प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सहजीवनाचं दैवत्व…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

तिच्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन होतं, त्याच्या खांद्यावर वीणा होती. दोघांच्याही पायात चप्पल नव्हती. पण…

त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं, ते आज लाखोंच्या गाड्यांतून फिरणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरही क्वचितच दिसतं…

मी त्यांच्या मागे बराच वेळ चालत होतो…

 त्यांनी एकदाही तिचा हात हातात घेतला नाही, एकदाही त्यांनी त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन केलं नाही, एकदाही कुठली अतिशयोक्ती नव्हती…

पण प्रत्येक पावलागणिक त्यांचं प्रेम बोलत होत.

तो वृद्ध वारकरी चार पावलं पुढे जाई? 

 अचानक मागे वळून पाही ती येतेय ना…

हे पाहण्यासाठी.

 तीही काही बोलत नव्हती. फक्त त्यांच्या मागे वळून पाहण्यावर हलकंसं हसायची. बस्स… इतकंच.

दुपार झाली…

दिंडी एका ठिकाणी विसावली…

 सगळे आपापल्या शिदोऱ्या सोडू लागले…

तिने जुन्या कापडात बांधलेली भाकरी काढली. मिरचीचा ठेचा आणि भाकरी…

ती म्हणाली…

 “आधी तुम्ही तुकडा मोडा”

तो म्हणाला…

 नको गं… तू आधी घे,

दोन मिनिटं दोघेही एकमेकांनाच आग्रह करत राहिले…

शेवटी…

 तिने भाकरीचा तुकडा मोडून त्याच्या हातात ठेवला, आणि स्वतःचा घास नंतर घेतला.

 त्या क्षणी मला जाणवलं… आजची पिढी प्रेम व्यक्त करण्यासाठी महागड्या हॉटेलला जाते,

 कितीतरी मोठं सेलिब्रेशन करते,

 तरी अखेर असमाधानीच…

 

आणि ही पिढी..

 अर्ध्या भाकरीतही एकमेकांना पूर्ण आयुष्य देऊन टाकते…

सायंकाळी मुक्काम झाला…

 तिने मुक्कामाच्या अलीकडे नदीवर जाऊन त्याचं धोतर धुतलं…

हात थरथरत होते.

कंबर वाकली होती.

डोळ्यांना नीट दिसत नव्हतं.

तरी…

 तिने धोतरावर एकही डाग राहू दिला नाही…

तो दूर बसून तिच्याकडे पाहत होता… कोणी पाहू नये म्हणून.

 त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं…

 कारण तिच्या हातात आता ताकद नव्हती,

 पण त्याच्यासाठीची माया अजून तरुण होती,

वीणा वाजवत तो गुणगुणू लागला…

 ‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना,

 केल्या विठुरायाला हो संसार पेलनाss’

रात्री झोपताना त्याने आधी तिच्या अंथरुणाखालचे दगड काढले,

 ती म्हणाली काय करता?

तो हसला…

“झोपताना पाठ दुखेल”

इतकंच… ते वाक्य छोटं होतं,

 पण त्यात 55 वर्षाचा संसार दडला होता…

आज प्रेमाचा अर्थ बदलला आहे,

 लोक म्हणतात मला माझी स्पेस हवी,

त्या दोघांनी मात्र आयुष्यभर एकमेकांना जागा दिली,

 पण अंतर कधी दिलं नाही…

आज लग्नाच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर शंभर फोटो टाकले जातात… ,

 यांनी कधी एक फोटोही काढला नाही,

कारण त्यांच्या आठवणी कॅमेऱ्यात नव्हत्या.

 त्या एकमेकांच्या डोळ्यात आणि हृदयात जपलेल्या होत्या…

आजची पिढी प्रेम सिद्ध करण्यासाठी भेटवस्तू देते, त्या देण्यात काही गैर नाही,

पण ती तिथे चुकते जिथे ते एकमेकांना न पेलणारे वचन देते,

 या जुन्या पिढीने एकमेकांना तारुण्य दिल, श्रम दिले, त्याग दिला, संयम दिला आणि शेवटी म्हातारपणातही एकनिष्ठेने साथ दिली…

वारकरी दिंडीतली ती म्हातारी जोडी पाहिली की वाटतं…

 प्रेमाचा सर्वात मोठा आवाज हा कधीच शब्दांत नसतो,

 तो आयुष्यभर निभावलेल्या जबाबदाऱ्यांच्या शांततेत असतो…

ती आजही त्याच्या मागून चालते,

 कारण पुढे जाण्याची तिची इच्छा नसते,

आणि तो आजही अधून मधून मागे वळून पाहतो, कारण तिला मागे सोडण्याची त्याची हिंमत नसते…

 त्यांनी एकमेकांना कधी गुलाब दिला नाही,

 पण आयुष्यभर एकमेकांच्या वाटेवरचे काटे वेचत राहिले…

 त्यांच्या संसारात आय लव यूनव्हतं,

‘पण तुम्ही आधी घास घ्या’..

 हेच त्यांचे सर्वात मोठं प्रेम पत्र होतं…

 आजकाल प्रेमाचा शेवट लग्नात होतो,

 आणि त्यांचं प्रेम तर लग्नानंतरच सुरू झालं होतं…

सुरकुत्या चेहऱ्यावर पडल्या,

 पण नात्यावर नाहीत,

देह थकला…

 पण एकमेकांची काळजी करण्याची सवय कधी म्हातारी झाली नाही…

ती वारकरी जोडी दिंडीत विरून गेली…

मी बराच वेळ त्यांच्याकडे पाहत राहिलो,

 क्षणभर वाटलं…

पंढरपुराकडे चालणारे ते दोन वारकरी नव्हतेच,

 

तो विठ्ठल होता…

ती रखुमाई होती..

कारण देव असाच असतो..

तो आयुष्यभर एकमेकांच मन राखणाऱ्या नात्यात असतो…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted