प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १५ ☆ प्रा.भारती जोगी ☆

नेहमीसारखाच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सुरू होता. पती-पत्नी… दोघही आपापल्या वाद्यावर सादरीकरण करत होते. पती एक राग वाजवत असे, आणि पत्नी तोच राग त्यांच्या पेक्षा ही तेज गतीने वाजवत असे. असं म्हणतात की, त्यावेळी पतीच्या चेह-यावरचे बदलत जाणारे भाव श्रोत्यांच्या नजरेतून सुटले नाहीत… पत्नीला ही जाणवले… नंतरही जाणवतच राहिले. श्रोत्यांची पसंती आणि वाहवा पत्नीच्या वादनाला अधिक मिळू लागली आणि तिला जाणवू लागली ती पतीची नाराजी, असुरक्षिततेचा भाव, आणि कुठेतरी अहंकाराची छटा!! त्यामुळे वैवाहिक जीवनात वादळं येऊ लागली, नात्यांत हळूहळू दुरावा येऊ लागला…

शेवटी आपला संसार वाचावा म्हणून आणि पतीचा स्वाभिमान दुखावू नये म्हणून तिने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि स्वयंघोषित अज्ञातवास पत्करत स्वतः ला आपल्याच निवासस्थानी चार भिंतीत जगणारे आयुष्य निवडले. कारण तिला आपल्या कलेवर आणि संगीतावर कुठलेही दूषण नको होते.

हे… आपल्या संस्कृतीतल्या पुरुषसत्ताक पद्धतीमुळे… अनाम, अलक्षित राहिलेलं आणखी एक स्त्री रत्न!!

हे झाकोळलं गेलेलं रत्न म्हणजे… भारतरत्न महान सतारवादक आणि संगीतकार पं रविशंकर यांची पहिली पत्नी… महान उस्ताद अल्लाउद्दीन खान यांची कन्या आणि उस्ताद अली अकबर खान यांची भगिनी… *अन्नपूर्णा देवी*!!! उर्फ रोशनआरा खान!

मैहर संस्थानच्या महाराज ब्रिजनाथ सिंह यांनी त्यांच्या वादन कौशल्यावर खुश होऊन त्यांना अन्नपूर्णा देवी हे नाव दिले, असं म्हणतात. १५ मे १९४१ ला हिंदू धर्म स्वीकारला आणि आपल्या पित्याचे शिष्य पं रविशंकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.

अन्नपूर्णा देवींच्या वडिलांनी सुरुवातीला त्यांना संगीतापासून दूर ठेवले. पण त्यांची अफाट श्रवण शक्ती, आणि संगीतातील समज पाहून त्यांनी देवींना आधी सतारीची दिक्षा दिली.

नंतर… प्रचंड ताकद आणि बोटांची लवचिकता लागणारं, स्त्रियांसाठी वाजवायला सर्वात कठीण असलेलं वाद्य… *सूर बहार* शिकवलं. देवींनी ही आपल्या प्रचंड मेहनतीने त्या वाद्यावर हुकूमत मिळवली. सतारवादनातही कुशलता प्राप्त केली.

सूर बहार… या वाद्याचा आवाज अत्यंत खोल, गंभीर आणि मानवी आवाजाच्या सर्वात जवळ जाणारा असतो. आणि अन्नपूर्णा देवींच्या सूर बहार वादनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गायकीचे अंग! त्यांच्या वादनात एक प्रकारची शांतता, ध्यान आणि आध्यात्मिक खोली होती. त्यामुळे ऐकणा-याला ध्यानस्थ अवस्था अनुभवायला मिळे हे विशेष!!

आणि म्हणूनच असं म्हणतात की… एकदा पं जीं च्या सतारीच्या

जलद गतीच्या तानांना, जुगलबंदी त उत्तर देतांना देवींनी सूर बहार वर इतकी संथ, गंभीर आणि खोल मींड घेतली की… संपूर्ण सभागृह शांत… आणि… लोकांनी उभं राहून ; फक्त देवींसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. *त्यांच्या सांगीतिक श्रेष्ठतेचा सर्वोच्च क्षण होता तो!

संगीत जगतातील सरस्वती* च होती ती!! त्यांचं सूर बहार ऐकणं म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती चे दर्शन!!

पण… या सरस्वतीतल्या पत्नी ने शेवटी आपल्या *आकाशगंगा* या निवासातील एकांत निवडला… एक… सूरांचा बहर आपल्या *सूर बहार* ला उराशी घेऊन अज्ञातवासात गेला. बहर कोमेजतोय असं वाटलं पण… त्यांच्या मोठ्या बंधूंनी… जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांनी जाऊन त्यांना समजावले आणि सांगितले की, ” तू मंचावर वाजवणे सोडले आहेस, पण बाबांचे हे अलौकिक संगीत संपू देऊ नकोस. शिष्यांना शिकवून जिवंत ठेव”!!!

अन्नपूर्णा देवींना आपल्या मोठ्या भावाचे म्हणणे पटले, आणि त्यांनी उर्वरित जीवन आपल्या मुंबईतल्या अपार्टमेंटमध्ये चार भिंतीत घालवत संगीत साधना सुरू ठेवली. विना श्रोत्यांच्या संगीतकार बनल्या त्या!

रात्रीच्या गहन शांततेत ; या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रतिभावान, अद्वितीय आणि २० व्या शतकातील एकमेव महिला सूर बहार वादक असलेल्या साधिकेने तिची सूर साधना सुरू ठेवली. रात्रीच्या निरव शांततेत तिच्या साधनेच्या शुचितेने सिक्त सुरांची बहार मात्र आसपासच्या लोकांना संतृप्त करत होती.

संगीत हा प्रसिद्धीचा मार्ग न मानता एक अंतर्गत साधना मानली देवींनी आणि सहा दशके ही तपस्वीनी, अथक, अखंड, अविरतपणे… एखाद्या समई सारखी शांतपणे, मंद-मंद तेवत राहून, समिधे सारखी जळत राहिली,सूर आणि संगीताच्या महा यज्ञात समर्पित होत राहिली!! ,त्या शीतल प्रकाश तेजात देशातील महान संगीतकार घडवत राहिली.

अन्नपूर्णा देवींचे घर जणू गुरूकुल च बनले… साधक शिष्यांसाठी! शिष्यांकडून एकही रूपया मानधन न घेता शिकवत. त्या म्हणायच्या… मी संगीत विकत नाही. ज्याला खरोखर संगीत हवे आहे, त्याला मी मोफत देईन. पण त्यासाठी पूर्ण समर्पण हवे. 

आणि खरंच देवींनी शिष्य घडवितांना त्यांना अग्निपरीक्षा द्यायला लावली. त्यांनी घडविलेल्या शिष्योत्तमांत प्रामुख्याने…

पं. हरिप्रसाद चौरसिया (बासरी) 

पं निखिल बॅनर्जी (सतार) 

दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी

नित्यानंद हळ्दीपूरकर (बासरी) 

यांचा उल्लेख अभिमानास्पद ठरतो. देवींनी या शिष्यांकडून फी कधीही घेतली नाही. त्यांची गुरूदक्षिणा म्हणजे… एकाग्रता, कठोर रियाज, आणि संगीतावर ची अढळ निष्ठा!!

पं हरिप्रसाद चौरसिया यांनी त्यांच्या बद्दल काढलेल्या गौरवोद्गारातून अन्नपूर्णा देवींच्या गुरू रूपेण संस्थिता रुपाचं… सगुण, साकार दर्शन होतं.

पं हरिप्रसाद चौरसिया म्हणतात,…

“मी त्यांच्या दारात कित्येक दिवस उभा राहिलो. मग त्यांनी माझं शिष्यत्व स्विकारले. आणि त्यानंतरच मला समजलं की, संगीत ही केवळ कला नाही, तर ती एक सर्वोच्च साधना आहे. देवी केवळ गुरू नव्हत्या, तर त्या संगीताचे चालते-बोलते मंदीर होत्या.

एक संगीत समीक्षक म्हणतात, 

“पं. रवी शंकर हे जगासाठी चमकणारा सूर्य असतील तर, अन्नपूर्णा देवी रात्री च्या शांततेत प्रकाश देणारा शीतल, दैवी चंद्र होत्या*!!

अन्नपूर्णा देवींचे संगीत अंतर्मुख करणारे होते. त्यांच्या सुरांमध्ये अशी जादू होती जी मानवी बुद्धी च्या पलीकडची होती. त्यांचे सूर बहार वादन ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष सरस्वतीचे दर्शन घेणे!!

सतारवादनातही वेगवान तानांवर जबरदस्त पकड होती देवींची! पण या तंत्राचा वापर त्यांनी कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी न करता, संगीतातील भाव आणि सौंदर्य वाढवण्यासाठी केला. आणि हेच आपलं वादन वैशिष्ट्य त्यांनी गुरू म्हणून सांगितले आणि शिष्यांना सखोल ज्ञान दिले.

असं म्हणतात की, ऋषिकेश मुखर्जींनी त्यांच्या अभिमान या चित्रपटाची प्रेरणा अन्नपूर्णा देवींच्या वादळी, काहीशा गूढ आणि त्यागमय आयुष्यातून घेतली.

प्रसिद्धी ची यत्किंचितही हाव नसलेल्या, प्रसिद्धीपरान्मुख अशा या तेवत्या समिधेच्या साहित्य साधनेतील समर्पणाची दखल भारत सरकारने मात्र घेतली आणि त्यांच्या प्रतिभेचा योग्य तो सन्मान करून… पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, देशिकोत्तम (मानद डॉक्टरेट) ही पदवी प्रदान केली हे मात्र नोंद घेण्याजोगे!!

अशा या… सहा दशकाहून अधिक काळ प्रसिद्धी च्या झगमगाटापासून दूर राहून संगीत साधना करत… समर्पित होत जाणा-या विदुषीने १३ ऑक्टोबर २०१८ रोजी ९१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. एक समिधा समर्पित झाली…  सूर बहार चे सूर शांत झाले, बहर संपला आणि संगीत जगतात एक निरव, नि:शब्द शांतता पसरली… एक समिधा निमाली!! *

– लेख क्र. १५.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted