मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(ओह, माझ्याकडची एक मोठी बॅग, गाडीला अडकवलेल्या तशाच दोन मोठ्या बॅगा, जशा Swiggy Zomato किंवा कुरिअर यांच्या डिलिव्हरी बॉईज कडे असतात तशा… हे पाहून आजीने अंदाज बांधला मी सुद्धा डिलिव्हरी बॉय आहे.

… हाताने बॅग शोधणे सुरूच होते.) 

इथून पुढे – – – 

आजीकडे दुसरे गिऱ्हाईक नव्हते, ती उघड्या डब्याचे झाकण लावत, उघड्या कढईवर मोठं भांड ठेवत, पदराला हात पुसत आपुलकीने विचारू लागली, ‘तु अमुक अमुक दुष्काळी भागातला ना रे? माझ्याकडे खूप मुले येतात त्या भागातली बेटा. ‘

‘आई वडील काय शेताकडे मजुरी करतात का…?

शिक्षण किती झालंय तुझं? दहावी तरी पास आहेस का…? लग्न झालंय का? पोर बाळ काही आहे का? ‘

आजीचे प्रश्न संपत नव्हते. आजी टपरीतलं इकडं तिकडं पडलेलं साहित्य आवराआवरी करत विचारत होती. मध्येच पदरानं तोंड पुसत होती.

मी तिला म्हणालो, ‘आजी मी डॉक्टर…

पुढचं बोलू न देता ती मला म्हणाली ‘ हां, अरे सगळीच खेड्यातली गरीब मुलं डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी व्हायची स्वप्न घेऊन येतात, पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत बाळा’ 

‘असू दे, आता जिथे नोकरी करतोयस तिथे करत रहा, पुढे नशीब पालटेल, फक्त कष्ट करत रहा प्रामाणिकपणे… रडायचं नाही बेटा लढायचं… ‘

‘आता ज्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोस तिथे किती दहा-बारा हजार तरी देतात का? एवढ्या पैशात पुण्यात राहायचं कसं आणि गावाकडे आई बापाला पैसे कसे पाठवायचे…? ‘ खरंच तिच्या चेहऱ्यावर चिंता पसरली.

थोड्या वेळात माझ्यासारख्या “डिलिव्हरी बॉय” ची दुःख तिची होऊन गेली… काही मिनिटातच ती मला आपलंसं करून गेली.

आजीचे प्रश्न अजूनही थांबत नव्हते.

तीच्याकडे गिऱ्हाईक म्हणून येणाऱ्या इतर सगळ्या डिलिव्हरी बॉईज मुलांचे अनुभव ऐकून, मीही त्यातलाच एक आहे हे समजून, तीने त्यांच्या व्यथा तिच्याही न कळत मला चिटकवून टाकल्या होत्या.

एव्हाना माझी बॅग सापडली, मी आजीला पैसे काढून देणार, इतक्यात विचार आला, आजी मला जो डिलिव्हरी बॉय समजत आहे, तेच तिच्या मनात राहू दे.

माझे भीक मागणाऱ्या लोकांमध्ये बसून मळलेले आणि चुरगाळलेले कपडे, पावसाने चेहऱ्याचा आणि केसांचा केलेला विकृत मेकअप, डिलिव्हरी बॉईज सारख्या बॅगा, कुठल्याही खिशात न सापडलेले पैसे आणि त्यात फाटलेला रेनकोट…!

या सर्वांमुळे गरीब घरातला आहे, हे समजून आजी माझ्याशी प्रेमाने बोलत होती आणि वागत होती.

मी डॉक्टर आहे वगैरे सांगितलं तर क्षणार्धात तिची माझ्याबद्दलची माया, कणव संपून जाईल.

आणि मी माझ्याबद्दल तिला सांगून तरी काय झेंडे लावणार होतो?

कारण ती स्वतः गरीब होती, आणि कष्ट करून जगत असलेल्या गरीब मुलांबद्दल तिला आपोआपच जिव्हाळा वाटत होता.

मलाही ती तेच समजली होती…

ती आईच्या रूपाने, देत असलेल्या जिव्हाळ्याच्या या दुधात, मी डॉक्टर आहे, असं सांगून मला मिठाचा खडा टाकायचा नव्हता.

तीच्या मनात जो गरीब मुलगा तिने रंगवला होता, मला ते चित्र पुसायचे नव्हते…!

आपलंसं समजून मनातल्या मनात माझ्याबद्दल वाळूचं घरटं जे तिने बांधलं होतं, मला ते विस्कटायचं नव्हतं 

खरंतर तीनं माझं रंगवलेले रूप मला आवडलं होतं…

हाच तर खरा आहे भिक्षेकर्‍यांचा प्रतिनिधी…!!!

पैशाची बॅग होती तिथे ठेवून आजीला म्हणालो, ‘आजी तीस रुपये माझ्यावर उधार… दोन दिवसात देतो. ‘

‘दे रे पगार झाल्यावर दिले तरी चालतील. मला कोणी फसवत नाही. ‘ 

नाही म्हणताना, उजव्या हाताचा पंजा, नाही, अशा अर्थाने, माझ्या चेहऱ्यासमोर नाचवत ती बेदरकारपणे म्हणाली.

‘फसवणारे फसवून गेले… ते सगळे माझेच होते, गोड बोलून माझ्याकडचं सर्व घेऊन निघून गेले, कुठे गेले मला माहित नाही. ‘ हे बोलताना मात्र ती भाऊक झाली.

‘कधीतरी वाटतं, भेटावं त्यांना शोधावं त्यांना… नातवंडं आता मोठी झाली असतील’

हे वाक्य बोलताना आजीच्या आवाजाला कंप सुटला, पुढे तिला बोलताच येईना, पुढचं सगळं आजीच्या डोळ्यातल्या पाण्याने सांगितलं… आजीनं डोळ्याला पदर लावला.

पुन्हा खाली मान घालून पदराने तिने डोळे पुसले.

पण पुढच्याच क्षणी पदर झटकून, खंबीरपणे चढ्या आवाजात म्हणाली, ‘जाऊदे शोधायचं तरी कशाला? शोध हरवलेल्यांचा घ्यायचा असतो, स्वतःहून गेलेल्यांचा नाही…!

‘हरवलं असेल तर नक्की सापडतं पण लपवून ठेवल्यावर माणसानं करायचं काय…? ‘ हुंदका देत ती म्हणाली.

‘माझं जाऊ दे तुझं सांग’ म्हणत शेजारच्या पातेल्यातून ओंजळीत पाणी घेऊन ते तिने चेहऱ्यावर सपासप मारलं.

मघाशी पाऊस माझ्या चेहऱ्यावर मारत होता तसंच…

फरक इतकाच, की मी पावसापुढे हार पत्करली आणि थांबलो या जागेवर…

आजीने परिस्थिती पुढे हार न मानता नवीन आयुष्याला सुरुवात केली होती याच जागेवर…

पाऊस आता थांबला होता तिच्या डोळ्यातलाही आणि आभाळातलाही…!

चार-पाच गिर्‍हाईकं आली होती. मी गाडीला किक मारून निघालो, तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, ती वडे तळण्यात पुन्हा गुंगून गेली.

पैसे मिळतील की नाही याची तिला फिकीर नव्हती, तिच्या दृष्टीने तिने एका भुकेल्या नातवाला घास भरवला होता, आणि आजी कधी भरवलेल्या घासाचे पैसे मागत नाही…!

काय योजना होती ही पावसाची?

का मला निसर्गाने या आजीची भेट घालून दिली असावी…??

आणि पुन्हा पैसे परत करण्याच्या उद्देशाने परत भेटण्याची योजना सुद्धा करून ठेवली होती…

सगळंच अकल्पित आणि अतर्क्य…!

दोन दिवसांनी मी तिला भेटलो डिलिव्हरी बॉय म्हणूनच, मी 50 ची नोट काढून तिच्या हातावर ठेवली, उरलेले वीस राहू दे म्हणालो.

काय जहागीरदार आहेस का कुठला? ती माझ्यावर डाफरली.

‘असाच पैशाला पैसा जोडून घरी पाठवत जा’ उरलेले वीस रुपये देत ती मायेनं म्हणाली.

(मनात म्हटलं, ‘तुला देऊन घरीच पाठवतोय आजी… कसं सांगू तुला? ‘)

यानंतरही तिच्याकडे बऱ्याच वेळा गेलो, कधी वडापाव खायला, तर कधी गप्पा मारायला.

या गप्पांमधून चेहऱ्यावरच्या, एक एक सुरकुतीची कहाणी उलगडू लागली… हळू हळू धुकं विरळ होत गेलं आणि रस्ता स्वच्छ दिसू लागला…

सुरकुत्यांच्या या जाळ्यात खूप काही साठलं होतं, आणि आजी या जाळ्यात अडकली होती कोळ्यासारखी…!

आजी खरंतर एका श्रीमंत घरातली, तीला दोन मुलं. पतीने सर्व इस्टेट या आजीच्या नावे करून ठेवली होती.

मुलांची लग्न होईपर्यंत सर्व ठीक होतं, पण एकदा लग्न झाल्यानंतर घरामध्ये दोनाची चार डोकी झाली.

हि चार डोकी पद्धतशीरपणे आजीकडे स्वतःचा वाटा मागू लागली, त्यासाठी रोज वाद विवाद आणि भांडणे, मारामाऱ्या होऊ लागल्या.

घरातली भांडणे थांबवण्यासाठी आजीने सर्व प्रॉपर्टी दोन्ही मुलांमध्ये वाटून टाकली.

प्रॉपर्टी वाटली तरी सुद्धा मरेपर्यंत मी याच घरात राहणार अशी अट आजीने घातली.

घरात राहूनही, यानंतर आजीला कोणती सून जेवण देणार यावरून वादविवाद होऊ लागले. त्यातही पुन्हा मारामाऱ्या.

स्वाभिमानी आजी रागाने एका साडीवर घराबाहेर निघाली आणि एका फुटपाथ वर राहू लागली.

ओळखी पालखीचे लोक तेवढ्यापुरते सांत्वन करून पुढे जात, त्यातीलच एकाने, आजी तुम्हाला वडे करायला चांगले जमतात, तुम्ही हाच व्यवसाय का नाही करत असे सुचवले.

स्वाभिमानाने जगायचं तर काहीतरी करायला हवं, या विचाराने, ओळखीच्या लोकांकडून उधारीवर काही पैसे घेऊन व्यवसायाला लागणारी सामग्री घेतली आणि पुढे थोड्या अंतरावर रस्त्यावरील फुटपाथवर हा व्यवसाय सुरू केला. गोड बोलण्याने हळूहळू जम बसत गेला.

ऊन वारा पावसाचा त्रास होऊ लागला, म्हणून जी जोडलेली माणसं होती, त्यातील तरुणांनी चार काठ्या आणून त्यावर एक फ्लेक्स टाकून दिला.

आजीला निवारा मिळाला.

साधारण पाचशे रुपये रोज कमावते आजी…

बाकी सर्व नातवंडं समजून आमच्यासारख्या डिलिव्हरी बॉईज ना… उधारीवर…!

कोणी पैसे आणून देते, कोणी बुडवते तिला काही फरक पडत नाही…!

दर भेटीत मला वाईट वाटायचं, स्वतःची ओळख सांगायची सुद्धा चोरी…

एकदा मी तिला म्हणालो, ‘तुझी हि टपरी आपण छान करून घेऊया का? या चार काठ्या फेकून देऊन आपण छान काहीतरी कायमस्वरूपी करू…

ती भडकली, तु माझ्या शॉप ला टपरी म्हणतो…?

हि टपरी नाही माझं शॉप आहे… शॉप…!

सर्व काही असूनही काही लोक आनंदी नसतात, तर काहीच नसताना आजी समाधानी होती…!

ही टपरी म्हणजे तिचे शॉप होते…

– क्रमशः भाग दुसरा

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एकावर एक फ्री ‘ चे वेड…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “एकावर एक फ्री ‘ चे वेड☆ श्री जगदीश काबरे ☆

छोट्याशा गावात अन्नपूर्णाबाईंची पुरणपोळीची गाडी होती. ही गाडी केवळ चवदार पूरणपोळ्यांसाठीच नाही, तर “मेंदूला खाऊ” देण्यासाठीही प्रसिद्ध होती, असे गावातील लोक हसत म्हणत. कारण अन्नपूर्णाबाई फक्त पुरणपोळ्या विकत नव्हत्या, तर प्रत्येक खरेदीमागे लपलेला विचारही लोकांच्या लक्षात आणून देत असत. ती गाडी म्हणजे जणू चालती-बोलती प्रयोगशाळाच होती. सकाळी शाळेत जाणारी मुलं, दुपारी शेतातून परतणारे शेतकरी, संध्याकाळी कामावरून थकून येणारे नोकरदार, सगळ्यांच्याच तोंडात एकच वाक्य असायचं, “बाईंची पुरणपोळी म्हणजे मऊसूत, जिभेवर विरघळणारी! ” 

गावातल्या जिल्हा परिषद शाळेत त्या वर्षी विज्ञान मेळावा भरवायचं ठरलं. नेहमीसारखी पोस्टर्स, चार्ट्स, मॉडेल्स, फुगे हे सगळं असणारच होतं. पण विज्ञान शिक्षकांनी यावेळी वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. “विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळेतली काचभांडी नाही, ” ते म्हणाले, “… तर ते आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. ” म्हणून त्यांनी अन्नपूर्णाबाईंना खास निमंत्रण दिलं.

मेळाव्याच्या दिवशी शाळेच्या मैदानात रंगीबेरंगी स्टॉल लागले. एका बाजूला सौरऊर्जेचे मॉडेल, दुसरीकडे पाण्याचा दाब दाखवणारी नळी, एका कोपऱ्यातून मात्र घमघमाट सुटलेला होता. कारण तिथे अन्नपूर्णाबाईंचा पुरणपोळीचा स्टॉल लागलेला होता.

मुलांना वाटले, वा! विज्ञान मेळाव्यात पुरणपोळी! पण अन्नपूर्णाबाई हसून म्हणाल्या, “ही फक्त पुरणपोळी नाही, हा एक विज्ञानाचा प्रयोग आहे. ” बाईंनी फळ्यावर तीन पर्याय लिहिले. ४० सेमी व्यासाची मोठी जंबो पुरणपोळी, ३० सेमी व्यासाची मध्यम पुरणपोळी, आणि २० सेमी व्यासाची छोटी पुरणपोळी.

४० सेमी व्यासाची एक पुरणपोळी चाळीस रुपयाना, ३० सेमी व्यासाची एक पुरणपोळी तीस रुपयाना आणि २० सेमी व्यासाची एक पुरणपोळी वीस रुपयाना आहे. पण ऑफर अशी आहे की, ४० रुपयात एक ४० सेमी व्यासाची पुरणपोळी मिळेल किंवा ४० रुपयात ३० सेमी आणि २० सेमी व्यासाची अशा दोन पुरणपोळ्या मिळतील किंवा ४० रुपयात २० सेमी व्यासाच्या तीन पुरणपोळ्या मिळतील.

आता सांगा मुलांनो, “तुम्ही कोणती ऑफर स्विकाराल की ज्यामुळे तुम्हाला जास्त पुरणपोळी खायला मिळेल? ” असा अन्नपूर्णा बाईंनी प्रश्न विचारला.

राघव म्हणाला, “आजी, सगळ्या पुरणपोळ्यांची किंमत वेगवेगळी का? ” अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, “कारण विज्ञानात फक्त वस्तू महत्त्वाची नसते, तिचं प्रमाण, क्षेत्रफळ आणि उपयोग महत्त्वाचा असतो. तेव्हा आज खाण्याआधी विचार करा! ”

मुलं हसली. “आजी, खाण्याआधी विचार कसा करायचा? ” एक मुलगा विचारला.

बाई हसून म्हणाल्या, “आज पोट भरायचंयच, पण त्याआधी डोकं भरायचं आहे. ”

बाईंनी तीन प्रकारच्या पुरणपोळ्या समोर मांडल्या होत्या. एक मोठी—जंबो, एक मध्यम आणि एक छोटी. त्या म्हणाल्या, “ या पुरणपोळ्या लहान मोठ्या आकाराच्या असल्या तरी प्रत्येकीची चव तीच आहे, बरं का. ” 

मग बाईंनी गोल पुरणपोळी शेजारच्या फळ्यावर काढून दाखवली. “ही पोळी गोल आहे. आता मला सांगा, गोलाचं म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतात? ” 

सायली पटकन म्हणाली, “πr² या सूत्रानुसार… ” 

बाईंनी टाळी वाजवली. “मग बघा, ४० सें. मी. व्यासाची जंबो पोळी म्हणजे मोठं क्षेत्रफळ. पण तीन छोट्या पोळ्यांचं एकत्रित क्षेत्रफळ किती होईल, याचा विचार केलात का? ”

मुलांनी कागद-पेन्सिली काढल्या. कोणीतरी गणित केलं, कोणीतरी अंदाज बांधला. मग लक्षात आलं की तीन छोट्या पोळ्या एकत्र केल्यावर मिळणारा ‘खाण्याचा आनंद’ जंबो पोळीपेक्षा वेगळा आहे. कुणाला जास्त तुकडे हवेत, कुणाला एक मोठी पोळी हवी, तर कुणाला मध्यम आणि छोटी अशी जोड हवी.

तेवढ्यात बाईंनी एक गुपित सांगितलं. “ही सगळी ऑफर म्हणजे मानसशास्त्र आहे, ” त्या म्हणाल्या. “लोकांना ‘एकावर एक’ किंवा ‘जास्त मिळतंय’ असं वाटलं की ते खूश होतात. पण खरा वैज्ञानिक विचार असा असतो की, आपल्याला काय हवंय, किती हवंय आणि त्याची खरी किंमत काय आहे? ”

मुलांना अचानक जाणवलं की हा फक्त खाण्याचा प्रश्न नाही, तर विचार करण्याचा आहे. राघव म्हणाला, “मला तीन छोट्या पोळ्या हव्यात, कारण मला मित्रांबरोबर वाटून खायचं आहे. ” सायली म्हणाली, “मला मध्यम आणि छोटी, कारण दोन्ही चवीचा अनुभव मिळेल. ” एक शांत मुलगी मीरा म्हणाली, “मला जंबो पोळी हवी, कारण मला मोठी पोळी तोडत बसायला आवडतं. ” अन्नपूर्णाबाई हसल्या. “बस्स! हेच विज्ञान. एकाच माहितीवर वेगवेगळे निर्णय. योग्य-चूक असं काही नाही, फक्त समजून निवडणं महत्त्वाचं. ”

मुलांना वाटलं, यात काय विज्ञान? पैसे दिले, पोळी घेतली, खाल्ली—सोपंय. पण बाईंची ऑफर ऐकून त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला. कुणी म्हणालं, “तीन छोट्या जास्त! ” कुणी म्हणालं, “एक मोठीच बरी. ” तर काही जण म्हणाले, “ऑफरमध्येच फायदाच असतो. ”

तेव्हाच बाईंनी पहिला वैज्ञानिक प्रश्न टाकला. “पोळी म्हणजे काय? ”

“खाण्याची गोष्ट! ” कुणीतरी ओरडलं.

“आकार कोणता? ”

“गोल म्हणजे वर्तुळाकार! ”

“मग वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतात? ”

सायली नावाच्या हुशार मुलीने हात वर केला आणि पटकन म्हणाली, “πr² या सूत्राने! ”

“शाब्बास, ” बाई म्हणाल्या, “आता आपण उकल करू. ”

बाईंनी फळ्यावर खडूने तीन मोठे गोल काढले. एकावर २० सें. मी. , एकावर ३० सें. मी. , आणि एकावर ४० सें. मी. , अशी संख्या लिहिली. “हे ह्या पुरणपोळ्यांचे व्यास आहेत, ” त्या म्हणाल्या. “आता प्रत्येक पुरणपोळीचे त्रिज्या किती होईल सांगा बरं. ” मुलांनी झटपट गणित केलं. छोटी पोळी—त्रिज्या १० सें. मी. , मध्यम—१५ सें. मी. , जंबो—२० सें. मी.

मग मोजमाप सुरू झालं.

छोटी पोळी— वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr² 

म्हणजेच छोट्या पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × १०² = ३१४ चौ. से. मी.

मध्यम पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × १५² = ७०६ चौ. से. मी.

जंबो पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × २०² = १२५६ चौ. से. मी.

हे आकडे बघून मुलांच्या भुवया उंचावल्या. कारण फरक प्रचंड होता.

“आता खरी गंमत बघा, ” बाईंनी सांगितलं. “रु. ४० मध्ये एक जंबो पोळी घेतली, तर तुम्हाला १२५६ चौ. से. मी. क्षेत्रफळ मिळतं. पण त्याच रु. ४० मध्ये तीन छोट्या पोळ्या घेतल्या, तर ३१४ × ३ = ९४२ चौ. से. मी. ”

“म्हणजे जंबो जास्त! ” एक मुलगा आश्चर्याने ओरडला.

पण बाईंनी लगेच हात वर केला. “थांबा. अजून संपलं नाही. ”

त्यांनी मध्यम + छोटीचा पर्याय घेतला. “७०६ चौ. से. मी. + ३१४ चौ. से. मी. = १०२० चौ. से. मी. ”

“म्हणजे हा पर्याय तीन छोट्यांपेक्षा चांगला, पण जंबोपेक्षा कमी, ” मुलांनी निष्कर्ष काढला.

आता मुलांना मजा यायला लागली. कारण आता फक्त पोळी खाणं नव्हतं तर तो एक गणिती खेळ झाला होता… आकड्यांचा, विचारांचा, निवडींचा.

मुलं विचार करत आहेत तेवढ्यात बाईंनी आणखी एक वेगळाच प्रश्न विचारला. “रु. ३० मध्ये काय घ्याल? ”

“दोन छोट्या! ” बहुतेकांनी उत्तर दिलं.

“की एक मध्यम? ” बाईंनी शंका उपस्थित केली.

मुलं गप्प झाली.

बाईंनी पुन्हा गणित मांडलं. दोन छोट्या पुरणपोळ्यांचं क्षेत्रफळ = ३१४ × २ = ६२८ चौ. से. मी. आणि एक मध्यम पुरणपोळीचं क्षेत्रफळ = ७०६ चौ. से. मी.

“म्हणजे? ”

“मध्यम जास्त! ” सगळ्यांनी एकदम उत्तर दिलं.

आता मुलांच्या डोक्यात प्रकाश पडू लागला होता. ऑफर म्हणजे नेहमी फायदा नसतो. जास्त नग म्हणजे जास्त मूल्य नसतं. दिसतं तसं नसतं. मुलं मंत्रमुग्ध झाली. विज्ञान अचानक रोमांचक झालं.

शेवटी बाईंनी निष्कर्ष सांगितला. “जर तुम्हाला जास्त खाण्याचं मूल्य हवं असेल, तर रु. ४० मध्ये जंबो पोळी सगळ्यात फायदेशीर. रु. ३० मध्ये मध्यम पोळी सर्वात शहाणी निवड. म्हणजे फक्त ‘जास्त नग’ दिसत आहेत म्हणून तीन छोट्या पोळ्या नेहमीच जास्त फायद्याच्या असतात असं नाही. आणि ‘एकावर एक’ हा शब्द ऐकून भुलायचं नाही. प्रश्न विचारायचा—खरंच किती मिळतंय? ”

त्या दिवशी मुलांना एक मोठा धडा शिकायला मिळाला. जाहिरातीच्या ऑफर –‘एकावर एक’ या सगळ्या गोष्टी डोळ्यांना भुलवतात; पण विज्ञान डोळ्यांपलीकडचं पाहायला शिकवतं. अन्नपूर्णाबाईंच्या पुरणपोळ्यांच्या ऑफरमुळे मुलांच्या मनात एक नवीन वैज्ञानिक दृष्टी तयार झाली, ती म्हणजे काहीही निवडण्याआधी “खरंच किती मिळतंय? ” हा प्रश्न विचारण्याची. आणि हाच तर विज्ञानाचा खरा गोडवा आहे. त्या दिवशी मुलांनी पुरणपोळी खाल्लीच, पण त्याहून जास्त ते शिकले की गणित फक्त पुस्तकातच नसतं, विज्ञान प्रयोगशाळेतच नसतं, आणि शहाणपण म्हणजे फक्त स्वस्त नाही तर योग्य निवड करणं असतं. अन्नपूर्णाबाईंच्या गाडीवरची पुरणपोळी संपली, पण मुलांच्या डोक्यातलं विचारांच गोड पुरण मात्र बराच काळ रेंगाळत होतं. मेळावा संपला. मुलं घरी गेली. त्या रात्री अनेकांच्या घरी चर्चा सुरू होती. बाबा म्हणत होते, “आपण तर जाहिराती पाहूनच वस्तू घेतो. ” आई म्हणत होती, “आता भाजी घेतानाही विचार करायला हवा. ”

अन्नपूर्णाबाईंची गाडी दुसऱ्या दिवशीही उभी होती. पण आज मुलं पोळी घेताना विचार करून घेत होती. कोणीतरी जंबो घेतली, कोणीतरी मध्यम. पण सगळ्यांच्या डोळ्यांत एकच चमक होती—समजून उमजून निवड केल्याची.

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिची पेन्शन : स्वाभिमानाची नवी ओळख… – लेखिका : तृप्ती देव   ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? जीवनरंग ?

☆ तिची पेन्शन : स्वाभिमानाची नवी ओळख… – लेखिका : तृप्ती देव  ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

घर सांभाळणाऱ्या हातांना पगार नसतो… पण सन्मानाची पेन्शन तरी असायला हवी.

सकाळचे साडेसात वाजले होते. स्वयंपाकघरातून कुकरच्या सलग तीन शिट्ट्या झाल्या, पाठोपाठ फोडणीचा खमंग वास घरभर दरवळत होता. घरात नेहमीसारखीच सकाळची लगबग सुरू होती.

“आई, आता तुम्ही जरा बसा बरं. भाजी झालीच आहे. चपात्या मी लाटते. सकाळपासून धावताय, जरा आराम करा, ” सून नेहा प्रेमाने म्हणाली.

छप्पन्न वर्षांच्या अलकाताई हसल्या…

“अगं, अजून राहुलचा डबा भरायचा आहे. तुझ्या दोघांचं दही ठेवायचं आहे. आणि हो, राहुलच्या आवडीची सुक्या खोबऱ्याची चटणी केली आहे आज. “

तेवढ्यात बेडरूममधून राहुलचा आवाज आला… 

“आई… माझा निळा शर्ट कुठे आहे गं?”

“कपाटात डाव्या बाजूला तिसऱ्या कप्प्यात बघ. “

“मिळाला. “

तिकडे डायनिंग टेबलवर बसलेले सुधीरराव वर्तमानपत्र वाचत होते.

“अलका, चहात साखर जरा कमी घाल बरं का. डॉक्टरांनी सांगितलंय. “

“हो, लक्षात आहे माझ्या. “

“बाबा, मी आणते चहा, ” नेहा म्हणाली.

त्यावर सुधीरराव हसले.

“अगं, तुझ्या हातचा चहा छान असतो. पण तुझ्या सासूबाईंच्या हातच्या चहाची मला पस्तीस वर्षांची सवय आहे. “

घरात सगळं सुरळीत होतं. मुलगा, सून, नोकरीतून निवृत्त झालेले सुधीरराव आणि या सगळ्यांच्या मध्यभागी अलकाताई.

कोणाला काय हवं, कोणाला काय आवडतं, कोणाची तब्येत कशी आहे, घरात काय संपलंय, कोणाचा वाढदिवस कधी आहे, या सगळ्याचं चालतं-बोलतं व्यवस्थापन म्हणजे अलकाताई. त्यांच्याशिवाय घरातलं पानही हलत नव्हतं. तिची घराला आणि तिला घरची सवय झाली.

पण दुर्दैवाने त्यांच्या या कामाला ना पगार होता, ना रजा, ना पदोन्नती. कारण घरातल्या प्रत्येकाला वाटायचं…

‘ आई आहेत ना… त्या करतील.’

राहुल आणि नेहा ऑफिसला निघून गेले. घरात शांतता पसरली. अलकाताईंनी शेवटचं आवरलं आणि दोन कप चहा घेऊन त्या सुधीररावांच्या शेजारी येऊन बसल्या.

आज सुधीरराव खूप आनंदात दिसत होते. त्यांनी मोबाईल पुढे केला.

“अलका, बघ. “

मोबाईलवर बँकेचा मेसेज होता. पेन्शन जमा करण्यात आली आहे.

सुधीरराव अभिमानाने म्हणाले, “आज पहिली पेन्शन आली. पस्तीस वर्षांच्या नोकरीचं फळ. आता आयुष्य निवांत जाईल. “

अलकाताईंनी मोबाईलकडे पाहिलं, मग त्यांच्या चेहऱ्याकडे. चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफेसोबत त्यांच्या डोळ्यांसमोर पस्तीस वर्षांचा संसार तरळून गेला.

राहुल लहान असताना तापाने फणफणत होता, तेव्हा सलग तीन रात्री जागून काढलेले दिवस… सासूबाईंच्या आजारपणात केलेली सेवा… सुधीररावांच्या बदल्यांमुळे पुन्हा पुन्हा उखडलेलं घर… मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवलेले क्षण… या सगळ्यात साडी घ्यायची राहिली, मैत्रिणींसोबत फिरायला जायचं राहिलं, अगदी स्वतःकडे लक्ष द्यायचंही राहून गेलं.

त्या हळूच म्हणाल्या,

“अभिनंदन हो. “

“धन्यवाद. “

काही क्षण शांतता पसरली.

मग अलकाताईंनी विचारलं,

“एक विचारू?”

“विचार ना. “

“तुम्ही आता रिटायर झालात ना?”

“हो. “

“मग माझं रिटायरमेंट वय किती?”

सुधीररावांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं.

“म्हणजे?”

अलकाताई शांतपणे बोलू लागल्या.

“तुमची नोकरी पस्तीस वर्षांची होती. वयाची साठ वर्षं झाली आणि तुम्ही निवृत्त झालात. मीही पस्तीस वर्षांपासून या घरात काम करते आहे. लग्न झालं तेव्हा मी एकवीस वर्षांची होते. आज छप्पन्न वर्षांची आहे. माझी नोकरी कधी संपणार?”

सुधीरराव काही बोलले नाहीत.

अलकाताईंचा आवाज आता जरा भरून आला होता.

“मी पैशांचा हिशेब मागत नाहीये हो. हा संसार मी प्रेमाने केला. पण मला एक सांगा… मला कधी रविवार मिळाला का? मला कधी रजा मिळाली का? मी आजारी असताना मला कोणी म्हणालं का, आज तू आराम कर?”

सुधीरराव शांत होते.

अलकाताई पुढे म्हणाल्या,

“परवा शेजारच्या काकूंसोबत कीर्तनाला जायचं होतं. तिथे गरीब मुलांना खाऊ वाटायचा होता. पण माझ्याकडे जास्तीचें शंभर रुपयेही नव्हते. तुमच्याकडे मागायला संकोच वाटला. राहुलकडे मागावंसं वाटलं नाही. आणि मग मी गेलेच नाही. “

त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

“अहो, मला पैशांचा मोह नाही. पण नातवासाठी एखादं चॉकलेट घ्यायचं असेल… स्वतःसाठी एखादं पुस्तक घ्यायचं असेल… एखादी साधी साडी आवडली असेल… तर प्रत्येक वेळी मी कोणासमोर हात पसरावा का? माझ्या हक्काचे चार पैसे माझ्या हातात असू नयेत का?”

असं म्हणत त्या उठल्या. डोळे पुसले आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या. कारण दुपारच्या जेवणाची तयारी बाकी होती. गृहिणीचं काम कधीच संपत नसतं.

त्या रात्री सुधीररावांना झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्यांनी अलकाताईंच्या आयुष्याचा इतक्या जवळून विचार केला.

– – आपल्याला पगार मिळाला. बोनस मिळाला… आता पेन्शनही मिळते आहे.

पण अलकाला काय मिळालं?… फक्त जबाबदाऱ्या?

दुसऱ्या दिवशी ते सकाळीच बँकेत गेले. त्यांनी एक नवीन खाते उघडलं आणि आपल्या पेन्शनमधून दर महिन्याला ठराविक रक्कम त्या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था केली.

दुपारी ते घरी आले. अलकाताईंना त्यांनी एक नवीन कोरे पासबुक आणि एटीएम कार्ड दिलं.

अलकाताईंनी आश्चर्याने विचारले,

“हे काय आहे?”

“उघडून बघ. “

.. त्यावर नाव लिहिलं होतं… अलका सुधीर देशपांडे.

त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

“हे माझं? पण कशासाठी?”

सुधीररावांनी त्यांचा हात हातात घेतला… 

“अलका, हा तुझ्या त्यागाचा मोबदला नाही. कारण तुझ्या त्यागाची किंमत मी कधीच मोजू शकत नाही. पण हा तुझा हक्क आहे. आजपासून माझ्या पेन्शनचा एक हिस्सा दर महिन्याला तुझ्या खात्यात जमा होईल. हा पैसा फक्त तुझा असेल. तुला कोणाकडेही मागावं लागणार नाही. पस्तीस वर्षे तू या घरासाठी जगलीस. आता थोडंसं स्वतःसाठी जग. “

अलकाताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

त्या हळूच म्हणाल्या,

“मला पैशांचा आनंद नाही झाला हो. “

“मग?” सुधीररावांनी विचारलं.

अलकाताई हसल्या.

“आज पहिल्यांदा असं वाटलं… या घरात मी फक्त जबाबदारी नव्हते. माझं अस्तित्वही आहे. “

सुधीररावांनी त्यांचा हात घट्ट धरला.

त्या दिवशी अलकाताईंना पैसे मिळाले नव्हते. त्यांना मिळाला होता सन्मान. स्वाभिमान. आणि आयुष्यभर दिलेल्या योगदानाची दखल.

नोकरी करणाऱ्या माणसाला पेन्शन मिळते… पण घर उभं करणाऱ्या गृहिणीला किमान स्वाभिमानाची आर्थिक ओळख तरी मिळायला नको का?

अनेक स्त्रिया स्वतःच्या घराच्या जवाबदाऱ्या सांभाळताना स्वतःचं अस्तित्व विसरतात. त्यांचं पूर्ण आयुष्य संसारासाठी जातो. त्यांचे हक्क बनतो. पण पण त्याकडे दुर्लक्ष होत सगळं तुझंच आहे असं म्हणणं असतं. पण तसे अधिकार तिला मिळावे. हाच कथेचा उद्देश.

आज गरज आहे प्रत्येक घरात सुधीररावांसारखा विचार रुजण्याची. जोपर्यंत घर उभं करणाऱ्या ‘तिचा’ हा अधिकार तिला मिळत नाही, तोपर्यंत घराला खऱ्या अर्थाने घरपण येणार नाही. चला, आजच सुरुवात आपल्या घरापासून करूया आणि प्रत्येक गृहिणीला तिचा हक्क अन् स्वाभिमान मिळवून देऊया!”

लेखिका : सौ तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड 

 (कथा आवडल्यास नावासोबत शेअर करा) 

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – २ लेखिका : चेतना वैद्य ☆ प्रस्तुती – संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? जीवनरंग ?

☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – २ लेखिका : चेतना वैद्य ☆ संध्या बेडेकर ☆

(बाबा म्हणाले… अग! मी आहे ना तुझ्या बरोबर. काळजी करू नको. सर्व ठीक होईल. आता एडव्हांस टेक्नोलॉजी आहे. काल मी आणि शाल्मली डाॅक्टरला भेटून आलो. सध्या अगदी सुरवातच आहे. आपल्याला लगेच कळल, हे खूप बर झाल.) 

इथून पुढे – – – 

शेवटी समोर असलेल्या नवीन प्रोजेक्ट वर फोकस करून आईची ट्रीटमेन्ट सुरू झाली. हे काही लगेचच पूर्ण होणार प्रोजेक्ट नव्हतच. पण सुरवात महत्वाची होती.

म्हणतात ना…

As you start to walk on the way, the way appears. Clarity does not appear before action. It comes from actions.

पुण्याला दिनानाथ मध्ये Step by step treatment सुरू झाली.

पेशंट बरोबर फक्त एक attendant राहू शकतो. असा दवाखान्याचा नियम. म्हणून शाल्मली आई बरोबर, तर दुसरी रिदिमा ने सांगलीत राहून घरची जबाबदारी सांभाळली.

2022 चा year end चा तो महिना, सर्वानी new year eve एकत्र celebrate करायची, धम्माल करायची, असा कार्यक्रम ठरला होता.

पण म्हणतात ना…

Man proposes… God disposes. …

त्याच दिवशी आईचे operation झाले.

व्यवस्थित झाले… अस डोॅक्टर म्हणाले. तेंव्हा त्या असहनीय वेदना असताना सुद्धा आईला वाटल..

चला आता लवकरच आपला सांगलीला जायचा परतीचा प्रवास सुरू होणार.

पण नाही…

आईची परीक्षा पूर्ण झालीच नव्हती. परीक्षेतील प्रश्न out of syllabus होते ना. अनेक चढ उतार, अनेक comlications. पुन्हा पुन्हा त्या मोठमोठ्या मशीनी, नाका तोंडात नळ्या. त्याचवेळेस 

मी शाल्मली (attendant)

येथे तापाने फणफणली होती तर, तर सांगलीला रिदिमा आणि तिच्या नवर्याला कोरोना झालेला.

पहिलाच प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू होते, तर पूढे दुसरे प्रश्न तयारच होते. म्हणजे washing mavchine मध्ये जसे कपडे गोल गोल फिरतात ना, तसे झाले होते. कोणचा धागा पकडावा, आणि कोणता सोडावा. हेच कळत नव्हत. सर्वच महत्वाच होत. शांत राहून सर्व सांभाळायच होत..

आई ICU मध्ये नऊ दिवस होती. या गोष्टी आईला कळल्याच नाहीत. मला मात्र आईला भेटायची परमिशन नव्हती. मग ICU मधील ते नऊ दिवस आईची काळजी कोणी घेतली असेल बर ? आश्चर्यच आहे नाही का ?

ICU मध्ये देवाच्या रूपात डोॅक्टर नर्स तर होतेच, बरोबर पाठीशी घाबरू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. असा आधार देणारे, श्री स्वामी पण होतेच ना.

किमोथेरेपी, injections. नंतर तीन वर्ष रोजची गोळी. हा प्रवास सोपा नव्हताच. या पिरेड मध्ये खूप उतार-चढ़ाव आले. आईने मात्र खंबीर पणे सर्व फेस केल. बाबा आईच्या पाठीशी होतेच.

या पिरेड मध्ये एक गोष्ट लक्षात आली की बाबा खाडकन ऊभे राहिले. आता भूमिकांची/ जबाबदारी ची अदलाबदल झाली आहे, हे त्यांच्या लक्षात आल.

Finally तो दिवस उजाडला, आई दिनानाथ मधून घरी सांगलीला परत आली. औषधोपचार चालू होतेच. पण दवाखान्यात राहणे आवश्यक नव्हते..

मनाला विरंगुळा म्हणून तिने या दरम्यान दोन एकांकिकांचे दिग्दर्शन केले, स्वतःचे यु ट्युब चॅनेल सुरू केले. छान उत्साहवर्धक positive लेख ती वाचत असे. कुठे तरी स्वतः ला active ठेवण, posiitive ठेवण गरजेचे आहे. हे तिला समजत होत. त्या निमित्ताने ती चार लोकांच्या संपर्कात होती. वेगवेगळया विषयांवर बोलत होती.

Strong mind always finds opportunities in difficult situatios.

बरोबर आहे…

उदास राहून कोणताच प्रश्न सुटत नसतो.

फायनली औषधांचे हे चक्र संपल. आणि पुन्हा एकदा पेट स्कॅन करून तो रिपोर्ट आज मिळाला.

रिपोर्ट आला…

डोॅक्टर ने वाचून म्हंटल… Wonderful ! अभिनंदन ! Mrs Vaidya. You have won the battle.

every thing is OK now.

एक डार्क काळ्याकुट्ट लांबलचक पिरेड finally संपला.

आजची सकाळ आधी सारखीच सुंदर, आनंदी होती. मुख्य म्हणजे आज कोणतीही गोळी घ्यायची नव्हती.

आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा सर्वांनी मिळून आल टाकलेला कडक चहा घेतला.

पुन्हा एकदा… आई जिंकली

खरय…

What is life ? 

Life is about adjustment between your feelings and reality. life has many such situations where you have to leave your emotions and accept reality.

मला नेहमी वाटत…

आपण खूप मोठ्या मोठ्या लोकांचे कौतुक करतो, त्यांच्या हुशारीची, त्यागाची, हिंमतीची, शौर्याची उदाहरण वाचतो, लोकांना सांगतो.

मग एका सर्व सामान्य घरातील सर्व सामान्य स्त्री आयुष्यात येणार्या कठीण प्रसंगाना धैर्याने, हिम्मतीने तोंड देऊन पुन्हा उभी राहते, हे पण कौतुकास्पदच आहे नाही का ?

आज पुन्हा एकदा चेतना बरोबर बोलण झाल.. आजपर्यंत मी त्यांना भेटलेली नाहिये… आज मला चेतना म्हणाली…

 

आता हे चौथं वर्ष सुरू आहे. या काळात मी दंड थोपटून उभी आहे.

 माझ्या धाकट्या नातवंडा सकट सगळं मी पाहिलंय.

 Quality life मी जगली आहे.

 मोह हा मनाला नाहीच आहे.

 फक्त माणसांचा मोह… मग विचार केला काय करावं आपण आता? जितके आयुष्य दिले परमेश्वराने त्याचे सोनं कसं करायचं ?.. त्याचे उत्तर मला माझ्या लेखणी न दिलं…

ती म्हणाली… अग! मी आहे ना… उचल मला आणि कर सुरुवात.

 अशा तऱ्हेने मी चारोळ्या लिहायला सुरुवात केली..

 नाटक हे तर माझं पॅशन आहेच..

 नाटकं बसवायला लागले, एकांकिका बसवायला लागले..

 आणि मग वाटलं सांगली पर्यतच हे सगळं सिमित होतंय… आपण जगभरातल्या लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतोय. इतकं सगळं जग आपल्या हाताच्या पंजात आलय… त्याचा फायदाही करून घ्यायला हवा ना… मग

Chetana Vaidya… चे वै

 या नावाने चॅनल उघडलं… उद्देश एकच होता… की लाखो लोकांपर्यंत पोहोचता येईल… आणि एक असाही स्वार्थी विचार येऊन गेला मनात… की उद्या परमेश्वराचा कॉल आलाच तर तेंव्हा लोकांच्या दोन लाख डोळ्यात तरी पाणी येईल.

 बस इतकच.

 

– – – मी म्हंटल…

सलाम तुम्हाला चेतना ताई… अशाच आनंदी रहा.

– समाप्त –

लेखिका : चेतना वैद्य 

प्रस्तुती  संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – १ लेखिका : चेतना वैद्य ☆ प्रस्तुती – संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? जीवनरंग ?

☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – १ लेखिका : चेतना वैद्य ☆ संध्या बेडेकर ☆

आज सकाळपासूनच आईच्या फोनची वाट बघत होतो. चारदा आम्ही दोघी बहिणींचे आपापसात विचारण झाल. आज आईच्या फोनची सर्वच वाट बघत होते. आज बाबा घरी येणार होते ना. आज बाबांना डिस्चार्ज मिळणार होता ना. म्हणून सर्वांचे लक्ष तेथे होते.

 आज मी आई बरोबर असायला हव होत.

माझ्या मनात येणारा हा आणि असे अनेक प्रश्न ? नेहमीच मला अस्वस्थ करतात.

आपण अमेरिकेत स्थायिक झालो… हे बरोबर आहे का ? आम्ही दोघी बहिणी भारताच्या बाहेर आहोत. जस जस आईबाबांच वय वाढतय, तसतसा हा प्रश्न मला खूप त्रास देतोय. आता तर मी पण चाळीशी पार केलीय, माझी मुल मोठी झाली. आता त्यांचे भविष्य, आईबाबांचे वर्तमान दोन्ही महत्वाचे. दोन्ही जबाबदार्या मनापासून पूर्ण करताना शारीरिक पेक्षा मानसिक ओढाताण खूप होते. हे जरी खर असल, तरी हे असच चालत राहणार आहे… हेही कळतय.

 करोनाच्या काळात बाबा दवाखान्यात भरती होते. त्यांचे डायलिसिस चालू होते. आई तिथे एकटी, बाबा दवाखान्यात, आणि आम्ही दोघी येथे.

 तो काळ खूप कठिण गेला. फोन, व्हिडिओ हेच एक साधन होते त्यावेळेस बाबा वरती हात लावून परत आले. अस म्हंटल तरी चालेल. ही जंग आईने एकटीने लढली आणि जिंकली सुद्धा.. मानसिक खंबीरता म्हणजे काय ? याचे जणू उदाहरणच आईने सेट केले. आम्हाला तर अजिबात यायच नाही, अशी सख्त ताकीदच आईने दिली होती.

केंव्हा एकदा हा करोनाचा काळ संपतो आणि आम्हाला भारतात यायची परमिशन मिळते. याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो.

 एकदाचा कोरोना निवळला, आईची परमिशन पण मिळाली, आणि आम्ही दोघी बहिणी परिवारासह आईकडे आलो. बाबांना बघून बर वाटल. आईचे कौतुक वाटल.

आई खूप खुश होती. दृष्ट लागावी अस माझ्या घराच आज गोकुळ झालय. सूख म्हणजे नक्की काय ? याचा प्रत्यक्ष्य अनुभव मी घेतेय. आज मी गोकुळात आहे, आनंदी आहे. अस आई सहज बोलून गेली. तुम्हा सगळ्यांना बघून माझा थकवा गेला. माझ्या या गोकुळाला कोणाची नजर नको लागायला. आई देवाजवळ प्रार्थनेत अस म्हणत होती.

पण देवाच्या मनात काही तरी वेगळच planning सुरू होत.

आई थकलेली दिसत होती. सर्दी खोकला पण झाला होता.

बाबा म्हणाले… मुलींनो ! जरा आईला पण एकदा डोॅक्टर कडे घेऊन जा. तिची तब्येत पण बरीच खालवली आहे.

आईचे औषध पाणी सुरू झाले. पण औषधाचा म्हणावा तसा असर दिसत नव्हता. X ray, अनेक टेस्ट्स झाल्या. शेवटी डोॅक्टरने आधी बायोप्सी, नंतर पेट स्कॅन करायला सांगीतल. या टेस्टच नाव ऐकल्यानंतर तर चांगले चांगले लोक आधीच घाबरतात.

 खर तर बर्‍याच दिवसांनंतर आम्ही सर्व भेटलो होतो. एका मोठया संकटाला तोंड देऊन टेंशन फ्री झालो होतो. देवाचे आभार मानत होतो. तर आता पुन्हा एक नवीनच प्रश्न समोर येऊन उभा होता.

टेस्ट झाली आणि डॉक्टरने रिपोर्ट वाचून लंग कॅन्सर चे निदान केले. आणि आई सूखाच्या शिखरावरून धप्पकन खाली पडली.

 आता तर सर्वांचेच धाबे दणाणले.

अनपेक्षितपणे, दूर दूर पर्यंत मनात अस काही असेल हे आलच नाही. साधा खोकला जो कोणालाही होतो आणि बराही होतो, तो आईचा बराच झाला नाही. तो या स्तरापर्यंत गेला असेल, हे कोणाच्या मनी ध्यानी पण आल नाही. हा सर्वांना एक मोठा धक्काच होता.

आज पुन्हा एकदा असहनीय शांतता घरात होती. प्रत्येक जण सहज सामान्य वागायचा प्रयत्न करत होता.

आई सरळ आपल्या बेडरूम मध्ये जाऊन बसली. मला माझ्या स्वतः बरोबर थोडा वेळ हवाय. अस म्हणाली. पूर्ण दोन दिवस 48 तास तिने बहुतेक स्वतःशीच वाद घातला असावा, संवाद साधला असावा. तिलाही हे accept करण कठिणच होत. जेवावस वाटत नाही, चहा पण घ्यावासा वाटत नाही. अशी अनेकदा ऐकलेली वाक्य आज आई स्वतः अनुभवत होती.

अशा वेळेस विचारांची सुनामी आलेली असते, भावनांचा विलक्षण गोंधळ मनात चालूच असतो.

भीती- काळजी-जबाबदारी-चिंता भविष्यात होणार्या संभावित घटना. मनाची तर क्षणात तोळा तर क्षणात मासा अशी अवस्था असते. विचार, भावना क्षणाक्षणाला बदलत असतात. अस्वस्थ मनाला शांत व्हायला वेळ लागतोच… वास्तव स्विकारायला मन शांत असाव लागत.

स्वतःसाठी वेळ काढून अंतर्गत शांततेत स्वतःशी संवाद साधला, तर प्रश्नांची उत्तर सापडतात. ताण कमी होतो. संकटाशी लढण्याचा मार्ग मिळतो. किंवा मार्ग काढावाच लागतो. दुसरा पर्याय समोर नाही हे लक्षात येत.

Sometimes being alone is the only way to know your power.

समोर असलेल्या नवीन प्रोजेक्ट वर फोकस करून पुन्हा एकदा Restart, Reorganize चा विचार करता येतो.

विचार भावना आणि आपले वर्तन यांचा परस्पर खूप संबंध असतो. त्यामुळे योग्य निर्णय वेळेवर घेणे आवश्यक असत.

घरात सर्वच panic / disturbed होतेच.

 दोन दिवसांनी आई व्यवस्थित तयार होऊन बाहेर आली. सर्वांसाठी आलं टाकून छान कडक चहा केला.

आई म्हणाली… मी ठीक आहे. जे आहे ते accept केलय मी. आता यापुढचा प्रवास खडतर आहे, हे माहित आहे मला. 1/2 दिवसांत डोॅक्टर कडे जाऊन line of treatment बद्दल समजून घेऊया. वेळ लागेल पण सर्व ठीक होईल, याची खात्री आहे मला. जशी वेळ येईल, तसा या परीक्षेचा अभ्यास करायच ठरवलय मी. तुम्ही सर्व आहातच बरोबर. गरज पडली तर मदतीला दुसरे पर्याय आहेतच.

सुरवातीला मला हे सत्य पचवायला त्रास झाला. पण now I am ok.

A correct decision doubles the confidence.

बाबा म्हणाले… अग! मी आहे ना तुझ्या बरोबर. काळजी करू नको. सर्व ठीक होईल. आता एडव्हांस टेक्नोलॉजी आहे. काल मी आणि शाल्मली डाॅक्टरला भेटून आलो. सध्या अगदी सुरवातच आहे. आपल्याला लगेच कळल, हे खूप बर झाल.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : चेतना वैद्य 

प्रस्तुती  संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निघून गेलेली सावली…  लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ निघून गेलेली सावली…  लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(आई आणि मुलाच्या नात्यातल्या न बोलल्या वेदनांची कथा)

घरात… पण परकं वाटणारं..

“आई, आता पुण्यातच राहा. बंगलोरमध्ये कामाच्या घाईत मी वेळ देऊ शकत नाही. “

शुभमचं वाक्य ऐकून सुलभा ताईंनी शांतपणे मान डोलावली.

काहीशा हसऱ्या चेहऱ्याने, पण डोळ्यांत क्षणभर ओल आली.

शुभमला ती दिसली नाही… तो आधीच फोनकडे वळला होता.

 

सगळं आयुष्य मुलासाठी काढून, वयाच्या सत्तरीत त्या पुन्हा एका नवीन आयुष्याच्या पायरीवर उभ्या होत्या.

मुलगा मोठा झाला, कमावता झाला…

पण आयुष्यभर आईने उरलेलं सगळं गुंफून ठेवलेलं नातं, आता स्वतःचं वय गाठत होतं.

 

नवऱ्याचं अचानक निधन झालं…

माणसं जरा थांबली, सांत्वना दिली, आणि निघून गेली.

घर, ज्यात दोन पिढ्या घालवल्या, आठवणींनी भरलेलं – विकावं लागलं.

“आई, ते जुनं गावातलं घर विकून टाक. मी पुण्यात बघतो एक चांगली जागा. “

तेव्हा सुलभा ताईंनीही काहीच विचारलं नाही.

फक्त विचारलं – “तुला वेळ होईल का माझ्यासोबत राहायला? “

शुभम म्हणाला – “पुणं सोयीचं होईल दोघांसाठी. “

 

आता, त्याच मुलाने प्रेमाने, काळजीने, व्यवस्थेने सांगितलं –

“पुण्यात तू एकटी नको राहूस. ” तू इकडेच ये.

 

पण त्या वाक्याच्या आड एक अधुरी जाणीव दडलेली होती –

“आई, तू इथं राहा, कारण माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही. “

 

सुलभा ताईंनी कपाट उघडलं, आणि जुन्या साड्या उचलायला लागल्या.

एका साडीच्या घडीत शुभमचा लहानपणीचा शाळेचा रिबन सापडला…

ती साडी अलगद डोळ्यांशी नेली.

क्षणभरात ती मुलाची आई परत झाली –

 

आता तीच आई नवीन शहरात एकटी राहणार होती, जिथं आठवणी नव्हत्या… फक्त भिंती.

 

घर मोठं होतं. सुखवस्तू. प्रिया – सून – नोकरी करणारी, सोज्वळ. नातू – रियांश – दुसऱ्या वर्गात.

पण घरात त्यांच्यासाठी जागा होती, “सुलभा ताईं” म्हणून. ‘आई’ म्हणून नव्हे.

 

पहिल्याच दिवशी, त्यांनी प्रियेच्या स्वयंपाकात मदत करायला विचारलं.

 

प्रिया सौम्य हसली, पण थोडीशी संकोचलेली –

“आई, मी ऑफिसहून येताना थकलेली असते, माझं एक ठरलेलं पॅटर्न असतं, “तुम्ही आराम करा ना! “

ती म्हणाली आणि लगेच AirPods कानात घातले.

किचनमध्ये automatic rice cooker सुरू झाला, आणि गॅसवर ready-to-eat पॅक गरम होऊ लागला.

 

सुलभा ताई काहीच बोलल्या नाहीत.

पण त्यांच्या डोळ्यांतला उत्साह मंद झाला.

 

“आई, तुम्ही आराम करा, “

हे वाक्य “आई, तुमचं काही काम नाहीये इथं” असं अनाहूतपणे कानावर पडून गेलं.

 

सुलभा ताई परत आपल्या खोलीत आल्या. रेस्ट पॅटर्न मधे.

सुलभा ताईंचं सगळं प्रेम आता रियांशभोवती फिरत होतं.

सकाळी दूध, संध्याकाळी फळं… आणि संध्याकाळी गच्चीत खेळणं हे त्यांचं दिवसाचं गोड वेळापत्रक होतं.

ती रियांशला झुला झुलवत, गाणी म्हणत –

“अरे माझा पोपट राजा, आई कुठं गेली? “

तो हसून म्हणायचा – “ऑफिस! “

 

एक दिवस, गच्चीवर जाण्याच्या तयारीत असताना प्रिया म्हणाली –

“आई, त्याला उन्हं लागून जाईल… त्याला उन्हाचा त्रास आहे. “

सुलभा ताईंनी गप्प बसून खेळण्याची चप्पल बाजूला ठेवली.

 

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी विचारलं –

“रियांशला वर घेऊन जाऊ का ग, थोडा खेळवते? “

 

प्रिया म्हणाली –

“आई, आज त्याचे ऑनलाइन क्लास आहेत… तुम्ही त्याला disturb करू नका. “

 

‘डिस्टर्ब करू नका’… हे दोन शब्द सुलभा ताईंना दिवसभर बोचत राहिले.

 

रियांश आता डोळ्यांवर चष्मा घालून स्क्रीनकडे बघायचा, आणि सुलभा ताई त्याचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायच्या.

पण आता तो उठून बिलकुल यायचा नाही.

कदाचित त्याला आईनंच सांगितलं असेल…

 

त्या रात्री सुलभा ताईंनी त्यांच्या जुन्या चष्म्याच्या डब्यात एक कागद ठेवला.

त्यावर लिहिलं होतं –

“मी रियांशला खेळवते, पण त्याच्या आयुष्यात अजून फक्त एक ‘notification’ बनून राहायचं नाहीये. “

दुसऱ्या दिवशी, रियांशला त्यांनी झोपताना गोष्ट सांगितली.

“एक राजा होता…”

 

“आजी, प्लीज! मला कार्टूनचं अॅप लाव ना! “

शुभम आतून ओरडला, “आई, त्याला गोष्टींपेक्षा मोबाईलवर कार्टून आवडतात आता. “

 

रोजचे संवाद मर्यादित… “आई, पाणी पाज. ” “आई, भाजी झाक. “

आईला ‘होते’ होण्याची सुरुवात झाली होती.

 

‘आई’ असणं, ‘असणं’ न उरतं

 

प्रत्येक दिवशी सकाळी शुभम आणि प्रिया दोघंही ऑफिसला निघायचे.

 

सुलभा ताई दररोज आपल्या कोपऱ्यात शांत बसायला लागल्या.

कधी तरी त्या दिवसभरात बोललेलं एकमेव वाक्य असे –

“रियांशने जेवलं का? “

 

प्रिया कधीच आईशी भांडत नाही. पण संवादही फारसा नाही.

ना एकत्र स्वयंपाक, ना एकत्र टीव्ही. ना एकत्र चहा.

 

प्रिया आपल्या मित्रमंडळींसोबत पार्टी करते, मदर-इन-लॉचा उल्लेख “She’s there… in her room mostly. ” असा करते.

 

शुभम हल्ली आईशी कमी बोलतो. केवळ आवश्यक उत्तरं.

प्रिया तर हसते, पण शब्दात एक अलिप्तपणा असतो.

 

“आई, फ्रीजमध्ये ठेवताना भाजी व्यवस्थित झाकून ठेव. वास येतो. “

“आई, तुला काही लागलं तर maid ला सांग. आम्ही मिटींगमध्ये असतो. “

“आई, थोडं टीव्हीचा आवाज कमी ठेव ना. रियांश अभ्यास करतोय. “

 

आवाज कमी केला जातो. आईच्या अस्तित्वाचा.

 

फ्लॅशबॅकमधली ‘आई’

 

एका दुपारी कपाट आवरताना शुभमचे जुने फोटो सापडले.

पहिलं बक्षीस, नाट्यस्पर्धा, पाढे म्हणताना…

त्या फोटोला पाहून डोळे भरून आले.

“हाच मुलगा. छोटा असताना माझ्या मांडीवर झोपायचा. त्याच्या तापात मी रात्रभर जागी राहायचे… आणि आता मी जर गप्पा मारल्या, तर disturb वाटतं त्याला? ”

 

सुलभा ताई पुन्हा डायरी उघडतात —

“मी कधी तिची सासू झालेच नाही… फक्त घरातली एक ‘म्यूट’ व्यक्तिरेखा आहे. “असचं वाटत.

 

“मुलं मोठी झाली की आईचं वय वाढतं … पण नातं मागेच राहतं का? “मुलं मोठी होतात. उंच वाढतात, जग बघतात, शिकतात, करिअर करतात… पण त्या वाढीच्या सावलीत एक शहाणी बाई हळूहळू वयात येते — ती म्हणजे आई.

.. कालपर्यंत जी पाटीवर अक्षरं गिरवत होती, ती आज मोबाईलवर टाईप करायला शिकते… मुलांसाठी.

.. कालपर्यंत जी नकार देत होती, आज ती समजून घेते… मुलांसाठी.

.. पण तिच्या आयुष्याचा काटा मात्र पुढे सरकत राहतो — हळूहळू, नि:शब्द.

 

मुलं विचारतात — “आई, तू शांत का झालीस? “

आई हसते… तिच्या चेहऱ्यावर थकव्याची लकीर असते, पण डोळ्यात अजूनही तेच प्रेम.

“शांत नाही ग, फक्त आवाज थोडा हळू झाला आहे. तुम्ही मोठे झालात ना! “

 

पूर्वी घरात कुठेही वळलं की तिची नजर आपल्यावर असे.

आता तीच नजर दरवाज्याकडे लागून बसते — ‘मुलं कधी येतील’ या विचारात.

एकेक करून सगळे मोठे होतात, आपापल्या आयुष्यात रमतात, आणि तिचं आयुष्य तिथेच थांबून राहतं.

 

ती आता विचार करत नाही की काय खायचं, काय आवडतं.

ती विचारते — “तुला काय हवंय? “

ती स्वतःसाठी कपडे घेत नाही, पण तुमच्या खरेदीत ती रमते.

ती आता काही मागत नाही — कारण आता ती ‘मुलांची आई’ राहिलेली असते, ‘स्वतःची व्यक्ती’ नव्हे.

 

पण प्रश्न राहतो —

“मुलं मोठी झाली की आईचं वय वाढतं … पण नातं मागेच राहतं का? “

 

नाही… नातं मागे राहत नाही.

ते कुठेही जात नाही… फक्त दुर्लक्षित होतं.

ते जपायचं असतं…

एवढंच की, जेव्हा आपण म्हणतो — “आई, वेळ नाही गं” — तेव्हा तिच्या दिवसाचा सगळ्यात मोठा अपमान होतो.

कारण तिच्या वेळाचा प्रत्येक क्षण आपणच होतो. एवढं लिहून आजचा दिवस परत एक चांगल्या आठवणीत गेला.

 

डायरी बंद करते.

 

रविवारी सर्वजण बाहेर गेले. आई घरीच.

शुभम म्हणाला, “आई, तुझी तब्येत हल्ली फारशी चांगली नसते, थोडं विश्रांती घे. “

 

त्या संध्याकाळी सुलभा ताईंनी प्रिया आणि शुभमला चहा दिला.

तेवढ्यात प्रिया चहा घेत म्हणाली –

“आई, थोडं कमी साखर घालायचं होतं. माझं डाएट चालू आहे. “

 

सुलभा ताई मनातल्या मनात म्हणाल्या –

“तिच्या डाएटचा विचार करताना माझ्या नजरेच्या अश्रूंनी कुणालाही ‘कॅलोरी’ वाटत नाहीत…”

 

एका दिवशी सुलभा ताईंनी शुभमला विचारलं –

“माझं जुने गावातलं घर आठवतं का रे तुला? चल एकदा जाऊया. थोडं आठवणींमध्ये फिरून येऊ. “

 

शुभम मोबाईलवर पाहत म्हणाला –

“आई, मी ट्रॅव्हल प्लॅन करत नाही. खूप बिझी आहे. “

 

प्रिया हसून म्हणाली –

“आई, तुम्ही तरी तिथे जाऊन काय करणार? गावात काय उरलंच आहे? “

 

सुलभा ताईंनी मान डोलावली. “हो बाई… काहीच नाही उरलं. “

 

पण त्या रात्री त्या उठून बसल्या. शेल्फमधून जुनं कपड्यांचं बॅग काढली. चार साड्या, औषधं, डायरी, आणि एक जपलेली फोटोफ्रेम – शुभम आणि त्याच्या वडिलांची.

 

सकाळी घरात शांतता होती.

आईचं रूम चा दरवाजा उघडा.

सामान नाही. फक्त एक चिठ्ठी:

 

“शुभम,

तुझ्या आयुष्यात मी अडथळा नाही,

म्हणूनच अडथळा नको वाटावा म्हणून निघतेय.

तू चांगला आहेस, प्रिया चांगली आहे.

फक्त माझ्या ‘आई’ असण्याचा अर्थ आता तुमच्या व्याख्येत बसत नाही.

म्हणून मी नजरेआड होतेय.

रियांशला सांग – त्याची आजी परत एक गोष्ट सांगायला कधीतरी येईल. “आईची माया अजूनही असते” असं एक वाक्य नक्की असेल.

 

तोपर्यंत, मी एका जुन्या घरात, एका गोधडीखाली,

आई म्हणून अजूनही तुझ्यासाठी प्रार्थना करत राहीन.

– तुझी आई अजून ही तुझीची. “

 

शुभम काहीच बोलू शकत नाही. प्रिया म्हणते, “तुमचं नातं होतंच ना? ती कुठेही गेली असेल, परत येईल. “

 

पण तो दिवसभर आईचा आवाज शोधतो — “शुभम, जेवलास का रे? “

“तुला पाणी आणून ठेवते रे! “

“थोडं थांब, थंडी पडतेय बाहेर! “

 

कोणीच काही बोलत नाही आता.

आता आवाज गेला… आणि पोकळी राहिली.

 

प्रिया विचारच करत राहिली,

“तिनं कधीच तक्रार केली नव्हती… पण त्यांनी असं का केलं? ”

 

रियांश दररोज विचारतो –

“आजोबा गेले… आता आजी पण गेली? “

प्रिया आणि शुभम काहीच बोलत नाहीत.

ते दोघंही एका अशा वास्तवात गुरफटलेत,

जिथे आई गेली हे बोलायचं नाही,

पण ती होती हे विसरायचंही नाही…

 

त्या रात्री, रियांशच्या पाटीवर एक चित्र होतं –

एक मोठ्ठं घर, त्याच्या बाजूला आजी, आणि तिच्या हातात गोष्टीचं पुस्तक.

खालच्या कोपऱ्यात एका लहानशा अक्षरांत लिहिलं होतं –

“आजी परत येईल, गोष्ट सांगायला! “

 

शुभम शांत होतो.

 

“ती जाताना काहीच घेऊन गेली नाही… पण मागे सगळंच पोकळ करून गेली. “ति असे पर्यंत कोणालाच कळली नाही.

 

कधी कधी लोक नातं संपवत नाहीत.

ते फक्त इतकं दुर्लक्षित केलं जातं की,

ते स्वतःच त्या नात्याच्या चौकटीतून बाहेर पडतात –

जेणेकरून त्यांना दोष दिला जाऊ नये…

 

तुटणं तर झालेलंच असतं ना?

फक्त त्याचा screenshot कुणाकडेच नसतो.

ना स्टेटसला लावायला,

ना आठवणीत जपून ठेवायला…

 

“तिला काय हवंय? “

हे कधीच ती सांगणार नाही… पण तिला अजूनही आपल्या आवाजाची, आपल्या स्पर्शाची, आपल्या संवादाची गरज असते हे विसरू नका.

लेखिका : तृप्ती देव

भिलाई 

प्रस्तुती : गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सूरज : एका सुरवंटाचा प्रवास ! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ सूरज : एका सुरवंटाचा प्रवास  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

 (Metamorphosis – a journey of a caterpillar …)

तुम्ही कधी सुरवंट पाहिला आहे का हो? दिसायला ओबडधोबड आणि काटेरी असतो तो. चुकून जरी हात लागला ना तर काटे चांगलेच टोचतात त्याचे. पण मग हा सुरवंट प्रवासाला निघतो, स्वतःला बदलण्यासाठी तो कोशात जातो आणि एक सुंदर फुलपाखरू होऊन बाहेर येतो.

बोर्डीतल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आमच्या मेहता कॉलेजमध्ये २००५ साली असेच एक सुरवंट आले होते – सूरज नावाचं. BSc बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश घेतला होता त्याने. कदाचित ॲडमिशनच्या पहिल्या यादीत त्याचं नाव नव्हतेही. आला तेव्हाचा सूरज काही फारसा बोलका होता असं आठवत नाही. बहुधा सुरुवातीचे काही दिवस तो एकंदरीत कॉलेजच्या माहोलला ॲडजस्ट होत होता.

एकदा रुळल्यावर मात्र सूरज बोलू लागला आणि तो इतका की “बाबा रे शांत हो” असं वारंवार म्हणायची पाळी यायची.

मूर्तीमंत विद्रोही वृत्तीचा अति आदर्शवादी असा सूरज होता. कॉलेजची बायोटेकची तिसरीच बॅच होती. प्रयोगशाळेत काही उपकरणं नसली किंवा एखादा प्रयोग नीट झाला नाही किंवा काही गोष्टी शिकवायला आम्ही चालढकल केली की सूरजचा तीळपापड व्हायचा.

हेच का शिकवलं नाही, इतकंच का शिकवलं, अमूक रेफरन्स पुस्तकं का नाहीत अशी सरबत्ती व्हायची. आणि याच्यामुळे जास्तीचं शिकायला लागतं म्हणून वर्गमित्रही नाराजच असायचे त्याच्यावर.

दुसऱ्या तिसऱ्या वर्षी मात्र हा मुलगा बदलू लागला, बदलतच गेला. म्हणजे तो शांत झाला, टीका करण्याचा बंद झाला असे नाही पण आता सकारात्मक टीका आली, अडचण सांगून झाली की लगेचच ” आपण असं करून बघू या का ” असा solution देणारा प्रश्नही पाठोपाठ येऊ लागला.

” पहिल्या वर्षाच्या शेवटीशेवटी मी जाम वैतागलो होतो. ” सूरज सांगत होता. ” माझ्या भुणभुणीने शिक्षकांची मी डोकेदुखी होतो, व विद्यार्थ्यांच्यातही माझे कोणी मित्र नव्हते. मी खरंतर सेकंड ईअरला पालघर कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलो होतो. पण तिथल्या मॅडमने मला मार्ग दाखवला. इकडे ॲडमिशन का घ्यायची आहे हे ऐकून घेतल्यावर त्या म्हणाल्या की खरा चॅलेंज तिथेच राहून शिक्षकांचे तुझ्याबद्दलचे मत बदलण्यात आहे, त्याच वर्गातल्या मुलांशी मैत्री करण्यात आहे. ” मग मी हे चॅलेंज म्हणून स्वीकारले, माझ्यात थोडासा बदल घडवला आणि फरक तुम्हाला दिसतोच आहे. “

खऱ्या अर्थाने सूरज खुलला तो डिपार्टमेंटला tissue culture च्या झालेल्या workshop च्या वेळी. २०-३० मुलांपैकी जेव्हा याच्या एकट्याच्याच explant ला कोंब आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. पण असे क्षण वगळता त्याचा रांगडेपणा अजूनही नको त्या वेळेला डोकं वर काढेल अशी सार्थ भीती आम्हाला सतत वाटत रहायची.

सोसायटीचे सेक्रेटरी एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या वकिल मॅडमना बोर्डीसारख्या ग्रामीण भागातील संस्थेचे कॉलेज दाखवायला घेऊन आले होते. आपली मुलं आळशी आहेत, ती विचार करत नाहीत, नुसती घोकंपट्टी करतात, application करीत नाहीत असा काहीसा टीकात्मक सूर त्यांनी लावला. मॅडमने critical thinking वर जोर देत न्यूटनचे उदाहरण दिले. त्याच्या डोक्यावर सफरचंद पडल्यावर त्याने critical thinking वापरले आणि इतिहास घडला.

सूरजने हे ऐकून हात वर केला आणि बायोटेकच्या सर्व प्राध्यापकांच्या पोटात एकसमयवच्छेदेकरून मोठ्ठा गोळा आला – हा बाबा आता काय तारे तोडणार?

” मॅडम, न्यूटन जर आमच्या पाड्यावर – वस्तीवर जन्मला असता आणि जर आमच्यासारखाच जर भुकेलेला असता आणि त्याच्या जर डोक्यात असे फळ पडले ना, तर तो ते खाली का पडले असा विचार करत बसला नसता. त्याने ते फळ आधी खाऊन टाकलं असतं. रिकाम्या पोटी critical thinking सुचत नाही, मॅडम. “

सूरज प्रकाशझोतात आला होता. त्याचा स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती व स्पष्टवक्तेपणा मॅडमना भावला. सोसायटीने दिलेला पुच्छगुच्छ त्यांनी सूरजला भेट केला.

सूरजबद्दल आणखी माहिती कळत गेली. त्याचे वडिल तलासरीजवळ सरकारी कर्मचारी होते. सूरजला शिष्यवृत्ती / फी माफीही मिळू शकणार होती, पण सूरजचा बायोटेकला प्रवेश घेण्याचा विचार त्याच्या वडिलांना लहान तोंडी मोठा घास वाटत होता. आपण एका छोट्या गावातून आलो आहोत, आपण अशी मोठी स्वप्नं पाहू नयेत. तू शेतकी कॉलेजला ॲडमिशन घे, तू म्हणशील तिथे मी सही करतो. पण हे असं निसर्गाच्या विरूध्द जाणाऱ्या बायोटेक फियोटेकला जाणार असशील तर मी काही सही करणार नाही. आपला मुलगा मोठा होतोय, त्याला दात आहेत पण त्याच्यासाठी आपल्याकडे चणे नाहीत याची त्यांना खंत होती.

बोर्डीला असताना ” आई, मी इतका शिकणार आहे की पुढे जाऊन शास्त्रज्ञ बनणार आहे. ” असं सूरजने आईला सांगितले आणि त्या माऊलीची झोप उडाली. असं प्रवाहाविरुद्ध वेगळं काही केलंस तर तुला पगार काय मिळणार आणि तुझं पोट तू कसं भरणार – तिला प्रश्न पडला.

सूरज जवळजवळ वर्षभर डहाणूला (बोर्डीपासून १५ किलोमीटरवर) आदिवासी हॉस्टेलला राहिला. फीचे पैसे उभे करायला तो चक्क एका बारमध्ये नोकरी करत होता. हे कळल्यावर त्याच्या एका प्राध्यापकांनी त्याला शिक्षण – फीसाठी पैसे दिले व अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले.

दुसऱ्या वर्षी तो रहायला बोर्डीला आला – त्याच्या दोन वर्गमित्रांबरोबर. गावातील मुलांना असलेल्या न्यूनगंडाने ते आपल्यातील गुणांना न्याय देऊ शकत नाहीत हा छाप त्याला पुसायचा होता. त्या मित्रांना चालताबोलता ज्ञानकोश सोबतीला मिळाला होता. याची फलश्रुती म्हणून हे दोघेही सोबती चांगल्या मार्कांनी पास झाले व मार्गी लागले.

सूरज BSc झाला. ६६% गुण मिळवून. पण त्यापेक्षा कौतुकाची गोष्ट म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत तो भारतात सहाव्वा आला होता. ही गोष्टही आम्हाला नंतर गंमतीशीर रीत्या कळली.

JNU entrance clear झाल्यावरही कुठे जायचं, कसं रहायचं, कसा निभाव लागणार त्याची खात्री वाटत नसल्याने सूरजने मुंबईच्या रूईया कॉलेजला analytical science ला MSc साठी form भरला होता. गोखले सोसायटीने थोडे फीचे पैसे उभे केले होते, थोडे डिपार्टमेंटने. आणि अशात रूईया च्या HOD चा मला फोन आला, ” मकरंद, तुझ्या सूरजचा ॲडमिशन फॉर्म मी फाडून टाकलाय. ” आम्ही सर्व सुन्न.

HOD धनश्री मॅडम सांगत होत्या. ” अरे, रूईयात JNU entrance ला पहिला आलेला मुलगा आहे ६१ rank चा आणि तो जगभर पेढे वाटत सुटलाय. तुझा मुलगा सहावा आलाय. भारतभरातील JNU च्या वीस केंद्रांपैकी कुठल्याही कॉलेजला आमच्यापेक्षा जास्त चांगलं infrastructure असेल, शेवटी centrally funded institutes आहेत बाबा त्या. मी सूरजला माझ्याकडे ॲडमिशन घेऊ देणार नाही”

सूरज शिष्यवृत्ती मिळवून गोवा विद्यापीठात गेला. MSc झाल्यावर पठ्ठ्याने PhD करण्यासाठी दोन दोन शिष्यवृत्ती मिळवल्या. आता मात्र वडिलांचा राग विरोध मावळला आणि सूरज दिल्ली स्थित प्रतिष्ठित अशा NII National Institute of Immunology त मायकेल जॅक्सनला झालेल्या vitiligo या कोडाच्या उपायावर PhD करू लागला. आज डॉक्टर सूरज युरोपमध्ये पोस्ट डॉक्टोरल फेलो आहेत.

अजूनही त्याची बोर्डीशी, आमच्यासारख्या जुन्या खोडांशी जोडलेली नाळ कायम आहे.

आतल्या धगधगत्या आगीला त्याने ज्ञान संपादनाकडे वळवलं. नुसती वैगुण्यं काढण्यापेक्षा तो उत्तरं शोधू लागला. सुदैवाने अजूनही तो तसाच आहे – रांगडा, unsophisticated, someone who calls a spade a spade. पण त्या सुरवंटाचं आता छान फुलपाखरू झालं आहे.

आणि या सुंदर प्रवासाचे आम्ही थोड्या कालावधीसाठी का होईना सोबती आणि साक्षीदार होतो याचा आम्हाला असीम आनंद आहे.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ O T P – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ O T P – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर

पुण्यातील एका गजबजलेल्या बँकेत सकाळची भयंकर गर्दी होती. महिन्याचा पहिला आठवडा असल्यामुळे प्रत्येक काउंटरवर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याच एका रांगेत ‘रघुनाथराव’ नावाचे एक ७५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ उभे होते. त्यांच्या हाताची बोटे म्हातारपणामुळे थरथर कापत होती आणि हातात एक जुना, पण स्क्रीन फुटलेला स्मार्टफोन होता.

त्यांचा नंबर आला. काउंटरवरील क्लार्कने वैतागलेल्या आवाजात विचारलं, “काय काम आहे बाबा? लवकर बोला. “

रघुनाथराव अत्यंत काकुळतीने म्हणाले, “साहेब, हे बँकेचं खातं एका मोबाईल नंबरला ‘लिंक’ (Link) करायचं होतं. तो नंबर बंद पडू नये म्हणून त्याचं *ऑटो-डेबिट’ (Auto-debit) चालू करायचंय. *

क्लार्कने संगणकावर काहीतरी टाईप केलं आणि म्हणाला, “तुमच्या मोबाईलवर ६ अंकी OTP आला असेल, तो सांगा. ” रघुनाथरावांनी खिशातून चष्मा काढला. ते थरथरत्या बोटांनी स्क्रीनवर तो मेसेज उघडण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांना टचस्क्रीन (Touchscreen) नीट चालवता येत नव्हतं. चुकून दुसरंच काहीतरी उघडायचं.

दोन मिनिटे झाली. त्यांच्या पाठीमागे रांगेत उभा असलेला ‘रोहन’ नावाचा एक २५ वर्षांचा कॉर्पोरेट तरुण भयंकर वैतागला.

“अहो काका, काय लावलंय हे? एक साधा OTP बघता येत नाही तुम्हाला? डिजिटल इंडिया आला, पण ही म्हातारी लोक बँकेत येऊन असाच टाईमपास करणार. घरी बसायचं ना, आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय! ” रोहन रागात ओरडला.

बँकेतले इतर लोकही रघुनाथरावांकडे बघून हसू लागले आणि कुजबुजू लागले. रघुनाथरावांचा चेहरा शरमेने लाल झाला. त्यांनी अत्यंत अपराधी भावनेने मान खाली घातली.

रोहन रागात पुढे आला. “द्या तो फोन इकडे. मी बघतो OTP, ” असं म्हणून त्याने अत्यंत उद्धटपणे रघुनाथरावांच्या हातातून तो फोन हिसकावून घेतला.

रोहनने स्क्रीन लॉक उघडला आणि तो ‘मेसेज’ (Messages) ॲपमध्ये गेला.

बँकेचा OTP सर्वात वरच आला होता. रोहनने तो ६ अंकी OTP क्लार्कला सांगितला. क्लार्कने विचारलं, “कुठला नंबर चालू ठेवायचा आहे साहेब? ” रघुनाथरावांचा आवाज अचानक अत्यंत जड आणि कापरा झाला. ते अत्यंत हळू आवाजात म्हणाले, “माझ्या… माझ्या पत्नीचा नंबर आहे. सौ. सुमती जोशी. “

रोहनने सहज त्या फोनमधील ‘सेंड मेसेजेस’ (Sent Messages) कडे पाहिलं… आणि पुढच्याच सेकंदाला रोहनच्या पायाखालची जमीन, शरीरातलं रक्त आणि त्याचा श्वास एकाच वेळी गोठून गेला! त्याचा घसा पूर्णपणे सुकला आणि डोळे भीतीने विस्फारले गेले.

रोहनने पाहिले की, तो जो ‘सुमती’ नावाचा नंबर होता… त्यावर रघुनाथरावांनी गेले दोन वर्षे दररोज शेकडो मेसेजेस पाठवले होते!

“सुमे… आज डब्यात तुझी आठवण आली. भाजी करपली होती गं. “

“सुमे… गुडघे खूप दुखतायत आज, तू असतीस तर तेल लावून दिलं असतंस. “

“सुमे… पोरगा कालही आला नाही भेटायला. मला खूप एकटं वाटतंय गं. मला कधी नेणार आहेस तू तुझ्याकडे? “

रोहनला अचानक धक्का बसला. रघुनाथराव डोळे पुसत अत्यंत जड आवाजात क्लार्कला सांगत होते…

*साहेब, माझी सुमती दोन वर्षांपूर्वीच देवाघरी गेली. माझा एकुलता एक मुलगा अमेरिकेत असतो, तो दोन वर्षांत एकदाही मला भेटायला आला नाही. सुमती गेल्यापासून मी या मोठ्या घरात पूर्णपणे एकटा पडलोय. मी रोज रात्री एकटेपणा असह्य झाला की, तिच्या या बंद असलेल्या नंबरवर मेसेज करतो… मला वाटतं ती वाचत असेल. काल टेलिकॉम कंपनीचा मेसेज आला की, जर या नंबरवर रिचार्ज झाला नाही, तर हा नंबर बंद करून दुसऱ्या कुणालातरी दिला जाईल. साहेब… जर हा नंबर दुसऱ्या कुणाला गेला, तर तिच्या व्हॉट्सॲपवरचा तो हसरा फोटो नाहीसा होईल ओ! मी रोज रात्री कोणाशी बोलू? माझ्या जगण्याचा तो एकमेव खोटा आधार आहे… म्हणून माझा जीव जाण्याआधी मला हा नंबर माझ्या खात्याला कायमचा जोडून ठेवायचा आहे. *

हे काळजाचे तुकडे करणारं सत्य त्या बँकेत घुमलं… आणि त्या वातानुकूलित बँकेत एक भयंकर, जीवघेणी स्मशानशांतता पसरली!

क्लार्कच्या हातातला Mouse तिथेच थांबला. रांगेतल्या लोकांच्या नजरा जमिनीवर खिळल्या.

रोहनला स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या शिक्षणाची आणि त्या ‘डिजिटल इंडियाच्या’ अहंकाराची भयंकर किळस आली. ज्या बापाला तो ‘टाईमपास करणारा अडाणी’ समजत होता… *तो बाप बँकेत व्यवहार करायला आला नव्हता, तर तो स्वतःच्या हरवलेल्या अस्तित्वाला आणि जळणाऱ्या एकटेपणाला वाचवण्यासाठी धडपडत होता! *

रोहनने कोणतीही किंकाळी फोडली नाही, तो तिथे छाती बडवून रडला नाही किंवा त्याने ‘मला माफ करा’ असे कोणतेही नाटकीय संवाद मारले नाहीत.

तो अत्यंत सुन्न अवस्थेत, एखाद्या मूक पुतळ्यासारखा उभा होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि त्यातून मूक अश्रूंच्या धारा अखंडपणे वाहत होत्या.

त्याने स्वतःच्या खिशातून स्वतःचा लेटेस्ट आयफोन (iPhone) काढला. त्याचे हात थरथर कापत होते. त्याने स्वतःच्या फोनवरून, सुमतीच्या त्या नंबरवर पुढच्या *दहा वर्षांचा’ रिचार्ज* (Recharge) स्वतःच्या पैशांनी अत्यंत मुकाट्याने करून टाकला!

रोहनने रघुनाथरावांचा तो जुना फोन अत्यंत आदराने, दोन्ही हातांनी त्यांच्या थरथरणाऱ्या हातांवर ठेवला. त्याने एकही शब्द उच्चारला नाही. तो फक्त त्या बँकेच्या फरशीवर, भर गर्दीत, त्या एकट्या बापाच्या पायांवर काही सेकंद नतमस्तक झाला.

त्यानंतर तो आपली बँकेची कामं तशीच सोडून, अत्यंत मुकाट्याने मान खाली घालून त्या बँकेतून बाहेर पडला. त्याची ती भयंकर शांतता आणि ते मूक अश्रू हेच सांगत होते की… *आपण तंत्रज्ञानात कितीही पुढे गेलो, तरी माणसाच्या एकटेपणावर ‘OTP’ नसतो. माणसाला जगण्यासाठी स्क्रीनची नाही, तर कुणाच्या तरी ऐकण्याची गरज असते, जी भूक जगातलं कोणतंही नेटवर्क भागवू शकत नाही. *

आजकाल आपण *वयोवृद्धांना तंत्रज्ञान समजत नाही म्हणून वैतागतो, पण त्यांच्या त्या अज्ञानामागे लपलेली संवादाची भूक आपण कधी समजून घेणार? *

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक संपाची कहाणी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एक संपाची कहाणी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या यूनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील.. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधी बरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.

विश्वास रागाने धूमसत होता.. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली..) 

इथून पुढे – – 

‘भेटले का सारंग?

‘होय. मग?

‘मग काहीच नाही.. त्त्यांचे म्हणणे तसा संप मागे घेऊ शकत नाही.

‘का?

‘त्त्यांची आणखी अनेक कंपन्यात यूनियन आहे.. त्यामुळे या कंपनीतून माघार घेतली तर इतर कंपन्यात परिणाम होतील.

‘पण मग कामगारांनी काय करायच? दत्तूकाका सारखेच बाकीचे.. मग तू का प्रयत्न करत नाहीस संप मागे घ्यायचा?

‘मी तस करू शकत नाही कारण आमच्या कामगारांपैकी अनेकांना सारंगअण्णा मोठी पगारवाढ देतील अशी आशा आहे आणि दुसरे..

‘दुसरे काय?

‘ही यूनियन चालवाणारी माणसे सरळ नसतात.. गुंड पोसत असतात हे.. मी संप मागे घेण्याचा प्रयत्न केला तर मलाच ठार मारतील ही लोक..

‘बापरे… तू नको पडूस यात.. चल जेवायला.. मी जेवण गरम करते…

ती दोघे जेवण करत असताना दार वाजू लागले म्हणून जेवणावरून उठून श्रद्धाने दार उघडले तर दत्तूकाका बाहेर होता..

‘मास्तर इलेत?

‘होय.. जेवत आहेत.. बसा.

दत्तूकाका आत येऊन बसले.

जेवण अर्धवट टाकून विश्वास बाहेर आला..

‘काका, सारंगअण्णांना भेटून आत्ताच आलो.. पण त्त्यांचे संप मागे घेण्याचे मन नाही..

‘मग.. आमी काय करायचा? किती दिवस उपाशी रवायचा?

‘मी सगळं सांगून बघितलं.. पण मालक अटी मान्य करत नाहीत आणि अण्णा अटी शिथिल करत नाहीत.. आपलंच चुकलं.. आपण उगीचच या यूनियनच्या मागे धावलो..

‘पण मास्तर.. माका पैशाची गरज आसा हो.. माज्या चेडवाचा लगीन करुचा आसा..

‘होय काका… मला समजतंय.. पण माझ्याकडे पण काहीच नाही.. तुमच्या सारखा मला पण दोन वर्षे पगार नाही. श्रद्धाला शाळेत काय थोडे पैसे मिळतात, त्यावर.. नशीब आम्हाला मूल नाही अजून.. नाहीतर..

‘पण माका आसा ना.. दोन चेडवा आसात.. दोगांय लग्नाची झालीत. थोरल्याचा लगीन ठरान दोन वरसा झाली. आता ती माणसा थांबतीत काय? मास्तर… मी अण्णाका भेटाक जावं.. माजी परिस्थिती सांगतय.. माज्यासारखी बरीच जणांची परिस्थिती अशीच..

‘ठीक आहे दत्तूकाका.. तुम्ही अण्णांना भेटा.

दुसऱ्या दिवशी दत्तूकाका सारंगअण्णाच्या ऑफिसमध्ये पोचले. दोन तास बाहेर बसल्यावर त्याना आतमध्ये घेतले..

‘बोला.. कोण तुम्ही..

‘मी दत्तू सावंत.. आमच्या कंपनीत संप सुरु आसा.. काल विश्वासमास्तर तुमका भेटून गेले.

‘बर.. तुम्ही त्या कंपनीत आहात. काय काम?

‘साहेब.. दोन वरसा आमी भायेर आसवं.. दोन वरसा म्हणजे चव्विस महिने पगार नाय.. कसा जगायचं?

‘तुम्हीच मंडळी माझ्याकडे आलात ना? मी तुमच्याकडे आलो होतो काय? तुम्हाला मोठी पगारवाढ पाहिजे.. पण थांबायला नको? कंपनीच्या मालकाकडे पगारवाढ मागितली.. पण तो देत नाही.. म्हणून संप.. मला काय हौस आहे संप पुकारण्याची?

‘पण अण्णा.. माझी खूप कुचम्बणा झाली हो.. माका दोन मुली.. दोघी पण लग्नाची झाली.. थोरलीचा लग्न ठरला पण.. माझ्याकडे पाच पैशे नाय हो.. लग्न करुचा कसा धाडस करू सांगा?

‘या तुमच्या वैयक्तिक गोष्टी मला सांगू नका.. संप केला की हे सोसावंच लागत.. डॉक्टरनी मिलचा संप पुकारला.. तुमच्याच कोकणातील कामगार देशोधडीला लागले.. मी असं ऐकलं की गिरणीकामगारांच्या मुली डान्सबार मध्ये नाच करतात म्हणे.. अजून करतात.. त्यानी आपल्या बापाचे कर्ज फिटवले, असे ऐकतो मी. असं होत..

 दत्तूकाका रागाने लाललाल झाले.. त्त्यांचे मस्तक गरम झाले… रागाने ते म्हणाले..

‘म्हणजे तुमचा म्हणणं.. माज्या मुलींनी डान्सबारमधी नाच करुचो..

‘असं म्हणत नाही मी…

‘मग काय म्हणताय. तुमका संप मागे घेऊक जमणा नाय आणि असलो सल्लो देतास?

रागाने दत्तूकाका बाहेर पडले.

दत्तूकाका विश्वासच्या घरी आले तेंव्हा तो सिगरेट ओढत बसला होता.. बाजूलाच श्रद्धा मुलांचे पेपर तपासत होती.. चिडलेले दत्तूकाका विश्वासला म्हणाले..

‘सालो भडवो माका सल्लो देता.. म्हणता गिरणी कामगारांचे मुली डान्सबार मध्ये नाच करतत.. तेनी बापाचा कर्ज फेडला.. नालायक सालो.. माका असो राग इलो, साल्याचो गळो दाबीन म्हणून..

‘शांत व्हा काका.. शांत व्हा.. अहो हे पुढारी असेच.. त्याना कामगार कसे राहतात याची कल्पनाच नसते.. मी आणि श्रद्धाने तुमच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाची सोय केली आहे.

‘काय?

‘होय काका… आम्ही पनवेलमध्ये एका सोसायटीत ब्लॉक बुक केला होता दोन वर्षांपूर्वी. दिढ लक्ष भरले होते.. परत पैसे भरणे जमलेच नाही.. आजच आम्ही पनवेल मध्ये जाऊन ते अग्रीमेंट रद्द केले.. बिल्डर खूष झाला कारण आता डबल दर झाले आहेत तिकडे… ते पैसे पंधरा दिवसात मिळतील. तेंव्हा तुम्ही मुलीच्या लग्नाचे ठरवा.. तोपर्यंत पैसे येतील.. लग्न होऊन जाईल..

दत्तूकाका रडू लागले.. ‘अजून देव आसा या जगात तुमच्यासारखो..

 दत्तूकाका डोळे पुसत घरी गेले. विश्वास, श्रद्धाला समाधान वाटले कारण कितीतरी दिवसांनी दत्तूकाका हसले.. समाधानाने घरी गेले.

 त्या रात्री खुप दिवसांनी विश्वास गाढ झोपला.

पहाटे पहाटे दारावर थापा सुरु झाल्या. एवढ्या पहाटे कोण म्हणत.. श्रद्धाने दार उघडले..

दत्तूकाका छाती पिटत ओरडत होते..

‘काय झाले काका?

‘काय सांगा बाय.. राती पासून माजा चेडू नायसा झाला.

‘आ.. कुठे गेली? शोधलंत का?

एवढ्यात विश्वास बाहेर आला.

‘काय झाल काका?

‘मास्तर.. माज्या चेडवान फसवल्यानं माका.. त्या बंडूदादाबरोबर पळणं गेला.. देवळात जाऊन लगीन पण केलान.

‘अरे.. काय हे? तुम्हाला काहीच कल्पना नव्हती?

‘थोडी थोडी होती.. तेचा तरी काय चूक? तीस वरसा झाली.. अजून लगीन नाय.. माजी कपंनी बंद.. मी तेचा लगीन ठरवलंय.. पण लगीन करूंक पैसो नाय.. शेवटी वाट बघून बघून तेना दुसऱ्याचो हात धरल्यानं. पण ता दुसरेपणाक..

म्हणजे?

‘त्या बंडू दादाचा पयला लग्न झाला हो.. तेका दोन झील आसात.. आणि तेचो मटक्याचो धंदो.. चार दिवस आत चार दिवस बाहेर..

‘अरेरे.. वाईट वाटले..

“आता तेका सोडूचय नाय.. सोडूचय नाय.. म्हणत संतापाने लाल झालेला दत्तूकाका बाहेर पडला..

 त्याच दिवशी दुपारपासून टीव्ही वरील बातम्यात ठळक बातमी यायला लागली..

 कामगारनेते जयवंत सारंग (अण्णा) यांचा त्यान्च्या ऑफिस बाहेर पोटात सुरा खुपसून खून..

 खुनी दत्तू सावंत याला अटक.

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक संपाची कहाणी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एक संपाची कहाणी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

दारावर खटखट झाली म्हणून श्रद्धाने दार उघडले.. बाहेर दत्तू होता..

‘काय हो काका? आज सकाळीच…

‘मास्तर आसत..?

‘अजून झोपलाय तो.. काल रात्री गेटमिटिंग करून आलाय.. उठवू का?

तेवढ्यात दत्तूकाकांच्या आवाजाने जागा झालेला विश्वास बाहेर आला..

‘काय हो दत्तूकाका.. आज सकाळीच..?

‘मास्तर.. कालच्या मिटिंगमध्ये काय ठरला संपाचा?

‘नाही हो.. मालक मागण्या मान्य करत नाही.. आणि मागण्या मान्य केल्याशिवाय आत जायचे नाही असे साहेबांचे म्हणणे..

‘मास्तर.. यात आमी उपाशी रवलव.. दोन वरसा झाली.. संप आज मिटात. उदया मिटात म्हणून.. खायचा काय?

‘होय हो काका.. मला का समजतं नाही.. एवढा दीर्घ संप चालेल याची कल्पना नव्हती.

‘मग पुढे काय? सारंगअण्णा काय म्हणटत?

‘बघू.. आज मी भेटायला जाणार आहे अण्णाना.. त्याना कालच्या गेटमिटिंग बद्दल पण सांगायचे आहे..

‘मास्तर.. जास्त वेळ काढू नकात.. माज्या चेडवाचा लग्न ठरवलंय.. दोन वरसा झाली.. तेच्या घरची चौकशी करतत.. गळ्यात तीन ग्रॅमची डवली तरी घालूक होयी.. आणि लग्नाचो खर्च.. कपंनी बंद.. पैसे खायसून हाडू?

‘बर मी आज म्हणतो अण्णांना.. तुमचा विषय पण सांगतो.. या तुम्ही..

‘उदया येतंय मास्तर.. बरी बातमी घेऊन या.. म्हणत दत्तूकाका गेले आणि विश्वास खुर्चीत धापकन बसला.

आंघोळ करून श्रद्धा बाहेर आली..

‘गेले दत्तूकाका? काय म्हणत होते?

‘संप केंव्हा संपणार? त्यान्च्या लेकीचे लग्न ठरून दोन वर्षे झाली.. त्यान्च्या गावाकडील आहे मुलगा.. कणकवली जवळचा.. पोलीस आहे.. लग्न करायचे पण खिशात काय तरी हवे ना..

‘या तुमच्या संपामुळे खुप लोकांचे वांधे झाले.. दोन वर्षे संप..? किती कामगार आहेत तुमच्या कंपनीत?

‘सोळाशे.. आणि स्टाफ वेगळा..

‘म्हणजे जवळजवळ दोन हजार कुटुंबे दोन वर्षे पगारवाचून आहेत.. एका कुटुंबात पाच माणसे पकडली तर एक लाख माणसे उपाशी आहेत.

‘होय तर.. जवळपास एक लाख माणसे या संपामुळे उपाशी आहेत.. दत्तू काका सारखे..

‘विश्वास.. आपली पण तीच परिस्थिती आली असती पण माझी नोकरी आहे म्हणून.. कशी काय असेना.. कमी पगाराची का असेना पण त्यामुळे घरात रेशन तरी येतंय.

‘बर.. मी सारंगअण्णांकडे जाऊन येतो, संप मागे घेतात का ते विचारायला… तुझ्याकडे पन्नास रुपये असतील तर दे.. बस साठी.. सिगरेट्स पण संपल्यात.. श्रद्धाने पर्स मधून पन्नास रुपये काढून दिले.

विश्वास बसमधून उतरला आणि पंधरा मिनिटे चालत सारंगअण्णाच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये पोचला. आत अण्णाच्या समोर पाचसहा मंडळी बसली होती आणि अण्णा मोठमोठ्याने त्याच्याशी बोलत होते. विश्वास आत गेला आणि एका स्टूलवर बसला. त्याला पहाताच अण्णांनी बोलणे आवरते घेतले आणि त्याच्याकडे तोंड करत बोलले..

‘झाली काल गेट मिटिंग? कामगारांचे काय म्हणणे?

‘अण्णा.. कामगार घायकुतीला आलेत.. त्त्यांचा संयम संपला.. त्यान्च्या दोन वेळ जेवणाचे वांधे झालेत.. पोरीबाळींची लग्ने अडकलीत.

‘पण त्या वेळी हेच कामगार माझ्याकडे आले होते ना? मी यांच्याकडे गेलो होतो? मी ठाणे पट्टीत दहा बारा कंपनीत भरगोस पगारवाढ दिलीच ना? पण आता परिस्थिती बदलली.. मिलचा संप फसला.. डॉक्टरांची डाळ शिजली नाही तर आपले काय?

‘म्हणजे अण्णा.. मिलच्या संपानंतर एवढा बदल झाला?

‘होय रे बाबा.. खूपच बदल झाला.. डॉक्टर एवढे स्ट्रॉग.. एवढा मिलकामगार त्यान्च्या मागे.. तरी संप यशस्वी झाला नाही.

‘का यशस्वी झाला नाही मिलकामगारांचा संप?

‘कारण मुंबई.. येथील जमिन.. जमिनी विकून कोट्यावधी पैसे मिळतात तर मिल चालवायला कुणाला इंटटेस्ट आहे? आणि राज्यकर्ते.. दोघांची आतून सेटलमेंट..

‘मग आपला संप? त्याचे काय होणार?

‘विश्वास.. मी तुझ्या कंपनीतील संप मागे घेऊ शकत नाही.. कारण माझे यूनियन मुंबईतील अजून दहा कंपनीत आहे आणि पुणे.. नाशिक भागात पण आहे.. हा संप फसला तर इतर कंपनीत परिणाम होईल… मला माझे यूनियन सुरु ठेवायचे आहे आणि त्यावर माझी डाळचावल आहे.

‘म्हणजे अण्णा.. तुमच्या स्वार्थासाठी आमच्या कपंनीतील कामगारांना उपाशी ठेवणार? केवढे हे पाप?

‘जीवो जिवश्य जीवनम.. हा डार्विनचा सिंद्धांत तुला माहित असेलच. अश्या लाखो कामगारांच्या जीवावर आमचे बंगले उभे राहतात.

‘हे पाप आहे अण्णा? कामगार स्वस्थ बसणार नाहीत..

‘मग कामगारांना तू का सांगत नाहीस.. संप मोडून कंपनीत जा म्हणून?

‘मला तसें सांगावेसे वाटते.. पण मला हे मान्य करायला हवे.. अजूनही बऱ्याच कामगारांचा तुंमच्यावर विश्वास आहे… कारण अनेक कंपन्यात तुम्ही घसघशीत पगारवाढ दिली आहे… आणि माझ्या दृष्टीने दुसरे कारण..

‘कसले दुसरे कारण विश्वास? बोल.. स्पष्ट बोल…

‘मला माहित आहे.. तुमच्यापाशी मुंबईतील अनेक गुंड आहेत.. त्याना तुम्ही पोसताय.. संप जो मोडेल त्त्यांचा तुम्ही गेम कराल..

अण्णा मोठ्याने हसले.. ‘तुला माहित आहे ना सर्व.. मग गप्प बस..

रागाने विश्वास बाहेर पडला.. बस पकडून घरी आला.. घराखाली एक दोन सिगरेटी घेतल्या आणि दार उघडून घरात गेला. त्याचे डोके गरम झाले होते. अण्णा आपला हेका सोडतं नव्हते.. पुढे काय करावे हे त्याला कळेना.. त्याची कॉलेजपासूनची डावी विचारसरणी.. कामगार.. त्यांचे हक्क.. याविषयी तो पोटतिडकेने बोलायचं. या कंपनीत नोकरी मिळाल्यापासून तो कामगारांच्या जवळ गेला.. त्त्यांचे लहानसहान प्रश्न सोडवू लागला.. त्यामुळे तो यूनियनलीडर झाला. गेली पाच वर्षे कंपनीने पगारवाढ दिली नव्हती, त्यामुळे कामगार नाराज होते. ते विश्वासबरोबर बोलत.. कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या यूनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील.. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधी बरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.

विश्वास रागाने धूमसत होता.. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली..

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares