श्री अशोक ल. देशपांडे

? पुस्तकावर बोलू काही ?

“मन अंकुरे अंकुरे” – लेखिका : डॉ. नेहा विनोद भटकर ☆ परिचय –  श्री अशोक ल. देशपांडे ☆

पुस्तक : मन अंकुरे अंकुरे

लेखिका : डॉ. नेहा विनोद भटकर 

प्रकाशक : ज्ञानपथ प्रकाशन

पृष्ठसंख्या : ११६ 

किंमत : रु. २०० /- 

मन अंकुरे अंकुरेजणू दरवळलेला मृदगंधच……

नुकत्याच २० व २१डिसेंबर २०२५ ला परिवर्तन प्रबोधिनी आयोजित तिसऱ्या विचारवेध साहित्य संमेलनात प्रकाशित झालेले, ज्ञानपथ प्रकाशनाचे डॉ नेहा विनोद भटकर लिखित, वैविध्यपूर्ण अशा एकूण सोळा लेखांचा संग्रह असलेले ‘मन अंकुरे अंकुरे’ हे पुस्तक वाचनात आले आणि त्यासंबंधीचा अभिप्राय लिहिण्यास लेखणी सहजच उद्युक्त झाली. त्याला अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम तर पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून आतील अक्षरधनाचा अंदाज आला. लेखिकेचं नाव ‘डॉ. ‘ ह्या उपधीशिवाय पाहून लेखिकेचा विनय, ऋजुता दिसून आली. मलपृष्ठावर नजर गेली असता, तिथे लेखिकेचा परिचय असेल म्हणून पाहीले तर पुस्तकातील अंतरंग तेथे अवतरलेला. सगळी अवतरणं वाचूनच सहृदय वाचक पूर्णानंदाची अनुभूती घेतो. निसर्गाचं किंवा परिस्थितीचं अचूक, नेमकं निरिक्षण, बारकावे टिपलेले दिसतात व वाचक पुस्तक वाचनास प्रवृत्त होतो. विज्ञानाच्या प्राध्यापिका सेवानिवृत्तीनंतर बालपणीच्या आठवणी इतक्या सुंदर व जश्याच्या तश्याच चित्रित करतात याचे कौतुक आणि नवलही वाटले.

गुलबकावली किंवा सिंदबादच्या सफरी ज्या उत्सुकतेने एकेकाळी वाचल्या जात होत्या त्याच उत्कंठतेशी साधर्म्य साधणारे हे ग्रामीणबाजाचे लेख आहेत, केवळ हळवं मनंच इतके बारकावे टिपू शकतं. ग्रामीण जीवन केव्हढं समृद्ध, परिपक्व, सहज, रोखठोक होतं, ह्याचं दर्शन वर्तमान पिढीला लेखिकेने करून दिलं आहे. ह्या विविध विषयांवरील लेखांमुळे लेखिकेच्या मनातील आजवर सुप्तावस्थेत असलेल्या बीजांना सशक्त अंकुर आले आहेत. वठलेल्या वृक्षांना कोमल पालवी प्रस्फुटित व्हावी तसा लेखिकेच्या मनमोराचा पिसारा डवरून जाऊन अक्षरधनाच्या रुपाने वाचकांसमोर आला आहे, ह्याचा वाचकांना देखील आनंदच होईल. व-हाडी भाषेचा पेरा; जसे की नानीमावशी या लेखातील ‘थांब आमासाक’ किंवा इतरही लेखातील अनेक वऱ्हाडी शब्दप्रयोग, वाचकांना सुखावून जातो. अथांग सागरात बुडी मारून तळाशी असलेल्या शिंपल्यातील मोतीच फक्त मुठीत धरून येणाऱ्या पाणबुड्यासारखीच लेखिकेने स्मृतीच्या अंतराळात झेप घेऊन आठवणींच्या रत्नांची पखरण प्रत्येक लेखात केली आहे. रम्य त्या बालपणातील बारकावे लालित्याने नटलेले आहेत. ‘अनवट मैत्री’ पृ. ७९’ “विचारांच्या भुंग्याने अनेक पावसाळे अगदी सहजपणे मागे टाकलेत हे कळलेही नाही“, अशी लालित्यपूर्ण किंवा त्यापेक्षाही सहज सुंदर व समर्पक वाक्य ठिकठिकाणी आढळतात. रात्रभर भुंग्याने कमलपुष्प दलात स्वतःच्याच धुंदित बंदिस्त करून घ्यायचे व सूर्योद‌यालाच बाहेर पडून मुक्त संचार करावा तसे विचारांचे /आठवणींचे काहूर स्मृर्तीची परते खुलवून गेली.

.. खेड्यातील लोकांचा जीवनाधार असलेल्या गुलाब भाईचं कामास काम एवढेच मर्यादित असलेलं साधं व निरागस असलेलं वलय लेखिकेने लिहिल्याप्रमाणे ‘कंदीलाच्या धुरकट काचेतून पडणाऱ्या अंधुक उजेडासारखं हळूहळू धूसर होऊन पडद्याआड दिसेनासं झालं आहे. ’ आज सामाजिक जाण हरवलेली, उजाडलेली खेडी पहिली की ‘गुलाबभाई’ सारख्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

.. ‘शतदा प्रेम करावे’ ह्या पाडगावकरांच्या कवितेच्या ओळीने संपलेले, माणुसकीच्या वाड्याचे वर्णन संपूच नये असे वाटत असतानाच वाचून संपले. वर्तमान पिढीला सांगूनही विश्वास न बसेल असे ते दिवस, ती माणसं, ते सामाजिक भान, भारतीय जीवन पद्धतीचे दर्शन, संस्कृती व परंपरेला जपणारा समाज लेखिकेच्या ओघवत्या लेखणीने ‘वाडा माणूसकीचा’ मध्ये जिवंत केला. त्या वाड्याचे वैभव जपणाऱ्या अन्नपूर्णांचे; एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे, वर्णन वाचून वाचक तृप्तीची ढेकर देऊन आनंदित झाल्यावाचून राहणार नाही.

.. ‘सामा’ या लेखातील दारकुची अविश्रांत श्रमाची कहाणी अंतर्मनाला स्पर्शूनच जात नाही तर ती त्याला चिकटते. ‘नाना’ सारखी माणसं जेथे जेथे असत ते तेथील सर्वांसाठी जीवनाधारच असत. खेड्यातील नाना सारख्या व्यक्तींना तर आधारवडच म्हटलं पाहिजे. ‘अनवट मैत्री’ ‘ओकरा’, ‘प्राजक्त सडा’ या लेखांत आलेल्या शब्दांना दिलेले प्राणी वा वनस्पती शास्त्रीय शब्द इंग्रजीत दिल्याने फार सोयीचे झाले. त्यातील कीटक आणि वनस्पतींचे बारकावे समजणे सोपे झालेत. वरील लेखांमध्ये आलेल्या बहुतेक सर्व कीटकांसोबत अनेकांची लहानपणी दोस्ती झाली असेल.

.. तिळभर नातं हा लेख संपूच नये असे वाटत असताना बैलगाडी व ढवळ्या पवळ्याच्या गळ्यातील घुंगरांची किणकिण मंदावल्याचा भास झाला. या लेखामध्ये लेखिकेने माहेरचा वारसा फारच ताकदीने उभा केला आहे असे निश्चितपणे वाटते कारण लिहिले ते काल्पनिक नाही याचा लेख वाचताना ठायी ठायी साक्षात्कार होतो आणि वाचकही त्या वाटेचा आनंदी वाटसरु होऊन बसतो.

.. ‘दिवस जून-जुलैचे’ या लेखातील प्रत्येक व्यक्ती, घटना, हेंबाडवानाची वगैरे शब्द, पेरणीच्या सरत्यावरील लक्षुम्या, सुतार, लोहारादि कारागिरांची ठिकाणं, आंब्याचं लोणचं घालण्याचा सोहळा, लहरी मिरुगाच्या सचैल पावसाने प्रफुल्लित झालेले शेतकऱ्यांचे चेहरे आदिचा मनमुराद समाचार घेऊन त्या स्मृतींना कलाबतूची झालर लावली.

.. ‘प्राजक्त सडा’ या लेखातील लालित्याचे मनोहर लेणे लेऊन आलेला प्राजक्त लेखिकेने भरभरून फुलविला आहे. श्रावण भाद्रपद मासी जसा तो पहाटेच्या समयी बरसतो तशीच लेखिकेची लेखणी देखील त्याच्या नाजूक फुलांचा दरवळ घेऊन अक्षरश: ओसंडली आहे. लेखिकेने आत्यंतिक तन्मयतेने ती सुगंधी दरवळाची वलयं, अनेक स्मृतींनी बांधून ठेवली आहेत.

.. ‘नामनिराळे गाव’ नावाचा अतिशय साध्या विषयाला धरून असलेला एक खुसखुशीत लेख, नामनिराळ्या गावातील नामनिराळ्या माणसांच्या नावातील गमतीजमातींवर कटाक्ष टाकणारा हलकाफुलका लेख वाचून चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या नाहीत तरच नवल.

.. ‘गोमटे वैराग्य’ मधील गोमट्याचे भावचित्र; ‘भिकारी नाही मी दादी, मी माह्या फुईच्या घरी पावना आलो’ तसेच ‘हो का, ते ठीक आहे पन मी तुह्या नावानं हे भाजी भाकर काढली, तं आता घरात ये, बस जरासा खाऊन घे कसा… ‘, ही निरागस आजीबाईच्या तोंडची वाक्यं आणि अशा अनेक ग्रामीण घाटाच्या जीवनातील सहजतेने समृद्ध झालं आहे. हा लेख वाचून खरोखरीच त्या नवलाईच्या विश्वातील इतर गोमट्या भटक्या पाहुण्यांची आठवण जागी झाली.

.. ’मार्च एक अनुभूति’ हा नुसती वसंत ऋतूची निसर्गातील रम्य पखरणच नाही तर मार्च महिन्यात घडणाऱ्या व्यावहारिक घडामोडीचे सक्षम दर्शन या लेखात घडले आहे. गोष्टी नित्याच्याच पण त्या देखील वाचनीय झाल्या आहेत व आपणही हा अनुभव घेतला आहे असे वाटून जाते. बाळपणीचा काळ सुखाचा म्हणून शाळकरी असताना खाल्लेल्या कैऱ्या तसेच होळी शिमग्याच्या वेळी केलेल्या चाकोल्याच्या माळांच्या उल्लेखांनी वाचकही त्या लेखात समरसून जातो. शासकीय कार्यातही ठराविक वेळी करावयाच्या कामांच्या घेतलेला आढाव्यात आपणही भागीदार होतो/आहे याची जाणीव करून देतो.

.. ‘लंडन ब्रिज’ लेखामुळे बऱ्याच मनोरंजक व ऐतिहासिक गोष्टी समजल्यात. बालपणी अर्थ न समजलेल्या पण सततच्या उच्चारणामुळे स्मरणात राहिलेल्या इंग्रजी कवितेचा भाव आणि अर्थ लेखिकेला गवसला व त्या आनंदीत झाल्या. अशाच प्रकारचा आनंद हा लेख वाचताना वाचकाला होतो. लंडन ब्रिजचं वास्तुशास्त्र, त्यात कालानुरूप झालेले बदल, पुढे अमेरिकेत ब्लॉकस रूपाने पोहचलेला लंडन ब्रिज, हे सर्व वाचून अचंबित व्हायला होते आणि मुख्य म्हणजे लेखिकेने त्याचा सुसूत्र असा घेतलेला आढावा, त्यामुळे लेख वाचनीय झाला आहे. हा लेख वाचताना पु. लं च्या ‘चितळे मास्तर’मधील वर्ड्सवर्थच्या ‘वेस्टमिन्स्टर ब्रिज’ या कवितेची आठवण व्हावी असाच हा ‘लंडन ब्रिज’.

लेखिकेने ग्रामीण बाजाचा हा रथ छानच सजविला आहे. आता ही संस्कृती वर्तमानात अगम्य आणि सांगूनही कुणाला खरं वाटण्यापलीकडची झाली आहे. टिनाच्या गुंड्या ज्या की आता कुणाला आठवतही नसतील तसेच दौत, टाक, चिंदकाच्या भुलाया (बाहुल्या), लाकडी भोवरे, बालपणी कित्येकांनी फुंकलेल्या आंब्याच्या कोयीतील बाटीच्या पुंग्या इत्यादीची आठवण ताजी करीत ग्रामीण स्मरणरंजनाचा सारीपाठ सुरेख मांडला आहे. या पुस्तकाच्या वाचन प्रवासात वाचक सचैल डुंबण्याचा आनंद उपभोगू शकतो.

…. लेखिकेने चितारलेल हे ग्रामीण भागातील जीवन, एक प्रकारे डॉक्युमेंटेशनच आहे. लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक असून, खूप छान असा हा अभिनंदनीय लेखन प्रपंच आहे.

प्रस्तावनेसाठी उपोद्‌घात हा शब्द जुन्या पुस्तकांच्या प्रथम पृष्ठावर असायचा तो पाहून बरे वाटले. डॉ. रा. गो. चवरे यांनी खूप विस्तृत आणि जरा जास्तच लांबलेली प्रस्तावना केली आहे.

.. पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ आणि प्रत्येक कथा सौ. प्रज्ञा सोनखासकर यांच्या समर्पक, सुंदर आणि सुबक रेखाचित्रांनी सजली आहे. त्यामुळे पुस्तकाच्या सौंदर्यात भरच पडलेली आहे.

.. पुस्तक बांधणी, छपाई, दोन ओळीतील स्पेस, टाईप (फॉन्ट), जाड कागद ही चांगल्या पुस्तकाची लक्षणं आहेत व त्यातील साहित्याला असलेला मृद्‌गंध हा वाचकांना हवाह‌वासा वाटणारा आहे.

…. लेखिकेच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देऊन येथेच थांबतो.

परिचय : श्री अशोक ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
जगत सिंह बिष्ट
0

अति सुंदर, फार सुंदर, मनमोहक।
🙏 🙏 🌸 🙏 🙏

अ. ल. देशपांडे अमरावती.
0

धन्यवाद, जगत सिंह जी.