श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मरण – स्मरण ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

आपली प्रिय व्यक्ती मृत्यूशय्येवर असाहाय्यपणे पडून असलेली पहावे लागणे हा आपल्या नशिबातला फार मोठा भोग म्हणावा लागेल! त्यात त्या व्यक्तीला असह्य वेदना होत असतील तर जवळच्या व्यक्तींना होणा-या मानसिक वेदना कल्पनातीत असतात. त्या व्यक्तीची या जगण्यातून मरणाने सुटका करावी, अशीच मनोमन प्रार्थना केली जाते, हे वास्तव आहे! 

अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जीवनाचा मोह सुटत नाही, हे नैसर्गिक आणि स्वाभाविकच आहे. याला फार मोजके लोक अपवाद असतील! जगण्याची नसली तरी शरीर श्वास घेणं स्वत:हून थांबवत नाही.

असाध्य व्याधी असलेली व्यक्ती तिच्या शेवटच्या क्षणांत कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसते. अनेकवेळा व्यक्ती दीर्घ किंवा कायमच्या बेशुद्धावस्थेत असते. काहीवेळा कधीही बरे न होण्याची स्थिती समोर नजरेला दिसत असते. ज्यांना शक्य आहे असे लोक या व्यक्तीला आधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करतात. प्रचलित वैद्यकीय कायद्यांनुसार व्यक्तीची जीवन रक्षक प्रणाली काढून टाकता येत नाही. उपचार थांबवायचे झाल्यासही एक कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. यातून अनेक प्रकारची आर्थिक, मानसिक, सामाजिक आणि विशेषत: नैतिक गुंतागुंत निर्माण होते. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा स्थितीत खूप कठीण काळ समोर उभा थकतो.

व्यक्ती फार काळ तग धरू शकणार नाही, हे सर्वांना ठाऊक असते. पण प्रतीक्षा करण्याशिवाय कोणताही मार्ग उरत नाही. जीवन रक्षक प्रणाली अजूनही खूप खर्चिक आहेत. विविध शस्त्रक्रिया केल्यानंतरही विविध गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात नातेवाईकांची मोठी आर्थिक हानी सुद्धा होत राहतेच. रुग्ण घरी आणणे आणि त्याची सुश्रुषा करणे विविध कारणांनी जिकीरीचे होऊन बसले आहे. मुळात उपचार थांबवणे, रुग्णाला दुस-या रुग्णालयात किंवा पर्यायी व्यवस्थेत हलवणे इत्यादी निर्णय कुणी घ्यायचे यावर एकमत होत नाही… आणि तोवर रुग्ण जन्मा-मरणाच्या उंबरठ्यावर निष्कारण ताटकळत राहतो. आणि रुग्णाची मन:स्थिती समजण्याची काहीही सोय नसते… केवळ अंदाज लावावा लागतो. रुग्णाच्या अत्यंत जवळच्या अर्थात पती, पत्नी, मुलगा या नातलगांवर या गोष्टीचा प्रचंड मोठा ताण येतो. त्यांची स्वत:ची मानसिक कुचंबणा तर होत असतेच, शिवाय अपराधीपणाची भावनाही मूळ धरू शकते! 

यावर उपाय शोधणे ही परिस्थितीची निकड बनलेली असताना भारतात यासंबंधी कोणताही स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही. परंतू २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यानुसार व्यक्तीला स्वत:ला स्वत:वर होणारे उपचार स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा हक्क मान्य करण्यात आला आहे. याला कायदेशीर भाषेत लिविंग विल अशी संज्ञा आहे.

अत्यवस्थ रुग्णावर Ventilator अर्थात कृत्रिम किंवा यंत्राच्या साहाय्याने श्वासोच्छवास देणे, CPR (Cardiopulmonary Resuscitation) अर्थात विशिष्ट वैद्यकीय कृती, उपकरणाच्या साहाय्याने हृद्य कार्यान्वित करणे, नळीवाटे, शीरेतून पोषण पुरवणे, Dialysis अर्थात यंत्राच्या साहाय्याने रक्त शुद्धीकरण करणे इत्यादी प्रकारांनी प्राणरक्षक उपचार केले जातात. जे खर्चिक आहेतच, शिवाय रुग्णाला वेदनादायक आहेत, असे दिसून येते. अर्थात इतक्या वेदना होत असतानाही रुग्णाला जगायचे आहे की नाही, हे समजणे शक्य नसते! अगदी मरावेसे वाटण्याची अत्याधिक इच्छा असली तरी अखेरीस तसं व्हावं, अशी रुग्णाची इच्छा असेलच असंही निश्चित म्हणता येत नाही!… मरणाचा अनुभव हा पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष असला पाहिजे, असे वाटते. असो. या विषयाला विविध बाजू आहेत.

आपल्या अंतकाळी आपल्या जवळच्या नातलगांना कोणताही निर्णय घेण्यात अडचण येऊ नये, अशी कायदासंमत व्यवस्था आता अस्तित्वात आलेली असून प्रक्रिया सोपी आहे. आपण मानसिकदृष्ट्या निर्णय घेण्यास सक्षम असतानाच आता लिविंग विल अर्थात आपल्यावर शेवटी कसे उपचार व्हावेत किंवा होऊ नयेत, हे आपण ठरवू शकतो. महाराष्ट्र राज्य या कायद्याची अंमलबजावणी करू पाहणारे पहिले राज्य ठरले आहे. इच्छामरण या पेक्षा हा कायदा वेगळा आहे, अये विधिज्ञ लोकांनी स्पष्ट केले आहे.

थोडक्यात आपण जर अत्यवस्थ अवस्थेत गेलो, तर आपल्यावर कोणते उपचार करावेत किंवा करू नयेत याबाबत आपण आधीच कायदेशीर सूचना देऊन ठेवायच्या. आपण अशा अवस्थेत पोहोचेपर्यतच्या कालापर्यंत आपण या सूचना रद्दही करू शकतो, ही यातील महत्त्वाची तरतूद आहे! 

मी वर जे काही लिहिलं आहे, ते माझ्या समजूतीनुसार लिहिले आहे, आणि हा लेख म्हणजे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हे! परंतू विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने, व अनेक लोकांना याबाबत कल्पना नसण्याची शक्यता असल्याने मी आपलं समोर मांडलं आहे. तज्ज्ञ, विचारवंत, वैद्यकीय व्यावसायिक, कायदेतज्ज्ञ याबाबत आणखी माहितीप्रद लेखन करतीलच, अशी आशा आहे.

वेळेपूर्वीच प्रत्येकाने याबाबतीत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असं वाटतं! 

संदर्भांसाठी आजच्या दैनिक सकाळ, पुणे मधील एका बातमीचे छायाचित्र सोबत जोडले आहे. सर्वांना शुभेच्छा. जीवेत शरद: शतम!

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted