श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १३३ आणि १३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. १३३ – – –
हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी ।
जेणें मानसी स्थापिले निश्चयासी ।
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे ।
तया भाषणे नष्ट संदेह मोडे ।।१३३।।
अर्थ : परमेश्वरावर दृढ भक्ती असणारा, वृत्तीने विरक्त असलेला, ज्याच्याजवळ (अध्यात्म)ज्ञानाचा विपुल साठा आहे आणि ज्याने निश्चयपूर्वक स्वस्वरूपावर आपली दृष्टी स्थिर केली आहे, अशा सत्पुरुषाचे दर्शन घेतले असता किंवा त्याचा स्पर्श लाभला तरी आपले पुण्य वाढते. त्याच्या बोलण्याने (उपदेशाने) आपल्या मनातील वाईट शंका किंवा संशयाचे निवारण होते.
(विरक्त – ऐहिक सुखांची आसक्ती नसलेला, विज्ञानरासी – ज्ञानाचे भांडार असणारा, नष्ट – नुकसानकारक/वाईट, संदेह – संशय/शंका, मोडे – नष्ट होतो)
विवेचन : खरा संत किंवा सत्पुरुष कसा असतो त्याची लक्षणे समर्थांनी या श्लोकात सांगितली आहेत. आजच्या काळात भोंदू बुवा, बाबांचा बाजार भरलेला आपल्याला दिसतो. अशा वेळी खरा साधू पुरुष कोण हे आपल्याला या श्लोकावरून सहज लक्षात येऊ शकते. संत किंवा साधू म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. दाढी आणि जटा वाढलेला, भगवे कपडे घातलेला, कपाळावर टिळा किंवा भस्माचे पट्टे ओढलेला, गळ्यामध्ये, हातामध्ये रुद्राक्षांच्या माळा या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण ही सगळी बाह्य लक्षणे झाली. खरा सत्पुरुष या लक्षणांशिवाय देखील आढळू शकतो.
मग सत्पुरुष होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे? तर सगळयात आधी त्याचे पहिले लक्षण म्हणजे ती व्यक्ती हरिभक्त असावी. भक्तीचा बाह्य देखावा करणे आणि अंतर्बाह्य परमेश्वराचेच होऊन राहणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जो हरिभक्त असतो, त्याचे भगवंतावर उत्कट प्रेम असते. लोकांसाठी तो त्याचे प्रदर्शन मांडत नाही. अशा सत्पुरुषाचे दुसरे लक्षण म्हणजे तो विरक्त असतो. तो चारचौघांसारखा संसारात दिसेल पण त्यात असूनही त्यापासून तो अलिप्त असतो. ज्याप्रमाणे कमळ पाण्यात असते, पण पाण्यापासून, चिखलापासून ते अलिप्त असते. अशीच या संतांची वृत्ती असते. एखादी गोष्ट मिळाली काय आणि नाही मिळाली काय त्यांना त्यामुळे फरक पडत नाही. ते सदैव आनंदी असतात. कारण ‘ ठेविले अनंते तैसे राहावे ‘ अशी त्यांची वृत्ती असते.
अशा सत्पुरुषाचे तिसरे लक्षण म्हणजे त्याच्याजवळ अनुभूतीतून आलेल्या ज्ञानाचा अपार साठा असतो. अर्थात हे ज्ञान म्हणजे प्रामुख्याने अध्यात्मिक ज्ञान. कारण ज्ञान या शब्दाचा जो व्यावहारिक अर्थ आपण इथे घेतो, तो इथे लागू होत नाही. अशी व्यक्ती कदाचित उच्च शिक्षित असेल किंवा नसेलही. परंतु भगवंताबद्दलचे, त्याच्या अस्तित्वाबद्दलचे ज्ञान त्याच्याकडे आत्मानुभूतीतून आलेले असते. भगवंताबद्दलचे आपले ज्ञान आणि अशा सत्पुरुषांचे ज्ञान यात एक मूलभूत असा फरक असतो. त्यांना असणारे ज्ञान आपल्यालाही असू शकते. पण आपले ज्ञान कोरडे असते. त्याला अनुभवाची आणि भक्तीची जोड नसते. आपले लक्ष बाह्य गोष्टींकडे जास्त असते पण अशा साधुपुरुषांचे लक्ष अंतर्यामी वळलेले असते. त्यांची भक्ती ही निश्चयपूर्वक दृढ झालेली असते. त्यांचे ज्ञान आत्मसाक्षात्कारातून आलेले असते. कोणी काही विपरीत सांगितले तरी ते विचलित होत नाहीत. आपल्या मार्गावरून ढळत नाहीत. ‘ निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ. ‘ म्हणून त्यांच्या ज्ञानाला महत्त्व आहे. त्यांच्या सहवासाला महत्त्व आहे.
अशा व्यक्तींचा केवळ सहवास लाभला तरी त्यांच्या वागण्याबोलण्यातून ही गोष्ट लक्षात येऊ शकते. परंतु आजकाल अशी व्यक्ती भेटणे कठीण. भेटली तर तिच्यावर विश्वास बसणे कठीण. त्यांचा सहवास लाभणे ही तर त्याहून पुढची गोष्ट. परंतु सुदैवाने अशी व्यक्ती भेटली तरी केवळ तिच्या दर्शनाने आपले मन प्रसन्न होते. कारण तिच्याभोवती भगवंताच्या कृपेचे आणि तपश्चर्येचे जे वलय असते, त्या लहरींचा सकारात्मक परिणाम आपल्यावरही होतो. त्यांच्या केवळ काही वाक्यांनी किंवा उपदेशाच्या चार शब्दांनी आपल्या मनातील सर्व बऱ्यावाईट शंका दूर होतात. त्यांचा स्पर्श देखील अत्यंत लाभदायक असतो. अशा व्यक्तीने आपल्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला किंवा त्यांच्या स्पर्शाचा लाभ कोणत्याही प्रकारे झाला तरी तो पुण्यप्रद असतो. त्यांच्या तप:सामर्थ्याचा काही अंश त्यातून आपल्याकडे प्रवाहित होतो. म्हणूनच साधू संतांच्या किंवा ज्येष्ठ व्यक्तींच्या पायावर डोके ठेवून आपण त्यांचे आशीर्वाद घेतो. अशा सत्पुरुषांना भेटण्याची संधी मिळत असेल तर कोणत्याही कारणाने ती दवडू नये.
स्वसंवाद
१. मी संतांची किंवा मार्गदर्शकांची निवड करताना केवळ त्यांच्या बाह्य वेशावर भुलतो, की त्यांच्या आचारातील विरक्ती आणि विचारांतील अध्यात्मिक ज्ञान पाहतो?
२. माझ्याजवळ असलेले ज्ञान केवळ ‘कोरडे’ (पुस्तकी) आहे, की मी ते ज्ञानेश्वरी किंवा दासबोधातील विचारांचा प्रत्यक्ष ‘अनुभव’ घेऊन माझ्या आचरणात आणले आहे?
३. ‘कमळाप्रमाणे’ संसारात राहूनही त्यातील ऐहिक मोहापासून अलिप्त राहण्याची आणि ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ अशी समाधानी वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न मी करतो का?
४. संतांच्या वाचनातून किंवा सहवासातून मिळणाऱ्या विचारांनी माझ्या मनातील नको त्या शंका-कुशंका (संदेह) दूर होऊन माझा देवावरील आणि चांगुलपणावरील विश्वास दृढ होतो का?
—–
श्लोक क्र. १३४ – – –
नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ।
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।
यही लक्षणी जाणिजे योगिराणा ।।१३४।।
अर्थ : जो अहंकार रहित असतो, वृत्तीने नेहमी अनासक्त असतो, क्षमा आणि शांती या गुणांचा उपभोग घेतो, ज्याचे अंतःकरण सदैव करुणेने भरलेले असते, जो नेहमी आपल्या कर्तव्यात दक्ष असतो, ज्याच्या मनात लोभ, संताप यांना स्थान नसते आणि जो दीनवाणा असत नाही – अशा व्यक्तीला योगियांचा राणा समजावे.
(वितरागी – अनासक्त, दैन्यवाणा – दुर्बल/लाचार, राणा – राजा)
विवेचन : साधू पुरुषाची लक्षणे स्पष्ट करणारा हा दुसरा श्लोक. आधीच्या श्लोकातही समर्थांनी सांगितलेली सत्पुरुषाची काही लक्षणे आपण पाहिली. या श्लोकातही ते साधुपुरुषाच्या खुणा सांगत आहेत. आधीच्या श्लोकात केवळ बाह्य लक्षणांवरून साधू किंवा सत्पुरुष ओळखता येत नाही हे आपण पाहिले. साधू किंवा सत्पुरुष ओळखण्यासाठी समर्थांनी सांगितलेल्या लक्षणांचाच वापर करावा लागतो.
सत्पुरुषाचे पहिले लक्षण समर्थ सांगतात ते म्हणजे तो अहंकार रहित असतो. अहंकार हा परमार्थातील प्रगतीच्या आड येणारा सर्वात मोठा दुर्गुण. ज्याला आपल्या ज्ञानाचा गर्व असतो, त्याच्याजवळ अहंकाराचा दर्प येतो. त्याचप्रमाणे ज्यांना काही स्वार्थ साधून घ्यायचा असतो, ते आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करून वाहवा मिळवतात. इथे साधू पुरुषाचे दुसरे लक्षण समर्थ सांगतात. ते म्हणजे तो वितरागी म्हणजे अनासक्त असतो. त्याला भगवंताखेरीज अन्य काहीही नको असते. तो सदैव तृप्त असतो. परमेश्वर हा आनंदस्वरूप आहे. सदैव अंतरातील भगवंताशी एकरूप झाल्याने तो कायमच आनंदी असतो. कोणतीही गोष्ट त्याला दुःखी करू शकत नाही.
या श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत साधुपुरुषाचे आणखी एक लक्षण समर्थांनी सांगितले आहे. तो क्षमा आणि शांती या गुणांनी परिपूर्ण असतो. त्याच्या अंतःकरणात दया किंवा करुणा सदैव वास करीत असते. ‘ दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती ‘असे आपण म्हणतो. असे साधुपुरुष म्हणजे चालतेबोलते देव असतात. दया, क्षमा आणि शांती हे दैवी गुण त्यांच्या अंतरात वास करीत असतात. व्यावहारिक जगातील सज्जन माणसाची दया, क्षमा किंवा शांती आणि संतांजवळचे हे गुण यामध्ये काही एक फरक अवश्य असतो. सामान्य माणसाची दया, क्षमा ही बऱ्याच वेळा आपल्या संबंधितांपुरती मर्यादित असते. परंतु संतांजवळील हे गुण परमेश्वरावरील प्रेमामुळे आलेले असतात. ‘ जे जे भेटते भूत, ते ते मानिजे भगवंत ‘ अशी त्यांची वृत्ती असते. त्यामुळे आपला आणि परका असा भेद त्यांच्याजवळ नसतो. एकनाथ महाराजांनी अभिषेकासाठी आणलेली गंगेच्या पाण्याची कावड तृषार्त आणि तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात ओतली. त्याच्यातही त्यांना परमेश्वराचे रूप दिसले. नामदेव महाराज कडक झालेली पोळी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावले. का तर ती शिळी पोळी खाऊन त्याचे पोट दुखेल म्हणून. म्हणूनच ‘ संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळू ‘ असे म्हटले जाते.
क्षमा आणि शांती या गुणांचा सत्पुरुष उपभोग घेतो असे समर्थांनी म्हटले आहे. याचा अर्थ असा की हे त्यांचे अंगभूत गुण असतात. त्याचा आनंद ते घेतात. सामान्य माणूस मात्र बऱ्याच वेळा नाईलाजाने क्षमा आणि शांती यांचा वापर करतो. पण बऱ्याच वेळा तो आतून चरफडत असतो. इथे संत पुरुषाचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण समर्थ सांगतात. ते म्हणजे तो सदैव दक्ष असतो. ‘अखंड सावधानता ‘ हा समर्थांनीच सांगितलेला गुण त्याच्या ठायी वास करीत असतो. साधारणपणे साधू पुरुष म्हणजे साधा भोळा, व्यवहार न समजणारा असं आपण समजतो. पण खरा सत्पुरुष नेहमीच आपल्या कर्तव्यात दक्ष असतो. कोणीही यावे आणि फसवून जावे इतपत भोळा किंवा मूर्ख तो नसतो किंवा नसावा.
संतांजवळ वितरागी म्हणजे अनासक्त वृत्ती असते. ऐहिक गोष्टी सोने, नाणे इत्यादींचे मूल्य त्यांच्या दृष्टीने मृत्तिके समान असते. याच वृत्तीमुळे ‘ काय उणे आम्हा विठोबाचे पायी ‘असे संत म्हणू शकतात. संत तुकारामांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जो नजराणा पाठवला होता तो तुकाराम महाराजांनी परत केला. कारण अनासक्त वृत्ती. संतांचा आणखी एक गुण म्हणजे त्यांच्याजवळ दैन्य किंवा लाचारी कधीच नसते. भगवंताच्या नित्य स्मरणात राहिल्यामुळे एक प्रकारची अनोखी मस्ती त्यांच्यामध्ये भरून राहिलेली असते. दया, क्षमा आणि शांती या अलंकारांनी ते शोभून दिसतात. असा भक्त समर्थांनी म्हटल्याप्रमाणे योगियांचा राणा समजावा.
इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे क्षमा, शांती हे गुण व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर शोभून दिसतात. परंतु जेव्हा राष्ट्राचा विचार येतो तेव्हा जशास तसे उत्तर द्यावे लागते. समर्थांच्याच भाषेत सांगायचे तर ‘ धटासी व्हावे धट, उद्धटासी व्हावे उद्धट. ‘ तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, ‘ भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. ‘ आपण करतो मात्र बऱ्याच वेळा उलट. वैयक्तिक पातळीवर आपण भयंकर स्वाभिमानी वगैरे असतो, शीघ्रकोपी असतो पण जेव्हा राष्ट्रावर संकट येते तेव्हा बऱ्याचदा आपण सहनशील असतो. प्रतिकार करीत नाही. या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. आपल्या सहनशीलतेमुळे आपल्या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली. आक्रमकांनी मंदिरे लुटली, मुर्त्या फोडल्या, स्त्रियांवर अत्याचार केले. देश पारतंत्र्यात गेला. देशाची शकले पडली. कुठे अन्नात, दुधात भेसळ झाली, भ्रष्टाचार झाला, अन्याय अत्याचार झाला तरी मला काय त्याचे? माझ्यापर्यंत तर ती गोष्ट आली नाही ना असे म्हणून आपण शांत बसतो. म्हणूनच समर्थांच्या सांगण्यानुसार दया, क्षमा आणि शांती हे गुण जरूर अंगी असावेत. सत्पुरुषांजवळ ते असतातच. पण जेव्हा समाज आणि राष्ट्राचा विचार येतो तेव्हा शास्त्र सोडून शस्त्रच हाती घ्यायला हवे.
स्वसंवाद
१. माझ्या अंगी असलेल्या क्षमा आणि शांती या गुणांचा मी खरोखर आनंदाने उपभोग घेतो, की नाईलाजाने सहन करून आतल्या आत चरफडत राहतो?
२. संत एकनाथ आणि नामदेव महाराजांप्रमाणे, ‘जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत’ ही ईश्वरी प्रेमाची भावना मी माझ्या दैनंदिन व्यवहारात थोडी तरी जपू शकतो का?
३. मी स्वतःला भोळा समजून व्यवहारात फसवणूक करून घेतो, की समर्थांनी सांगितल्याप्रमाणे कर्तव्यात आणि व्यवहारात ‘अखंड सावध’ राहतो?
४. वैयक्तिक आयुष्यात क्षमाशील राहतानाच, समाज आणि राष्ट्रावर अन्याय किंवा संकट येते तेव्हा मी गप्प न बसता अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य दाखवतो का?
– क्रमशः श्लोक १३३ आणि १३४
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







