सुश्री शीला पतकी
इंद्रधनुष्य
☆ एक वेगळी प्रेम कहाणी… ☆ सुश्री शीला पतकी ☆
तिचं डोकं दुखत होतं पण काम तर करणं भाग होतं. 50 टोप्या प्रत्येक बाईने शिवायच्या होत्या. तिचे हात पटापट चालत होते. मशीन वर पाय भरभर चालत होते… पण डोके दुखण्याची वेदना चेहऱ्यावर दिसत होती. आसपास अशीच राष्ट्र उपयोगी काम चाललेली होती. एक दहा बाय दहाची खोली त्यातच एका कार्यकर्त्याचा संसार तिथेच बुलेटिनचे गठ्ठे आणि बरच काही…! इतक्यात एक तरुण कार्यकर्ता आत मध्ये आला टोप्या घेऊन जाण्यासाठी त्यांन त्या सतरा अठरा वर्षाच्या मुलीकडे पाहिलं का कोण जाणे पण त्याला वाटलं तिला काहीतरी होतंय त्यांना विचारलं, ” बरं वाटत नाही का? ” ती म्हणाली, ” नाही डोकं फक्त दुखतंय” तो म्हणाला,… “चहा घेऊन बघा “ती म्हणाली, ” ते आमच्या घरी चहा करत नाहीत महात्माजींचा आदेश आहे ना… “… मग तो तातडीने बाहेर पडला… अर्ध्या तासात परत आला… हातात एक थर्मास होता आणि रॅपर मधली गोळी! त्यांना तिचं काम थांबून एक ग्लास पाणी दिलं आणि म्हणाला, “गोळी घ्या डोके दुखणे थांबेल आणि त्यावर हा एक कप चहा घ्या” आता मात्र तिने त्याच्याकडे पाहिलं आपल्यासाठी इतक्या आदराने आणि प्रेमाने आपल्या दुखण्याची दखल घेऊन हे सगळं करणारा तरुण कोण? … समोर एक 22 /23 वर्षाचा काळ्या रंगाचा दणकट हाडापेराचा कुरळ्या केसाचा तरुण उभा होता तिने त्याच्याकडे पाहिलं तो नजरेनेच म्हणाला घ्या चहा घ्या काही बिघडत नाही. तिने चहा घेतला थोड्या वेळाने डोकं दुखायचं थांबलं.
तरुण रोज त्या कार्यालयात कामानिमित्त येत होता हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं तिने विचारलं, “खेड्यातून आलात? तो म्हणाला, ” हो शेती असते तिकडे पण शिक्षणाला इथेच होतो. शाळा सोडली… महात्माजींचा आदेश. कार्यकर्ता म्हणून सामील झालो सध्या तरी मोठ्या नेत्यांच्या हाताखाली निरोप पोहोचवणं संदेशवहन जेवण पोहोचणे इत्यादी कामे करतोय चोरून बुलेटिन वाटतो वेषांतराची कला आहे तिचा उपयोग करत लपून छपून असणारी काम करतो”. ती बेहद खुश झाली तो म्हणाला पण माझ्या जेवणाची सोय नाहीये…! ती म्हणाली, ” मी डबा देईन तुम्हाला “… तो म्हणाला मोफत नको खानावळी सारखा डबा देत असाल तर पैसे देऊन जेवेन”… ती म्हणाली, “आईला विचारून सांगते”. मग डब्याचा निमित्ताने तो रोज येत राहिला
… एक दिवस धाडस करून त्यांना विचारलं… हो धाडसच कारण ती वेगळ्या जातीची होती तो उच्च कुलीन ब्राह्मण होता घरी पटणार नाही तिला स्वीकारणार नाही याची त्याला जाणीव होती. तरीही त्यांन निर्णय घेतला. तिच्याही आईचा विरोधच होता. माणस आपली जात सोडत नाहीत आणि ते खरेच आहे कारण जीवनशैली वेगळी असते ना? पण त्या अठरा वर्षाच्या मुलीने ते धाडस दाखवलं. घरात कोणीही पुरुष माणूस नाही एक धाकटा भाऊ आणि विधवा आई. हे आपलं यापेक्षा अधिक भलं करू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन तिने त्याच्याशी विवाह केला व त्यांचा चहा विचारण्याचा दिवस व्हॅलेंटाईन डे ठरला…! कुठल्याही मंगल अक्षता नाहीत.. कुठलेही भटजी नाहीत… हौस मौज नाही… शालू शेले नाहीत..! कोर्टातले एका लावलेल्या छोट्या स्टॅम्पवर ते लग्नासाठी करारबद्ध झाले. कोर्टात जमलेल्यांनी आशीर्वाद दिले. त्यांचा संसार सुरू झाला! तो कधी तुरुंगात, कधी घराबाहेर देशाच्या कामात… अनेक बाजूने विरोध… पैशाची नोकरी नाही कामधंदा नाही घरची बऱ्यापैकी श्रीमंती असताना खायचे वांदे व्हायचे… पण ते डगमगले नाहीत दोघांच्या जीवावर संसार उभा केला मुलाना उत्तम शिकवलं देशभक्तीच बीज पेरलं आज आणि हसत खेळत दिलखुलासपणे जगत राहिले…! एकमेकांची कदर करत…! जग अख्ख विरोधात होतं पण ते एकमेकांसाठी होते… मग सगळे जग त्या दोघांनी जिंकून घेतलं आज ते दोघ असते तर तो म्हणाला असता, तूच माझी व्हॅलेंटाईन करतेस ना अजूनही प्रेम तुझ्या कळ्या कभिन्न नवऱ्यावर…! “
आणि ती शांतपणे हसली असते कारण तिचं नाव शांता होत…!!!
एक सुंदर प्रेम कहाणी जी खरी आहे प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला मला ती आठवते आणि अभिमान वाटतो त्या दोघांचा. राष्ट्र प्रेमातून एकमेकांवर प्रेम करून संसार थाटणारे हे दोन प्रेमी जीव माझे आई-बाबा आहेतबाई दादा, आज तुम्ही हयात नाहीत… पण तुमच्या एवढी प्रेमळ निर्मळ प्रेम कहाणी दुसरी मी पाहिली नाही. फक्त 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करणे मोठ्या हॉटेलत जाणं भेटवस्तू देणं मग म्युझिक लावून नाच करण… केक कापणं… राजे हो हा व्हॅलेंटाईन डे नाही. प्रेम देवतेचे स्मरण करायला हे काही करावं लागत नाही फक्त एकच गोष्ट करावी लागते एकमेकांवर नितांत प्रेम.. एकमेकांप्रती विश्वास आणि आयुष्यभराची खंबीर साथ…!
असो… आज एकमेकांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या प्रेमी जीवाना हॅपी व्हॅलेंटाइन डे!!!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




