मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अविधवानवमी – लेखिका : सुश्री प्राची गडकरी ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ अविधवानवमी – लेखिका : सुश्री प्राची गडकरी ☆ सौ. गौरी गाडेकर

“आजी कपाटाची चावी हवी आहे मम्मीला”… मी मोबाईल बघत बघत आजीला म्हटंले.

“अरे! चावी मी काय कमरेला लावून फिरते का? फळीवर असेल बघ ना… मला आता आयुष्यात रस नाही उरलाय, तिथे कपाटाच्या चावीत काय रस असणार”..

आजीने जरा चिडूनच मला उत्तर दिले.

आजीचा चिडलेला स्वर ऐकून आजोबांनी घाईघाईत फळी वरील चावी माझ्या हातात देत म्हंटले,

“तिचा उपास आहे ना आज… त्यामुळे भुकेने थोडी चिडचिड झालीय तिची. आणि तुझ्या मम्मीची पण कमाल आहे. चावी मागायची कशाला… अरे जेव्हा पाहिजे तेव्हा फळी वरून आम्हाला न विचारता सरळ घ्यायची की “…. आजोबांनी आजीला आज पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. तितक्यात आजी पुन्हा चिडचिड करत म्हणाली,

“उगाचच माझ्या भूकेच खोटं कारण सांगू नका. आठ महिन्यांपूर्वीच माझी भूक मेली आहे…. “आजी पुढे काही बोलायच्या आत आजोबांनी मला खुणेनेच निघून जायला सांगितले.

मी चावी मम्मीला नेवून दिली आणि आजीची चिडचिड सुध्दा सांगितली.

मम्मीने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, आणि ती कपाटाच्या दिशेने गेली.

तसं तर आमचं सगळं घर माझ्या मम्मीच्याच मर्जी प्रमाणे चालते. आजी- आजोबांची खरंतर माझी मम्मी सून लागते! परंतू मम्मीचे कायम मुली प्रमाणेच आजी-आजोबांनी लाड केलेले मी पाहिले आहे. मम्मीला कधीच कसलही बंधन, रितीरिवाजाचं ओझं, परंपरेच्या बेड्यात आजीआजोबांनी अडकवले नाही, आणि माझ्या मम्मीनेही त्यांच्या लाडाचा गैरफायदा न घेता त्या लाडाचा प्रेमानी स्वीकार करून कायम आजी-आजोबांना योग्य तो मान दिलेला मी पाहिला आहे.

तसेतर मम्मीच्या लग्नाला वीस वर्षे झालीत. तरीही अजून सुध्दा मम्मी घरातील छोट्या छोट्या गोष्टी आजीला विचारूनच करते ‘भाताला तांदूळ किती घेऊ, दहा पोळ्या करू का बारा, वांग्याच्या भाजीत गोडा मसाला घालू का?’…. आणि मग आजी रोजच ठरलेले उत्तर मोठ्या कौतुकाने मम्मीला देणार… “अग मला काय विचारतेस चित्रा, माझ्यापेक्षा जास्त तुझाच अंदाज बरोबर असतो. तू तुझ्या नावाप्रमाणेच “चित्रा” सारखा संसार साभाळाला आहेस. खरं सांगते चित्रा… तुझ्यामुळे ह्या घरात आनंद आहे. “

त्यावेळी मात्र मम्मीलाही दोन मुठ मांस जास्त चढून तिच्यात नवीन उत्साह संचार होतो. स्वत:च्या चित्रा नावाची ही मम्मीला तेव्हा फार गंमत वाटते. घरातील आनंद, सुखशांती, समाधान हे सगळं केवळ आजी- आजोबा आणि मम्मी ह्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे, तसेच प्रेमळ स्वभावामुळे टिकून आहे. बाबातर कायम बाॅर्डरवरच असायचे. परंतू अलिकडे माझे बाबा गेल्यापासून आजी डोक्याने थोडी सैरभैरच असते. त्यामुळे आमच्या घरातील चैतन्य हरवलं होतं.

तसं पाहायला गेले, तर आमचं संपूर्ण खानदानच मिल्ट्रीतलं…. पणजोबा मिल्ट्रीत होते. तेही युध्दात शहीद झाले होते. आजोबाही मिल्ट्रीत होते. आजोंबांचा तर एक हात गोळी लागल्याने कापावाही लागला होता. त्यांना तर आता एकच हात आहे. ह्याच सगळ्या भीतीने आपल्या मुलाने म्हणजे माझ्या बाबांनी मिल्ट्रीत जावू नये असं आजीला अगदी मनापासून वाटायचे. परंतू माझ्या बाबांनी खुपच हट्ट धरला होता मिल्ट्रीचा. आणि आजोबांनी लहानपणा पासून माझ्या बाबांचा प्रत्येक हट्ट पुरवला होता. त्यामुळेच आजीच्या इच्छे विरुद्ध आजोबांनी बाबांना मिल्ट्रीत जायला परवानगी दिली होती. आणि आमचं दुर्दैव म्हणजे आठ महिन्यांपूर्वी बाबा अतिरेक्यांच्या चकमकीत शहीद झाले.

त्यामुळे आजोबांनी बाबांना आर्मीत जायला परवानगी नसती दिली, तर आज आपला मुलगा जिवंत असता… ही सल आजीला सतत टोचत होती. म्हणूनच अलिकडे ती रोज उठून आजोबांशी वाद घालायची. प्रचंड चिडचिड करायची. ती जणू एकदम बिथरली होती. डाॅक्टर तर म्हणाले, आता जर आजी सावरल्या नाही… तर कदाचित त्यांना वेड लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच गेल्या आठ महिन्यांपासून केवळ आजीला सांभाळणे एवढेच माझे, मम्मीचे आणि आजोबांचे काम होते.

आजोबांना मात्र बाबा शहीद झाले, याचा फार गर्व वाटायचा. आपला केवळ हात गेला. “ह्यापेक्षा देशासाठी जीव गेला असता, तर आपले जीवन सार्थकी लागले असते असे त्यांना मनापासून वाटायचे. “

किंबहुना माझी मम्मी तर दोन दिवसात सावरली होती बाबा गेल्यावर. ती तर अभिमानाने सगळीकडे मिरवायची… माझा नवरा देशासाठी शहीद झाला आहे… इतकंच नाही, तर मी सुध्दा मिल्ट्रीत जावून घराण्याची परंपरा राखावी, असाच मम्मीचा हट्ट असतो. आणि मी ही तसा एका पायावर तयारच आहे डिफेन्स जाॅईन करायला. एकीकडे माझी डिफेन्सची तयारी चालू होतीच… परंतू आजीच्या अशा वागण्यामुळे आम्ही सगळी तयारी आजीच्या चोरून करत होतो. इतक्यात मम्मी घाईघाईत आजीच्या रुममध्ये गेली. मी सुध्दा उत्सूकतेने तिच्या पाठोपाठ गेलो.

मम्मी आजोबांना म्हणाली… “अण्णा स्वयंपाक तयार आहे. परंतू अजून अकराच वाजतायत. म्हणून मी जरा बाजारात जाऊन येते. मला यायला उशीर झालाच तर तुम्ही जेवून घ्या. तसे मी विठाबाईंना सांगितलेही आहे, मला उशीर झालाच तर तुम्हाला वाढायला. “…

मम्मीचं वाक्य अर्धवट तोडून आजी लगेच म्हणाली,

“आज पर्यंत तुझ्या विना कधी जेवलो आहोत का आम्ही चित्रा?… मग आज तुझ्याविना कसे जेवू. आणि येवढ्या पावसात काय सामान आणायचं तुला बाजारातून! धोंडूला सांग… तो आणून देईन की”…..

आजी मोठ्या काळजीने मम्मीला म्हणत होती. मम्मीने आजीला स्वेटर घातला. तिच्या दोन्ही गुढघ्यावर नीकॅप चढवली. आजोबांच्या हातात दोन औषधाच्या गोळ्या दिल्या, आणि पाण्याचा ग्लास देत म्हणाली,

“धोंडू किती धांदरट आहे, माहित आहे ना तुम्हाला… चारातील दोन गोष्टी हमखास विसरतो. म्हणून विचार केला, आपण स्वत:च जावं बाजारात. तसेही धोंडू पाण्याचा पंप बिघडलाय तो दुरूस्त करायला गेलाय. कधी उजाडेल तो आता देवच जाणे. तुम्ही काळजी नका करू, मी लवकरच येते. “

मम्मीने आजीच्या खोलीतून बाहेर पडताना पंखा बंद केला आणि आजीला टी व्ही लावून दिला. तसेच आजोबांना स्टडी रुम मध्ये खगोलशास्त्रा वरील एक मस्त इंग्रजी सिनेमा लावून दिला. आणि मला दोघांवर नीट लक्ष ठेव असे बजावून ती बाजारात गेली.

आजीच्या अस्थीर मनामुळे तिने पुढच्या दहा मिनिटात टिव्ही बंद केला आणि ती माझ्याशी चेस खेळायला बसली. आजी कधीच हरलेली मला आवडत नाही, हे तिला माहीत असावे. म्हणूनच अर्धा डाव सोडून ती आजोबांच्या शेजारी जाऊन इंग्रजी सिनेमा बघत बसली.

एक-दीड तासाने मम्मी दोन मोठ्या पिशव्या भरून सामान घेऊन आली. तोपर्यंत विठाबाईंनी डायनिंग टेबलवर जेवायची सगळी तयारी करून ठेवली होती. मम्मी हातपाय धुवून येई पर्यंत आजी स्वयंपाक घरात जाऊन मम्मीने आणलेल्या पिशव्या वाचकरून पहात होती. आजी-आजोबांना खूप उत्सुकता होती. कारण अचानक बाजारात जाऊन त्यांच्या चित्राने काय सामान आणलय हे आजीला पहायचे होते.

इतक्यात मम्मीने सगळ्यांना हाक मारली जेवायला. खिमा-पाव आणि फ्राईड राईसचा आनंद घेत आमची पंगत चांगली रंगली होती. मी तर आडवा हातचं मारला खिम्यावर… तेवढ्यात बेचैन झालेल्या आजीने मम्मीला विचारलेच…

“काय खरेदी केली चित्रा”

” काही खास नाही. भाज्या, दुध, देवाला हार सगळं रोजचंच आणि… “मम्मी पुढे काही म्हणायच्या आधीच आजी एकदम म्हणाली…

“पण त्या सामानात केळीची पानं पाहिली मी… ती कशासाठी आणली आहेत. “

मम्मी पाच सेकंदासाठी एकदम शांत झाली आणि एक दिर्घ श्वास घेवून म्हणाली,

“पितृपक्ष चालू आहे… तर… पान ठेवीन म्हणते मी उद्या… “

‘पान’ एवढा शब्द ऐकताच आजीच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागले. आजीने हातात घेतलेला घास तसाच ताटात ठेवला, आणि ती तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. मम्मीने ताटाला नमस्कार करून आजीच्या पाठी जाणार… तोच आजोबा मम्मीला धीर देत म्हंणाले…

” चित्रा थांब… तू जेव बेटा, तिला तशीही भूक नव्हतीच. तू बाजारात गेली होतीस, तेव्हा एक चिकू तिने खाल्ला होता… बाकी यंदा कावळ्याला पान ठेवावं असं माझ्याही मनात खूप होते.. पण हे कसं तुला सांगावं, हेच मला कळत नव्हतं. तुला सांगतो चित्रा… मी अगदी लहान असताना तात्या म्हणजे माझे वडील युध्दात शहीद झाले. देशासाठी शहीद झालेला जवान हा अमर असतो. तो कधीच मरत नाही. अशी माझ्या आईची ठाम समजूत होती. आणि पितृपंधरवड्यात पान हे मेलेल्या माणसांना ठेवले जाते. म्हणून आईने कधी पानच ठेवले नाही तात्यांना.

त्यानंतर ‘मिल्ट्री’ हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आईने मला मोठं केले. परंतू मी काॅलेजमध्ये असताना माझी आई अचानक गेली. आईची पहिल्या पासून शेवट पर्यंत एकच इच्छा होती… मी आर्मीत जावं! तीची ती इच्छा मात्र मी पुर्ण केली. आणि मी मिल्ट्रीत गेलो. कधी बाॅर्डवर तर कधी महत्त्वाच्या मिशनवर होतो. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना कधीच पान ठेवू शकलो नाही. आणि जेव्हा रीटायर झालो, तेव्हा इतके वर्ष ठेवले नाही, मग आता तरी कशाला ठेवा. हीच भावना मनात होती. परंतू माझ्या मुलाला… अवधूततला मात्र उद्या आपण पान ठेवायचं. अवधूतच्या पानाला कावळा शिवला… की मला माझ्या मागील चार पिढ्यांना शांती मिळाल्याच समाधान तरी मला मिळेल. “….

आजोबा चक्क सेंटीमेंटल झाले होते. एक मिल्ट्री मॅन एवढा भावूक झालेला मी पहिल्यांदाच पाहिला. आजोबांचा गहिवरलेलां आवाज ऐकून आजी लगिबगीने डोळे पुसत बाहेर आली. आजोबांकडे पहात जरा गंभीर आवाजात आजी मम्मीला म्हणाली….

“उद्या आपल्या अवधूतची तिथ नाही बरं का चित्रा… अग अवधूत तर एकादशीला गेला. आणि उद्या नवमी आहे. आपल्याला परवा पान ठेवायला लागेल अवधूतला!”

आजी डायनिंग टेबलची खुर्ची ओढून मम्मी शेजारी बसली. मम्मी गालात हसली. तिने आजी-आजोबांना क्षणिक न्याहळलं आणि म्हणाली… ,

“पण मी पान उद्याच ठेवणार आहे… नवमीला! आणि खरंसांगू ? मला अवधूतला पान ठेवायचंच नाही. अण्णा तुमचीच आई म्हणाली होती ना… ‘शहीद जवान अमर असतात’. माझा अवधू तर अमरच आहे. त्यामुळे त्याला पान ठेवायचा प्रश्न येतच नाही!…

हे पान तर… मी तुमच्या आईला ठेवणार आहे अण्णा! कारण उद्या अविधवा नवमी आहे.

ऐन तारूण्यात नवरा शहीद होवून सुध्दा त्यांना तुम्हाला सैन्यात भरती करण्याचा ध्यास होता. तुम्ही स्वत:चा हात गमवून सुध्दा, सासुबाईंचा विरोध पत्करून अवधूतला सैनिकी शिक्षण दिले. तिच परंपरा पुढे नेत मी सुध्दा माझ्या मुलाला मिल्ट्री जाॅईन करायला सांगितले. आपण नशिबान आहोत ना अण्णा!

म्हणूनच आपल्या पिढ्या देशासाठी शहीद होत आल्या आहेत.

पण हे देशप्रेम ज्या माऊली आपल्या मुलांच्या मनावर बिंबवतात, त्या माऊलींच कौतुक केले पाहिजे. एक दुःख पदरात असताना त्या माऊल्या आपल्या मुलांना सीमेवर पाठवून दुसऱ्या दुःखाला छातीठोकपणे सामोरी जायची तयारी दाखवतात. अशा आदर्शवादी माऊलींला पान ठेवून मी त्यांचे आशीर्वाद घेणार आहे. अण्णा तुमच्याच आईचा आदर्श मी गिरवून माझ्या मुलाला सैनिकी शिक्षण देतेय. अण्णा तुमच्या आईने देश प्रेमाचे बीज ह्या घरात रुजवले. म्हणूनच येणारे प्रत्येक फळ देशप्रेमाने भारावलेले निघते.

म्हणूनच ह्यापुढे जो पर्यंत मी जिवंत आहे, तो पर्यंत केवळ पितृपक्षातील अविधवा नवमीलाच ह्या घरात पान ठेवलं जाईल… त्या माऊलीच्या आदर्शाचे स्मरण हे झालेच पाहिजे. “

मम्मीच्या बोलण्याने आजी-आजोबांचे डोळे पाण्याने डबडबले असले तरी, त्या दोघांनी चक्क टाळ्या वाजवून मम्मीचे कौतुक केले.

आजीचा सैरभैर पणा तर क्षणातच पळुन गेला, आजीला जणू एकदम नवी उमेदच मिळाली. आजीने विठाबाईला भाज्या निवडायला सांगून, पणजीआजीचा फोटो हाॅलमध्ये आणून ठेवला. माझ्या जवळ येऊन आजीने नुसता प्रश्नांचा भडीमार सुरु केला…. “बाळा कधी निघणार आहेस? कुठे तुझं ट्रेनिंग आहे? गरम कपडे खरेदी केलेस का? पोस्टींग कुठे? आणि बरं का… निघताना रव्याचे लाडू देईन हो तुला. अवधूतला सुध्दा नेहमी बरोबर मी लाडू द्यायची….

आजोबा आणि मम्मी दुरून आजीची गडबड बघत होते. आजीच्या मनातील दुःखाला मम्मीने आदर्शाची जोड देऊन, आजीला जगण्याची नवी उभारी दिली. हे आजोबांनी क्षणातच ओळखले होते. म्हणूनच बहुतेक आजोबा मम्मीला शेकहॅन्ड करून जणू धन्यवाद देत होते.

गेले आठ महिन्यांपासून आजीच्या मनावरील दुःखाच्या ओझ्याला पितृपक्षातील अविधवा नवमीने क्षणात उतरवले… हेच खरे !

लेखिका : सुश्री प्राची गडकरी

मो.  ९९८७५६८७५०

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शब्देविण संवादू… सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆  शब्देविण संवादू… सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

“अवंती, छान झाली आहे ग भाजी. मी ना या भाजीला जिरं व मिरची वाटून घालते. ” अलकाताई सुनेला म्हणाल्या.

जेवण संपवून जरा पडावं म्हणून त्या आपल्या खोलीत गेल्या.. तेवढ्यात त्यांचा मुलगा अनिकेत खोलीत आला. “आई, तू भाजीला काय घालतेस हे तिला सांगत जाऊ नको. तिचं करणं तुला आवडत नाही म्हणून तू दरवेळी काहीतरी शिकवत बसतेस असं तिला वाटतं. तुझा हेतू चांगला असतो ग.. पण तिला ती टीका वाटते. त्यापेक्षा बोलूच नको ना!.. बरं डुलकी काढ आता!” म्हणून तो बाहेर गेला.

आता कुठली डुलकी? कॅालेजात मराठी शिकवण्यात आयुष्य गेलं. पण आता शब्द आपल्याला साथ देत नाहीत? प्रशंसा देखील टीका वाटते?.. त्यापेक्षा बोलूच नको? काय बोलायचं आणि कसं बोलायचं ही कसरत होऊन बसली होती.

अलिकडे हे अवंतीचं काय पण अनिकेत बरोबर सुध्दा सारखं घडत होतं. साधं काही बोलायला जावं अन् ते शब्द मुलांना टोचावेत. आम्हाला नाही का कळत असं वाटावं..

बावीस वर्षाची अलका सासरी गेली तेव्हा आईनं सांगितलं होतं, “शिकून घे हं सगळं सासुबाईंकडून. हुशार आहेत त्या!

मोठ्यांकडून शिकायचं ही मानसिकता आईच्या त्या एका वाक्याने बनली होती पण हल्ली ‘फट म्हणता ब्रम्हहत्या’ अशी तऱ्हा होऊन बसली आहे.. मुलं सर्वज्ञ झाली आहेत.. दोन दोन डिग्र्या असतात.. भरपूर पैसा मिळवतात आणि ते गुगल आहेच अडीअडचणीला! AI पण आहे.. माणसं हवीत कशाला? पण गुगलला अनुभवाची जोड असते का? आईचं प्रेम असतं का आणि गुगल सांगेल ते सगळं खरं असतं का?

त्यांनी एक निःश्वास टाकला.. तेवढ्यात लेकीचा फोन आला.. ”आई, मी व केदार सुटं रहायचं म्हणतो आहोत. अगं मुलांना रागावले ना की आई निष्कारण मधे पडतात. ‘नको गं तिला रागवू.. अगं मुलं आहेत ते.. चुकायचचं’ असलं बोलतात. मग मुलांना काय!” लेक भडाभडा मनातलं सारं बोलून मोकळी झाली.

“नंतर करते फोन.. पडली आहे जरा.. ” म्हणून त्यांनी फोन बंद केला. आपल्या सासुबाई काही म्हणाल्या तर ब्र काढायची हिंमत नव्हती कुणाची! वडिलधारे आपल्या हिताचंच सांगणार ही भावना असे त्या काळात!

बाहेर कामाची बाई शैला जोरजोरात अवंतीला म्हणत होती, ”वैनी, नवरा लई भांडतो.. नकोसं करतुया.. डोकं फिरवतो.. म्हणून कामात लक्ष लागत नाही माजं.. अन् मग तुमी ओरडता मला सारखं. ”

एक शब्दावर शब्द आपटत होते. लहान मोठ्यांना दुखवत होते. अर्थाचा अनर्थ होत होता. म्हणायचं होतं एक आणि होत होतं भलतचं. ईश्वरानं केवळ माणसाच्या हातात शब्द दिले. साधे शब्द, गोड शब्द, कटू शब्द, शीतल शब्द, उग्र शब्द..

केवढं सामर्थ्य असतं शब्दात! रडणाऱ्याचे अश्रू थांबवण्याचं.. दोन देशातील युध्दं मिटवण्याचं.. ईश्वराजवळ पोचण्याचं! शब्द, अक्षर ब्रम्हाची महती कधी समजते का माणसाला. विद्यार्थ्यांना शब्दब्रम्ह शिकवताना किती बारकावे सांगत असू आपण.. समर्थ दासबोधात म्हणतात..

पहिले ते शब्दब्रम्ह । दुजे मीतिकाक्षर ब्रम्ह ।

तिसरे खंब्रम्ह । बोलिली श्रुती ॥

शब्द बोलून झाला की त्याचं अस्तित्व संपतं.. भात्यातून सुटलेला बाण व मुखातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही. म्हणून तर विचार करून शब्द वापरा हे शिकवलं आपण पण आता आपल्याच शब्दांनी अवंती का दुखावते? काय चुकतंय माझं?

तेवढ्यात त्यांना यजमानांचा फोन आला. “अगं, नामदेव सिरिअस झालाय. मला घरी यायला उशीर होईल. ”

त्यांचे यजमान डॅा. लेले एक उत्तम डॅाक्टर होते. सारं आयुष्य सेवेला वाहून घेतलेले.. चाळीशीतला नामदेव त्यांच्याच घरी काम करत होता पण अचानक त्याची तब्ब्येत खालावली. त्यांच्याच हॅास्पिटल मध्ये ॲडमिट झाला. ह्रुदयाचा आजार होता.. केस कठीण आहे असं डॅाक्टर सांगत होतेच..

त्या एकदम उठल्या व केस विंचरून, साडी सरळ करून तयार झाल्या. “अनिकेत, मी नामदेवला बघून येते. ” एवढं एकच वाक्य बोलल्या व घाईनं बाहेर पडल्या. वर्क फ्रॅाम होम दोघांचं चालू असतं. ते चालू असताना काही बोललं तर तिकडून नको आरडाओरडा! त्यांनी थोडी फळं विकत घेतली व त्या हॅास्पिटलमधे पोचल्या.

अनेक नळ्या जोडलेला नामदेव त्यांना बघून क्षीण हसला. षड्-रिपू नी गांजून गेलेल्या जीवाला अंतकाळी तरी समजत असेल का की ती सारी धडपड व्यर्थ होती. होतं महत्वाचं फक्त ईश्वराशी जोडलेलं नातं, सत्कर्म व सदाचार!

आजूबाजूला त्याचे आई, वडील, बायको व पंधरा वर्षाचा मुलगा उभे होते… उसनं अवसान आणून.. अलकाताईनी नामदेवचा हात हातात घेतला. त्यानं डोळ्यानीच नमस्कार केला. तो आजारी पडला तेव्हा “तुझ्या कुटूंबाची आम्ही काळजी घेऊ” हे अलकाताईंचं वाक्य त्याला नक्की आठवलं असेल..

.. डॅाक्टर लेले आले. त्यांनी परत एकदा नामदेवचा चार्ट बघितला. त्यांनी त्याच्या वडीलांच्या खांद्यावर हात ठेवला व थोपटले. त्यांनी डॅाक्टरांकडे बघत हात जोडले. डॅाक्टरनी नामदेवच्या पंधरा वर्षाच्या मुलाला जवळ घेतले आणि त्याच्या केसातून हात फिरवला. नामदेवाजवळ जाऊन त्याच्या कपाळावर हात फिरवला व ते बाहेर गेले… नामदेवचे डोळे मिटले होते.. तरी डॅाक्टरांच्या स्पर्शाने त्याचा चेहरा शांत झाला असे सर्वांना वाटले..

अलकाताई पण बाहेर आल्या.. डॅाक्टरनी चष्मा काढून डोळे पुसले व ते दोघे हळूहळू चालत त्यांच्या ॲाफिसकडे जात असतानाच नामदेवची नर्स धावत आली व तिने डॅाक्टरांकडे बघत.. ‘नाही.. ‘ अशी मान हलवली.. नामदेव आता नाही हे कळल्यावर त्या तिघांचे अश्रू गालावर ओघळले..

अलकाताई घरी आल्या. नामदेवाच्या यातना संपल्या म्हणून एका प्रकारची शांती वाटत होती पण त्याच्या खोलीत घडलेल्या शब्देविण संवादातलं सामर्थ्य त्या परत परत अनुभवत होत्या. एका शब्दाशिवाय नामदेवला ‘आम्ही आहोत तुझ्या बरोबर’ सांगितलं गेलं. त्याच्या आई वडीलांना व मुलांना डॅाक्टरनी “माझ्या हातात जे होतं ते मी केलय.. आता परमेश्वराची ईच्छा” सांगितलं.. त्या खोलीत ज्याला जे म्हणायचं होतं ते शब्दाशिवाय प्रत्येकाला समजलं होतं.. नामदेवला सुध्दा! शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले..

तान्ह्या बाळाला काय हवं ते आईला कसं समजतं.. आणि ईश्वर भेटीची आस ज्याला लागली तो ईश्वरापाशी शब्दाविना कसा पोचू शकतो.. केवढी प्रचंड शक्ती आहे या शब्देविण संवादात!

अवंती चहा घेऊन आली. त्या काही न बोलता चहा घेऊन खोलीत गेल्या.. त्या आठवड्यात चाललेलं मनातलं द्वंद्व काही वेगळच होतं. घरात बोलायचं का नाही? बोलताना आपला हेतू चांगला आहे हे आपल्याला व त्या देव्हाऱ्यातल्या गजाननाला माहित असल्याशी कारण.. मग इतर काही का म्हणेनात!

.. का शब्देविण संवाद करायचा?

काही दिवस विचार केल्यावर अलकाताईंनी एक निर्णय घेतला.. कमीत कमी शब्द वापरण्याचा.. शब्दाचा अर्थ बदलणार नाही असे अगदी जरूरीपुरते लागणारे शब्द बोलण्याचा. उत्स्फुर्तपणे काही प्रेमानं सांगणं हे अपात्री दान आहे इथे हे लक्षात घेऊन..

भरभरून बोलण्याची उर्मी आरत्या, श्लोक, कविता, लेख चार मैत्रीणींना किंवा खाली राहणाऱ्या दहावीतल्या आर्याला शिकवताना पूर्ण होत असे.. आर्या हुशार होती. मराठीमध्ये

मार्क पडत नाहीत म्हणून काही विचारायला येत असे! आता त्यांनी तिच्या शिकवणीची वेळच ठरवली होती..

अमेरिकेत राहणाऱ्या जीवश्चकंठश्च मैत्रीणीला एक दिवस फोन करत असतं.. ज्यादिवशी मुलं मिटींग करायला आठवड्यातून एकदा ऑफिस मधे जात.. डॉक्टर कामावर असत तेव्हा.. मन हलकं होऊन जात असे.

लेकीला फोन करून म्हणाल्या होत्या, “जरूर रहा सुटे. दोघींनाही मोकळा श्वास घेता येईल.. ” लेक आश्चर्याने ऐकतच राहिली..

हॅाल मध्ये अवंती अनिकेतला म्हणत होती, “अरे, हल्ली आई काही बोलतच नाहीत. नामदेव गेल्या त्यातून बाहेर पडल्या नाहीत वाटतं”.

डॅाक्टर व अलकाताईंना त्यांच्या खोलीत हा संवाद ऐकू आला.. ते एकमेकांकडे बघून हसले.. दोघांना अगदी पक्कं समजलं एकमेकांच्या मनात काय चाललं होतं ते.. शब्देविण संवादु यापूर्वीच करायला हवा होता असं दोघांच्या मनात आलं व ते एकदम खळखळून हसले!!

शब्देंविण संवादु। दुजेंवीण अनुवादु॥

हें तंव कैसेंनि गमे।परेहि परतें बोलणे खुंटले॥

आयुष्यभर शब्द वापरून मराठी शिकवणाऱ्या अलकाताईंना आता शब्द या माघ्यमाची गरज उरली नव्हती! आयुष्यात सतत काहीतरी नवीन शिकावं म्हणतात.. ते घडून आलं होतं अवंतीमुळे! अनिकेत मुळे!

अवंती अनिकेतचे मनोमन मानलेले आभार त्यांच्यापर्यंत पोचू देत अशी त्यांनी शब्दब्रम्हाला विनंती केली आणि पांडुरंग कांती.. या अभंग मैत्रीणींना शिकवण्यासाठी त्या सज्ज झाल्या!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे.

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जाग ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

जाग ! श्री संभाजी बबन गायके 

त्याच्या घराच्या अंगणात कसं कुणास ठाऊक औदुंबर उगवला होता. हे झाड एकदा का उगवून त्यानं बाळसं धरलं की ते उपटून टाकण्याची हिंमत सहसा कुणी करू धजत नाही. त्याच्या वडिलांनीही मग या देवाच्या झाडाला पार बांधून दिला आणि काही वर्षांतच तो पार देवाचा पार म्हणून ओळखला जाऊ लागला.

वडील असेतोवर त्याचं सर्व नीट होतं. एकुलता एक गडी.. लाड व्हायचेच. तालमीत जायचं, कबड्डीचे मैदान गाजवायचे हा नित्यक्रम. त्यात ढोल लेझिमचा नाद अंगात मुरला. ताशा असा घुमायचा की केवळ तो ऐकण्यासाठी लोक गर्दी करीत. गावोगावच्या जत्रेत त्याच्या मंडळाने बक्षिसं मिळवली नाहीत असं कधी होत नसे. देवळातली शो केस असंख्य मानाच्या ढाली, भिंतीवरची घड्याळं, स्मृतिचिन्हे यांनी भरून गेली होती. बिदागी म्हणून मिळालेल्या पैशांतून तालमीची आणि मारुतीच्या देवळाची डागडुजी केली जाई. पण रंगाचं काम करावं ते यानेच. नुसतं भिंती रंगवणं नव्हे. त्याचं हस्ताक्षर केवळ सुंदर आणि देखणं. गावातला फळा त्याच्याच अक्षराला सरावला होता.

लग्नात दिल्या जाणाऱ्या भांड्यांवर नावं कोरायला पण तो शिकला होता. मग गावातले वरबाप झालीत द्यायची भांडी तर विकत आणत, पण नावं टाकायला याच्याचकडे देत… पैसे द्यायचा विचार ते करत नसत आणि हा मागतही नसे. पुढे लग्नाचे बॅनर केले जाऊ लागले. लोक फक्त पांढरा कपडा आणून देत आणि जमलंच तर निळा रंग. हा बाबा आपला वेळ खर्ची टाकून लग्नाच्या दिवशी बॅनर लागेल गावात अशी व्यवस्था करायचा. थोडक्यात हा गावचा नारायण ! लग्न झालं आणि दोन मुलं झाली तरी याचा हा उद्योग काही थांबला नाही.

वडील गेले आणि कारखान्यात कामाला जाणं भाग पडलं. तरीही याचं रात्री ढोल लेझीम वाजवायला जाणं थांबलं नाही. याला त्याच्या गावातले खेळ म्हणत. आणि जत्रेतले खेळ तर रात्रीच असत. कबड्डीच्या टुर्नामेंट सुद्धा दूर दूर असत. नोकरी सांभाळून हे व्याप सांभाळणं किती अवघड. पण यातच जीव गुंतला असल्याने रात्रीचे जागरण आणि दिवसभर अंगमेहनत याचा मेळ घालणं कठीण होत होतं.

त्यात पाच पंचवीस पोरं एकत्र आणि शिवाय ही पोरं तरुण तडफदार. तारुण्यातील काही आकर्षणं ओलांडून डोळे बंद करून पुढे जाणे यातील प्रत्येकाला शक्य होईलच असं नव्हतं.

बाकी जाऊ द्यात… आधी काहीतरी भारी करायचं म्हणून एकदा तोंडाला लागलेली ती अगदी नसानसांत भिनायला लागली. देखणा, उंचापुरा गडी… दारूमुळे त्याची रया जायला लागली. अनेकांनी सांगून पाहिलं. पण क्रम चुकेना !

असाच एकदा मध्यरात्री तो घरी परतला.. झुलत झुलत…. एवढ्या रात्री कशाला घरच्यांना जागं करायचं म्हणून त्यानं औदुंबराच्या पारावरच अंग टाकून दिलं ! औदुंबर आता डेरेदार झालेला होता. त्याच्या बायकोने बुंध्यापाशी दिवाबत्ती सुरू केली होती… तुळस ठेवली होती. दत्ताची तसबीर होती. याची दारू सुटली म्हणजे या अवदसेसोबत आलेली सारी बिलामत सुद्धा निघून जाईल अशी त्याच्या आईला आणि कारभारणीला आस होती.

पहाटेचे तीन वाजले असावेत… त्याला कुणीतरी गदागदा हलवत होतं… त्याचे डोळे तांबारलेले.. शुद्ध नव्हतीच. त्याने कसेबसे डोळे किलकिले केले. “असं कुठवर चालायचं? जागा हो… ” असं काहीबाही त्याच्या कानापाशी कुणीतरी बोलत असल्याचं त्याला जाणवलं. आई किंवा बायको… या दोघींपैकी हा आवाज नव्हता… काही समजेना !

हा पुन्हा गाढ झोपी गेला. झोप कसली.. नशा ती. पण त्याला साडेपाच वाजता जाग आली. घरचे अजून उठायचे होते. हा सहज बाहेर रस्त्यावर आला. तिथून पुढे पाय मोकळे करायला म्हणून मारुतीच्या देवळाच्या चौकात निघाला… तर चौकात एस. टी. गाडी उभी. कोण कुठं निघालं असावं? लग्न तर नाही आज कुणाचं ! तो जवळ गेला.. पंचवीस बाया गडी माणसं तयार होऊन गाडीत दिगंबरा दिगंबरा भजन करीत बसली होती.. इतरांची वाट बघत. त्याने गाडीपुढे जाऊन बोर्ड पाहिला…. नारायणपूर ! कधी ऐकलं, पाहिलं नव्हतं. त्याला पाहून गाडीतील एक वयोवृद्ध म्हणाला…. “ बाळा, यायचं का नारायणपूरला? “

“ काय आहे तिथं? “ त्याने विचारलं.

” चल तर खरं.. कल्याण होईल ! हे असं किती दिवस राहणार…. दारूत आयुष्य बुडवीत? ” उत्तर आलं.

” पण मी तर अजून काहीच आवरलं नाही. आंघोळ पांघुळ काय नको का देवाच्या गावात जायला?” त्याने अडचण सांगितली !

” अरे, मन साफ आहे ना? चल.. गुरू माऊली समजून घेतील यावेळी !”

आणि तो गाडीत बसला. त्याला गाडीत बसलेलं अनेकांनी पाहिलं होतं, त्यांपैकी कुणी न कुणी तरी त्याच्या घरी सांगणार होतं !

गाडी नारायणपूर गावात पोहोचली. साऱ्या प्रवासात भजन सुरूच होतं. आज गुरुवार.. दत्त गुरूंचा वार. तुफान गर्दी. गुरुजी आसनावर बसलेले… त्यांच्या दर्शनाला मोठी रांग.. तो कितीतरी वेळ रांगेत तिष्ठत थांबून राहिला.. त्याची वेळ आली.. गुरुजींनी मस्तकावर हात ठेवला… “ बरं केलंस… माझं ऐकून इथवर आलास.. सोड तो मार्ग ! पुढच्या गुरुवारी व्यवस्थित अंघोळ, पूजा करून ये ! “

गुरुजींनी त्याच्या गळ्यात तुळशी माळ घातली.. ’. कल्याण हो ! ‘

तो रांगेतून पुढे सरकला आणि भानावर आला ! सामान्यांच्या आयुष्यात अध्यात्माच्या वरच्या पायऱ्या कधी येत नाहीत. पण एखादी अशी पायरी सापडते की जिच्यावर माथा टेकला की आहे या आयुष्याचा प्रवास सोईचा होऊन जातो. व्यसन सुटलं की चालणे सरळ मार्गी होऊन जाते.. याचेही असेच झाले.

भगवंताने सामान्य लोकांसाठी असे काही महात्मे धाडून दिलेत जागोजागी. त्याचं काम सोपं करायला !

अध्यात्म असं व्यवहाराच्या कामी आलं तरच ते लोक आचरणात आणतील, हेच खरं.

अशा असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून उत्तम मार्गावर आणणारे कित्येक महात्मे आपल्या आसपास आहेत. नारायणपूर, सासवड येथील अण्णा महाराज हे असेच एक सिद्ध ! त्यांच्या जाण्याने एक आधार हरपला आहे…..

… खरं तर असे आधार कुठे ना कुठे असतातच.. जे माणसाला उत्तम मार्गावर नेण्यासाठीच असतात.

पण ते योग्य वेळी सापडले पाहिजेत …. आणि नकळता नाही सापडले तर आपणहून शोधले पाहिजेत.

अर्थात ते शोधण्याची सद्बुद्धी देणारे कोण.. ते मन स्वच्छ-शुद्ध आणि खऱ्या अर्थाने जागं झाल्याशिवाय लक्षात येत नाही हे मात्र खरं !!!!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कोण ? कुणाचा ?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “कोण ? कुणाचा ?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

मी अंथरुणातून उठलो तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का ? या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो. मी पाहिलं तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता.

मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो, “माझ्या छातीमध्ये आज रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखत आहे, मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो. “

“हो पण सांभाळून जा, गरज पडली तर फोन करा. ” मोबाईलमध्ये बघता बघताच बायको म्हणाली. बाकी सर्व मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती.

मी गाडीची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो. मला खूप घाम येत होता आणि गाडी स्टार्ट होत नव्हती. त्याच वेळी आमच्या घरी काम करणारा, ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर बघून तो म्हणाला, “काय साहेब, गाडी चालू होत नाही का?”

मी म्हणालो, “नाही… !!”

“साहेब, तुमची तब्येत ठीक दिसत नाही. इतका घाम का येतो आहे? साहेब, या परिस्थितीमध्ये गाडीला किक मारू नका, मी किक मारून चालू करून देतो. ” ध्रुवने एकच किक मारून गाडी चालू करून दिली. त्याबरोबरच विचारले, ” साहेब, एकटेच जात आहात का?” 

मी म्हणालो, “हो. “

तो म्हणाला, “अशा परिस्थितीमध्ये एकटे जाऊ नका. चला, माझ्यामागे बसा. ” 

मी म्हणालो, “तुला गाडी चालवता येते का ?”

“साहेब, माझ्याकडे मोठ्या गाडीचं देखील लायसेंस आहे, काळजी करू नका आणि मागं बसा. “आम्ही जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ध्रुव पळतच आत गेला आणि व्हीलचेअर घेऊन बाहेर आला, “साहेब, पायी चालू नका, या खुर्चीवर बसा. “

ध्रुवच्या मोबाईलवर सतत रिंग वाजत होती. मी समजून गेलो की, फ्लॅटमधील सगळ्यांचे फोन येत असतील की तो अजूनपर्यंत का नाही आला? शेवटी कंटाळून ध्रुव कोणाला तरी म्हणाला की, “मी आज येऊ शकत नाही. “

ध्रुव, डॉक्टरांबरोबर ज्या प्रकारे चर्चा करत होता त्यावरून त्याला न सांगताच समजलं होतं, की साहेबांना हार्टचा त्रास आहे. लिफ्टमधून तो व्हीलचेअर ICU कडे घेऊन गेला. माझ्या त्रासाबद्दल ऐकल्यानंतर, डॉक्टरांची टीम तयारच होती. सगळ्या टेस्ट ताबडतोब केल्या.

डॉक्टर म्हणाले, “तुम्ही वेळेवर पोहोचलात आणि त्यातून तुम्ही व्हिलचेअरचा उपयोग करून अधिकच समजूतदारपणाचे काम केले आहे. आता कोणाचीही वाट बघणंं हे तुमच्यासाठी हानिकारक आहे, यामुळे वेळ न घालवता आम्हाला हार्टचं ऑपरेशन करून तुमचे ब्लॉकेजेस लवकरच दूर करावे लागतील. या फॉर्मवर तुमच्या नातेवाईकाच्या हस्ताक्षराची गरज आहे. ” डॉक्टरांनी ध्रुवकडे बघितलं.

मी म्हणालो, “बेटा, तुला सही करता येते का?” 

तो म्हणाला, “साहेब, इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका. “

“बेटा, तुझी काहीही जबाबदारी नाही. तुझ्याबरोबर भले रक्ताचा संबंध नाही, तरीही तू काहीही न सांगता आपली जबाबदारी पूर्ण केलीस. खरंतर, ही माझ्या कुटुंबियांची जबाबदारी होती. एक अजून जबाबदारी पूर्ण कर बेटा. मी खाली हस्ताक्षर करून लिहून देईन, की मला काही झालं, तर ही जबाबदारी माझी आहे. ध्रुवने फक्त माझ्या सांगण्यावरून हस्ताक्षर केलं आहे. कृपा करून आता सही कर… आणि हो, घरी फोन करून सांगून दे. “

त्याचवेळी माझ्या पत्नीचा फोन ध्रुवच्या मोबाईलवर आला. ती काय म्हणत होती ते त्याने शांतपणे ऐकून घेतले.

थोड्या वेळाने ध्रुव म्हणाला, “मॅडम, तुम्हाला माझा पगार कट करायचा असेल, तर कट करा, मला काढून टाकायचं असेल तर काढून टाका, परंतु आत्ता ऑपरेशन सुरु होण्या आधी हाॅस्पिटलमधे पोहचून जा. हो मॅडम, मी साहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली आहे आणि त्यांनी सांगितले आहे, की आता वेळ घालवून चालणार नाही. “

मी विचारलं, “बेटा घरून फोन होता का?” 

“होय साहेब. “

मी मनात पत्नीविषयी विचार केला… अगं, तू कोणाचा पगार कट करण्याची गोष्ट करत आहेस आणि कोणाला काढून टाकण्याची गोष्ट करत आहेस? अश्रूपूर्ण डोळ्यांनी, मी ध्रुवच्या खांद्यांवर हात ठेवून म्हणालो, “बेटा काळजी करू नकोस. मी ज्या संस्थेमध्ये सेवा देतो, तिथे वृद्ध लोकांना आसरा देतात आणि तिथे तुझ्यासारख्या व्यक्तींची गरज आहे. तुझं काम भांडी धुणे… कपडे धुणे… हे नाही तर तुझं काम समाजसेवा करण्याचे आहे. बेटा, तुला पगारही मिळेल, त्याबद्दल चिंता बिलकुल करू नकोस. “

ऑपरेशननंतर मी शुद्धीवर आलो. माझ्यासमोर माझे सर्व कुटुंबीय मान खाली घालून उभे होते. मी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले, “ध्रुव कोठे आहे?”

पत्नी म्हणाली, “तो आताच सुट्टी घेऊन गावी गेला. म्हणत होता की त्याच्या वडीलांचे हार्टअटॅकने निधन झाले आहे. पंधरा दिवसानंतर तो परत येईल. ” आता मला समजलं, की त्याला माझ्यामध्ये आपले वडील दिसत असावेत. हे देवा! त्याला हिम्मत दे.

संपूर्ण कुटुंबीय हात जोडून, शांतपणे मान खाली घालून माझी माफी मागत होते. मोबाईलच व्यसन एका व्यक्तीला आपल्या हृदयापासून, आपल्या परिवारापासून, आपल्या अस्तित्वापासून किती दूर घेऊन जाते!

डॉक्टरांनी येऊन विचारलं, “सगळ्यात प्रथम मला हे सांगा, ध्रुव तुमचे कोण लागतात?”

मी म्हणालो, “डॉक्टर साहेब, काही नात्यांच्या संबंधाविषयी किंवा त्यांची खोली न मोजणं हे केंव्हाही चांगलं. अशामुळे त्या नात्याचे मोठेपण तसचं राहील, फक्त मी इतकंच म्हणेन की तो माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासाठी देवदूत बनून आला होता. “

पिंटू म्हणाला, “आम्हाला माफ करा बाबा. जे आमचं कर्तव्य होतं, ते ध्रुवने पूर्ण केलं, ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. इथूनं पुढे अशी चूक भविष्यामध्ये कधीही होणार नाही. “

“बेटा, आम्ही सर्वजण आज टेक्नॉलॉजीमध्ये इतके गर्क झालो आहोत, की आपल्या आसपासच्या लोकांचा त्रास देखील आपल्याला जाणवत नाही. एका निर्जीव खेळण्याने जिवंत माणसाला गुलाम बनवून ठेवलं आहे. आता वेळ आली आहे, की त्याचा उपयोग मर्यादित स्वरूपात करावा. नाहीतर… परिवार, समाज आणि राष्ट्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि त्याची किंमत चुकविण्यासाठी तयार रहावे लागेल. “

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हत्तीवरची स्वारी- भाग – ३ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ हत्तीवरची स्वारी – भाग – ३ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

(अधून मधून ते संशयित दृष्टीने एकमेकांकडे बघत होते. दोघांमध्ये दोन तीन टेबले होती. कुणास ठाऊक, संध्याकाळपर्यंत मॅनेजर साहेब काय निकाल देतात?) — इथून पुढे — 

ही चौकशी लंच ब्रेकनंतरही चालू राहिली. एक एक स्टाफ केबीनमध्ये जात होता. डोळ्यांनी जे पाहिलं, त्याचं सविस्तर वर्णन करून, प्रसन्न मुद्रेने बाहेर पडत होता, जसं काही आपल्या मनावरचं सगळं ओझं, ते केबिनमध्ये ठेवून आलेत.

तो बाहेर येताच सगळे त्याच्याभोवती गोळा व्हायचे, जसे काही तो एखादा इंटरव्ह्यू देऊन आलाय. ते विचारायचे, ‘आत काय झालं?’ बाहेर येऊन सगळे रामप्रसाद आणि सीतारामला सांगायचे, ‘‘काळजी करू नका. सगळं ठीक होईल. ” आता या सगळ्या चौकशी दरम्यान मॅनेजरनाही मजा वाटू लागली होती. ते स्टाफला खोदून खोदून विचारत होते. आणि प्रत्येक जण आपापल्या पध्दतीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे रामप्रसाद-सीतारामच्या वीरगाथेचं वर्णन करून आले होते.

आता चौकशी व्हायची फक्त दोन माणसे उरली होती. एक स्वत: बडेबाबू आणि दुसरे मॅनेजरसाहेब. दुस-या क्षणी त्यांची पाळी आली. मॅनेजरसाहेबांचं काय, ते आरामात केबीनमध्ये बसून जसे काही रामप्रसाद आणि सीताराम या दोन भावांच्या विरश्रीच्या चित्रपटाची पटकथाच लिहित होते जणू.

बडेबाबूंच्या टेबलावरचा इंटरकॉम वाजला. ‘‘आलोच सर!” ते फोन उचलून म्हणाले. ते मॅनेजर साहेबांच्या केबीनमध्ये पोचले. त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी आदेश दिल्यावर त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसले. मग त्यांनी सगळ्या केबीनभर चौफेर दृष्टी टाकली. ते आत्ता प्रथमच या केबीनमध्ये येत होते. सगळं काही व्यवस्थित ठेवलेलं होतं. एका बाजूला सीतारामचा अर्ज होता. साहेब आपल्या डायरीत काही काही लिहीत होते. कदाचित् स्टाफव्दारे जी माहिती मिळाली, त्याबद्दल नोंदी करत होते. बड्याबाबूंनी केबीनच्या दरवाज्याला लावलेल्या काचेतून बाहेर पाहिले. तिथून बाहेरचं ऑफीसचं सगळं दृश्य स्पष्ट दिसत होतं. एवढ्यात मॅनेजर साहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं.

‘‘हां, बडेबाबू आजचा दिवस कसा काय गेला?”

‘‘ठीक गेला सर! काही अत्यावश्यक, फाईलींचा अभ्यास करत होतो. एक-दीड दिवसांत इथल्या कामाप्रमाणे स्वत:ला ऍडजेस्ट करेन. ”

मॅनेजर साहेबांना थोडं आश्चर्य वाटलं. इथे सकाळपासून रामप्रसाद आणि सीतारामचा किस्सा चालला होता. आणि बडेबाबू फाईली चाळत होते. मॅनेजर पुढे म्हणाले, ‘‘मी रामप्रसाद आणि सीतारामबद्दल विचारतोय. ”

बडेबाबू अगदी सामान्य दिसत होते, जसं काही घडलंच नाही. आपल्या शांत, चिरपरिचित, गंभीर मुद्रेने बघत ते म्हणाले, ‘‘अच्छा! आपण सीतारामबद्दल विचारताय होय? काही नाही सर, छोटीशी जखम झालीय. सगळं ठीक होईल. ”

आता मॅनेजर चकीत झाले. त्यांना वाटलं, एक तर आपल्या बोलण्याचा आशय यांना कळला नाही किंवा मग ते बनवाबनवी करताहेत.

‘‘आपल्याला माहीत आहे ना, की या दोघांच्या केसची मी चौकशी करतोय. आज त्या दोघांमध्ये काय झालं, जरा विस्ताराने सांगा ना!”

पण बडेबाबू कोणत्या मातीचे बनले होते, कुणास ठाऊक? ते जराही विचलित झाले नाहीत. ‘‘म्हणजे रामप्रसाद आणि सीतारामबद्दल विचारताय का आपण?”

‘‘आपण आत्ताच म्हणालात ना की सीतारामला मामुली जखम झालीय. त्याला ती कशी झाली, हे मी जाणून घेऊ इच्छितो. जरा विस्ताराने सांगा. ”

बडेबाबू गंभीरपणे पुढे म्हणाले, ‘‘सर, मी सकाळी आलो. मस्टरवर सही केली आणि माझ्या खुर्चीवर येऊन बसलो. टेबलवर ठेवलेल्या फाईल्समधून अत्यावश्यक फाईली काढल्या आणि त्यांचा अभ्यास करू लागलो. इतक्यात, धडामकन् आवाज आला. मी डोकं वर करून पाहिलं, तर सीताराम अर्धवट टेबलावर व अर्धवट जमिनीवर असा लोंबकळत होता. शक्यता अशी आहे की थोडा लेट झालेला असल्याने, हजेरी पत्रकात सही करताना घाईघाईत तो टेबलावर आपटला असावा. आणि त्याला जखम झाली असावी. ”

मॅनेजर साहेब आता स्वत:ला रोखू शकले नाहीत. आपलं डायरी लिहिण्याचं काम बंद करून त्यांनी पेन खाली ठेवलं आणि डायरी बंद केली. आता लिहिण्यासारखं काही उरलंच नव्हतं.

‘‘वा: ! बडेबाबू आपण तर कमाल केलीत. आपल्याला प्रजासत्ताक दिनी हत्तीवर बसवून आपली मिरवणूक काढली पाहिजे. ”

‘‘का बरं? मी असं कोणतं काम केलंय?”

‘‘बडेबाबू आपल्याला श्रमवीर पुरस्कार मिळायला हवा. आपण आपल्या कामात इतके तल्लीन झाला होतात, की चार पावलांवर दोन शिपायांची मारामारी होते आहे आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. आणि आपण म्हणताय सीतारामचं डोकं टेबलवर आपटलं. ऑफीसमधल्या सगळ्या स्टाफने सांगितलं, ते काय खोटं आहे?”

आता बड्याबाबूंच्या चेह-यावर त्यांचं ते चिरपरिचित कुटील हसू तरळलं. ते या आपल्या ठराविक हास्यपूर्ण चेह-याने मॅनेजरकडे बघत म्हणाले, ‘‘सर, हत्तीवर स्वार तर मी आपल्या सोबतच होईन. ”

आता मॅनेजर साहेबांचा चेहरा रागाने लालीलाल झाला. ‘‘काय बकताय काय तुम्ही?”

‘‘तसं नाही सर! मी खरंच बोलतोय. आज सकाळी जे झालं, ते रामप्रसाद-सीताराम यांच्यापासून सगळ्या स्टाफला माहीत आहे. ”

केबीनच्या काचेतून बाहेर पहात बडेबाबू म्हणाले, ‘‘आता आपल्या बाबतीत बोलायचं, तर इथून बाहेरचं सगळं दृश्य स्पष्ट दिसतं तरीही, सकाळपासून आत्तापर्यंत. एकेका स्टाफ मेंबरला बोलवत त्याला त्या दृश्याचं वर्णन करायला सांगितलंय, ही गोष्ट काही गळ्याखाली नीट उतरली नाही. आता जोपर्यंत हत्तीवरच्या स्वारीचा प्रश्न आहे, तर निवृत्त झाल्यानंतर आपण दोघेही हत्तीवर बसू या. गणतंत्र दिनाच्या परेडमध्ये नव्हे, एखाद्या अभयारण्यात. ”

बडेबाबू उठून उभे राहिले. त्यांनी नमस्कार केला आणि मॅनेजर साहेबांना काही बोलण्याची संधी न देताच ते केबीनच्या बाहेर पडले. मॅनेजर साहेबांना अशा अनपेक्षित उत्तराची मुळीच अपेक्षा नव्हती. इतक्या दीर्घ नोकरीत, अतिशय कडक स्वभावाबद्दल प्रसिध्द असलेल्या मॅनेजर साहेबांचा असा स्पष्टवादी, सटीक आणि सरळ उत्तर देणा-या स्टाफशी आत्तापर्यंत कधीच संबंध आला नव्हता. ते काही वेळ शांतपणे बसले. मग त्यांनी काही विचार केला व डायरी उचलून बाहेर पडले. जाता जाता बडेबाबूंना म्हणाले, ‘‘मी काही जरूरीच्या कामासाठी घरी चाललोय. कुणाचा फोन आला, तर तेव्हढं मॅनेज करा. ”

बडेबाबू काही बोलणार, एवढ्यात मॅनेजर साहेब ऑफीसच्या बाहेर पडलेसुध्दा. ऑफिस सुटायचीही आता वेळ झाली होती. मॅनेजर साहेब जाताच सगळे जसे स्वतंत्र झाले. आणि हळूहळू पिंज-यातून बाहेर पडून आपापल्या घरट्याकडे जाण्यासाठी बाहेर पडले. आता ऑफीसमध्ये फक्त बडेबाबू आणि शूरवीर रामप्रसाद व सीताराम तेवढे उरले. शेवटी तिघांनीही आपापले टिफीन उचलले आणि आपल्या घराच्या दिशेने निघाले.

दुस-या दिवशी ऑफीसला जाण्यापूर्वीच बडेबाबूंना हेडऑफिसमधून फोन आला की त्यांना डेप्युटेशनवर जायची आवश्यकता नाही. त्यांच्या चेह-यावर एक रहस्यमय हसू पसरलं.

बडेबाबू आपल्या पहिल्या ऑफिसमध्ये पोचले, एवढ्यात रामप्रसादचा फोन आला, बडेबाबू, आपले खूप खूप आभार. काल संध्याकाळी आपलं आणि मॅनेजर साहेबांचं काय बोलणं झालं, माहीत नाही. पण आत्ता सकाळी सकाळी मॅनेजर साहेबांनी बोलावलं आणि सांगितलं, की सीतारामने आपला अर्ज परत घेतलाय. पुन्हा तक्रार येता कामा नये.

‘‘चला! बरं झालं! अभिनंदन! माझ्याजागी कुणी दुसरा हेडक्लार्क आला की नाही?”

‘‘नाही. बडेबाबू कोणीच आलं नाही. साहेब म्हणत होते, आपण येणार नाही. आणि त्यांनी त्या टेबलवरच्या सगळ्या फाईली केबीनमध्ये आणून ठेवायला सांगितल्या. ”

बड्याबाबूंच्या चेह-यावर एक रहस्यमय, कुटील हास्य पसरले आणि ते निश्चिंतपणे गुपचुप आपल्या जुन्या फाईली निपटू लागले.

— समाप्त — 

मूळ हिंदी कथा – हाथी की सवारी

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हत्तीवरची स्वारी- भाग – २ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ हत्तीवरची स्वारी – भाग – २ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

 ( या फालतु समस्येवर उपाय तरी काय करायचा? बडेबाबूंच्या दृष्टीने जशी काही ही समस्याच नव्हती. मॅनेजर साहेवांनी थोडा वेळ विचार केला मग इंटरकॉमवरून ते विरेंद्रशी बोलू लागले. ) – इथून पुढे —-

‘अरे विरेंद्र, हा रमेश आहे ना, त्याच्या मोठमोठ्या लोकांशी ओळखी आहेत. तो आपल्यासाठी उगीचच काही तरी खुसपट काढून अडचणी निर्माण करेल. हे बघ, या विभागात कुणी थट्टेने त्याची टुलकीट लपवली असेल, तर तर सांग, कुठल्या तरी ठराविक जागी ती ठेवावी. यावर मी कुठलीही अनुशासनिक कारवाई करणार नाही. ”

बडेबाबूंनी गुपचुप चहाचा शेवटचा घोट घेतला व ते उठले. गंभीर चेह-यावर कुटील हसू आणत मॅनेजरच्या डोळ्यांना डोळे भिडवत म्हणाले, ‘‘काय बोलताय साहेब? थट्टा आणि तीदेखील रमेशची. कोण करणार त्याची थट्टा? ज्याने कुणी हे केले असेल, त्याने ते सिरियसलीच केले असेल. ” आणि मॅनेजर साहेबांच्या प्रतिक्रियेची वाट न बघता ते केबीनमधून बाहेर पडले. मॅनेजर असहाय्यपणे त्यांच्याकडे बघू लागले.

त्या दिवसापासून आजपर्यंत टूलकीट काही मिळाली नाही आणि मॅनेजरने पुन्हा काही त्याबद्दल विचारले नाही.

धीरगंभीर दिसणारा विरेंद्र उर्फ वीरु आणि बडेबाबू या दोघांमध्येही प्रचंड सेन्स ऑफ ह्यूमर होता. त्यांच्याशी अतिशय काळजीपूर्वक बोलावे लागे. नाही तर, ते केव्हा काय बोलतील, ते समजायलाच डोक्याला ताण द्यावा लागे. बड्याबाबूंशी बोलताना अगदी पूर्ण शुध्दीत राहून बोलावं लागे. नाही तर ते असं एखादं वाक्य टाकत की आसपासच्या लोकात आपल्याला हास्यास्पद बनायला वेळ लागत नसे. ते अतिशय गंभीरपणे बोलत. पण त्यावेळी चेह-यावर एक कुटील हसू खेळत असे. हे हसू आसपासच्या लोकांसाठी आहे की ते ज्यांच्याशी बोलताहेत, त्यांच्यासाठी आहे, कळत नसे. थोडक्यात काय, तर त्यांच्याशी सुसंवादी होऊन आपण त्यांच्याशी, जेवढं आवश्यक आहे, तेवढं मोजकंच बोलायला हवं.

बडेबाबू वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर, वक्तशीर होते, तसेच कामाच्या बाबतीत ईमानदार. नोकरीत सध्या ते जिथे आहेत, तेथून त्यांच्या बाबतीत पदोन्नतीची कुठलीही शक्यता नव्हती. तशी त्यांची इच्छाही नव्हती. शिवाय, आता नोकरीत त्यांचं कुणी काही बिघडवू शकेल, याचीही त्यांना काळजी, चिंता नव्हती.

आपल्या हाताखालची मंडळी आणि अधिकारी वर्ग यांच्याशी ते नेहमीच हसून खेळून बोलत. आपली वाक्पटुता आणि स्पष्टवक्तेपणा याबद्दल ते सगळ्या ऑफीसमध्ये सुप्रसिध्द होते. त्यांच्या हाताखालच्या लोकांची काय बिशाद होती, की ते बडेबाबूंशी वाद घालतील. बडेबाबूंच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांचे वरीष्ठ अधिकारीही त्यांच्याकडून प्रेमानेच काम करून घेत.

बड्याबाबूंची नोकरीत आता अवघी पावणे दोन वर्षे उरली होती. त्यापूर्वी एखादी चांगली निवृत्तीयोजना आली, तर त्यांनी ती घेण्याचेही ठरवले होते. अर्थात् त्यामुळे पेन्शनीत फार काही फरक पडला असता असं नाही. इतक्यात बातमी आली की त्यांची बदली झाली. या बदलीसाठी ते मुळीच तयार नव्हते. त्यांनी आपल्या संपर्क सूत्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ब-याच प्रमाणात तो यशस्वीही होत होता. नाही तर त्यांनी सेवानिवृत्ती घेण्याचेही नक्की केले होते. पण त्या कशाची गरज पडली नाही, कारण त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या सेवाकालाचा विचार करून त्यांची बदली करण्याचा विचार रद्द केला. गरज पडेल, तेव्हा त्यांना डेप्युटेशनवर पाठवावे, असे ठरले.

सगळं ठाकठीक चालू होतं. तोपर्यंत कळलं, की त्याच शहरातल्या दुस-या विभागीय कार्यालयातील हेडक्लार्क दीर्घ मुदतीच्या रजेवर जाणार आहेत. बड्याबाबूंना तिथे डेप्युटेशनवर पाठवायचे ठरले. त्यांची काही तशी खास इच्छा नव्हती, पण फारशी असुविधाही नव्हती. शहर तेच. या कार्यालयाऐवजी ते कार्यालय. तेथील हेडक्लार्क रजेवर जाण्यापूर्वी बड्याबाबूंनी फोनवर त्यांच्याशी बोलून तिथल्या कामकाजाविषयीची माहिती जाणून घेतली. त्यांना असं कळलं की तिथले मॅनेजर अतिशय कडक आहेत. पण एकंदर कर्मचारी वर्ग शिस्तीच्या बाबतीत अतिशय ढिला आहे.

शनिवारी ते आपल्या ऑफिसमधून रिलीव्ह झाले आणि सोमवारी सकाळी नेहमीच्या वेळेत नवीन ऑफिसमध्ये पोचले. त्यांना काय कल्पना की त्यांच्या नोकरीच्या तिथल्या पहिल्याच दिवशी तिथे बॉम्ब फुटणार आहे.

साडे दहा वाजले होते, पण रामप्रसाद शिपायाशिवाय ऑफीसमध्ये कुणीच आलेलं नव्हतं. रामप्रसाद म्हणाला, ‘‘साहेब, मॅनेजर साहेब केबीनमध्ये बसले आहेत. ’ बड्याबाबूंनी केबीनकडे नजर टाकली. केबीनच्या काचेवर काळी सनस्क्रीन फिल्म लावली होती. त्यामुळे बाहेरून आतलं दिसत नव्हतं, पण आतून बाहेरचं सगळं स्पष्ट दिसत होते.

ते गुपचुप काहीसे अस्वस्थपणे खुर्चीवर बसले. आणि फाईलींच्या ढिगा-यातल्या काही अत्यावश्यक फाईल्स काढून, मजकूर समजून घेण्याच्या दृष्टीने त्यातील पाने उलटू लागले.

थोड्या वेळाने ऑफीसमध्ये गडबड, गोंधळ वाढू लागला. लोक येऊ लागले. मस्टरवर सही करून आपापल्या जागी बसू लागले. बडेबाबू फायली चाळत होते खरे, पण त्याचवेळी त्यांचं लक्ष सगळीकडे होतं.

सगळं काही ठाक-ठीक चाललं होतं. त्यांच्या टेबलपासून तिस-या किंवा चौथ्या टेबलवर मस्टर ठेवलेलं होतं. रामप्रसाद आणि दुसरा शिपाई सीताराम यांच्यात काही बाचाबाची सुरू झाली. बघता बघता प्रकरण इतकं वाढलं की दोघेही शिव्यागाळीवर उतरले. बड्याबाबूंना वाटलं, थोड्या वेळात सगळं शांत होईल, पण हे काय प्रकरण हातघाईवर आलं. दोघांच्यात मारामारी सुरू झाली. तरीही ते तसेच बसून बघत राहिले. काही लोक भांडण सोडवायला पुढे धावले. पण या दरम्यान दोघांची मारामारी इतकी वाढली, की कुणालाच मधे पडता आलं नाही. रामप्रसादने सीतारामला इतकं जोरात ढकललं, की तो पलिकडच्या टेबलाच्या कोप-यावर जोरात जाऊन आदळला. त्याच्या डोक्याला लागलं. जखमेतून रक्त येऊ लागलं. आता हा सगळा तमाशा थांबवण्यासाठी बड्याबाबूंना नाइलाजाने उठावं लागलं.

त्यांना वाटत होतं, हे प्रकरण इथेच थांबावं. पण सीतारामच्या डोक्याला खोक पडली होती. त्यामुळे तो ऐकायला मुळीच तयार नव्हता. आपलं डोकं धरून तो मॅनेजर साहेबांकडे पोचला. बड्याबाबूंना वाटलं, आता म्हैस पाण्यात गेली.

मॅनेजरने प्रथम सीतारामला मलमपट्टी करण्याची व्यवस्था केली आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की त्याने रामप्रसादशी तडजोड करावी, पण ऑफीसमधील काही स्टाफच्या भडकावण्यामुळे त्याने ते आजिबात ऐकलं नाही व मॅनेजर साहेबांकडे रामप्रसादविरुध्द लेखी तक्रार केली. आता काय करणार? मॅनेजर साहेबांना वाटलं की या सा-या प्रकरणाचा नीट तपास करायला हवा.

सगळ्या कार्यालयातलं सरकारी काम एका बाजूला राहिलं आणि चौकशी करायला सुरुवात झाली. बड्याबाबूंना वाटलं, चांगली व्यवस्थित नोकरी चालू होती. या नाही त्या भानगडीत येऊन अडकलो. पण आता दुसरा काही इलाजही नव्हता. मॅनेजर साहेबांनी एकेका स्टाफ मेंबरला केबीनमध्ये बोलावलं आणि विचारणा सुरू केली. त्यांच्या बोलण्याप्रमाणे ते टिपणं काढू लागले.

ऑफीसमध्ये एका बाजूला रामप्रसाद आणि दुस-या बाजूला सीताराम डोक्याला पट्टी बांधून, शूरवीराप्रमाणे बसले होते. अधून मधून ते संशयित दृष्टीने एकमेकांकडे बघत होते. दोघांमध्ये दोन तीन टेबले होती. कुणास ठाऊक, संध्याकाळपर्यंत मॅनेजर साहेब काय निकाल देतात?

– क्रमशः भाग दुसरा.

मूळ हिंदी कथा – हाथी की सवारी

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हत्तीवरची स्वारी- भाग – १ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ हत्तीवरची स्वारी – भाग – १ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

भोपाळमधील एका सरकारी कार्यालयात प्रबोधबाबू हेड क्लार्क होते. आता हिंदी भाषेच्या रिवाजाप्रमाणे हेडक्लार्कला ‘बडेबाबू’ म्हंटलं जातं. पण प्रबोधजींच्या बाबतीत त्यांचे केवळ सहकर्मीच नव्हेत, तर मॅनेजरपासून डायरेक्टरपर्यंत सगळे त्यांना ‘बडेबाबू’च म्हणत. होता होता परिचित नातेवाईकांमध्येही त्यांना बडेबाबूच म्हंटलं जाऊ लागलं. प्रबोध हे त्यांचं नाव जणू विसरल्यासारखंच झालं.

तर एकदा बडेबाबूंच्या विभागात मेंटेनन्स विभागाकडून, कॉम्प्युटर इंजिनिअर रमेश आला. कॉम्प्युटर मध्ये काही समस्या असतील, तर त्या सोडवणे, सुधारणा वगैरे करणे गरजेचे असेल, तर ते करणे इ. गोष्टींसाठी त्याची नियुक्ती झाली होती. रमेश प्रत्यक्ष कामापेक्षा बढाई मारण्यात पटाईत होता. त्याने विभागातील सर्वांना कॉम्प्युटर किती काळजीपूर्वक हाताळायला हवा, वगैरेबद्दल सूचना दिल्या. लोकांनी कॉम्प्युटर काळजीपूर्वक हाताळले नाहीत, तर त्यांना अद्दल घडवण्यासाठी तो काय काय करू शकतो, हे सांगायलाही त्याने कमी केले नाही. लोक त्याची वायफळ बडबड ऐकून पार वैतागले होते.

 थोड्या वेळाने रमेश पाणी पिण्यासाठी बाहेर कुलरकडे गेला. त्यावेळी रमेशची थट्टा करण्यासाठी बडेबाबूंनी काही जणांना नजरेच्या इशा-यानेच रमेशची टूलकीट लपवायला सांगितली. रमेश पाणी पिऊन परत आला आणि आपली टूलकीट न दिसल्याने तो बेचैन झाला. त्याने त्या विभागात सगळीकडे शोधाशोध केली, पण त्याला त्याची टूलकीट कुठेच मिळाली नाही.

सगळा विभाग अगदी शांत आणि स्तब्ध होता. जसा काही नुकताच कुणाचा तरी मृत्यू झालाय. थोड्या वेळापूर्वी रमेशची बडबड ऐकणारे सगळे, खाली मान घालून आपापल्या फाईलींमध्ये गर्क झाले होते. कुणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

रमेशने आपल्या स्मरणशक्तीवर खूप ताण दिला, पण त्याला काहीच आठवलं नाही. मग तो ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्युटर तपासणीसाठी गेला होता त्या त्या ठिकाणी गेला पण कुणीच त्याला सहकार्य केले नाही. काहींनी त्याला सहानुभूती जरूर दाखवली. ‘नीट आठवून बघ. कुठे ठेवली होतीस टूलकीट?’ ते तर त्याने आधीच केले होते.

सगळा घटनाक्रम बघू जाता रमेशच्या आता लक्षात येऊ लागलं होतं, की ‘दालमें कुछ काला है’. हे लोक त्याच्याशी काही कपट करत आहेत. शेवटी नाईलाजाने तो बडेबाबूंच्या टेबलापुढील खुर्चीवर जाऊन बसला. बडेबाबूंनी त्याला न पाहिल्यासारखे करत आपल्या फाईली बघण्याचं काम चालू ठेवलं. विभागाची अनपेक्षित स्तब्धता, शांतता याचा भंग करत रमेश म्हणाला, ‘‘बडेबाबू माझी टूलकीट मिळत नाही. ’’

‘‘अरे रमेशभैय्या जरा डोक्याला ताण देण्याचा प्रयत्न करा. आपण कुठे गेला होतात? शेवटी कुठे गेलात? आपली टुलकीट शेवटी कुठे ठेवलीत?’’

रमेश आता पुरता वैतागला. म्हणाला, ‘‘बडेबाबू, मी ते सगळं करून बघितलं. ”

‘‘छे: छे: हे काही बरोबर झालं नाही. अखेर आपली छोटीशी टूलबॉक्स ती जाईल कुठे?” आपल्या धीर-गंभीर चेह-यावर एक कुटील हसू खेळवत ते म्हणाले, ‘‘रमेशभैय्या, आपण मुळीच चिंता करु नका. आपण जर खरोखरच टूलकीट आणली असेल, तर ती इथेच कुठेतरी असेल. ”

आता रमेशचं डोकं जरा सटकलंच. चिडून म्हणाला, ‘‘आणली असलीत तर… म्हणजे काय? या विभागातले इतके सगळे कॉम्प्युटर मी त्याच्याशिवाय तपासले का?”

‘‘शांत व्हा. शांत व्हा. रमेशभैय्या. ”

‘‘शांत… शांत काय? मला इतर विभागातसुध्दा कॉम्प्युटर बघायला जायचंय. आपण माझी टूलकीट लवकर मिळवून नाही दिलीत, तर… ”

‘‘तर काय?”

‘‘मी मॅनेजर साहेबांकडे तक्रार करीन. ”

बडेबाबू आपल्या नेहमीच्या चिरपरिचित मुद्रेत पोचले. ‘‘मग करा ना तक्रार!”

संतापाने रमेश उभा राहिला. आणि पाय आपटत मॅनेजरच्या केबीनकडे निघून गेला. विभागात अगदी शांतता पसरली. इतकी शांतता की टाचणी पडली, तरी आवाज येईल. सगळे एक दुस-यांना डोळ्याने खुणावत होते. बडेबाबू निश्चिंत होऊन आपल्या कामाला लागले. त्यांना माहीत होतं, मॅनेजरच्या केबीनमध्ये आत्ता काय चाललं असेल व त्यांना हेही माहीत होतं की हा मुद्दा निकालात कसा काढायचा.

त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मॅनेजरचा इंटरकॉमवरून कॉल आलाच. ते हसत हसत उठले. विभागात सगळीकडे बघत आपले कुटील हसू पसरवले. आणि ते केबीनकडे निघाले. विभागात खुसफुस होऊ लागली. काही जण म्हणत होते, ‘आता मजा येईल’. काहींना वाटत होतं, ‘विनाकारणच भांडण ओढवून घेतले. ’

बडेबाबू मॅनेजरच्या केबीनमध्ये पोचले. रमेश आधीपासून तिथे होताच. केबीनमध्येही शांतता होती. मॅनेजर साहेबांनाही वाटत होतं की हा फालतु मामला लवकरच निपटला जाईल. कारण रमेशची अनेक वरिष्ठ अधिका-यांशी ओळख होती. एवढीशी गोष्ट वरपर्यंत जाऊन कुणी त्यांच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखवावं, असं त्यांना वाटत होतं.

बडेबाबूंच्याकडे तोंड करत मॅनेजर म्हणाले, ‘‘बडेबाबू बसा. बघा बरं या रमेशची काय समस्या आहे?”

बडेबाबू अगदी शांतपणे बसले. आणि गंभीरपणे रमेशकडे बघत म्हणाले, ‘‘रमेशभैय्या काय झालं? आपण तर इतरांच्या समस्या सोडवता. आता आपल्याला कोणती समस्या आली?”

रमेश संतापाने लालीलाल झाला. तो जवळ जवळ किंचाळत म्हणाला, ‘‘बडेबाबू, माझी टूलकीट आपल्या विभागात हरवलीय. ”

बडेबाबू मुळीच उत्तेजित झाले नाहीत. आश्चर्यकचकित होऊन, त्यांनी अगदी शांतपणे विचारलं, ‘‘काय टूलकीट? कमाल आहे. टूलकीट म्हणजे काय कुणी लहान मूल आहे, जे माझ्या विभागात हरवेल. आपण आपलं काम पूर्ण करून बाहेर गेला होतात. तिथे कुठे तरी विसरला असाल. जरा शांत डोकं ठेवून विचार करा. आपण तिकडे कुठे तर विसरला नाहीत ना!”

‘‘मी बाहेर फक्त कूलरचं पाणी प्यायला गेलो होतो. आपल्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. ”

मग रमेश मॅनेजरला म्हणाला, ‘‘सर, मला यांच्याशी काहीही बोलायचे नाही. आपण माझी टूलकीट मिळवून द्या बस्स!”

मॅनेजर साहेबांच्या आता एकंदर परिस्थिती लक्षात येऊ लागली होती. ते म्हणाले, ‘‘रमेश, सध्या दुस-या टूलकीटने तू आपलं काम चालव. मी सगळ्याची माहिती काढून तुला कळवतो. ”

रमेश रागाने उठून उभा राहिला आणि बड्याबाबूंकडे बघत म्हणाला, ‘‘ठीक आहे. सध्या मी जातो. जर आपल्याला यांच्याकडून टूलकीट मिळवण्यात काही अडचण असेल, तर सांगा. मी जनरल मॅनेजरकडे जातो.”

मॅनेजर गप्प बसले. रमेश पाय आपटत तिथून निघून गेला. केबीनमध्ये थोडा वेळ शांतता पसरली. तोपर्यंत चहाची वेळ झाली. त्यांनी कँटीनच्या पो-याला दोन कप चहा केबीनमध्ये पाठवायला सांगितला. पो-या चहा ठेवून निघून गेला. दोघे गुपचुप चहा घेऊ लागले. मॅनेजर साहेबांच्या डोक्यात उलट-सुलट विचारांचा नुसता गुंता झाला होता. या फालतु समस्येवर उपाय तरी काय करायचा? बडेबाबूंच्या दृष्टीने जशी काही ही समस्याच नव्हती. मॅनेजर साहेवांनी थोडा वेळ विचार केला मग इंटरकॉमवरून ते विरेंद्रशी बोलू लागले.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथा – हाथी की सवारी

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पितृदेवो नम: – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ पितृदेवो नम: – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(त्यानी आमच्या वाडीत सर्व घरात पेढे वाटले पण आईला आणि मला वाटतं असे त्याने हे अप्पाना सांगायला हवे होते.. एकवेळ त्याने आम्हाला कळविले नसते तरी चालले असते.. ) इथून पुढे —

म्हणता म्हणता मी बारावी झाले आणि रत्नागिरीस डी एड ची ऍडमिशन घेतली. आप्पा मला रत्नागिरीस घेऊन गेले तेंव्हा माझ्या लक्षात आले, रत्नागिरीस सुद्धा अप्पांच्या किती ओळखी? अगदी st स्टॅन्ड वर सुद्धा लोक अप्पांशी बोलायला येत होती, आम्ही ज्या लॉजवर राहिलो एक रात्र, तेथे पण अप्पाना मोठं मान.. कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी पोहोचलो तेथील क्लार्क अप्पाना ओळखत होते, त्यानी भरभर आमची कामे केली. अप्पांच्या नाट्यप्रेमाने आणि भजनी गाण्याने अप्पानी माणसे जोडली होती.

अप्पांचे नाट्यप्रेम आणि भजनप्रेम जोरात होते, त्यानी पंचक्रोशीतील धडपडया तरुणांना एकत्र करून नाटकें सुरु ठेवली, आमच्या गावात नोकरीनिमित्त आलेल्या दोन बाई पण नाटकात भाग घेऊ लागल्या आणि आप्पा बाळ कोल्हटकरांची, मधुसूदन कालेलकरांची नाटकें बसवू लागले आणि सावंतवाडी, वेगुले, मालवण ते रत्नागिरी पर्यत नाटकें नेऊ लागले.

दादा नोकरीला लागला आणि मामानी त्याचे लग्न जमवले. त्याच्याच ऑफिस मधील मुलगी. दादाने पत्र लिहून आईला कळविले आणि आईला आणि मला लग्नाला बोलावले. अप्पाना दादाचे लग्न ठरत आहे, हे कळले तेंव्हा 

आप्पा – आनंदाची बातमी आहे, जोशी च्या घरात नवीन सून येते आहे, तुम्हाला दोघीना बोलवले आहे, मी st चे बुकिंग करून ठेवतो, तुम्ही दोघी जा लग्नाला, रविला आणि तूझ्या भावाला पण आनंद होईल.

आई – पण त्याने आपल्या पित्याला बोलावलेले नाही, हे मला आवडलेले नाही. मी लग्नाला जायची नाही.

आप्पा – असे करू नका, त्याला वाईट वाटेल, माझी काळजी करू नका. तुम्ही दोघी जाच.

आई – मी नाही जाणारं, येथूनच अक्षता टाकेन, नंदेला जाऊदे.

शेवटी आई लग्नाला गेली नाही आणि मी पण नाही.

माझ्या अप्पाना लग्नाला बोलावले नाही म्हणजे काय?

—रवी —

माझ्या लग्नाला आई, नंदा आली नाहीत, कदाचित अप्पाना लग्नाला बोलवले नाही, हे त्याना खटकले असेल. पण अप्पानाबद्दल माझ्या मनात अढी बसलीच आहे, ती कशी निघणार. शिवाय ती मंडळी आली तर मामाकडेच उतरणार आणि मामा आणि अप्पांचे बोलणे किती वर्षांपासून नाही. म्हणजे मामाची पण आप्पा लग्नाला येऊ नये अशी इच्छा असणार.

लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात मामांच्या आणि ऑफिस च्या कृपेनें मी जागा घेतली आणि आता तरी आईने माझे घर पहावे, असे मला वाटू लागले. मी तिला पत्र लिहिले पण तिचे उत्तर आले नाही.

माझ्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले असतील, एक दिवस नंदेचा ऑफिसमध्ये फोन आला आणि मी सटपटलोच “आईला अर्धांग वायूचा मोठा झटका आला असून अप्पानी तिला रत्नागिरीत परकार हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे ‘.

मी घाबरलो, आई म्हणजे माझा कलीजा होता, मी त्याच दिवशी रात्रीची रत्नागिरी st पकडली आणि पहाटे रत्नागिरीत पोहोचलो.

आईची परिस्थिती गंभीर होती, सलाईन्स लावलेली होती. तिचा फक्त एक डोळा उघडा होता आणि एक हात हलत होता. ती कुणालाच ओळखत नव्हती. आप्पा आणि नंदा बाजूलाच होती.

मला पहाताच आप्पा रडू लागले, नंदा रडू लागली, माझ्याही डोळ्यातून अश्रू गलत होते.

संध्याकाळी मी डॉ ना भेटलो, त्त्यांचे म्हणणे आता पेशन्टला घरी घेऊन जा, हॉस्पिटलमधील उपचार केले आहेत, यापुढे उपचार नाहीत. घरी नेऊन मालिश करा, व्यायाम करून घ्या.

 त्याच दिवशी आम्ही आईला घरी आणले.

आईला घरी आणल्यापासून अप्पानी आईचा चार्ज घेतला. रोज तेलाने मालिश करण्यापासून हात वरखाली करणे, पाय वर करणे, गरम पाण्याने शेकणे सुरु केले. शिवाय आम्हा सर्वांचे जेवणं करणे सुद्धा.

अप्पानी आईला हॉस्पिटल मधून घरी आणले हे कळले मात्र, दुसऱ्या दिवशी पासून गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक भेटायला येऊ लागले, कित्येक लोक मदत करण्यासाठी आले. काही बायकांनी रोज भांडी घासून दयायचा, जमिनीला शेण सरवून द्यायच्या.

कोणी आईसाठी तेल आणली, डुकराचे तेल आणले.

एव्हडी माणसे आमच्या घरी कशी काय येतात हा मला प्रश्न पडत होता. गावचे सरपंच, पोलीस पाटील अगदी जिल्ह्याचे आमदार पण येऊन चौकशी करून गेले, सारे जणं येऊन अप्पाना भेटत होते. काही लागलं तर कळवा, असे सांगत होते.

मी नंदेला विचारलं “नंदे, एव्हडी माणसे चौकशीला, मदतीला कशी काय येत आहेत?

नंदी म्हणाली “दादा, हे अप्पामुळे, आप्पा सर्व समाजात मिसळतात, कोण कुठल्या जातीचा हे पहात नाहीत. त्याना घेऊन भजन करतात, कोणालाही पेटी तबला विना मोबदला शिकवतात, गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन नाटकें बसवतात त्यामुळे ही लोक अप्पांच्या मदतीसाठी धावून आलीत ‘.

 मला शरम वाटली. मी असे काहीच केले नाही, अशी माणसे जोडली नाहीत.

रत्नागिरीच्या डॉ नी एक दिवसाड एक इंजेकशन घायला लिहून दिले होते. या खेडेगावात कोण इंजेकशन देणार असा मला प्रश्न पडला, अप्पानी दहा km वरील डॉ ना निरोप पाठविला मात्र, ते डॉ घरी येऊन इंजेकशन देऊ लागले, आईचे ब्लड प्रेशर पाहू लागले. अप्पानी एव्हडी माणसे जोडली होती, हे खरे.

आईच्या आजारपणामुळे आप्पा सर्वच आघाडी्यावर लढत होते. पहाटे उठून गोठ्यात जाणे, शेण काढणे, दूध काढणे मग आईची स्वछता.. कपडे बदलणे.. आंघोळ घालणे.. आमच्यासाठी चहा, नाश्ता करणे.

मग गावात भिक्षुकीला जाणे. नंदी मदतीला होती थोडीफ़ार पण तिला पण कॉलेजला जायची घाई होती. मग माझ्या आईची काळजी कोण घेणार?

माझी रजा पण संपत आलेली, नंदी रतनगिरीला जायची, मग घर आणि अंथरुणाला खिललेली आईकडे लक्ष द्यायला कोण? एकटे आप्पा, आणि त्यानी गोळा केलेली माणसं.

आणि मी अप्पाना दोष दयायचो?गेल्या कित्येक वर्षात त्याचेशी भाषण केलेले नाही, माझ्या लग्नात त्याना बोलावले नाही? त्याना सून दाखवली नाही अजून? नवीन घर घेतल मुंबईत, तर बघायला या म्हंटले नाही?

किती चुकीचा वागलो मी. आई आणि नंदू सारखी सांगायची, अप्पांशी निदान दोन शब्द बोल… ते पण केल नाही मी.

माझा जायचा दिवस आला, दुपारी जेऊन निघणार होतो मी.. अप्पानी वरण भात मेतकूट तयार ठेवले होते. अप्पानी आईला सूप भरविले आणि नंदीने ताटे घेतली.

मी कसाबसा दोन घास घशाखाली घातले. मी उठलो हे पाहून आप्पा आणि नंदी पण ताटावरून उठली. मी आईकडे जाऊन तिच्या डोकयावरून हात फिरवीला, माझ्या पाठीच आप्पा आणि नंदी उभी होती.

घशात कढ येत होते, डोळ्यात अश्रू जमा होत होते. काहीकळायचंय आत मी अप्पांच्या गळ्यात पडलो, “क्षमा करा आप्पा, तुमच्या कोकराला क्षमा करा, तुम्हांला ओळखल नाही मी आप्पा ‘.

आप्पा मला थोपटत होते.

“असुदे, असुदे बाळा, अरे बाप मुलावर कधी रागवेल काय? बाप मुलावर फक्त प्रेम करतो, तो रागवेल कसा?

“आप्पा, माझ्यासारखा मुलगा असता तर कुठलाई बाप रागावला असताच, पण आपा, तुम्ही खरच महान आहात.. तुम्ही गावातील लोकांना जमवून भजने करता, नाटकें करता, जातीपतीचा विचार करत नाही म्हणून मी दोष देत होतो, पण तुम्ही समाजात मिसळून किती माणसे जमवलीत हे आईच्या या आजारपणात समजले. आपण समाजात मिसळलो तर समाज तुमच्या मदतीला धावतो, हे मला समजलं क्षमा करा आप्पा, क्षमा करा ‘.

आप्पा रडत रडत मला थोपटत होते, शेजारी नंदी पण मला मिठी मारून रडत होती.

मी बाहेर पडताना आईकडे पाहिले, आई पण हसत होती असा मला भास होत होता.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पितृदेवो नम: – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ पितृदेवो नम: – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

माझी शाळा सुटली तशी मी धावतच घरी आले. बाकी वर्गातील मुले रेंगाळत रेंगाळत येत होती मागाहून, पण मला घाई होती. दूध पिऊन आप्पा सोबत देवळात जायचे होते. आमच्या घराच्या पानंदी जवळ अप्पाचं दिसलें. काठीने आमच्या काळू आणि सैना या गाईना हाकवत गोठ्याकडे नेत होते. मला पहाताच आप्पा म्हणाले 

“नंदा, धावतेस कशाला? कोण पाठी लागलाय?

मी म्हंटल “अहो आप्पा, तुमच्या बरोबर देवळात यायचंय, रोजच येते ना मी ‘.

आप्पा हसून म्हणाले “होय बाई, मला माहित होते पण गमतीने विचारले ‘.

मी धावत धावत घरात घुसले आणि दप्तर कोपऱ्यात ठेवले. घरात गेले तर आईने नुकतेच चुलीवरून दूध उतरवून ठेवले होते. चुलच्या बाजूला ठेवलेल्या फडक्याने मी गरम पातेल्यातील दूध माझ्या ग्लासात ओतले आणि फुन्कर मारीत मारीत दूध पिऊन टाकले.

मग खोलीत जाऊन फ्रॉक बदलला आणि अप्पांची वाट पहात राहिले.

गोठ्यात आई काळूचे दूध काढत होती आणि आप्पा छोटया वासराला पकडून होते. दोन तांब्ये भरून आईने दूध काढले आणि अप्पानी वासराला लुचायला सोडले. दोन हातात दोन दुधाने भरलेले तांब्ये घेऊन आई मागील दाराने आत आली आणि मला पहाताच म्हणाली 

“दूध घेतलंस का? आणि रात्री घरी आल्यावर अभ्यास पुरा करायचा गुरुजींचा. सकाळी उशिरा उठतेस तू, सकाळसाठी ठेऊ नकोस. दादा आला का शाळेतून “?

मी म्हंटल “नाही बहुतेक, आला तर मला दिसला असता ‘.

तेव्हड्यात आप्पा त्यान्च्या पंच्यावर अंगात बंडी घालून आणि मोठी बॅटरी आणि काठी घेऊन लोट्यावर हजर झाले, मला पहाताच म्हणाले 

“चला, नंदू बेटा.. ते खोरणात पुस्तक असेल ते घे आणि चप्पल घाल, चला..

एव्हड्यात आई पदराला हात पुशीत बाहेर आली आणि मला म्हणाली 

“अप्पांचा हात सोडू नकोस जाताना येताना.. वाटेल फुर्शी, दिवडे येतात पायाखाली, बघूनचाल ‘.

मी हो.. हो म्हंटले आणि अप्पांचा हात पकडला, आम्ही अंगणातून बाहेर पडणार एव्हड्यात दादा शाळेतून आला. मी अप्पांचा हात पकडून निघणार, एव्हड्यात तो माझ्यावर खेकसला “नंदे, काय चाललंय तुझं? कसली फालतू नाटकें करता? गावातील फालतू माणसामध्ये वावरता? निदान तू तरी..

मी त्याच्या बाजूने धावत बाहेर गेले आणि अप्पांच्या पुढे चालू लागले.

आप्पा – नंदे, तूझ्या दादाला आवडत नाही तू माझ्याबरोबर येतेस ते, मग तू कशाला येतेस, तू जा बरे घरी 

मी – आप्पा, मला आवडते नाटक, तुम्ही इतरांना नाटक शिकवता ते आवडत, मला आता नाटक पाठ पण झाले आहे.

आप्पा – खरे की काय आणि नाटकातल्या पार्ट्याना पाठ होत नाही.

बोलत बोलत मी आणि आप्पा देवळाकडे पोहोचलो.

मी आप्पाचा हात पकडून देवळात पोहोचलो तोपर्यत गावातील इतर झिलगे आले होते, मी काही लोकांना ओळखत होते, कुंभारांचा नामू, मोन्या जळवी, संतू मडवल, कृष्णा जगताप आणि इतर काही. अप्पानी माझ्याकडून पुस्तक मागून घेतले आणि आप्पा म्हणाले -अंक दुसरा -प्रवेश पहिला.. औरंगजेब आणि दिलेरखान… म्हणताच दिलेरखनाची भूमिका करणारा नामू कुंभार उभा राहिला, औरंगजेबाची भूमिका आप्पा स्वतः करत होते. अप्पानी नामूला दरबारात प्रवेश कसा करायचा, नजर कुठे ठेवायची.. बादशहाला मुजरा कसा करायचा हे दाखवले आणि नामूकडून तीन वेळा करून घेतले. मग आप्पा बादशहाच्या भूमिकेत बाकावर बसले आणि बादशहाचे सवांद म्हणू लागले. माझ्या मनात आले, माझे आप्पा पहिली की दुसरी शिकलेले, गावात भिक्षुकी करणारे, कधी शिवाजी, कधी सोयराबाई, कधी दिलेरखान तर कधी औरंगजेब बादशहा कसे बनतात? त्यान्च्या भूमिकेत कसे काय शिरतात? या गावाच्या पलीकडे ते फारसे जात नाहीत.. कधी मधी रत्नागिरी पर्यत.. मग एव्हडे नाटक बसवणे कसे काय जमते? याचा अर्थ माझे अप्प्पा खुप खुप हुशार असणार. मग माझा दादा आप्पावर का चिडून असतो? तो त्याच्याशी एक शब्द पण बोलत नाही.. सारे आईकडे.

नाटकाची तालीम संपवून आम्ही घरी आलो. आई बिचारी आमची वाट पहात होती. मग जेवणं करून झोपलो.

सकाळी मला जाग आली, तेंव्हा माझ्या लक्षात आले आप्पा सकाळीच भिक्षुकीला गेले असणार, त्याआधी त्यानी गोठ्यात गाईचे शेण काढले असणार आणि शेण डोकयावरून टोपलीतून बागेत फोफलीना टाकले असणार, मग आप्पा किती वाजता उठले असतील? रात्री उशिरा झोपतात आणि भल्या पहाटे उठतात आप्पा.

 मी खोलीतून बाहेर आले एव्हडयात आतील खोलीतून आई आणि रविदादा यांचे मोठमोठ्याने बोलणे ऐकू आले, मी कान टवकारले 

दादा – मला हे पसंत नाही, रोज नाटकें करतात.. गावातल्या कसल्या कसल्या लोकांना जमवतात.. तो कोण न्हावी, कुंभार, मडवल, हरिजन सुद्धा असतो म्हणतात नाटकात.. सकाळी गावात भिक्षुकी करतात आणि रात्री नाटकाची तालीम, आणि नंदेला घेऊन जातात बरोबर, तू सांगत कसे नाहीस त्यांना?

आई – रवी, त्त्यांची आवड आहे ती. नाटक, भजन हा त्त्यांचा श्वास आहे. त्त्यांचे रोजचे काम ते व्यवस्थित करतात ना, रोज गावातील भिक्षुकीला जातात शिवाय कुठे एकादशणी, सत्यनारायण असेल ती पण चुकवतत नाहीत. आपण दोन वेळ जेवतो, कपडे घालतो तो त्याचेंचमुळे. शिवाय गुरांना चरायला नेणे, गवतकाडी घालणे कोण करत? तू करतोस काही?

रवी – पण खालच्या जातीच्या लोकांमध्ये वावरणे बरे काय? आपले मामा बघ.. म्हणजे तुझे भाऊ.. कसे अलिप्त राहतात गावापासून, तूझ्या भावाकडे असे वातावरण असताना, तू तूझ्या नवऱ्याला का सांगत नाहीस?

आई – लग्नाच्या आधी मी माहेरची होते, त्यावेळी ते संस्कार होते.. लग्न करून या घरात आले, आता माहेरचे विसरले आणि या घराचे झाले.

रवी – पण नंदेला तरी या लोकात नेऊ नको म्हणावं.

आई – तिला आवडते नाटक, जाऊदे तिला.. नाहीतरी या गावात कसली करमणूक आहे.. जाते आवडीने.. जाऊदे.

दादा रागारागाने त्याच्या खोलीत गेल्याचे मी पाहिले. मी आईजवळ जाताच आई म्हणाली “नंदे, दोघांचे एक मिनिट पटत नाही.. हा रवी बोलत पण नाही आप्पशी. कसला राग घेऊन बसला आहे?

रवी – आईला किती सांगितले तरी ती अप्पांचीच बाजू घेते, खरे तर तिने तिचे भाऊ.. म्हणजे माझे मामा कसे वागतात हे तिला माहित आहे.. गावचे मामा पण गावातील इतर समाजापासून अलिप्त असतांत, मुंबईचे मामा पण, कामावर जाताना आपला डबा आणि पाण्याच्या बाटलीला कोणाला हात लावू देत नाहीत, एव्हडे सोवळे पाळतात आणि माझे वडील आप्पा सर्व जातीतील लोकांमध्ये मिसळतात. त्याचेंसोबत जेवत पण असतील, भजनाच्या वेळी कुणाच्याही घरी चहा पितात, मला हे अजिबात आवडत नाही. सोबत नंदेला घेऊन जातात हे पण पटलेले नाही. नंदेला काय.. आपल्या अप्पांचा पुळका असतो.

मी दोन वेळा वाद घातला अप्पांशी, पण त्यान्च्यात काही बदल नाही. या घरात रहाण्याचा पण मला कंटाळा आला आहे, पण आई म्हणजे माझा वीक पॉईंट आहे, तिच्यावर माझे फार प्रेम आहे. मी जन्मत. अशक्त होतो म्हणे, आईने निगुतीने मला मोठं केल, तिला वाईट वाटतं मी अप्पांशी बोलत नाही ते.. पण त्यानी आपले वागण बदलावं.. मग मी बोलेन.

नंदा – दादा मॅट्रिक झाला आणि मोठया मामाकडे शिक्षणासाठी मुंबईला गेला. दादा माझ्या मामाचा खुप लाडका. दोघांचे विचार सारखेच…. अप्पांच्या विरुद्ध.. म्हणून दोघेही अप्पाना दुषणे देत असतांत… पण मी आप्पाच्या विचाराची.. अप्पांची नाटकें आवडीने पहाणारी.. भजने ऐकणारी.

कॉलेजात असताना दादा चार दिवसासाठी यायचा, आई आणि तो तासंतास गप्पा मारायचे पण तो अप्पांशी कधी बोलला नाही. दादा आला म्हणजे आप्पा खुश असायचे, त्याच्यासाठी शहाळी आणायचे, ओले काजू आणायचे, आंबे आणायचे पण दादाला त्त्यांचे हे प्रेम कसे दिसायचे नाही कोण जाणे?

दादा ग्रॅज्युएट झाला आणि नोकरीला लागला. त्याने पत्र लिहून आईला कळविले. आईने अप्पाना सांगितले, तेंव्हा त्याना किती आनंद झाला. ते जेथे जेथे भिक्षुकीला जात तेथे त्या लोकांना आपल्या मुलाबद्दल सांगत. त्यानी आमच्या वाडीत सर्व घरात पेढे वाटले पण आईला आणि मला वाटतं असे त्याने हे अप्पाना सांगायला हवे होते.. एकवेळ त्याने आम्हाला कळविले नसते तरी चालले असते..

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आया… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ आया…  ☆ सौ. वृंदा गंभीर

माझं बालपण खेड्यात गेलं… एकत्र कुटुंब होतं मोठं होतं त्यामुळे प्रेमाला काही कमी नव्हती सगळे लाड करायचे.

खेड्यात असूनही सगळे सुशिक्षित होते… त्यामुळे शिक्षण हेच ध्येय होतं. माझं आणि भांवडांचं दहावी पर्यंत शिक्षण झालं आणि पुढच्या शिक्षणासाठी आम्हाला शहरात पाठवलं काकू होती आमच्याबरोबर एक स्वतःच घर घेऊन दिल सगळ्या सुखसोई करून दिल्या आणि आमचं कॉलेज जीवन सुरु झालं… 

मी सॉफ्टवेअर इंजिनियर झाले आणि चांगल्या कंपनीत जॉब लागला, पॅकेज मिळालं दहा लाखाचं खूप आनंदी झाले सगळे एव्हणा खेड्याच रूप बदलून शहरी झाले होते. बोलणं राहणीमान थोडासा गर्व आलाच होता.

माझे भांवड पण जॉब ला लागले कोणी तर परदेशीं गेले… 

आता वेळ आली होती लग्नाची अर्थात अपेक्षा खूप होत्या माझ्यापेक्षा पॅकेज जास्त असावं त्याचा स्वतःचा बंगला गाडी एनव्हेसमेंट पुन्हा दोघंच असावे घरचे कोणीही नको… 

आई पप्पा कंटाळले स्थळ बघून कुठे मुलगा आवडत होता तर त्याची परिस्थिती नव्हती आणि असलीतर मुलगा आवडायचा नाही माझं वय 30 झालं मी प्रगती खूप केली होती. अशातच माझ्या कपंनीत एक अमेरिकेतून आलेला आपला भारतीय मुलगा आला दिसायला हँडसम होता बघताक्षणी तो आवडला हळू हळू ओळख झाली, , , , , मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

घरी सांगितलं सगळे खुश झाले लग्न करून दिल खूप थाटामाटात लग्न केल, , , , कशाची कमी नव्हती लग्न करून गावी गेलो पूजा झाली आणि हनिमून साठी स्विझरलँड ला गेलो एक महिन्याची रजा होती दोघांची खूप समाधान आणि आनंद ओसंडून वहात होता. दोघांचे विचार जुळत होते मन एकरूप झालं होतं जणूकाही एक आत्मा आणि दोन शरीर असेच एकरूप झालो होतो………

सुट्टी संपली आणि आम्ही घरी आलो दोघंच घरी रोज जॉब आणि घर सुट्टीच्या दिवशी एकमेकांना वेळ देणं बस, , , , , , , , एक दिवस खूप मळमळ व्हायला लागली थोडीशी चक्कर आली डोळ्यांना अंधारी आली काहीच सुचेना 

मी घरी आले व अभि ला म्हणजे माझ्या नवऱ्याला कॉल केला तो लगेच आला व मला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला DR म्हणाले घाबरण्यासारखं काही नाही तुम्ही “आई “होणार आहे…

मला व अभी ला खूप आनंद झाला.

घरी कळवलं सगळे भेटायला आले खायला पौस्टिक लाडू करून आणले काळीज घ्यायला सांगितली व ते पुन्हा गावी गेले.

नऊ महिने पूर्ण झाले होते कधीही डिलेव्हरी होईल असं सांगितलं रात्री अचानक पोटात कळा यायला लागल्या व मला हॉस्पिटल मध्ये नेलं सिझर झालं आणि गोड गोंडस गोरीपान मुलगी झाली…

बस आता एकच मुलगी वाढवायची असा निर्णय घेतला ती एक वर्षाची होईपर्यंत मी घरी राहिले तरीही एक आया होती तिला सांभाळायला नाहूमाखू घालायला तिचा बाळाला लळा लागला होता म्हणून मी बिधास्त होते. कामाचा व्याप वाढला होता दोघांनाही वेळ मिळतं नव्हता बाळाला वेळ देता येत नव्हता….

“अशू” म्हणजे माझी मुलगी पाच वर्षाची झाली सगळं काही आया करत होती. पण अशू एकटी पडत चालली होती हट्टी झाली होती कुणाचही ऐकत नव्हती. मीं एकदा सुट्टी काढून गावी गेले तिला थोडा बदल हवा म्हणून तिथे माझ्या जावेचे मुलं खूप शांत समजदार नाती जपणारी सर्वांचे आदर सन्मान करणारी सुसंकृत मुलं दिसली मला वाईट वाटलं कदाचित माझी मुलगी आज्जी आजोबांबरोबर राहिली असती तर अशीच घडली असती कुटुंबात जे वळण लागतं ते चार भिंतीच्या आत आया कडून कसं लागेल. मी अभी ला म्हणाले अशू करता मी गावी रहाते जॉब सोडते पण अशू ऐकायला तयार नव्हती आज्जी आजोबांना घेऊन जाऊ म्हणाले तर घरी एक आज्जी आहे मला तिचा हवी असं म्हणाली वेळ निघून गेली होती फक्त पच्छाताप उरला होता…….

पैसा तर आया ला गेला होता पण मुलगी हाताबाहेर गेली होती आता अशू कॉलेज मध्ये जात होती मित्र मैत्रिणी होत्या पण सगळे बिघडलेले बघवत नव्हतं पण चूक आमचीच होती पैसा आणि प्रतिष्ठा कमवायच्या नादात संस्कृती हरवली होती.

अशू एक दिवस लग्न करून घरी आली मुलगा ड्रग्ज घेत होता बघून खूप त्रास झाला आता पैसा उपयोगी येणार नाही आज माणूस आपलं माणूस हवं होतं असं मनाला वाटून गेलं… 

अभी ला सहन झालं नाही तो अटॅक येऊन जागीच गेला माझ्या डोळ्यापुढे अंधार होता….. आज पैसा प्रतिष्ठा सगळं होतं पण इज्जत राहिली नाही हेच खरं होतं…..

 मी ठरवलं हे सगळं दान करायचं आणि आपण आश्रमात जाऊन रहायचं आणि तिथे सेवा करायची कारण गावी जाऊ शकत नव्हते, , , , , , आज मी घातलेल्या अटीची मला लाज वाटत होती आज जर माझे सासू सासरे माझ्या सोबत असते तर आज्जीआजोबांच्या संस्कारात मुलगी वाढली असती आणि हे दिवस बघायला मिळाले नसते.

आया पैसा घेऊन कामं करणाऱ्या असतात त्या काय मुलांना वळण, संस्कार लावणार…

मला हेच सांगायचं नाती जपा मुलांना पाळणा घर किंवा आया नकोय आज्जी आजोबांची छत्रछाया हवी संस्काराची शिदोरी फक्त आज्जीआजोबा देऊ शकतात आयुष्यभर पुरेल एवढी तेंव्हा पैसा प्रतिष्ठा तर हवी त्याचं बरोबर नाती आणि संस्कार हवेत तेंव्हाच “संस्कृती टिकेल” हे लक्षात असुद्या… 

मी चुकले तुम्ही चुकू नका आई वडिलांनी शिकवलं म्हणून आपण प्रतिष्ठा मिळवली प्रगती केली जसे आपल्या आई वडिलांनी कष्ट केले तसेच सासू सासऱ्यांनी पण केलेले असतात म्हणून नवरा क्लासवन अधिकारी होतो म्हणून त्यांना मान द्या सन्मान करा आणि पुढची पिढी सुसंस्कारी घडवा तर शेवट छान होईल नाहीतर आहेच माझ्यासारखं वृद्धाश्रम

आणि हो अशू कुठे आहे, काय करते माहित नाही. ती जिवंत आहे की नाही तेही माहित नाही.

मी गेलेल्या वेळेचा आणि पैशाच्या नादात मुलीला वेळ न दिल्याचा फक्त पच्छाताप करत बसते दुसरं माझ्या हाती काही नाही.

शिक्षण घ्या पण गर्व करू नका 

© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares