श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जाणीव… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(“मला कुणी समजूनच घेत नाही” नयना संतापून रडायला लागली “ती आई तशीच आणि तुम्हीही तसेच. सारखे मागे लागतात. मनासारखं काही करुच देत नाहीत” रागारागाने ती उठली आणि तिच्या रुमकडे निघून गेली.) 

इथून पुढे – –  

“अशीच करते ही आजकाल. थोडंसं काही बोललं की लगेच रडायला लागते. तिच्याशी कसं वागावं तेच कळेनासं झालंय ” माधवी हताश होऊन म्हणाली.

” साहजिकच आहे माधवी. सध्या तिला डिप्रेशन आलंय. तिच्या बहुतेक मैत्रिणी नोकरीला लागल्यात. ज्यांना लागल्या नाहीत त्यांची लग्नं होऊन गेलीत. ही एकटीच अशी घरात रिकामी बसलीये. जिच्याजवळ भावना मोकळ्या करता येऊ शकतील अशी कुणी व्यक्तीच सध्या उरलेली नाहिये. साहजिकच तिला डिप्रेशन येणार. एकट्या मुलांचा हाच प्राॅब्लेम असतो. ती लवकर डिप्रेशनमध्ये जातात. याकरिता कमीतकमी दोन मुलं तरी हवीत “

” हो. नाही झालं आपल्याला दुसरं मुल. काय करणार. पण ही ही गोष्ट खरी की तिच्या डिप्रेशनला तीच स्वतः जबाबदार आहे. तिच्या अपेक्षा तर खुप आहेत पण तिला स्वतःला काहिच करायला नको असतं “

” हो. तेही खरंच. पण ते ती ॲक्सेप्ट करत नाहीये. याच्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे तिचं लवकरात लवकर लग्न लावून देणं “

” ठिक आहे. सुरुवात केलीच आहे आपण स्थळं बघायला”

दोनच दिवसांनी रोजचा पेपर वाचतांना एल. आय. सी. च्या व्हेकंसीजची जाहिरात विनायकच्या पहाण्यात आली. त्यानं नयनाला हाक मारुन बोलावलं

” तू आजचा पेपर वाचलास? “त्यानं विचारलं

” नाही. मी पेपर वाचत नाही “

” का? का पेपर वाचत नाहीस? कमीतकमी नोकरीच्या जाहिरातीसाठी तर वाचत जा “

” अहो बाबा इतके जाॅब पोर्टल आहेत. त्याच्यावर हजारोंनी जाहिराती येत असतात. त्याच्यासाठी पेपर वाचायची काय गरज आहे? “

” मग एल. आय. सी. ची जाहिरात वाचलीच असशील तू?  “

” वाचली असेल. शक्यता आहे. पण त्यांनी कंप्युटर इंजीनियर कुठे मागितलेत? ” जाहिरात बघत ती म्हणाली

” पण त्यांना कोणतेही ग्रॅज्युएटस् चालणार आहेत “

” बाबा मी कारकून बनून काय करु? मागेही तुम्ही कुठल्यातरी बँकेची जाहिरात दाखवली होती. मला अशा जाॅबमध्ये इंटरेस्ट नाहिये बाबा. मला माझ्याच फिल्डमधला जाॅब हवाय ” ती वैतागून म्हणाली.

” बेटा नोकरीच करायची म्हंटलं तर कुठलीही चालू शकते. फिल्ड वेगळं असलं तरी शिकतो माणूस. आणि सरकारी नोकरी केव्हाही चांगली. पगारही चांगला असतो. जाॅब सिक्युरिटी असते आणि लग्न झाल्यावरही तू तिथे बदली करुन जाऊ शकतेस “

” हो पण जाॅब सॅटिसफॅक्शनच काय? ते मला या सरकारी नोकरीत मिळणार थोडीच आहे. आणि मला त्या सरकारी नोकऱ्या अजिबात आवडत नाहीत. राहू द्या. मी पुण्यातल्या एका कंपनीत अप्लाय केलाय. पुढच्या आठवड्यात इंटरव्ह्यू आहे “

विनायकला चुप बसण्याव्यतिरिक्त पर्यायच उरला नाही. तो माघार घेत म्हणाला

“ठिक आहे. मात्र या वेळी तरी तुझं सिलेक्शन व्हायला पाहिजे “

“मी प्रयत्न तर करणारच आहे ” ती म्हणाली आणि रुममध्ये निघून गेली. ती गेल्यावर माधवी विनायकला म्हणाली

“तुम्ही नोकरीसाठी तिच्या इतकं मागे लागता पण नोकरीला लागल्यावर ती कशी वागते ते माहित आहे ना? घरातल्या एकाही कामाला ती हात लावत नाही वरुन तिच्याच तैनातीत मला रहावं लागतं. असा रुबाब दाखवते की जणू घरात कमावणारी ती एकटीच आहे आणि आपण तिच्याच कमाईवर अवलंबून आहोत “

” माहितेय मला. पण अशी रिकामी बसलेलीही मला सहन होत नाही. पण तू काळजी करु नकोस. तिला नोकरी लागणं कठीणच दिसतंय कारण इंटरव्ह्यूला जातांना ती कधी तयारीच करुन जात नाही “

दुसऱ्या आठवड्यात नयना पुण्याला जाऊन इंटरव्ह्यू देऊन आली तेव्हा तिचा चेहरा पडलेला होता. संध्याकाळी विनायकनं घरी आल्यावर तिला विचारलं.

“काय झालं? कसा झाला इंटरव्ह्यू? “

” चांगला झाला पण माझं काही सिलेक्शन झालं नाही “

“का? “

” आजकाल वशिला लागतो बाबा सगळ्या ठिकाणी. आणि आपण तिथेच तर कमी पडतो. साक्षी जाॅबला लागली ती तिच्या मामाच्या ओळखीमुळे. समीर टिसीएस मध्ये त्याच्या बाबांच्या ओळखीमुळे लागला. नेहा पण तिच्या बाबांच्याच वशिल्यामुळे आयबीएम मध्ये लागलीये”

” याचा अर्थ तू मलाच ब्लेम करतेय. माझ्या जिथे ओळखी आहेत त्या एल. आय. सी. मध्ये आणि बँकेमध्ये तर तू नोकरी करायला तयार झाली नाहीस. सगळ्याच ठिकाणी माझी ओळख कशी असणार? आणि फक्त ओळखीमुळे नोकऱ्या लागत नाहीत. इंटरव्ह्यूमध्ये आपली हुशारीही दाखवावी लागते. मी पाहिलंय की इंटरव्ह्यूला जातांना तू कधीच तयारी करुन जात नाहिस. आज पाच वर्षं झाली तुला इंजीनियरींग सोडून. काय शिकलीस तेसुद्धा तुला आठवत नसेल तर इंटरव्ह्यूमध्ये तू काय बोंब पाडणार आहेस? तू पुण्याला गेलीस खरी पण काय होणार आहे हे आम्हांला अगोदरच माहित होतं “

“तुमचीच नाट लागली माझ्या इंटरव्ह्यूला ” ती रडत रडत म्हणाली

“वा रे वा! तू स्वतः तयारी करुन जायचं नाही. इंटरव्ह्यूत चांगली उत्तरं द्यायची नाही आणि सिलेक्शन झालं नाही तर आईबापालाच दोष द्यायचा. ही कोणती पद्धत? आम्ही काय वैरी आहोत का तुझे? ” माधवी चिडून म्हणाली

” जाऊ द्या मला काही बोलायचंच नाही या विषयावर “ती उठली आणि रडतरडत आपल्या रुममध्ये निघून गेली.

तिच्या पाठमोरी आकृतीकडे बघत माधवी म्हणाली

“बघा. अशी करते ही. गरीब आणि अशिक्षित आईवडिलांची मुलं काय ओळखीने लागतात का नोकरीला? “

” खरंय माधवी तुझं. गरीब आणि अशिक्षित आईवडिलांच्या मुलांमध्ये परिस्थितीला सामोरं जाण्याची आणि कसंही करुन यश मिळवण्याची जिद्द असते. त्यांना आपल्यालाच प्रयत्न करुन पुढे जायचं आहे याची जाणीव असते. कितीतरी यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तींचे आईवडील अशिक्षित आणि गरीबच होते. कोणत्याही सुखसुविधा मुलांना ते देऊ शकले नाहीत तरीही मुलांनी यशाचं शिखर गाठलं. आणि आपली मुलं पहा. आपलंही चुकलंच. आपण नको तितके तिचे लाड केले. ती म्हणेल ते आपण तिला देत आलो. त्यामुळे तिला कधी गरिबीची जाणीवच झाली नाही. आईवडिलांनी आपल्याला शिकवलंय तर आपण स्वतःहून धडपड करुन नोकरी मिळवली पाहिजे, त्यांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पुर्ण केल्या पाहिजेत असं तिला कधी वाटलंच नाही “

“खरंय तुमचं पण आपलंही काही चुकलं असं मला वाटत नाही. आपल्याला ज्या सुखसोयी मिळाल्या नाहीत त्या आपल्या एकूलत्या एक मुलीला मिळाव्या असं आपल्यालाही वाटणं साहजिकच होतं. आता तिलाच या गोष्टींची जाणीव नाही तर आपणही काय करणार?

त्यात एवढंच सुख म्हणावं की तिनं प्रेमाबिमाच्या काही भानगडी नाही केल्या. नाहीतर आपल्या डोक्याला अजून ताप झाला असता “

“खरंच. ही देवाचीच कृपा समजायची कारण कितीही चांगले संस्कार केले तरी या मुली कधी भरकटतील सांगता येत नाही. पहातेय ना कसं मुलींना फसवून मग त्यांना मारुन टाकलं जातंय ते “

माधवीच्या अंगावर शहारे आले. ती म्हणाली

“असं काही घडण्याच्या आतच नयनाचं लग्न उरकून टाकलं पाहिजे “

 

एक महिना असाच गेला. त्यात नयना दोन ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊन आली पण दोन्ही ठिकाणी तिची निवड झाली नाही. या दरम्यान बंगलोरचं एक स्थळ चालून आलं. मुलगा एकुलता एक होता, देखणा होता. बारा लाखाचं पॅकेज होतं. आणि सहा महिन्यांनी ते सोळा लाख होणार होतं. फक्त लग्न झाल्यावर मुलीने नोकरी करावी अशी मुलाकडच्यांची अट होती. त्यात विनायक आणि माधवीलाही काही गैर वाटलं नाही. मुलामध्ये दोष काढण्याकरीता कोणतेच मुद्दे नसल्याने नयनाही नाही म्हणू शकली नाही. शेवटी तीन महिन्यांनी नयनाचं लग्न थाटामाटात पार पडलं.

एक महिन्याने माधवीनं नयनाला सहजच फोन केला.

“कशी आहेस बेटा? “

“आई तशी मी मजेत आहे. सासूबाई आणि नवरा दोघंही स्वभावाने चांगले आहेत पण इथे खुप कामं करावी लागतात. सकाळी सहा वाजताच उठावं लागतं “

” का? “

” अगं माझ्या नवऱ्याला फिटनेसचं वेड आहे म्हणून तो सकाळी पाच वाजताच जिमला जातो. सासूसासरेही सकाळी साडेपाचलाच माॅर्निंग वाॅकला जातात. सुरुवातीला मी माझ्या सवयीने एकटीच नऊ वाजेपर्यंत झोपलेली असायचे. तसं मला कुणी बोलत नव्हतं पण त्यांच्या चेहऱ्यावरुन माझं असं उशीरापर्यंत झोपणं त्यांना आवडत नाहिये असं माझ्या लक्षात आलं. मग नाईलाजाने मलाही सकाळी सहा वाजता उठावं लागतं. नवरा, सासूसासरे सकाळी घरी आले की त्यांना लगेच चहा करुन द्यावा लागतो. मग नाश्त्याची तयारी. माझी झोपच होत नाही आजकाल. वरुन घरात सतत लोकांचं येणं जाणं असतं. दिवसभर चहापाणी करुन मी थकून जाते. त्यातून आता नवरा आणि सासू दोघंही माझ्या मागे लागलेत मी नोकरी करावी म्हणून. सासूबाई म्हणतात ‘तू इतकी शिकली आहेस त्याचा उपयोग तुझ्या आईवडिलांना नाहितर आम्हांला तरी होऊ दे “

“काय चुकीचं म्हणताहेत त्या? मिळत असेल तर कर नोकरी “

” हो पण घरातली कामंही मलाच करावी लागणार ना? सासूसासऱ्यांना थोडीच कामं सांगता येतील! “

माधवीला हसू आलं. माहेरी नोकरी करतांना जो रुबाब नयना दाखवायची तो आता तिला सासरी दाखवता येणार नव्हता.

“ठरव मग काय करायचं ते “आपलं हसू दाबत ती म्हणाली.

“तू बोल ना जरा माझ्या सासूबाईंशी. त्यांना म्हणा कमीत कमी लग्नाचं एक वर्ष तरी तिला एंजॉय करु द्या “

“नाही गं बाई! मी तुझ्या संसारात अजिबात ढवळाढवळ करणार नाही. तू आणि तुझ्या सासरचे काय ठरवायचं ते ठरवा. तुमच्या घरात भांडणं लावायची माझी अजिबात इच्छा नाही “

“बरं “

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted