श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “हात…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
ओळख हि बऱ्याचदा कोणासोबत आहे. किंवा सोबत कोण आहे. यावरून ठरते, किंवा बदलते सुध्दा.
काही शब्दांच असंच आहे. वाक्यात हा शब्द दुसऱ्या कोणत्या शब्दांच्या हातात हात घालून कसा, आणि कुठे येतो त्यानुसार अर्थ बदलत असतो.
हात या शब्दाचा उपयोग आपण आपल्या सोयीनुसार करतो. हात म्हणजे खांद्यापासून हाताच्या पंजापर्यंत सगळा भाग अस असलं तरी त्याचा अर्थ अर्थातच आपण लावू तसाच असतो.
भविष्य पाहण्यासाठी दाखवला जातो तो हात. आणि लग्नासाठी मागीतला जातो तो सुद्धा हात.
काम करुन दुखतात ते सुद्धा हातच. किंवा दोन कामं जास्त झाली तर हात मोडतात का? असंही म्हटलं जातं.
चांगली बातमी सांगितली की
लगेच काही गोड देतो ते हातावर. आणि थोड अंतर ठेवा असं सांगतांना सुध्दा अंतर लागत ते हातायेवढच.
कोणी मोकळेपणान सगळं सांगत असेल तर म्हणतो, हातचं काहीही राखून ठेवत नाही. आणि उदार असेल तर म्हणतो हात मोकळा आहे.
उदार असणाऱ्याचा हात मोकळा असतो. पण हातात काहिही नसलेला हात सुध्दा मोकळाच असतो. समारंभात, भेटायला मोकळ्या हाताने कसं जायचं? असं म्हणत काही तरी बरोबर घेतो.
“हातच्या कंकणाला आरसा कशाला. ” या सारख्या म्हणी मध्ये सुद्धा तो येतो.
भविष्यात काय आहे? हे समजून घेण्यासाठी हात दाखवतो. आणि एखादं काम प्रयत्न करुनही होणार नसेल, किंवा त्या कामाची किंमत होणार नसेल, तरीही म्हणतो, कशाला उगाचच हात दाखवून अवलक्षण….
पत्याच्या खेळात असतो. कारस्थानात असतो. मदतीसाठी असतो. विजयात असतो. आणि आशिर्वाद देतांना तर असतोच असतो.
रागात उगारला जातो. भांडणात दाखवला जातो. चोर सुध्दा मुद्देमालावर हातच मारतो.
अडचणीच्या वेळी पसरावा लागतो. अनावश्यक खर्च होत असेल तर तो आखडता घ्यावा लागतो. देतांना वर आणि घेतांना खाली असतो. तर हातचं सोडून पळत्याच्या पाठिमागे…… या आशयाच वाक्य सुध्दा ऐकायला मिळतं.
संधीचा फायदा करून घेणारे असतात तेव्हा ते वाहत्या पाण्यात हात धुतात. तर जबाबदारी न स्विकारणारे हात झटकतात.
रिकामा माणूस हातावर हात ठेवून असतो. रोज कमवून खाणाऱ्यांच पोट सुध्दा हातावरच असतं. आवडीच्या पदार्थावर आडवा हात मारला असच म्हणतो.
विश्वासू साथीदार उजवा हात असतो. पण ठेवलेली वस्तू सापडत नसेल तर मात्र ती डाव्या हाताने कुठे ठेवली? असाच विचार होतो.
हातावर तुरी देऊन पसार होणारे असतात. तसच ओळख नसतांनाही मदतीचा हात पुढे करणारे असतात.
माझा काही संबंध नाही, या अर्थाने सुध्दा हात वर केले असच म्हणतात. तर सहमती किंवा असहमती दर्शवतांनासुध्दा वर होतो तो हात.
ढकलणं, किंवा ओढणं या परस्पर विरोधी क्रिया. पण त्या करण्यासाठी लागतो तो हात.
विश्वासाने धरला जातो, आणि अविश्वासात काढून घेतला जातो. कधी कधी
उपकारामुळे तो दबला जातो. तर कधी तो वेगवेगळ्या पध्दतीने दाबला जातो.
नमस्काराला लागतो, टाळी द्यायला लागतो. कौतुकाची थाप द्यायला लागतो. मायेने पाठिवर फिरवायला लागतो. आणि पुजेत सुध्दा लागतो.
दोनाचे चार होतात ते सुद्धा हात. हाताला चव असते. तसच हाताला गुणही असतो असंही म्हणतात. हातात कला असते. तर काही गोष्टी लिलया करण्यात हातखंडा असतो.
हात दाखवा, गाडी थांबवा. असंही एक वाक्य परिवहन मंडळाच होत.
अनेक हात एकत्र आले तर बळकटी येते. आणि हात सोडला तर मात्र दुबळेपणा, एकाकीपण जाणवतो.
भावाबहिणीच अतुट नातं दाखवणारी राखी हातावरच बांधतात. तर वेळेच बंधन पाळण्यासाठी पहावं लागणार घड्याळ हातावरच विराजमान असतं.
कराग्रे वसते लक्ष्मी. कर मध्ये सरस्वती. या सारख्या ओळींमध्ये हातात लक्ष्मी आणि सरस्वती यांच वास्तव्य हातातच असतं हेच सांगितलं आहे.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





