श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “नाहीतर मला तुझ्याकडे बोलावून घे!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
एकाच वेलीवर फुललेली दोन फुलं एकमेकांशी आयुष्यभर नातं सांगत राहतात पण दुसरं फूल कोमेजून जाईतोवरच… पण कोमेजून गेलेल्या, मातीच्या कुशीत विरून गेलेल्या फुलाची सय सल म्हणून मनात जागवत दुसरं फूल जेंव्हा सुगंधाविना जगत राहतं… तेंव्हा त्या लतेने तिच्या सर्वच फुलांत तिचे स्वप्राण गुंफलेले आहेत.. असं समजावं!
आजच्या दिवशी मोग-याचा एक फुलोरा निमाला! सुगंधाला फुलांपेक्षा जास्तीचे श्वास देऊन निसर्गाने आपल्यावर मोठेच उपकार केलेले आहेत. सुकलेली सुमनेही कितीतरी वेळ मने उल्हसित करीत राहू शकतात… फक्त ती जपून मात्र ठेवता आली पाहिजेत.
पण काही वेदना, काही दु:खं कधीच जुनी होत नाहीत. सावली निघून गेल्यानंतर भाजणारं ऊन सदोदित प्रखर होत जातं… बाळासाहेबांचं असंच झालेलं आहे!
दीनानाथ, माई, लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ… या एकमेकांशी एका अखंड सूत्रात बांधल्या गेलेल्या फुलांची संख्या स्वरांच्या संख्येएवढी असावी हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही!
लतेच्या देहातून कळ्या प्रकट होतात… आणि फुलत जातात… पण लताच कोसळून पडली की कळ्यांनाही माती जवळ करावीच लागते. या कळ्यांतील हृदयनाथ नावाची कळी पुढे स्वत:च्या सामर्थ्यावर फूल झाली… पण या फुलाने लतेचा हात काही सोडलेला नाही… अगदी आजच्या क्षणापर्यंत.
दीदी आपल्याला सोडून गेल्या त्यापेक्षा त्या हृदयनाथ यांना जास्त सोडून गेलेल्या आहेत… हे बाळासाहेबांचे शब्द सांगून जातात. गेल्या काही महिन्यांपासून दैनिक सकाळच्या रविवार पुरवणीत बाळासाहेब आणि दीदी यांच्यातील संवाद वाचायला… नव्हे ऐकायला मिळतो आहे. एक भाऊ आपल्या बहिणीशी एवढा तादात्म्य पावू शकतो हे अनुभवणे ही एक वेगळीच अनुभूती आहे. आई आणि मूल हा स्नेहसंबंध आपल्याला ज्ञात असतो… पण भावा-बहिणीमधली ही भावसरगम दुर्मिळ म्हणावी अशी. मुख्य म्हणजे ही सरगम गद्यात व्यक्त केली जाते आहे.
आपण या संवादात जणू आगंतुक आहोत… वाटतं… हृदयनाथ जगाला काही सांगायला जात नाहीत… ते स्वत:लाच सर्वकाही सांगत आहेत. ते केवळ त्यांच्या दीदीशीच बोलत आहेत… तिच्या आठवणींच्या खोल डोहात अगदी तळापर्यंत जाऊन भावसमाधी लावून बसलेत… बाळासाहेबांचं विदीर्ण झालेलं हृद्य प्रत्येक शब्दात ठळक दिसत राहतं… हे असं प्रेम लाभलेली माणसं असतात… हे जाणवत राहतं.
मायाजाल हे असंच तर असतं… पण त्याची स्वत:चीही एक गोडी आहे. लता दीदी आणि बाळ हृदयनाथ या भावा-बहिणीच्या नात्याची उकल हृदयनाथ मंगेशकर यांच्या लिखाणातून थोडी थोडी होत जाते आहे… पण अजूनही खुद्द हृद्यनाथ यांना सर्वकाही सर्वांशाने व्यक्त करता आलेलं आहे… असं दिसत नाही. फुले वेचू जाता तिकडे दुस-या कळ्यांना बहर आलेला आहे असं होत जातं. मोगरा फुलला या माऊली ज्ञानोबारायांच्या अजरामर शब्दकळ्या सुरात गुंफताना लता-हृद्य यांच्यात झालेला संवाद जणू ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथांचा संवाद वाटतो… इथं दीदी जणू निवृत्ती!
दीदी गेल्या… आणि त्यांचे हृदय मागे राहिले आहे… या हृदयाला आता पुन्हा लतेच्या अंतरंगात शिरून तिच्याशी एकरूप होऊन जाण्याची आस लागलेली आहे…
“तू परत ये… परत येऊ शकणार नसशील… तर मला तुझ्याकडे बोलावून घे… ” हे हृदयनाथांचे शब्द मन हेलावून जातात!
लता मंगेशकरांनी जेवढे आपल्याला दिले तितकेच हृदयनाथ यांनीही दिलेले आहे. अभंगवाणी, मीरेची भजने यांच्या सुरावटी त्यांनीच तर रेखल्या आहेत… त्यांच्या सुरांवरच लता दीदीच्या स्वरांतून मोगरा फुलला आहे! बाळासाहेबांनी दीदीच्या आठवणी सांगत राहाव्यात… शब्दबद्ध करीत राहाव्यात… कारण फूलच लतेचे अंतरंग जाणत असते!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




