगळंच घडलं. तो गप्प, मी गप्प. घरात विचित्र अशी अस्वस्थता. दूध संपल्याचं निमित्त झालं अन वादावादी सुरू झाली.

.. पुन्हा तू तू मै मै. शब्दाला शब्द लागून आवाज चढले. त्यानं हात उगारला.

मला ते सहन झालं नाही. तिरमिरीत खाडकन त्याच्या तोंडात मारली. दोन चार शिव्या दिल्या.

तो बिथरला. अंगावर धावून आला.

तेव्हा “जा मर” म्हणत जोरात ढकलल्यावर त्याचा तोल गेला. भिंतीवर जोरात डोकं आपटलं आणि…….

त्यानंतर सगळंच बदललं.

बरेच दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. पोलिस चौकशी झाली पण त्यानं सांभाळून घेतलं.

आणि रागाच्या भरात मी चुकीचं वागले. स्वतःचाच खूप राग आला. पश्चाताप होतोय.

.. त्या घटनेचा परिणाम आमच्या नात्यावर झाला.

मी आता पटकन चिडत नाही. मनाविरुद्ध झालं तरी शांत असते. म्हणतात ना, वाईटातून चांगलं निघतं. माझ्याबाबतीत हेच असावं.

तो मात्र एकदम बदलला. आता बोलतच नाही. झाल्या प्रकारानं तो खूप दुखावला गेला. तरीही रिऍक्ट झाला नाही. वरवर शांत दिसत असला तरी मनात प्रचंड वादळ आहे. माझ्याकडे तर बघतही नाही. सतत टाळतो. बोलत नाहीये. फक्त मेसेजद्वारे आमच्यात संवाद होतो. घरात पण अनोळखी प्रवाशासारखं वावरतो. हा ‘अबोला’ फारच जीवघेणा आहे. अनावधाने घडलेल्या प्रकाराबद्दल मी हजारदा माफी मागितली. समेटासाठी प्रयत्न केले. हात जोडले, रडले, विणवण्या केल्या.. परंतु शून्य प्रतिसाद.

संवादच नसल्यानं वाद नाही. आम्ही मनानं खूप लांब गेलोय. —

“ आपण वेगळे होऊ ” त्याचा मेसेज पाहून जबरदस्त धक्का बसला. हे अनपेक्षित आणि सहन करण्यापलीकडलं होतं. प्रकरण या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. मी शंभर टक्के चुकलेच पण त्याचं वागणंही बरोबर नव्हतं.

.. मी बोलायचा प्रयत्न केला पण…. उपयोग झाला नाही. बोलचाल बंद करून तो अपमानाचा बदला घेत होता. खूप वाईट वाटलं पण रागही आला. तो मात्र ढिम्म !! खूप रडले नंतर विचार केला अन मेसेजला उत्तर दिलं – – 

“ जशी तुझी इच्छा ”…

— — माझा राग आणि त्याचा ईगो यामुळे आमच्या नात्याला भलतचं वळण मिळालं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शुक्रवारची सवाष्ण… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

? जीवनरंग ?

☆ शुक्रवारची सवाष्ण… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

जाग आली तरी सकाळ झाल्यासारखं वाटतच नव्हतं. काळ्याभोर ढगांनी आज सूर्यकिरणांना वसुंधरेपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही, असा बहुधा पण केला होता..

रात्रभर एका लयीत बरसणारी संततधार अजूनही तशीच होती..

अशा सर्दकुंद वातावरणात आजिबात उठावसं वाटत नव्हतं..

रजईत स्वत:ला लपेटून दिवसभर तिच्या उबेत पडून रहाता आलं असतं तर मी स्वत:ला सा-या दुनियेतली भाग्यवान समजलं असतं!

पण रोजची कामं थोडीच टाळता येतात..?

मनाविरुद्धच उठले नि कामाला लागले. सकाळची आन्हिकं, चहापाणी, लेकीची शाळेची तयारी, तिचा डबा या धावपळीत वेळ कसा पळून गेला, ते कळलच नाही..

यजमान त्यांच्या कामाला नि लेक शाळेला गेली तशी पायाची चाकं आपोआप विसावली..

घड्याळाकडे नजर गेली. अकरा वाजून गेले होते.. दहाच्या काट्याला हजर होणारी शिल्पा आज अजूनही आली नव्हती.. अर्धा तास उशीर होणार असला तरी फोन करून कळवणा-या शिल्पाकडून तास उलटून गेला तरी काही निरोप नव्हता..

” काय झालं असेल? पावसामुळं उशीर झाला असेल का? की आज बुट्टी मारणार असेल?

नाही, पण न सांगता बुट्टी मारणा-यातली ती नाही.. तिच्यासारखं वर्ककल्चर आजपर्यंत कुणाचं पाहिलं नाही.. “

डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं..

शिल्पा….

माझ्याकडं गेली चार वर्षे केर-फरशी करणारी.. तीस-बत्तीशीची.. फार तर चार फुट दहा-अकरा इंच उंची.. शेलाटा बांधा.. थोडक्यात लहान चण.. काळ्याच्या जवळ जाणारा वर्ण.. तारुण्यातल्या पिटिकांनी आपल्या अस्तित्वाच्या खुणा अजुनही चेह-यावर ठेवलेल्या..

काळेभोर दाट केस.. गुंडाळून मोठ्या पिनेत बांधलेले.. सुळसुळीत साडी.. लाल, निळ्या, पिवळ्या.. अशा कुठल्यातरी डार्क नि फ्रेश रंगातली.. स्वस्तातली, पण स्वच्छ.. चापून चोपून पिना लावून नेसलेली..

खोटच पण छान दिसणारं मंगळसूत्र.. खोटं खड्याचं कानातलं.. हातात दोन प्लास्टिकच्या नि दोन काचेच्या बांगड्या.. चेह-याला ” खारा शेंगदाणा ” करून सोडणारी.. घरचा कारखाना आहे की काय असं वाटायला लावणारी भरघोस पावडर…. ती घरात आली की सा-या घराला सुगंधित करून टाकणारी… नि कपाळावर टिकली..

– – तिची कथा सा-या कामवाल्यांसारखीच..

वडील व्यसनी.. आईनं हॉस्पिटलात धरलेलं काम.. हिला शाळेत घातलेलं.. पण शिक्षणाशी हिचं न जमलेलं.. गाडी कशीबशी सहावीपर्यंत पोहोचून बंद पडली.. आईनं चार घरची काम लावून दिली.. त्यात ही खूश..

…. अठराव्या वर्षी लग्न.. पाठोपाठ झालेले दोन मुलगे.. हिच्या नि त्याच्या वडिलांची परंपरा चालवणारा दारूडा नवरा.. कधीतरी लहर आली तर कामावर जाणारा.. इतरवेळी हिच्यावर पुरुषी हक्क गाजवणारा..

जेमतेम तीन माणसं झोपू शकतील एवढी भाड्याची पत्र्याची खोली… घर नावाची.. ते घर चालवायची जबाबदारी हिचीच.. कारण नव-याच्या मते हिनं पोरांना जन्म दिलेला..

.. थोरला मुलगा पायानं थोडासा अधू नि धाकट्या मुलाच्या हृदयात छिद्र..

तिच्याकडे पाहून वाटायचं….

देव एखाद्याच्या मागे असा का लागतो..?

या जगाच्या रणभुमीवर पाठवताना रित्या हातांनी का पाठवतो..?

रूप, पैसा, बुद्धिमत्ता, चांगलं नशीब.. कुठलेच शस्त्र हाती नसताना हिनं ही आयुष्याची लढाई लढायची कशी..?

मला असं वाटत असलं तरी तिला तसं वाटत नसावं..

तिच्यासाठी तिचे दोन हात नि पाय हीच शस्त्रे होती..

तिने आणखी चार घरची कामे धरली..

खरंतर ती महानगरपालिकेच्या शाळेत मुलांना घालू शकली असती.. पण तिने त्यांना चांगल्या शाळेत घातलं.. पोरं बिघडू नयेत म्हणून तिनं चांगल्या वस्तीत घर घेतलं.. जास्त भाड्याचं नि अजूनच लहान..

…. घरात व्यसनी नवरा असतानाही पोरं बिघडू नयेत म्हणून घर बदलणा-या हिचं मला कौतुक वाटायचं..!!

पोरांना तिनं ट्यूशन लावलेली.. त्यांना सगळ्या स्पर्धा परीक्षांना बसवण्याचा हिचा हट्ट.. पोरंही आईच्या कष्टाचं चीज करणारी..

” वहिनी, अमोल मंथन परीक्षेत दुसरा आला बघा.. ” म्हणत ती माझ्या हातावर पेढा ठेवायची तेंव्हा तिचे नि माझे डोळे भरलेले असायचे..!!

मी तिच्या हातात पोराला बक्षीस म्हणून पाकीट ठेवायचे..

” वहिनी, हे कशाला.. फक्त आशीर्वाद द्या माझ्या पोरांना.. त्यांनी खूप शिकून मोठं व्हावं एवढीच देवाकडं मागणी आहे.. ” म्हणत ती डोळे पुसायची!!

” आता काही शिल्पा येत नाहीत ” म्हणत मी केरसुणी घेतली नि घर झाडायला सुरुवात करणार एवढ्यात दार वाजलं..

” शिल्पा असेल का? “.. नाही.. ती तर दारातूनच जोरानं हाक मारते..

” मग कोण असेल? “..

दार उघडलं..

दारात तीच उभी … ओळखूही न येणारी.. केस विस्कटलेले.. साडी आदलेदिवशीचीच.. चुरगळलेली..

तिने अंघोळ केली नाहीये हे सहज दिसत होतं.. डोळे सुजलेले.. चेहरा सुजलेला.. चेह-यावर जखमा, हातावर लाल वण.. डोळ्याखाली काळं-निळं….

” अगं शिल्पा.. काय झालं, अशी का दिसतेयस? “.. मी दारातच न राहवून विचारलं..

ती उत्तर न देताच आत आली. फरशीवरच बसली नि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.. मी काही न बोलता शेजारच्या खुर्चीवर बसले.

” वहिनी, बाईच्या जन्माला येणं, हे पाप असतं काय हो? माझा नवरा काही करत नाही, पैसे कमवत नाही.. मी सगळं मान्य केलंय. दिवसभर राबून पैसे मिळवते, घर चालवते, मुलांचं करते. माजा पेदाड नवरा रोज दारू पितो, घरी येऊन भांडण करतो.. मारतो.. तरी मी सहन करते. पण काल हद्द झाली. नवरा घरी येताना एका बाईला घेऊन आला. तिचं नि याचं लफडं आहे म्हणे.. तिला घरात ठेवायचं म्हणत होता..

…. मग मात्रं मी भांडले.. मला असं अंगभर मारलं त्यानं.. तेंव्हा मात्रं मला सहन झालं नाही..

सरळ कोप-यातली काठी उचलली नि त्याच्या पाठीत घातली.. ती बाई मधे आली.. तिलाही चार दणके दिले..

नि दोघांना घराबाहेर काढलं.. घराला कुलूप घातलं नि पोरांना घेऊन आईकडं आले..

सकाळी पोलीसस्टेशनला तक्रार नोंदवून आलेय..

घरभाडं मी भरतीय.. नव-याला आता फिरकू द्यायची नाही.. त्याला काडीमोड देऊन टाकते..!!

त्वेषानं ती उठली नि केरसुणी घेऊन कामाला लागली..

दुर्गेच्या रूपातील तिला मी प्रथमच पहात होते..

काम झाल्यावर मी दिलेली चहा-बिस्कीटं खाऊन ती तरातरा निघून गेली…

दुसरा दिवस उजाडला..

श्रावणी शुक्रवार..

पुरण घातलं.. देवीला-लेकीला पुरणानं औक्षण केलं..

पुरणा-वरणाचा स्वयंपाक झाला..

…. “नवरा असणं” या पात्रतेवर एखाद्या महिलेला जेवायला बोलवायचं… नि “नवरा वारला” किंवा ” नव-यापासून दूर राहते “… म्हणून एखादीला टाळायचं.. हे माझ्या पटण्यापलीकडचं… म्हणून 

” सवाष्णजेवण “… माझ्याकडे न होणारं…!!

आज लवकरच लेक नि नवरा घराबाहेर पडले..

” वहिनी “…

रोजच्यासारखी शिल्पाची हाक..

तिला पाहून मी थबकलेच…

जरीची लालबुंद साडी.. केसात शेवंती-अबोलीचा मोठा गजरा.. गळ्यात खोटचं पण मोठं गळ्यातलं..

कानात मोठे झुबे.. हातभर बांगड्या नि दोन्ही हातांना लालचुटुक रंगलेली मेंदी… चेह-यावर भरपूर पावडर नि त्यातून डोकावणारं नेहमीसारखं मोठं हास्य.. कपाळावर मोठी लालबुंद टिकली..

…. कालचं ते नि आजचं हे रूप..

माझं डोकच बधीर झालेलं..

” वहिनी, आज लग्नाचा वाढदिवस माझ्या.. “

” अगं पण काल तुझ्या नव-यानं तुला मारलं, दुसरी बाई घेऊन आला.. तू त्याला काडीमोड देणार म्हणालीस.. आणि आज लग्नाचा वाढदिवस म्हणून एवढी सजून आलीस? नवरा परत आला वाटतं? “

” नाही हो वहिनी… नव-यापाशी मी काय आता नांदत नाही. पण म्हणून मी आजचा दिवस दु:खात का घालवू.. याच दिवशी माझं लग्न झालं.. नवरा बेकार निघाला म्हणून काय झालं.. या दिवसामुळं मला माझी दोन पोरं.. माझे काळजाचे तुकडे मिळाले.. मला जगण्याचं कारण मिळालं.. नाहीतर माझ्या जगण्याला काय अर्थ होता? म्हणून हा दिवस मी दरवर्षी साजरा करते.. आणि पुढेही करणार.. चांगलं धरायचं नि वाईट सोडून द्यायचं.. एवढच कळतं बघा मला.. “

हे ऐकून मी थक्क झाले..

” सकारात्मक कसं जगावं “.. असली कुठलीही पुस्तकं काय ” सकारात्मकता ” हा शब्दही न ऐकलेल्या हिला हे एवढं मोठं तत्त्वज्ञान कुणी शिकवलं?

– – आणि डोक्यातली ट्यूबलाईट पेटली..

देवानं हिला रित्या हातांनी नि रित्या नशीबाने पाठवलं असा माझा देवावर आरोप होता..

 तिला परमेश्वराकडून मिळालेला हा ” सकारात्मक” तेचा खजिना मला आज दिसला.. जो इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोलाचा होता..

” आज माझ्याकडे शुक्रवारची.. जिवतीची सवाष्ण म्हणून जेवशील? “…

नवरा नसतानाही पोटच्या अंकुरांना सर्वस्व मानून त्यांच्यासाठी आपलं आयुष्य आनंदाने झिजवणा-या या ” सवाष्णीला ” माझ्या मुखातून त्या ” जिवती ” नंच जेवणाचं आमंत्रण दिलं असावं…!!

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भयभीत… भाग-२ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ भयभीत… भाग-२ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सुश्री गिरिमा घारेखान

(मागील भागात आपण पाहिले – वैदेहीने बटाट्याचे छोटे छोटे काप करत म्हंटलं. ‘‘ओह गॉड ! किती सुंदर आहे. तुझ्यासारखाच गोरा. गोलमटोल. हात-पाय हलवतोय. वाटलं, त्याला उचलून घ्यावं!’

‘मग असं मूल कोण सोडून गेलं असेल?’ विराजलाही आता बातमीत रुची निर्माण होऊ लागली होती.) आता इथून पुढे….

‘कुणास ठाऊक? त्याच्या आईने कसं धाडस केलं असेल? त्याचा बाप सापडला पाहिजे. तुम्हा पुरुषांचा जुलूम काय कमी असतो?’ वैदेही तेलात कढिलिंब टाकत म्हणाली.

‘पण आशा तर्‍हेने मुलाला सोडून जाण्यामुळे काय बाप पकडला जाईल?’ विराज म्हणाला, पण त्याचा आवाज कापत होता. चेहर्‍यावरील भाव वैदेहीच्या नजरेस पडू नयेत,

म्हणून तो स्वैपाकघराच्या बाहेर आला. वैदेही दोघांच्या नाश्त्याच्या प्लेटस घेऊन बाहेर आली.

विराजला आज बटाटे पोहे चांगले लागले नाहीत पण त्याने खाल्ले नसते, तर वैदेहीचा हजार प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं, म्हणून मग तो एकेक चमचा पोहे तोंडात घालू लागला.

श्री राजेंद्र निगम

वैदेही तर खाता खाताही बोलत होती.

‘विराज, तो नक्कीच पकडला जाईल. त्या मुलापाशी ठेवलेल्या थैलीत, दुधाच्या पावडरचा डबा, दूध पाजायची बाटली आणि एक चिठ्ठीही आहे. ‘

‘चिठ्ठी’ विराजने तोंडात घातलेले पोहे बाहेर येऊ लागले.

‘ चिठ्ठीत लिहलय, की या मुलाचा बाप याच सोसायतीत रहातो. उद्यापर्यंत त्याने या मुलाला नाही नेलं, तर त्याची आई पोलिसात तक्रार करेल आणि खटला भरून त्याची बदनामी करेल. पण जर कुणी आजच पोलिसांकडे तक्रार केली, आणि त्या बाळाला पोलिसांच्या हवाली केलं, तर ती या सोसायटीच्या मधे उभी राहून स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करेल. ‘

‘ओह गॉड!’ विराज नाश्ता खाली ठेवून उभा राहिला. ‘आता उद्या काय होईल, ते होईल. मी तर ऑफिसमध्ये असेन….!‘ विराज स्वत:शीच म्हणाला.

वैदेहीला उभं राहता राहता एकदम आठवण झाली, ‘ बाबांनी काही महत्वाची कागदपत्रे कुरियर केली आहेत. उद्यापर्यंत कुरियर यायला हवे. उद्या तू वर्क फ्रॉम होम करशील?’ ती म्हणाली.

विराजने काही उत्तर दिले नाही. तो बाथरूममध्ये घुसला.

‘वर्क फ्राम होम’पासूनच ही झंझट सुरू झाली होती. त्यावेळी काही कारणाने विराज घरून काम करत होता. त्यांची कामवाली सकाळीच काम करून निघून जायची. वैदेही बोलबोलता बोलून गेली, ‘आता साहेब घरूनच काम करणार आहेत. ’ म्हणून मग गावाकडून आलेली तिची धाकटी बहीण पन्नाला ती दुपारचं काम करण्यासाठी पाठवू लागली.

: पन्ना सुंदर होती. चंचल होती. गावाकडून शहरात आल्याने सवाई शहरी दाखवण्याचा प्रयत्न करत होती. कॉँप्यूटरवर काम करणार्‍या या साहेबांसमोर वटवट करायला तिला खूप आवडे. साहेब काय करताहेत, ते बघण्यासाठी ती त्यांच्या खुर्चीच्या अगदी जवळ जाऊन उभी राही. मग ती कॉँप्यूटरच्या अगदी जवळ आपला चेहरा आणी. मग एक दिवस कॉँप्यूटर एका बाजूलाच राहिला. दुसरीच खिडकी उघडली. यात विराजची कुठलीच जबरदस्ती नव्हती. उलट असं वाटत होतं की पन्नाच जणू समर्पित होण्यासाठी आली आहे आणि एक दिवस खरोखरच पन्नाने जबरदस्ती केली.

एका रविवारी संध्याकाळी वैदेही भाजी आणायला गेली होती. त्यावेळी पन्ना तिथे आली आणि धमकावणीच्या सुरात म्हणाली,

‘सा’ब, म्हारा पेट में थारु छोरो है, इसका क्या करना है ?’

विराज घाबरला. असं काही होईल, याचा त्याने विचारही केला नव्हता. त्यानंतर पन्नाने आपले मोठे मोठे डोळे आणखीनच मोठे करत आणि आपले हात त्याच्यापुढे पसरत म्हंटलं, ‘तू असं समजू नकोस, की मी अडाणी आहे. मला सगळं माहीत आहे. टाकीन त्याला तुझ्या घरी. अजून तरी मी माझ्या बहिणीला तुमचं नाव सांगितलेलं नाही. दोन दिवसांनंतर येईन. पाच लाख रुपये तयार ठेवा…. नाही तर… ’

विराटच्या लक्षात आलं, हिचा ‘बोलवता धनी’ कुणी वेगळाच आहे. तो काहीसा घाबरला. पण कुठल्या तरी खेडवळ मुलीने त्याला मूर्ख बनवून अशा तर्‍हेने पाच लाख रुपये

मागितले, तर काय द्यायचे? या सगळ्या घडलेल्या घटनेत त्याचा दोष काहीच नव्हता. ती मुलगीच गळ्यात पडली होती आणि ते मूलही याचंच असेल, यावर विश्वास तरी कसा

ठेवायचा? तिच्या पोटात मूल असेल, हे तरी खरं कसं मानायचं? केवळ धमकी देऊन पैसे लुबाडायला बघतेय.

विराटने ‘कर जा तुला काय करायचं असेल ते’, असं म्हणून तिला पळवून लावलं, पण आता हे संकट खरोखरच दरवाजाशी येऊन ठेपलं. आता गावाकडची माणसेसुद्धा खूप हुशार झालीत. तिने आणि तिच्या साथीदाराने जे शक्य होतं, ते केलं. आता?

विराटला आता त्याचं प्रमोशन आणि नोकरी हातातून निसटताना दिसली. वैदेही आणि सगळे नातेवाईक आणि त्याचे मित्र त्याच्यावर थू…. थू… करताना दिसू लागले. वैदेहीच्या

वडलांची करोडोंची संपत्ती हवेत उडताना दिसू लागली. याच्या तोंडातून पुन्हा पोहे बाहेर पडले. तो बेसीनपाशी पळाला.

***

सौमिल आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीचा दरवाजा कधीच उघडत नसे. त्याच्या खालीच कचरापेटी होती. त्याचा दुर्गंध बाल्कनीपर्यंत पोचायचा. त्याचे आई-वडील एकदा त्याचं घर

बघायला तिथे आले होते. तेव्हा, आईला काही ते घर आवडलं नाही, पण बाबा म्हणाले, ‘सगळ्या परिस्थितीशी तडजोड करता आली पाहिजे. जीआरई क्लिअर करून तो यूएसला जाईल, तेव्हा तिथे एकाच फ्लॅट मधे तीन-चार जणांना एकत्र राहावं लागतं. वडील डॉक्टर आहेत आणि आई शाळेत प्रिंसिपल आहे, तर त्यालाही काही तरी करून दाखवायला हवं ना! संघर्षाशिवाय काहीच हाती लागत नाही. ’

‘हो. मला खात्री आहे, सौमिल आपला नावलौकिक वाढवेल. ’ सौमिलच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली. सौमिलदेखील मन लावून जीआरईची तयारी करत होता. त्याच्या क्लाससाठीच तो या शहरात आला होता. दोन दिवसांवर परीक्षा आली होती, म्हणून तो अभ्यासासाठी लवकर उठला होता.

आज मागच्या बाजूच्या बाजूने खूपच गडबड ऐकू येत होती. वाटत होतं, सगळी सोसायटी तिथे जमा झालीय. सौमिललाही राहवलं नाही. त्याने बाल्कनीचा दरवाजा उघडून

नजर खाली फिरवली. त्यांचा वॉचमन एका लहान बाळाला घेऊन उभा होता. खालच्या मावशी म्हणत होत्या, ‘आजच्या दिवस तूच लक्ष ठेव. गरज लागली, तर आम्हाला बोलाव.

बघूयात त्या नालायकाच्या हृदयात राम जागतो का ते?’

दुसरी काकू म्हणाली, ‘आमच्या घरासमोर कुणी अभागिनीने अग्निस्नान केलं तर आम्हाला पाप लागेल. आजच्या दिवस सांभाळ त्याला!’

वॉचमन बाळाला घेऊन निघून गेला. पण बायकांच्या तिथे चाललेल्या चर्चेवरून सौमिलला सगळी गोष्ट कळली. त्याने बाल्कनीचा दरवाजा बंद केला आणि तो आत आला.

कॉफी बनवली. घेतली आणि पुस्तक हातात घेतलं, पण त्यात छापलेल्या काळ्या अक्षरांच्या जागी त्याला लीनाचे अश्रूभरले काळे डोळेच दिसू लागले. सौमिलने तिला खूप समजावलं होतं, ‘एकदा चूक झाली, पण तीच धरून बसून कसं चालेल? चूक सुधारून पुढे जाऊयात. ’ त्याने तिला व्यावहारिक बनायला सांगितलं.

‘जीआरई क्लिअर करून मी अमेरिकेला जाईन. या वेळी लग्न करून मी काय इतक्या लहान वयात बाप बनू? मग माझ्या करियरचं काय? चल. उद्याच कुठल्या तरी चांगल्या

गायनॅकला भेटू’ पण लीना काही हे सगळं समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ती प्रेमाचंच गीत आळवत होती.

‘तुझ्या करियरसाठी मी काय माझ्या मुलाला मारून टाकू? मला वडील नसतील, पण माझ्या आईचं मला पूर्ण सहकार्य आहे. ती म्हणते, ’ तू तुझ्या बाळाला जन्म दे, मग आपण

त्याच्या बापाचं नाव उजेडात आणू. बघुयातच लग्न कसं करत नाही ते! ते डॉक्टर आणि प्रिन्सिपलही आपल्या मुलाचा पराक्रम बघू देत. ’

अशा प्रकारे ते लोक त्याला उघडं पाडणार होते.

सौमिल विचार करत राहिला. दिवसभरात तो आजिबात अभ्यास करू शकला नाही.

***

दुसर्‍या दिवशी सोसायटीत गरमागरम बातमी पसरली.

वॉचमनने रात्री त्या बाळाला आपल्या केबिनमध्ये झोपवले होते आणि तो बाहेर खुर्चीवर बसला होता. तो रात्री बाथरूमला गेला, तेवढ्या वेळात कुणी तरी येऊन त्या बाळाला

घेऊन गेले. सोसायतीतल्या सगळ्याच बायकांना अतिशय दु:ख झाले. हां. एक वॉचमन तेवढा खूश होता. एका बाळाला अनाथाश्रमात सोडून येण्यासाठी भली मोठी रक्कम, —- — तीही तीन तीन लोकांनी द्यावी?

— समाप्त — 

मूळ गुजराती कथा – फफडाट 

मूळ लेखिका : गिरिमा घारेखान, मो. 8980205909.

हिंदी अनुवाद : भयभीत अनुवादक राजेन्द्र निगम, मो. 9374978556

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भयभीत… भाग-१ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ भयभीत… भाग-१ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

डोअर बेलचा आवाज आला आणि संतोष गाढ झोपेतून उठला.

दर शनिवारपणे कालही त्याला घरी यायला उशीर झाला होता. उद्या रविवार. आरामात झोपेन, असा विचार करून, तो निवांतपणे झोपला होता. पण एवढ्यात कुणी तरी याला उठवलं होतं.

सुश्री गिरिमा घारेखान

संतोषने घड्याळ पाहीलं. साडे सात वाजले होते. खूप काही लवकर उठावं लागलं नव्हतं. आत्ता कोण आलं असेल? आणि रंजना का दार उघडत नाहीये?

‘उघडेल रंजना दार’, असा विचार करत तो काही वेळ तसाच पडून राहिला. डोअर बेलचा आवाज चालूच राहिला आणि रंजना येण्याची काही चिन्हे दिसेनात. मग त्याने विचार केला, कदाचित बाथरूममध्ये असेल. त्यामुळे संतोषला उठावच लागलं. खिन्न स्वरात त्याने विचारलं, ‘कोण आहे?’ त्याने दरवाजा उघडला, तर समोर रंजनाच होती.

श्री राजेंद्र निगम

‘तू आत्ता यावेळी कुठे जाऊन आलीस? आणि किल्ली घेऊन का गेली नाहीस? तुला माहीत आहे ना, मी रविवारी उशिरा उठतो. ’ तो रंजनाला फटकारत म्हणाला.

आशा परिस्थितीत नेहमी टोमणे मारणारी रंजना… पण यावेळी त्याच्या संतापाचा काहीही परिणाम झाला नाही. तिच्या चेहर्‍यावर एक वेगळ्याच प्रकारची उत्तेजना होती.

‘झोप… झोप… काय करतोस? आता मी जे बोलतेय, ते ऐकलस, की तुझी सगळी झोप छूमंतर होऊन जाईल…

‘असं काय झालय?’

रंजनाचा या वेळचा मूड संतोषला काही वेगळ्याच प्रकाराचा वाटला.

घरात ती दोघेच फक्त होती, पण ती इतक्या हळू आवाजात पुटपुटत होती, की जशी काही ती त्याच्या कानातच सांगते आहे.

‘अरे, आपल्या सोसायटीच्या कचरापेटीच्या जवळ कुणी तरी लहान मुलाला दुपट्यात गुंडाळून ठेवलय. किती सुंदर बाळ आहे. तुझ्यासारखेच मोठे मोठे डोळे, गोरा रंग आणि बाळसेदार शरीर. आपला रजत जेव्हा छोटा होता ना, तेव्हा जसा दिसायचा ना, तसाच दिसतोय अगदी. ‘

संतोष डोळे विस्फारून ऐकत होता.

असा मुलगा कोण सोडून गेलं असेल?…. ती?……

त्याच्या पोटात गुरगुरू लागलं. डोक्यात महिन्यांचा हिशेब होऊ लागला. कानात त्याची सेक्रेटरी पूर्वी चावडाचे शब्द गुणगुणू लागले, ‘संतोषसर, आपण मला धोका दिलात. पत्नीला घटस्फोट देऊन आपण माझ्याशी लग्न कराल, असं मला आश्वासनाचं गाजर दाखवून, आपण मला वापरत राहिलात आणि आता म्हणताय, हे शक्य नाही. ऑफिस सुटल्यावर जादा कामाच्या निमित्ताने आपण मला थांबवून घेत होतात. त्यावेळी आपल्या इज्जतीला डाग लागत नव्हता. आता समाज आणि इज्जतीच्या गोष्टी करताय.

आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमधून कोरा चेक काढून संतोषने तिच्यापुढे ठेवला.

‘घे! लाख… दोन लाख… किती पसे पाहिजेत तुला? तू स्वत: तेवढी रक्कम यात भर.

 पूर्वीने त्याच्या जवळचा चेक ओढून घेतला आणि त्याचे तुकडे तुकडे करून हवेत उधळून टाकले.

‘मला जर पैसेच हवे असते, तर वेळोवेळी मी तुझ्याकडून मोठमोठ्या रकमा उकळल्या असत्या. पण ही पूर्वी चावड़ा काही बाजारबसवी बाई नाही. तू मला ओळखलं नाहीस. मी हे मूल पाडून टाकणार नाही. त्याला जन्माला घालून तुझ्या डोक्यावर आणून बसवीन. बघू, त्याला कसा ठेवून घेत नाहीस ते!’

तिचं हे रूप पाहून संतोष काहीसा घाबरला. तरीही रुबाब दाखवत त्याने शेवटचा प्रयत्न केला, ‘जा. जा. काय करशील? मूल काय कपाळावर बापाचं नाव लिहून घेऊन जन्माला येणार आहे?’ 

पूर्वी तिरस्कारपूर्वक हसली. मग एकेका शब्दावर जोर देत म्हणाली, ‘डीएनए अशी काही टेस्ट असते, माहीत आहे नं? त्या टेस्टमध्ये तू बाप शाबीत होशील. मग कपाळावर नाव लिहिण्याची गरज उरणार नाही. ’ 

त्याच्या पोटात गडबडल्यासारखं झालं. त्याने आपली बाजू सावरायचा प्रयत्न केला. ज्या कुशलतेने पूर्वी तो तिला पटवायचा, तसाच हावभाव करत तो तिच्याजवळ गेला मधात घोळवलेल्या आवाजाने म्हणाला, ‘ अजूनही उशीर झालेला नाही. कशाला आपलं दोघांचंही जीवन बरबाद करतेस? मी तुझ्यासाठी चांगल्यातला चांगला डॉक्टर शोधतो. करून टाक अ‍ॅबॉर्शन!’ मग संतोष तिच्या खांद्यावर हात ठेवू लागला. पण तिचं डोकं आधीपासूनच फिरलेलं होतं.

‘खबरदार, मला हात लावलास तर! तुझ्या घराबाहेर ठेवून जाईन. मग सांभाळा आपला पिंड. ’

संतापाने लाली-लाल झालेली पूर्वी तिथून निघून गेली.

मग काय ते मूल पूर्वीने ठेवले असेल?

संतोष भयभीत झाला. कुठे आणि कसे फसलो आपण? त्याला वाटू लागलं. पण लगेचच त्याच्या मनात दुसरा विचार आला, ‘आशा तर्‍हेने ठेवल्यावर आपण त्याला सभाळू असं कसं वाटलं तिला? मूर्ख कुठली! ‘

‘कसला विचार करताय?’ रंजनाच्या बोलण्याने त्याची तंद्री तुटली.

‘अं… नाही… नाही… काही नाही… मी विचार करतोय, त्या मुलाचं काय होणार? पोलिसांना फोन केला?’

‘अरे, त्याच्या आईने सगळा विचार करूनच त्याला इथे ठेवले असेल ना ! असं झालं की आपला वॉचमन…. ’

संतोषला वाटलं, त्याच्या पोटात काल घेतलेली व्हिस्की अजूनही फिरते आहे. त्याला घराबाहेर पोलीस उभे असलले दिसले. घर सोडून जाणारी रंजना दिसली. तिरस्काराने बघत जाणारा रजत दिसला. त्याला वाटलं आपण रंजनासमोर फार काळ उभं राहू शकणार नाही. ‘मी आंघोळ करून येतो’ असं म्हणत तो अशा घाईने बाथरूममध्ये घुसला, जसा काही सगळ्या गोष्टी आंघोळ करताना पाण्याबरोबर वाहवून टाकील. रंजनाला वाटलं, सगळं सांगून झाल्याशिवाय तिला स्वस्थता लाभणार नाही. बाथरूमच्या बाहेर उभं राहून तिने बाकीच्या गोष्टी सांगितल्या. उधाणलेल्या मनाला थंड करण्यासाठी संतोष शरीरावर थंड पाणी घालत राहिला.

 ***

विराजचं वर्तमानपत्र वाचून झालं, पण अजूनही वैदेहीचा ‘नाश्ता तयार आहे. ये लवकर, ‘ असा आवाज ऐकू आला नाही, म्हणून तो उठला आणि स्वैपाकघरात गेला. वैदेही तिथे नव्हती. बाथरूममध्येही नव्हती. रविवारी सकाळी सकाळी ही कुठे गेली असेल? आठवडाभराच्या भाज्या आणायला तर संध्याकाळी जाते. मग?

 विराज बेचैन होऊन विचार करू लागला. त्याला भूक लागली होती आणि स्वैपाकघरात फक्त भिजवलेले पोहे दिसत होते. वैदेहीचा मोबाईलही ओट्यावर दिसत होता. ‘कुणाचा फोन आला असेल, म्हणून ती सगळं टाकून तशीच पळत गेली. ’ विराजला काहीच कळलं नाही.

बाल्कनीमध्ये जाऊन खाली बघण्याचा विराज विचार करत होता, एवढ्यात वैदेही आली. विराजची भुकेची व्याकुळता त्याच्या शब्दातून प्रगट होत होती. ‘अशा तर्‍हेने न सांगता कुठे गेली होतीस? दरवाजाही उघडा होता. ’

‘तू आंघोळीला गेला होतास आणि बातमीच अशी होती, की ती ऐकताच मी धावतच सुटले. ’ वैदेहीच्या बोलण्यात एक प्रकारची उत्तेजना होती.

‘पण बातमी काय होती? आणि बायकांच्या असल्या गावगप्पात तुला कधीपासून रस वाटू लागला की तू अगदी धावत-पळत गेलीस?’

विराजला अजूनही आश्चर्य वाटत होतं.

‘गावगप्पा नाहीत विराज ही हकीकत आहे. आपल्या सोसायटीच्या कचरापेटीजवळ एक लहान बाळ पडलय. ’ वैदेहीने बटाट्याचे छोटे छोटे काप करत म्हंटलं. ‘‘ओह गॉड ! किती सुंदर आहे. तुझ्यासारखाच गोरा. गोलमटोल. हात-पाय हलवतोय. वाटलं, त्याला उचलून घ्यावं!’ 

‘मग असं मूल कोण सोडून गेलं असेल?’ विराजलाही आता बातमीत रुची निर्माण होऊ लागली होती.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ गुजराती कथा – फफडाट 

मूळ लेखिका : गिरिमा घारेखान, मो. 8980205909.

हिंदी अनुवाद : भयभीत अनुवादक राजेन्द्र निगम, मो. 9374978556

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“Life is a game of chess. You cannot undo the moves but you can make the next move better.”•••

काही दिवसांपासून अजय खूप शांत शांत होता. नेहमी प्रमाणे गप्पा नव्हत्या. त्याला शांत बघायची सवयच नाही. अनिताने शेवटी विचारलेच, •••••

काय झाले? बर वाटत नाहीये का?? की आॅफिसचे टेंशन?? ••••

अजय म्हणाला, •••• तसं काही नाही ग. काल परागला अचानक भारतात जावे लागले. त्याच्या बाबांना बरं नाहिये म्हणून. हे ऐकून मला पण आई बाबांची आठवण येतेय. आता दोघांचे वय झालंय. या तीन वर्षांपासून आपण भारतात जाऊ शकलो नाही. फक्त फोनवर काय तेवढं बोलण होत. तेही आई बरोबरच. बाबांबरोबर तर तेवढंही बोलण होत नाही. मला खूप अपराधी असल्यासारखे वाटतंय. बाबांबरोबर मोकळेपणाने कधी बोलल्याचे आठवतच नाही. प्रत्त्येक वेळी असंच होतं. बाबांच्या मनातही बऱ्याच गोष्टी असतील ना. कधी त्यांच्या मनातलं समजायचा प्रयत्नच केला नाही. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार, प्रश्न, पैशाचे प्रोब्लेम, आॅफिसचे टेंशन, त्यांना पण कधी ‘बरं वाटतं नाहिये ‘असं झालं असेलच ना. आता नोकरी केल्यानंतर मला कळतंय किती कठीण काम आहे हे. त्यांनी कसे मॅनेज केले असेल??? . माझे व ताईचे कॉलेज शिक्षण साधारण एकाच वेळेस झाले. जेमतेम मिडिल क्लास परिस्थिती, बाबा एकटेच कमविणारे, घरी आई सर्व छान सांभाळत होती. पण बाबा नेहमी मागेच राहिले. त्यांच्याही काही इच्छा असतीलच ना. •••

अग, आई नेहमीच महत्वाची पण बाबांना का विसरलो मी??? . •••••

आईने नऊ महिने पोटात सांभाळले. घरही छान सांभाळले, बाबांनी पण कष्ट केले. नोकरी केली. पैसे कमविले. स्वतः ला मागे ठेवून घराच्या, मुलांच्या आवश्यकता पूर्ण केल्या. मला पंचवीस वर्षे सांभाळले. आपल्या परिस्थिती च्या बाहेर जाऊन अमेरिकेला जायची माझी इच्छा पूर्ण केली. ••••

‘ बाबा म्हणजे पाठीचा कणा. ‘ म्हणून मागे राहून घराला आधार देत होते का?? पण मी त्यांना का समजू शकलो नाही.??? त्यांनी आपल्या किती तरी इच्छा मागे ठेवून आमचं ऐकलं. ••••

मागे आपण भारतात गेलो, तेंव्हा मी आपल्या मित्रांना जास्त वेळ दिला. आई बाबांनी काही सूचना पण दिल्या होत्या. आई म्हणाली होती, •••”अरे, कुलकर्णी काकांना भेटून ये. त्यांना बरं नसतं आता. तुझी आठवण नेहमी काढतात. ” •••

आईला आपल्या घरी भजन करायचे होते. तिला आपल्या सूनेला मैत्रिणींना दाखवायचे होते. आपण शेजारच्या लोकांना भेटावे, असे तिची इच्छा होती. एकदा सर्वांना घरी बोलवायचे ठरविले होते तिने. पण तेही जमले नाहीच. आई बोलून तरी दाखवते, बाबा मात्र शांत असतात म्हणजे दिसतात. ••••

किती छोट्या अपेक्षा होत्या त्यांच्या आपल्या कडून. पण त्याही आपण पूर्ण करत नाही. काही ही विरोध न करता, तक्रार न करता, आपल्या मनाची सहज समजूत घालतात. याउलट आपल्या येण्याची जय्यत तयारी करून ठेवतात. ••••

आता यावेळेस आपण गेलो की पूर्ण वेळ आई बाबांनाच द्यायचा. काही दिवस घरी राहून, तू तुझ्या आई बाबांना भेटायला जा. तेथे रहा. नंतर मी येईनच. त्यांच्या लहान सहान इच्छा पूर्ण करायच्या. त्यांची सर्व कामे मार्गी लावायची. मेडिकल चेक अप, घरातील आवरासावर, ठरवून सगळी कामं करून‌ येऊ. त्यांच्या वयाप्रमाणे, सवयीनुसार घरात काही बदल करुन घेऊ. •••••

यावेळेस अजय अनिताचा ‘ India Visit Plan ‘ ठरला होता. फक्त घर, आई बाबा, मुख्य म्हणजे यावेळेस तो बाबांना वेळ देणार होता. बाबांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार होता. मला तुमच्या बद्दल काय वाटतं?? तुम्ही आमच्याकरिता जे काही केले, त्याबद्दल तो धन्यवाद म्हणणार होता. त्यांना मिठी मारणार होता. त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार होता. पेंडिंग कामं पूर्ण करणार होता. ••••

बरोबर आहे, •••••

” Your best teacher is your last mistake. ” 

म्हणतात ना, ••••

” रिश्ते निभाने के लिए बुद्धि नहीं, दिल की शुद्धि होनी चाहिए ।”••••••

येथे आई बाबा दोघेही अजय अनिता येणार म्हणून खूप आनंदात आहेत. ••••

आई. बाबांना म्हणाली, ••••• 

यावेळेस आपण आपल्या कडून काही सांगायचे नाही, •••काही काम सांगायची नाही. •••याला भेटा, •• त्यांना फोन करा ••असं काही म्हणायचे नाही. •• एकतर मुलांना वेळ कमी असतो. ••त्यांचे काही कार्यक्रम ठरलेले असतात. •• खरेदी असते, •• ‘ वैशाली ‘ मधे सर्व मित्र जमतात, •• धमाल करतात. एकदा का पुन्हा परत अमेरिकेत गेले की त्यांना तरी कुठे वेळ मिळतो??? . आॅफिसचे काम, घरचे काम सर्व त्यांनाच तर करायचे असते. ••••

आपण सर्व साहित्य घरी आणून ठेवूया. त्यांना जेंव्हा वेळ असेल, ते जे म्हणतील तेवढं करायचे. सामान काय नंतर ही वापरता येते. मी त्या वेळेस भजनाला वगैरे काही जाणार नाही. आपण घरातच असायला हवे नाही का?? ••••

असे आईने ठरवूनच ठेवले. •••

आई बाबांना म्हणाली, ••••अहो, तुम्ही घरी घालायला काही नवीन कपडे घेऊन या. , नवीन टॉवेल, टॉयलेट पेपर, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, अशी आईंने लिस्टच बाबांना दिली. अजय अनिताची खोली स्वच्छ करून ठेवली. एअरपोर्ट वर जायला टॅक्सी व नंतर ही येथे फिरायला टॅक्सी ड्रायव्हर बरोबर बोलून ठेवले. ••••

आईने मावशींकडून फराळाचे सर्व पदार्थ तयार करून घेतले. दिवाळीची सर्व तयारी हळूहळू सुरू केली. ••••

यावेळेस अजय अनिताला काय द्यायचे?? या विचारात आई होतीच, तेंव्हा बाबा म्हणाले, •••• अगं! काही ‘ fixed deposit ‘ आहेत ते, या महिन्यात मॅच्युअर होतील. तेंव्हा तुला काय द्यायचे असेल ते दे. काही प्रश्न नाही. आई ने अगदी दोन पाकिट तयार करूनच ठेवली. ••••

दोघेही एकमेकांना भेटायची आतुरतेने वाट बघत होते. यावेळेस दोघांचा ‘ माइंडसेट ‘मात्र वेगळाच होता. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच साजरी झाली. दोन्हीकडून एकमेकांना समजण्याचा, काळजी घेण्याचा प्रयत्न होता. आईने घरी भजन ठेवले. सुनेची ओळख करून दिली. अमेरिकेतुन आणलेले चॉकलेट व केसरची छोटी डबी सर्वांना दिली. •• शेजारच्या सर्वांना एकत्र बोलावून अजय अनिता शी ओळख करून दिली. ••• छान पार्टीच केली. अजय अनिता ओळखीच्या काका काकूंना भेटून आले. •••आई बाबांना जेथे एकटं जाण जमतं नाही, तेथे टॅक्सी ने घेऊन गेले. ••• अजयने आईच्या हातचे सर्व पदार्थ खाल्ले. लहानपणी खाल्लेल्या काही पदार्थांची डिमांड केली. ••• अजयने बाबांसाठी T shirts आणले. •• जाताना मला हे सर्व न्यायचे आहे असं म्हणून एक लिस्ट आईच्या हातात दिली. ••••

आईसाहेबांचा उत्साह तर बघण्यासारखा होता. •••

यावेळेस बाबा व अजयला गप्पा मारताना बघून आई चे डोळे सारखे भरून येत होते. हे आनंदाश्रु ती पदराने पुसत होती. मनोमन देवाचे आभार मानत होती. ••••

अजय बाबांना त्यांच्या नोकरी बद्दल, तुम्ही पैशाची गुंतवणूक कसे करत होता?? त्यावेळचे आॉफिस कल्चर कसे होते.??? एकंदरीत बाबांना बोलतं करत होता. त्यांचे मन समजायचा प्रयत्न करत होता. •••

कुठे तरी अजयला समाधान मिळत होत. बाबा पण खूप खुश होते. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच पार पडली. बाहेरच्या दिव्यांच्या प्रकाशापेक्षा, प्रत्येकाचे अंतर्मनात जास्त प्रकाश होता. मन उजळून निघाले होते. ••••

लहानपणी रस्ता पार करताना एक नियम शिकवला होता. ” थोडं थांबा, डावीकडे बघा मग उजवीकडे बघा, मग पुन्हा डावीकडे बघून रस्ता पार करा” ••••

खरंय, हाच नियम आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर पाळावा, सुसाट धावताना, थोडं थांबावं, काही राहिलं का?? द्यायचे?? घ्यायचे?? बोलायचे?? याचा विचार करावा. वेळेवर मन हलके करून टाकावे. म्हणजे पूढे पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही. ••••

म्हणतात ना, ••••

” Life is a game of chess. You cannot undo the moves but you can play the next move better. ” •••

” इतरांच्या आनंदासाठी केलेला प्रयत्न स्वतःचा आनंद द्विगुणित करतो. ” ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोघे… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ दोघे… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“ अग पाणी देतेस का? आणि चहा पण टाक, ”.. पेपरमधलं डोकं बाहेर काढत विनयरावांनी ऑर्डर सोडली खरी आणि आपले कान स्वयंपाक घराच्या दिशेला टवकारले,..

नेहमीच्या अपेक्षेप्रमाणे तिकडून सिक्सर आलाच,.. “ तुमच्या हातांना काय मेहंदी लागली आहे का?? मी कामात आहे,.. मलाच तुम्ही केला तर चहा मिळेल, ”.. बायकोच्या या वाक्यावर मिश्किल हसत विनयराव आत गेले,.. गाणं गुणगुणत चहाच आधण चढलं,.. हाताने पाणी घेऊन ते पिताना ते म्हणाले, “ठाऊक होतेच आम्हास आपण नेहमीप्रमाणे आमच्याच हातचा चहा पिणार,.. “.. बायको काही बोलणार तेवढ्यात कामवाली रमा आत आली. अगदी जुनी कामवाली,..

 विनयरावांच्या मागेपुढेच लग्न झालेलं असेल,.. पलीकडच्या कासार गल्लीतल्या कमलीची सुन,.. त्याकाळातही चांगलं शिक्षण असुन परिस्थितीमुळे गरिबाशी लग्न झालं,.. लग्न झाल्याबरोबर कमलीने सोबत कामावर लावली. मागे कमली वारली,.. ही पण खरंतर थकली आहे पण एवढं काम पोटासाठी रेटतेच,.. तिला पाहताच विनयरावने चहाचे आधण वाढवलं,.. आधी रमा उशिरा यायची तो पर्यंत हा गप्पांचा चहा दोघांमधला होऊन गेलेला असायचा. पण कालपासून रमाने सांगितले होते ‘सुन बाळंतीण झाली आहे,… मी जरा लवकर येईल कामावर, ’.. चहा उकळल्यावर बायकोने तो ओतला. रमाला मागच्या अंगणात हाक मारुन कप दिला आणि विनयराव आणि ते बसले मस्त झोपाळ्यावर,.. चहा सोबत गप्पा, हास्य मध्येच रागावणं आणि चिडणं आणि परत हास्याची खसखस सुरू होती. पण ह्यात एकदोन वेळा विनयराव यांना जाणवत होतं की मागच्या अंगणातले डोळे चोरून डोकावत आहेत,.. असं आता नेहमीच होत होतं. बागेत काम करणारे डोळे, कान ह्यांच्या गप्पात डोकावत होते,..

 काही महिने गेले आणि एक दिवस बायको अर्ध्यावर्ती डाव सोडून गेली,.. रमा अजूनही कामाला येतच होती,.. तीच वेळ.. विनयराव चहाचं आधण ठेवतच होते,.. तेवढ्यात रमा आली,.. विनयरावांनी आधण वाढवलं,.. चहाचा कप रमाला दिला,.. ती मागच्या दारात बसणार तेंव्हा विनयराव म्हणाले, “इथेच बैस मलाही सोबत वाटेल,.. सोबतीचा चहा पिण्याची सवय झाली आहे ग.. ” रमा अंग आखडून बसली,.. काहीतरी बोलावं म्हणून विनयराव म्हणाले, “रमा इतकी वर्ष तू ह्या घरात काम करतेस पण ह्या काही महिन्यात मला जाणवत होतं कि आम्ही हा चहा घ्यायला बसलो की तू चोरून आम्हाला बघत होतीस ऐकत होती,…. मला आश्चर्य वाटत होतं की एवढी वर्ष झाले तू बघतेसच आम्हाला, मग असं चोरून डोकावून का बघायचीस ग? ? “ 

रमा एकदम चपापली,.. म्हणाली “ खर सांगु तुम्हाला पटणार नाही,.. अग सांग जे खरं आहे “ ते विनयराव म्हणाले,….

रमा म्हणाली, ” मला खुप आवडत होतं तुमचा हा चहा घेताना चालणारा संवाद,.. कुठलंही नातं न ठेवता फक्त निसर्गाने दिलेल्या भुमिका स्त्री आणि पुरुष ह्यांच्या.. मनाचे पैलू एकमेकांना दाखवत चालणाऱ्या गप्पा,…. त्यात इतर कुठल्याही नातेवाईकांचा उल्लेख नाही, राग, द्वेष नाही. फक्त जगताना येत असलेल्या अनुभवांची चर्चा.. त्यातुन सकारात्मक मुद्दा धरून त्याचे होणारे फायदे एकमेकांना सांगणं,.. मग ते जगण्यात आणण्यासाठी असणारी धडपड,… बाईंना एवढा आजार होऊन त्यातून त्या सहज बाहेर आल्या तुमच्या ह्या अश्या जगण्यामुळे,.. मी काम करताना सगळं कानावर पडायचं,.. माझ्याही विचारांना चालना मिळत गेली,.. मला आवडायचं नात्याच्या पलीकडे जाऊन होणारी माणसातली दोघांची भूमिका तुम्ही जगायचे,.. माणसातील माणूसपण जगवण्यासाठी इतर माणसातील चांगलं वेचून त्यावर चर्चा करून ते अंगीकारत होते,.. म्हणुन मग चोरून, डोकावून मी ही साठवू पाहात होते त्या विचारांना स्वतःत,.. बस एवढंच.. “

 विनयराव हसले,.. म्हणाले रमा,.. ” भौतिक सुखांच्या पलीकडे असलेलं हे माणुसकीच जग हरवायला नको म्हणुन तिचा माझा चाललेला हा अभ्यास आहे,.. ह्यावर मोठं पुस्तक लेखन सुरू आहे, पण ती गेली अर्ध्यात सोडून. नियतीला तस मान्य असेल,… असो पण तुला एक विनंती करतो तसा चहा आपण दोघे घेत जाऊ. परत चर्चा.. मालक नोकर ही चाकोरी सोडून माणुस म्हणुन घडू देऊ. काही निष्कर्ष लागतील हाती ती कदाचित त्या पुस्तकाला पूर्ण करतील. बस तेवढं तिचं स्वप्न पूर्ण होईल त्या पुस्तकाचे नाव असेल.. “दोघे… “

रमालाही आनंद वाटला,.. तिने होकार दर्शवला आणि विनयरावांना जाणवलं फोटोतुन बायको हसली म्हणाली, ” हम्म चांगलं केलंत. संवाद साधत काहीतरी शोधत रहा. तिच्याही अनुभवातून माणुसकीची नवी नवी गणितं नक्कीच सापडतील,…. ”

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares