सुश्री त्रिशला शहा

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे आत्मचरित्र – ४ भाग ☆ परिचय : सुश्री त्रिशला शहा ☆ 

पुस्तक : ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे आत्मचरित्र – ४ भाग

लेखक : श्री आनंद यादव

शिक्षण घेण्यासाठी अतोनात कष्ट,त्रास सोसून, अतिशय जिद्दीने आणि संघर्षात्मक जीवनाचा सामना करणारे सुप्रसिद्ध लेखक म्हणजे आनंद यादव.

कागलसारख्या लहान गावातील दुसऱ्याच्या शेतात मोलमजूरी करुन, राबणाऱ्या शेतकरीकुटुंबातील रत्नाप्पा जकाते आणि ताराबाईच्या पोटी सर्वात मोठा,पहिला मुलगा म्हणून जन्म घेतलेला ‘आनंद’.वडील रत्नाप्पा अतिशय रागीट स्वभावाचे तर आई ताराबाई नवऱ्याचा मार सहन करत,दरवर्षी  एका अपत्याला जन्म देणारी,शेतात,घरात राबणारी अतिशय सोशिक स्वभावाची बाई,घरातील गरिबी आणि वाढत जाणारी खाणारी तोंडे या सगळ्या परिस्थितीत वयाच्या नवव्या वर्षांपासूनच आनंदला कामाला जुंपून घ्यावे लागले.शेतातील कामे,जनावरांची उसाभर, लहान भावंडांची देखभाल अशा कामात लहानगा आनंद दिवसभर कष्ट उपसीत होता,या साऱ्या कष्टातून मन रमवण्यासाठी गावात आलेल्या तंबूतील सिनेमा पहाण्याची आवड निर्माण झाली.मग यासाठी वैरण विकून,शेंगा विकून पैसे गोळा करायची सवय लागली,ही आवड इतकी वाढली कि काही वेळा तंबूत चोरुन जाऊन सिनेमा पहात असे,यातूनच पुढे शिक्षण घ्यावे असेही मनात होतेच, यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला शिक्षण घेतले पाहिजे ही ठिणगी मनात फुलत होती.

गावात असणाऱ्या शाळेत जाणारी मुले पाहून मनाचा ओढा शाळेकडे जात होता.पण वडिल मुलांना शाळेत घालणाच्या विरुध्द होते,मुलगा शाळेत गेला तर शेतीची कामे कोण करणार?अशा विचीत्र परिस्थितीत सापडलेल्या आनंदने संघर्ष करुन शिक्षणाचे धडे गिरवायला सुरु केले.त्यातही अनंत अडचणी,वह्या पुस्तके घ्यायला पैसे नसणे,शाळेची फी कुठून   भरायची,कामाच्या व्यापातून अभ्यासाला वेळ कसा काढायचा?वर पुन्हा शेतीची कामे रखडली तर वडिलांचा मार तर ठरलेलाच होता.शाळेतही वेळेवर फी भरली नाही तर शिक्षकांकडूनही अनेक दा मार मिळे,मुलांसमोर अपमान केला जाई,अशा आपल्याही अंगावर काटा आणणाऱ्या अतिशय बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन कागलसारख्या लहान गावातून शिक्षणाच्या निमीत्ताने कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे,पंढरपूर ते अगदी युरोप पर्यंत पोहोचलेल्या अतिशय जिद्द,चिकाटी असणाऱ्या लेखकाचे हे आत्मचरित्र.

ही कहाणी इतकी विलक्षच आहे कि ती एका पुस्तकात मावलीच नाही,म्हणूनच या आत्मचरित्राचे चार खंड आहेत.त्यामध्ये झोंबी,नांगरणी,घरभिंती,आणि कांचवेल अशा चार खंडातून लेखकाचा जीवनप्रवास उलगडत जातो.शिक्षण घेताना आलेल्या अनंत अडचणी,नोकरीतील अनेक कठिण प्रसंग,लग्न,संसार,भावंडांच्या शिक्षणाबद्दलची तळमळ,बहिणींची लग्न,आईवडिलांची  पैशासाठीची मागणी,त्यांचे आजारपण, शेतातील अनेक अडचणी,कोर्टकचेरी अशा अतिशय दुर्धर प्रसंगातून जाताना लेखकाच्या वाट्याला कसोटीचे क्षण येत होते पण आपला गाव,आपले कुटूंब याबद्दलची एक अनामिक ओढ त्यांच्या मनात होती  त्यामुळे ते सदैव त्यासाठी तत्पर रहायचे.

शिक्षणाची एकेक पायरी चढत डॉक्टरेट मिळवूनही ते तळागाळातील मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले,शिक्षण घेणं किती अनिवार्य आहे हे मुलांच्या मनात ठसवत राहिले.

या सर्व शिक्षणप्रवासात त्यांना शंकर पाटील,पु.ल. देशपांडे, सुनिताताई देशपांडे,श्री.पु. भागवत,व्यंकटेश माडगूळकर अशा मान्यवर लेखकांचे सतत सहकार्य,मार्गदर्शन मिळत गेले.लेखकानी लिहीलेल्या कथा,कविता,लेख यांचे रेडिओवर सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी व्यंकटेश माडगूळकर यांच्यामुळे मिळाली,त्याकाळात रेडिओवर कार्यक्रम करणे अतिशय मानाचे समजले जाई.त्यामुळे आनंद यादव आपल्या लिखाणामुळे घराघरात पोहोचले. अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या,ललित लेखन त्यांनी केले.अनेक पुरस्काराने ते गौरविले गेले.त्यांच्या झोंबी या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा कागलच्या ग्रामपंचायतीने लेखक आणि त्यांच्या आईंचा जाहीर सत्कार घडवून आणला ही अतिशय मानाची गोष्ट ठरली.

चार भागात असलेले हे आत्मचरित्र वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटत नाहीच तर उलट उत्कंठावर्धकच वाटते.अतिशय प्रेरणादायी असलेले हे आत्मचरित्र वाचकांनी नक्कीच वाचले पाहिजे.

परिचय : सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments