उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तीन अनुवादित लघुकथा – मी नक्की येईन / आत्मविश्वास / खेळणे “ हिन्दी लेखक : श्री महेश राजा ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆
☆☆☆☆
१) मी नक्की येईन माझ्या बाळांनो!
मुलांच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस होता. मुले खूश होती. उद्यापासून दिवाळीची सुट्टी लागणार होती. दु:खी होती ती शाळेतली आया. ती एका कोपर्यात बसून मुलांना खेळताना बघत होती. उद्यापासून शाळा उजाड वाटणार होती.
तिचे कोणी नातेवाईक, संबंधित नव्हते, असा काही नव्हतं. तिला दोन मुले होती. ती वेगवेगळ्या शहरात आपापल्या पत्नी-मुलांबरोबर रहात होती. जेव्हा, त्यांना पैशाची काही अडचण यायची, तेव्हा, त्यांना आईची आठवण यायची. नाही तर कधी सणावारीदेखील आईला कधी बोलावले नव्हते. पतीचा मृत्यूनंतर, तिने मेहनत-मजुरी करून मुलांना शिकवले. छोटी-मोठी नोकरी शोधून, त्यांची समान परिवारातील मुलींशी लग्ने करून दिली. सगळ्यांना ती खुश बघू इच्छित होती. तिची कुणाहीबद्दल कसलीच तक्रार नव्हती. तिला माहीत होतं, आज-कालचे दिवस असे आहेत. सुना सासूच्याजवळ राहू इच्छित नाहीत. घरोघरी हीच परिस्थिती आहे. आपल्या नशिबाचा दोष मानून, ती शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत आयाची नोकरी करत होती. शाळेतील मुलांवर ती खूप प्रेम करत असे. त्या मुलामध्ये, ती आपलं मन रमवत असे. कधी तिला आपल्या नातवंडांची आठवण येत असे. आपण त्यांना आपल्या मांडीवर बसवून कधी नीट भरवू शकलो नाही या विचाराने, ती दु:खी होत असे. या शाळेतल्या मुलांनाच ती आपली मुले मानून खूश रहात असे.
एवढ्यात, एका मुलाच्या रडण्याच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. तिने त्या मुलाला मांडीवर बसवले आणि त्याला गप्प करण्याचा ती प्रयत्न करू लागली. सगळ्या मुलांना ती खूप आवडत असे. ती सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून गेली होती. तिला आता रडू येऊ लागले होते. दिवसभर मुलांची देखभाल, त्यांचे खाणे -पिणे, साफ-सफाई यात तिचं मन रमायचं. आता उद्यापासून काय करणार? हा विचार तिला सतावत होता. मॅडमने हाक मारली. सुट्टीची वेळ झाली. मुलांकडे भरलेल्या नजरेने बघत ती बेल वाजवायला निघून गेली. तिच्या डोळ्यातून अविरत अश्रूधारा वहात होत्या. मॅडमने तिच्या मनातील भाव समजून, तिच्या ख्ंद्यावर हात ठेवून तिला सांत्वना दिली. गेट उघडून ती लक्ष ठेवत होती. कुणाची रिक्षा अजून आली नाही. इतक्यात बघता बघता मुलांनी तिला घेरलं. त्यांच्या हातात एक पॅकेट होतं. सगळी मुले एका स्वरात ओरडली, ; बाई, यावेळी दिवाळीसाठी तू आमच्याच घरी ये. आम्ही आमच्या मम्मी –पापांना विचारलय! तिने सगळ्या मुलांना आपल्या ममतामयी बाहुंनी विळखा घातला. भरल्या आवाजात ती म्हणाली, येईन बाळांनो. जरूर येईन! तिचा गळा दाटून आला. मुले जिद्द करू लागली. नाही. आत्ताच चल आमच्या बरोबर! तिने मुलांना समजवलं, शाळेची साफ-सफाई, राखण करणं, याची जबाबदारी तिच्यावर आहे. वेळ काढून एकेकाकडे, अशी ती सगळ्यांकडे जाईल.
मुलांनी तिच्याकडून प्रॉमीस घेतले. सगळ्यात छोट्या असलेल्या सिद्धीने तिच्या हातात पॅकेट दिले. ती म्हणाली, हे काय आहे बाळांनो?
यावेळी सहावीच्या वर्गातला विकी म्हणाला, ही साडी आहे. आम्ही सगळ्यांनी आमच्या पॉकेट मनीतून पैसे वाचवून ही साडी तुझ्यासाठी घेतली.
नको. मी कशी ही घेऊ?
नाही म्हणू नको हं! आम्हाला वाईट वाटेल!
मॅडम म्हणाल्या, बाई, घे! मुलांनी इतक्या प्रेमाने आणलीय!
तिने सगळ्या मुलांच्या गालाचा एकेक पापा घेतला.
बाई, तू घरी आली नाहीस, तर मी फटाके नाही उडवणार! विशू म्हणाली.
बाई, मी फराळाच करणार नाही.. मदन म्हणाला.
नाही. नाही. बाळांनो, मी नक्की येईन. आत्यंतिक खुशीने ओघळणारे अश्रू, तिने तसेच ओघळू दिले.
सगळी मुले निघून गेली.
गेटपाशी उभी असलेल्या तिला, दूर उडणार्या धुळीकडे ती बघत राहिली.
…. जीवनात आज तिला प्रथमच वाटले, ती एकटी नाही आहे.
मूळ कथा – मैं जरूर आऊंगी मेरे बच्चोँ!, मूळ लेखक – महेश राजा
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454,
☆☆☆☆
२) आत्मविश्वास – –
जानकीदेवींनी एकदा आपल्या सार्या घराचे निरीक्षण केलं. सगळं काही ठाक-ठीक आहे न? तिची सहयोगी आशा पूर्ण निष्ठेने घर सजवण्याच्या कामात गुंतलेली होती. तिचा मुलगा राजेश आपल्या पत्नीला घेऊन आपल्या कामाच्या ठिकाणी गेला होता. मुलगी रीना आपल्या सासरी सुखात आहे. जानकीदेवींनी अन्य नोकरांना आवश्यक त्या सूचना दिल्या. आता ती देवघरात आली. आपल्या इष्ट देवतांना नमस्कार करून, आपल्या पतीच्या फोटोपूढे उभी राहिली. तस्बिरीतून एक तेजस्वी किरण फुटतोय, असा तिला वाटलं.
पदर डोक्यावर ठेवत ती हळुवारपणे म्हणाली, ‘आहो, बघा ना, मी माझी सारी कर्तव्ये पार पाडलीत. मुलीचा विवाह एका कुलीन परिवारात केला. मुलगा आणि सून डॉक्टर आहेत. तुम्ही दोघांना माझ्या झोळीत टाकून, लवकर निघून गेलात आणि सगळी जबाबदारी माझ्यावर टाकलीत. तुमचा माझ्यावर विश्वास होता. तो मी कायम ठेवला. सगळं चांगल्या तर्हेने निभावलं. ’
थोडं थांबून डोळ्यात उतरलेलं पाणी पदराने पुसलं. मग म्हणाली, ‘आता मला परवानगी द्या. आता मी माझं पुढचं जीवन समाजसेवेत आणि गरीब मुलांना शिकवण्यात व्यतीत करू इच्छिते. मला आशा आहे, तुमचा विरोध असणार नाही. आजपासूनच मी आपलं हे निवासस्थान, हर्षध्वनी आश्रमाच्या रूपात बदलते आहे.
तुम्हाला प्रणाम करून, तुमचा आशीर्वाद घेऊनच, हे शुभ काम मी करू इच्छिते. मला परवानगी द्या! ’
– – ती हात जोडून मूक उभी राहिली. तिला वाटलं, पतीची तसबीर हसते आहे.
मूळ हिंदी कथा – स्वयं पर विश्वास, मूळ लेखक – महेश राजा
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454
☆☆☆☆
३) खेळणे – –
दोन दिवसांनंतर आज वातावरण स्वच्छ होतं. मध्यंतरी खूप पाऊस पडत होता. आज ऊन पडण्याची लक्षणे दिसू लागले होती. अंश आज आपल्या आजोबांबरोबर किलकारी गार्डनमध्ये आला होता. शहराच्या मधोमध असलेला हा बगीचा मुलांच्या दृष्टीने फिरण्यासाठी अतिशय आकर्षक जागा होती. बागेत झोपाळे, घसरगुंड्या आणि व्यायाम करण्याची अनेक उपकरणे लावलेली होती. बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली होती. किलकारीच्या एका बाजूला फळे, ज्यूस इ. च्या हातगाड्या लागल्या होत्या. दुसर्या
बाजूला एक हलकी चटई हांतरून एक बाई, आपल्या लहान मुलाला घेऊन मुलांसाठी मातीची अनेक आकर्षक खेळणी घेऊन, गिर्हाईकांची वाट बघत बसली होती. तिचा छोटा मुलगा पुन्हा पुन्हा त्या खेळण्यासाठी हट्ट करत होता. तो सारखा एखादं खेळणं उचलून घेत होता. त्याची आई, त्याच्या हातातून ते काढून घेत होती.. खेळणं घेण्याची मनाई करत होती.
अंश वारंवार हे दृश्य बघत होता. तो आपल्या आजोबांना म्हणाला, ‘ आजोबा, त्या मुलाची मम्मी त्याला खेळणं का घेऊ देत नाही? ’
आजोबा त्याला समजावत म्हणाले, ‘ती गरीब आहे. त्यांच्या घरी खाण्यासाठी काही नाही. जेव्हा तिची खेळणी विकली जातील, तेव्हा त्यांच्या घराची चूल पेटेल.
अंशने पुहा विचारले, ‘आजोबा, त्यांच्याकडे खायला का नाही? आपल्या घरी तर आहे. आपण घरून रोटी आणून या महिलेला आणून देऊ या. ’
आपल्या नातवाचे हे निरागस बोलणे, ऐकल्यावर आजोबा हसू लागले. लाडाने त्यांनी याला मिठीत घेतलं. ‘चल! त्या महिलेकडून खेळणं घेऊ या. ’
अंश खूश झाला. तो त्या जागी गेला व दोन चांगली खेळणी त्याने उचलली आणि आजोबांकडे पाहिलं. आजोबांनी होकार भरला.
अंशने एक खेळणं त्या छोट्या मुलाला दिलं. ती महिला ‘नको… नको.. ’ म्हणत होती.
आजोबांनी दोन्ही खेळण्यांचे पैसे तिला दिले. तेव्हा ती आश्वस्त झाली. तो मुलगा खेळणं मिळाल्याने खुश झाला. तो खेळण्याशी खेळू लागला.
अंशने आपल्या बॅगेतून काही फळे काढली आणि त्या मुलाला दिली. मुलाची आई त्यांच्यापुढे हात जोडत राहिली.
आता आजोबा-नातवाची जोडी हातात हात घालून आपल्या घराकडे खुशी-खुशीने परत चालले होते.
– – आकाश निरभ्र होतं. त्यातून सूर्यदेवता हसत होती.
मूळ हिन्दी कथा – खिलौना, मूळ लेखक – महेश राजा
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454,
☆☆☆☆
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





