श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अवयवदान…”  ☆ श्री सुनील देशपांडे ☆

जुलै महिना हा अवयवदान प्रबोधन महिना म्हणून नोटो म्हणजेच भारत सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने एक लेख – – जास्तीत जास्त लोकांमध्ये तो पसरवून लोकांना अवयवदानाबाबत जागृत करण्यासाठी मी सर्वांना आवाहन करीत आहे.

आपलं शरीर हे एक अजब असं स्वयंचलित यंत्र आहे. सदर यंत्रामध्ये दोन केंद्रे आहेत. त्यातलं एक ऊर्जा केंद्र आणि दुसरं आज्ञा केंद्र. या ऊर्जा केंद्राला आपण हृदय असे म्हणतो आणि आज्ञा केंद्राला आपण मेंदू असे म्हणतो. या दोन्ही केंद्राद्वारे आपल्या शरीरातील सर्व व्यवहाराचे नियंत्रण होत असते. आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग असतात. जसे की हात, पाय, डोकं, नाक, कान, डोळे वगैरे. या सर्व शरीराच्या भागांना अवयव असे म्हणतात. आत्ता मी सांगितले ते सर्व शरीराचे बाह्य अवयव आहेत. त्याचप्रमाणे शरीराच्या आत मध्ये विविध भाग असतात उदा. यकृत, जठर, फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड, स्वादुपिंड, वगैरे. या सर्व शरीराच्या आत मध्ये असलेल्या भागांना अंतर्गत अवयव असे म्हणतात. आपलं संपूर्ण शरीर हे बाह्य अवयव आणि अंतर्गत अवयव यांचे द्वारे बनलेले असे अजब यंत्र आहे.

यंत्राचा जेव्हा एखादा भाग बिघडतो तेव्हा यंत्रातला तो भाग काढून दुसरा भाग बसवून ते यंत्र पुन्हा चालू केले जाते. यंत्राचे सुट्टे भाग कंपन्यांकडून विकत मिळतात. त्यामुळे यंत्राचा बिघडलेला भाग दुसऱ्या भागाने बदलून ते यंत्र पुन्हा कार्यरत करता येते. परंतु शरीर हे एक असे अजब यंत्र आहे की त्या यंत्राचा कोणताही भाग कोणत्याही कारखान्यात किंवा शरीराबाहेर कोठेही तयार होत नाही किंवा तयार करून मिळत नाही. शरीराचा भाग हा मानवाच्या शरीरातच तयार होतो आणि तो शरीरातच उपलब्ध असतो.

वर्षानुवर्षे मानवाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात बऱ्याच वर्षांपूर्वीपर्यंत मानवाच्या शरीरातला एखादा भाग बिघडला की मानवाचे आयुष्य संपून तरी जाते किंवा त्या मानवाला अपंगत्व किंवा काहीतरी शारीरिक कमतरता निर्माण होते.

बिघडलेल्या अवयवामुळे निर्माण होणारी कमतरता अथवा मृत्यू ही गोष्ट असाहाय्यपणे सहन करण्याशिवाय त्या माणसाकडे व त्याच्या कुटुंबीयांकडे पर्याय राहिलेला नसतो.

परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राने यातील अनेक व्याधींवर संशोधन करून त्यामध्ये नवीन उपचार पद्धती निर्माण केली आहे त्या उपचार पद्धतीला अवयव प्रत्यारोपण असे म्हणतात.

प्रत्यारोपण म्हणजे खराब झालेल्या अवयवाच्या ठिकाणी तो अवयव काढून दुसरा चांगला अवयव बसवणे. परंतु त्यासाठी दुसरा चांगला अवयव उपलब्ध असणे आवश्यक असते आणि आपण पाहिलेच आहे की कोणताही मानवी अवयव कोणत्याही दवाखान्यात किंवा कारखान्यात बनविता येत नाही. तो दुसऱ्या माणसाच्या शरीरातूनच उपलब्ध झाल्यास, तेही चांगल्या गुणवत्तेचा अवयव उपलब्ध झाल्यास खराब झालेल्या अवयवाच्या जागी बदलून बसवता येतो. पण हे कसं घडणार? त्यासाठीच आवश्यक आहे ते म्हणजे ‘अवयवदान’

अवयवदान म्हणजे आपल्या शरीरातील चांगल्या अवयवाचे दुसऱ्याच्या शरीरातील खराब अवयवाच्या ठिकाणी बसवण्यासाठी आपल्या चांगल्या तऱ्हेने कार्यरत असलेल्या अवयवाचे दिलेले दान. हे अवयवदान दोन प्रकाराने करता येते

एक जिवंतपणी आणि दुसरे मृत्यूनंतर.

आता आपण त्याचा उहापोह करूया.

कोणताही अवयव मला माझ्या जगण्यासाठी माझ्या शरीरामध्ये उपलब्ध असावा लागतो. तो नसल्यास माझ्या जीवनाचे काय होईल? आणि त्यामुळे मी एखादा अवयव जिवंतपणे कसा बरे देऊ शकेन? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचे दान करू शकते ते अवयव म्हणजे

१) दोन पैकी एक किडनी म्हणजेच मूत्रपिंड.

२) लिव्हरचा म्हणजेच यकृताचा काही भाग.

३) फुफ्फुसाचा काही भाग,

४) स्वादुपिंडाचा काही भाग,

५) आतड्याचा काही भाग.

६) गर्भाशय

कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य एका किडनी वर म्हणजेच मूत्रपिंडावर व्यवस्थित व्यतीत होऊ शकते. त्यामुळे एक किडनी दान केल्याने त्याला कोणताही शारीरिक धोका संभवत नाही. त्याच प्रमाणे इतर ज्या अवयवांचे काही भाग आपण दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करतो ते अवयव दोन्ही शरीरात काही कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्ण पणे कार्यरत होतात. तशी शक्यता असेल तरच डॉक्टर अशा अवयवांचा काही भाग काढून घेण्यास मान्यता देतात. त्यामुळे एखाद्याच्या शरीरातून असे काही भाग काढून घेतल्यास त्याला पुढील आयुष्यात कोणताही शारीरिक धोका संभवत नाही.

एखाद्या स्त्रीचे गर्भाशय चांगल्या रीतीने कार्यरत असून त्या स्त्रीला पुढे मूल नको असल्यास त्या स्त्रीच्या शरीरातून गर्भाशय काढून ज्या स्त्रीच्या शरीरात गर्भाशय नाही किंवा असलेले गर्भाशय नीट कार्यरत होऊ शकत नाही अशा स्त्रीच्या शरीरात ते प्रत्यारोपित करता येते व त्यामुळे त्या स्त्रीला मूल होऊ शकते.

जिवंतपणी वरील प्रमाणे सर्व अवयव दान करून गरजू रुग्णाच्या आयुष्यात आनंद फुलवता येतो आणि दात्याला कोणताही शारीरिक धोका नसतो हे जाणून घेतले पाहिजे.

यातील दुसरा भाग म्हणजे मृत्यूनंतरचे अवयवदान.

अनेक वर्षापासून मृत्यूची व्याख्या ही हृदयक्रिया बंद पडल्यानंतर मृत्यू होतो अशीच आहे. त्यामुळे सहसा हृदयक्रिया बंद पडली की मृत्यू आला अशी व्याख्या केली जायची. सर्व धर्मांनी ही हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू होतो अशीच मृत्यूची व्याख्या केली होती. परंतु आपण या लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. आपल्या शरीराची दोन नियंत्रण केंद्रे असतात त्यातील पहिले हृदय असते. परंतु दुसरे एक नियंत्रण केंद्र म्हणजे मेंदू. ज्याप्रमाणे हृदय बंद पडल्यानंतर मनुष्याचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे मेंदू बंद पडल्यानंतरही माणसाचा मृत्यू निश्चित असतो. म्हणूनच मृत्यू दोन प्रकारचे असतात हे आता आधुनिक विज्ञानाने सप्रयोग सिद्ध केलेले आहे. हृदयाचा मृत्यू आणि मेंदूचा मृत्यू – – – 

– – हृदयाचा मृत्यू झाल्यानंतर फक्त तीन मिनिटांमध्ये शरीरातील सर्व अंतर्गत अवयव बंद पडतात आणि पूर्णपणे निरुपयोगी ठरतात. परंतु बाह्य अवयवांपैकी नेत्र आणि त्वचा या दोन अवयवांच्या बाबतीत अपवाद ठरू शकतो. मृत्यूच्या घटकेनंतर साधारणपणे सहा तासापर्यंत हे अवयव खराब होत नाहीत. अर्थात सर्वसामान्यांच्या भाषेत रूढ झाले म्हणून जरी आपण त्यांना अवयव म्हणत असलो तरी तांत्रिक शास्त्रीय भाषेत त्यांना उती म्हणजेच टिशू असे संबोधले जाते. या टिशूंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा रक्ताशी संबंध नसतो त्यामुळे कोणत्याही माणसाच्या टिशू कोणाही माणसाच्या शरीरास प्रत्यारोपण करता येतात त्यासाठी रक्तगट जुळण्याची आवश्यकता नसते….. त्यामुळे मृत शरीरामधील कॉर्निया व त्वचा म्हणजेच स्किन हे दोन टिशूवर्गीय अवयव मृत्यूनंतर सहा तासाच्या आत काढून घेऊन दुसऱ्याच्या शरीरावर प्रत्यारोपण करण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अवयवदान करायचे असल्यास त्याच्या मृत्यूनंतर किमान नेत्र व त्वचा दान करता येतेच…… शरीराचे अंतर्गत अवयव मात्र एका विशिष्ट परिस्थितीमध्येच प्रत्यारोपणासाठी उपयोगी ठरू शकतात आणि त्या परिस्थितीतच ते दान करता येतात. त्याबद्दल आपण विस्तृत चर्चा करू.

कल्पना करा की माझा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये माझ्या मानेला जोराचा मार बसलेला आहे आणि मी बेशुद्ध असून मला दवाखान्यात ऍडमिट केलेले आहे. या परिस्थितीत ऍडमिट केल्या केल्या कोणत्याही दवाखान्यामध्ये डॉक्टर प्रथम पेशंटला अति दक्षता विभागात ठेवून त्याला व्हेंटिलेटर लावतात. कारण त्याच्यावर उपचार करत असताना मधूनच त्याचा श्वास बंद पडू नये याची काळजी घेण्यासाठी हा व्हेंटिलेटर लावला जातो. व्हेंटिलेटर हे एक कृत्रिम श्वसन यंत्र असते आणि या यंत्रांमुळे माणूस स्वतः श्वसन करण्यास सक्षम नसेल तर या यंत्राद्वारे कृत्रिमरीत्या त्याचा श्वासोच्छ्वास चालू ठेवता येतो. जर श्वासोच्छ्वास चालू असेल तरच हृदयाचे कार्य चालू ठेवता येते. अशा परिस्थितीत डॉक्टर जेव्हा रुग्णावर उपचार करत असतात त्यावेळी जर पेशंटची मानेच्या मागील बाजूस असलेली ब्रेन स्टेम म्हणजेच मेंदूस्तंभ नावाची ही कांडी तुटलेली असेल तर पेशंटचा मेंदूशी संपर्क पूर्णपणे नष्ट होतो. तसेच जर डोक्याच्या कवटीला मार लागला असेल आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला असेल तरीही मेंदूचे कार्य बंद पडू शकते.

अपघात न झालेल्या रुग्णाला सुद्धा जर ब्रेन हॅमरेज मुळे मेंदूत रक्तस्त्राव झाला असेल तर.

म्हणजेच कोणत्याही कारणामुळे एकूणच शरीराचा मेंदूशी संपर्क तुटणे किंवा मेंदूचे कार्य रक्तस्त्राव होऊन बंद पडणे या दोन्ही स्थितीला ब्रेन डेड म्हणजेच मेंदू मृत्यू किंवा मस्तिष्क स्तंभ मृत्यू असे संबोधले जाते. सर्वसामान्यांच्या भाषेत मेंदू मृत्यू असे आपण म्हणू शकतो.

ही स्थिती अत्यंत महत्त्वाची असते यावेळी मेंदूचे कार्य बंद असले तरीही व्हेंटिलेटर चालू असल्याने रुग्णाचा श्वासोच्छ्वास कृत्रिमपणे का होईना चालू असतो, त्यामुळे हृदयक्रिया चालू असते. त्यामुळे माने खालील सर्व शरीर हे रक्ताभिसरणामुळे जिवंत आहे असे वाटण्याची शक्यता असते. छातीमध्ये हृदयाची धडधड स्पष्टपणे दिसू शकते पण तरीही मेंदू मृत झालेला असेल तर व्हेंटिलेटर काढल्या काढल्या त्या रुग्णाचा मृत्यू 100% निश्चित असतो. म्हणजेच ब्रेन डेड याचा अर्थ जिवंत सदृश्य मृत्यू असेही आपण म्हणू शकतो.

हा खरा मृत्यू आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी अपनी या नावाची एक टेस्ट असते ही टेस्ट चार डॉक्टरांची सरकार नियुक्त समिती सहा तासाच्या अंतराने दोन वेळेला करते. दोन्ही वेळेला ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर या समितीतर्फे त्या रुग्णास ब्रेन डेड असे घोषित केले जाते. ब्रेन डेड म्हणजे शंभर टक्के मृत्यूच.

अशा जिवंत सदृश्य मृत्यू परिस्थितीमध्ये माने खालील शरीरामधील सर्व अंतर्गत अवयव कार्यरत असतात. सामान्य यांत्रिक भाषेत म्हणायचे तर ते वर्किंग कंडिशन मध्ये असतात. असे कार्यरत अवयवच फक्त एका शरीरातून काढून दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात.

याचा अर्थ असा रुग्ण मृत्यूशयेवर हॉस्पिटल मधील आयसीयू मध्ये असल्यास व डॉक्टरांच्या समितीने त्याला ब्रेन डेड घोषित केले असल्यास मगच त्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होऊ शकतात. परंतु त्याही परिस्थितीत ब्रेनडेड रुग्णाच्या वारसांनी अवयव प्रत्यारोपणासाठी मान्यता दिलेली असणे कायद्याने आवश्यक असते.

– – – आता आपण असे समजू की वरील सर्व परिस्थिती सकारात्मक आहे. जेव्हा असे असेल तेव्हा शरीरातील अनेक अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध असतात. डॉक्टर त्यातील कोणकोणते अवयव योग्य स्थितीत आहेत ते पाहून मगच कोणते अवयव प्रत्यारोपित करावयाचे हे ठरवतात. परंतु सर्वसाधारणपणे जर सर्व अवयव सुस्थितीत असतील तर प्रामुख्याने पुढील अवयव हे मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतात म्हणून त्यांना लाइफ सेविंग किंवा प्राण रक्षक अवयव असे म्हणतात ते मुख्यतः पुढील प्रमाणे हृदय, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, दोन्ही किडनी म्हणजेच मूत्रपिंडे.

परंतू त्याशिवायही आतडी, गर्भाशय, रक्तवाहिन्या, कानाचे ड्रम, हृदयाची झडपे, हाडे, कूर्चा, बोन मॅरो वगैरे तसेच बाह्य अवयवांपैकी दोन्ही डोळे, त्वचा, दोन्ही हात वगैरे असे एकूण 50 पेक्षा जास्त अवयव आणि मुख्यतः उती म्हणजेच टिशू प्रत्यारोपणासाठी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषत: वारस नातेवाईकांनी जर अवयवदानास संमती दिली, तर अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो. यातले कित्येक मृत्यू आपण फक्त आपल्या संकल्पाने आणि आपल्या वारस नातेवाईक यांनी केलेल्या संकल्पपूर्ती ने आपण वाचवू शकतो.

आज आपण अवयवदान / देहदानाचा संकल्प करूया आणि या संकल्पाची माहिती आपल्या कुटुंबियांना आणि मित्र व नातेवाईक यांना देऊन त्यांनाही या कार्यात सहभागी करून घेऊया. या माणुसकीच्या कार्यासाठी आपल्याला सजग राहता येईल आणि अनेकांचे प्राण वाचवले याचे पुण्य पदरी पाडून घेता येईल.


लेखक : सुनील देशपांडे

उपाध्यक्ष, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन न्ड बॉडी डोनेशन.

संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन.

मो  ९६५७७०९६४०

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted