श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ रक्तमाखली अक्षरे! ☆ श्री संभाजी बबन गायके 

रक्तमाखली अक्षरे !

 – – – ते ‘अधिकारी’ मोक्षाचे !

लग्नाला उणेपुरे दहाच तर महिने झाले होते. नवरा शिपाई गडी, त्यामुळे सहवास आजवर फारसा लाभला नाही, अशी स्थिती. त्यात त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला हाक मारली आणि हा गेलाही लगोलग… सेनेतील नोकरी म्हणजे सैनिकाचे पहिले लग्नच मानले जाते गंमतीने! 

आजच्या सारखं मोबाईलचं गारुड नव्हतं तेंव्हा. त्यामुळे लिखित शब्दांवरच सारी मदार असायची. शिवाय हे शब्द दुस-यांच्या नजरेखालून तपासून घेतले जाऊनच आपल्या माणसाच्या हाती लागणार… देशाच्या संरक्षणाचा सवाल असतो! कुणी नजरचुकीने का होईना संवेदनशील माहिती उघड करू नये, हा उद्देश असतो. विशेषत: युद्धकाळात तर यावर कटाक्ष असतो.

त्याचं पत्र आलं आणि ते वाचण्यात किती तरी वेळ ती हरवून गेली होती. खूप वेळा पत्र वाचल्यानंतर तिने उत्तर लिहायला घेतलं… आणि त्यातही बराच वेळ गेला! शब्दांत सर्वच गोष्टी मावत नाहीत… आणि त्या पत्राचा आकारही एवढा नव्हता की सर्व काही लिहिता यावं! तिने काही ओळी लिहिल्या आणि पत्र धाडलं! 

मेजर राजेशसिंग अधिकारी यांच्या मनात त्यावेळी केवळ तोलोलिंग शिखर होतं… आज रात्री निघायचं आहे त्या पंधरा हजार फुटावर असलेल्या कड्याकडे… ! शिखराच्या थोड्या अलीकडच्या बुरुजांवर ‘त्यांनी’ खंदक बनवून ठेवले आहेत. आणि त्यातून ते आपल्या सैनिकांना अचूक लक्ष्य करताहेत. त्यांना गप्प केलं पाहिजे… कायमचं! कारण त्यांना ओलांडता आलं तरच आणखी वर जाऊन शिखरावर ताबा मिळवता येईल… आणि मग इतर ठिकाणं ताब्यात घेणं शक्य होईल… अन्यथा सारंच केवळ अशक्य आहे! 

खरं तर तोलोलिंग आपल्या मालकीचं शिखर. अत्यंत उंच, तिथलं तापमान कित्येक महिने शून्याखाली असतं. पलीकडे पाकिस्तानी सैनिकही त्यांच्या बाजूने भारतावर नजर ठेवून असतात. तापमान मानवी सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे खाली घसरले की तिथं थांबणं म्हणजे मरणाला आमंत्रण. म्हणून दोन्ही देशांनी हिवाळ्यात आपापल्या सैन्य-चौक्या रिकाम्या करून मागे जायचे आणि बर्फ वितळले की पुन्हा तिथं येऊन बसायचे, असे ठरवले होते! आणि असं काही वर्षे सुरळीत सुरूही होतं. पण मग एकदा पाकिस्तानी सडक्या मेंदूत एक काळी योजना शिजली. भारतीय सैनिक त्यांच्या चौक्यांत दाखल होण्याआधीच आपण तिथवर पोहोचायचं. मग त्यांनी भर हिवाळ्यात त्यांचे अनेक सैनिक गमावून त्या अतिशीत हवामानात आधुनिक साधनांच्या साहाय्याने पक्की व्यवस्था तयार करवून घेतली. आणि भारतीय हद्दीत कित्येक किलोमीटर्स आतपर्यंत घुसखोरी करीत भारतीय सैन्य-चौक्यांचा कब्जा मिळवला… आणि एखादा लबाड शिकारी सावजाची प्रतीक्षा करीत बसावा तसे दबा धरून बसले.

याचा सुगावा लागल्यानंतर भारताने तपासणी गस्ती पथक पाठवलं… त्यावर भीषण हल्ला करून त्यांनी कॅप्टन सौरव कालिया साहेब आणि त्यांच्या सहका-यांना ताब्यात घेतलं… त्यांचे पुढे त्यांनी किती हाल केले ही स्वतंत्र हकीकत आहे… मानवतेला काळीमा फासणारी! 

कॅप्टन सौरभ कालिया यांच्या शोधार्थ गेलेल्या पथकांवरही तुफान हल्ले झाले. नेहमीप्रमाणे चौक्या ताब्यात घ्यायला गेलेल्या सैनिकांवर तिथे आधीपासूनच घुसून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी आरामात हल्ला केला आणि या बेसावध शूर वीरांना कपटाने संपवले! 

सर्व परिस्थिती लवकरच ध्यानात आली… आणि ऑपरेशन विजय हाती घेण्यात आले. योजना आखल्या गेल्या. भारतीय वायूसेनेची मदत घेण्यात आली.

ज्या ठिकाणी पाकिस्तानी मशीनगन्स घेऊन सज्ज बसलेले असत्तात, खालून वर चढत येणा-या भारतीय सैनिकांवर अचूक गोळीबार करत त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असतात, त्यांच्यापर्यंत पोहोचायचंच होतं… ! 

या उंच शिखरांवर पाकिस्तानी नेमके कुठे दडून बसलेत याची पाहणी करण्याचा एक मार्ग होता… हवाई पहाणी! मेजर अधिकारी साहेबांना तो परिसर उत्तम माहीत होता. त्यांनी स्वत:हून या हवाई पहाणीमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली आणि ती पहाणी करूनही दिली. कारण त्यांना स्वत:च इथपर्यंत पोहोचण्याची कामगिरी मिळाली होती… तयारी तर पूर्ण पाहिजे! 

तोलोलिंगच्या या शिखराच्या अनेक बाजूंनी सैनिकी तुकड्या चढणार होत्या. योजना तयार होती. शिखराच्या एका सुळक्यावर असलेले शत्रूचे खंदक नेस्तनाबूत करून तिथे आपल्या सैनिकांसाठी पक्के ठिकाण तयार करून देण्याची जबाबदारी अधिकारी साहेबांना मिळाली होती. जेणेकरून इथून आणखी वर असलेल्या शिखरांवर बसलेल्या शत्रूवर चालून जाता येईल! 

खरं तर मेजर साहेब 2nd Battalion, Mechanised Infantry Regiment (2 Mech Inf) या तुकडीतील अधिकारी. पण युद्धाच्या गरजेनुसार त्यांना 18th Battalion, The Grenadiers सोबत संलग्न करण्यात आले होते. आणि जून महिन्याच्या अखेरीस त्यांना पुन्हा त्यांच्या मूळच्या दलात पाठवले जाणार होते… तेथून ते सुट्टीवर जाणार होते आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करणार होते! 

मोहिमेवर जाणार का? अशी विचारणा ब्रिगेडीअर खुशाल ठाकूर साहेबांनी केली तेंव्हा त्यांनी अतिशय त्वरेने होकार दिला होता. त्यांच्याकडे एक कंपनी म्हणजे दहा सैनिकांची एक तुकडी सोपवण्यात आली. हे सैनिक commandoes होते… विशेष प्रशिक्षित सैनिक. ज्या भौगोलिक परिस्थितीत लढायचे आहे, त्या परिसरातील वातावरणाशी जुळवून घेण्याचा सराव आधी करून घेतला जातो. तुकडी तयार होती.

मेजर राजेश सिंग अधिकारी साहेबांच्या हाती त्यांच्या पत्नीने धाडलेलं उत्तराचं पत्र पडलं! यावेळी साहेबांच्या एका हातात रायफल आणि एका हातात तोलोलिंगचा नकाशा होता… आणि डोक्यात केवळ शत्रू! त्यांनी ते पत्र शांतपणे आपल्या युनिफॉर्मच्या वरच्या खिशात ठेवलं… काळजाच्या वर… काळजाला लागून! मोहिमेवरून परतल्यावर वाचू… त्यांनी मनात म्हटलं… आणि त्यांचं दुसरं मन सांगत होतं… ही मोहिम अत्यंत धोक्याची आहे… परत येण्याची शाश्वती नाही!

२८ मे, १९९९ची रात्र. तोलोलिंग… उंची सुमारे १६ हजार फूट. नव्वद अंश म्हणजे एकदम सरळ भिंत. त्यापेक्षा थोडा कमी अंशाचा डोंगरकडा चढत जायचं होतं आणि त्यासाठी बर्फात गिर्यारोहण करायला लागतात ती साधनंही घेणं आलं. रात्रीची वेळ असली तरी शत्रू सावध होताच. त्याला चाहूल लागली… त्यांनी प्रकाशाचे गोळे हवेत उडवले… त्यामुळे आपले सैनिक त्यांना दिसले… लपून बसलेल्या स्नायपर बंदूक वाल्याने एका ज्येष्ठ सैनिकास अचूक टिपले! सर्वजण जागच्या जागी थांबून राहिले… मिळेल त्या दगडांचा आडोसा घेत. रात्र पुढे सरकली… तापमान उणे पाच झाले. त्या रात्री आणि पुढचा सारा दिवस तिथेच लपून राहण्याचा निर्णय झाला! इथं आल्यावर समजलं… त्या बंकर्स मध्ये पाच-सात मुजाहिदीन (पाकिस्तानी अतिरेकी.. जे नेहमी पाकिस्तानातून कश्मिरात घुसखोरी करून येत असतात!) नव्हते… प्रशिक्षित पाकिस्तानी सैनिक होते… संख्येने कितीतरी पटीने अधिक आणि शस्त्रसज्ज! 

२९ मे, १९९९ची रात्र. पुन्हा चढाई आणि लढाई सुरु. यावेळी मेजर साहेबांनी निराळी व्यूहरचना आखली. खांद्यावरून डागण्याचे मोठे शस्त्र स्वत:च्या खांद्यावर पेलले आणि अचूक अग्निअस्त्र डागली… शत्रूचा एक बंकर उध्वस्त झाला… आणि साहेब तसेच पुढे निघाले… साथीदार सैनिकांच्या तीन-चार मीटर्स पुढे! ११ वाजता ब्रिगेडीअर ठाकूर साहेबांना त्यांनी रेडीओ सेटवरून निरोप दिला… साहेब… लढाई सुरु आहे… एक बंकर काबीज झालाय!

बाकी कमांडोज इतर मार्गांनी वर चढत होतेच… पाऊस सुरु आहे आणि त्यातून न भिजता पळत जाणे शक्य असते? मेजर साहेबांना अगदी समोरून, छातीवर गोळ्या लागल्या… शत्रूच्या खंदकातून आलेल्या! तशाही दुस-या बंकरच्या अगदी वीस एक मीटर अंतरावर ते पोहोचले होते… सहकारी सैनिकांनी त्यांना तिथून सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला… त्यांनी नकार दिला! गोळीबार करीत ते त्या खंदकात झेपावले… दोघा शत्रूंना हातांनी लोळवले आणि यमसदनी धाडले

१. ३० वाजता ठाकूर साहेबांनी रेडीओ सेटवर संपर्क साधला… यावेळी रेडीओ ऑपरेटर लान्स नायक राजेंद्र यादव म्हणाले… ”अधिकारी साहेब बंकर मध्ये घुसलेत आणि त्यांची शत्रूशी जोरदार लढाई सुरु आहे… हातांनी… समोरासमोर! आणि दुस-याच क्षणी रेडीओ ऑपरेटरच्या तोंडून शब्द बाहेर पडले… ”ओह! मां!” हाच तो क्षण होता… ब्रिगेडीअर साहेबांना समजायला वेळ लागला नाही… वाघ गमावला आपण! 

अधिकारी साहेबांच्या छातीवरच्या खिशातील कागदी लिफाफा रक्ताने भिजून गेला होता… पत्रातील अक्षरं लाल झाली असतील! 

तेरा दिवस मेजर साहेबांचा देह तिथून आपल्याला ताब्यात नाही घेता आला. कारण तोलोलिंगवरून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु राहिला. पण अधिकारी साहेबांनी ताब्यात घेतलेल्या बंकर्समुळे तिथे नंतर पोहोचलेल्या भारतीय सैनिकांना पाय ठेवण्याची जागा मिळाली होती… ही जागा ताब्यात आली होती… हा पहिलं मोठं यश होतं!

१४ जून, १९९९… मेजर राजेशसिंग अधिकारी… तिरंगी राष्ट्रध्वज पांघरून घरी आले! खरं तर त्यांना लढाईला निघण्याच्या वेळी satellite phone वरून पत्नी सौ. किरण नेगी-अधिकारी यांच्याशी बोलता आले असते… पण त्यांनी त्यांच्या इतर सैनिकांना आधी त्यांच्या त्यांच्या घरी call करू दिले… आणि यांना बोलायचे होते तेंव्हा phone battery उतरली होती! 

देह घेऊन घरी आलेल्या अधिका-यांनी मेजर राजेश अधिकारी साहेबांचा गणवेश आणि ते पत्र किरण यांच्या हाती दिलं… ! न वाचलं गेलेलं पत्र!… त्यातील प्रत्येक अक्षराला मेजर साहेबांच्या रक्ताचा लालिमा लागलेला होता! जणू सुवासिनीच्या कपाळावरचं लालभडक कुंकू!

किरण यांनी स्वत:च लिहिलेल्या ओळी… भरलेल्या डोळ्यांनी पुन्हा कशाबशा वाचल्या… ”प्रिय राजेश… आपलं होणारं बाळ मुलगा असेल की मुलगी… ठाऊक नाही! तुम्ही परत सहीसलामत येऊ शकलात लढाईतून तर माझ्यासारखी आनंदी मीच असेन या जगात… पण तसं नाहीच झालं तर… एका हुतात्मा सैनिकाची पत्नी म्हणून मी अभिमानाने जगेन. आणि एक सांगू… आपल्या बाळाला केवळ कारगिल दाखवणार नाही… त्याला तुमच्या सारखं भारतीय फौजेचा अधिकारी बनवून दाखवेन… शब्द देते! या परत… वाट पाहते!

एक सैनिक गमावला जातो तेंव्हा एक पुत्र, एक पती, एक पिता, एक भाऊ, एक मित्र गमवला जातो… आणि मेजर राजेश सिंग अधिकारी यांच्यासारखा सैनिक गमावला जातो तेंव्हा एक शूर सैनिक, एक दिलदार माणूस, गोड गळ्याचा एक गायक, एक उत्तम चित्रकारही कायमचा दृष्टीआड होऊन जातो! ही एवढी मोठी किंमत मोजतात सैनिक आपल्या रक्षणार्थ! 

कै. मेजर राजेशसिंग अधिकारी यांच्या सारख्या ‘महावीर’ शूरांना ‘मोक्ष’ मिळण्याचा अधिकार आहेच! 

जय हिंद.!! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted