श्री जगदीश काबरे

☆ “लग्नाचे वय☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजात लग्न ही संकल्पना केवळ एक करार नाही की निव्वळ एक सामाजिक विधीही नव्हे, तर ती एका दीर्घकाळ चालत आलेल्या सांस्कृतिक मूल्यप्रणालीची मूळ प्रेरणा मानली गेली आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्तींमधील केवळ शारीरिक किंवा कायदेशीर बंधन नव्हे, तर दोन कुटुंबांच्या मध्ये तयार होणारी एक संपूर्ण जीवनपद्धती. आपल्या देशामध्ये लग्न हा केवळ एक संस्कार नाही, तर ती एक संस्था आहे. मात्र हाच विवाह आणि कुटुंब संस्थेचा अर्थ, उद्देश व स्वरूप काळानुसार बदलत गेला आहे. इतिहासातील विविध टप्प्यांमध्ये विवाहसंस्थेच्या स्वरूपात, उद्दिष्टात आणि सामाजिक दृष्टीकोनात मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर झाले आहे. आधुनिक काळात तर ही स्थित्यंतरे अधिक स्पष्टपणे दिसून येतात — विशेषतः जेव्हा कोणीतरी वयाच्या पन्नाशीनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा “लग्न करायचे ते फक्त मूल जन्माला घालण्यासाठीच असते, मग आता काय उपयोग?” असा प्रश्न विचारला जातो. आम्हाला मूल होऊ शकतं हे जगाला दाखवण्यासाठी आपण लग्न करतो का? नातं स्थिरावलं की मग नवीन नात्याचा स्वीकार करणं यात काय गुन्हा आहे? आणि लग्नासारखी जबाबदारी घेणाऱ्यांना याही जबादारीची जाणीव नसेल कशी? मग ती कधी घ्यायची ते ठरवू देत की ज्यांच त्यांना. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, परिस्थिती वेगळी, त्यानुसार घ्यायला लागणारे निर्णयही वेगळे मग असं असताना लोकं लगेच मतं लादायला, शिक्के मारायला का सुरुवात करतात? हा प्रश्न विचारणाऱ्या मानसिकतेचा उगम, त्यामागील पारंपरिक दृष्टिकोन, आणि त्यावर आधारित साचलेली मूल्यसंस्था यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की, आर्ष काळामध्ये स्त्री-पुरुषांमधील संबंध हे भाऊ-बहीण बाप-मुलगी अशा नात्यातही होत होते, असे इतिहासाचार्य वि का राजवाडे यांनी दाखवून दिलेले आहे. त्या पुस्तकातील यम-यमी या बहिणभावांचा लैंगिक संबंधासंबंधीचा संवाद प्रसिद्धच आहे. पूर्वीच्या टोळी जीवनामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. एक स्त्री अनेक पुरुषांबरोबर रत होत असे. त्यामुळे मुले फक्त स्त्रीचीच समजली जात असत. पण शेतीचा शोध लागल्यानंतर स्थिर जीवन पद्धतीत जमिनीच्या वारसांचा प्रश्न निर्माण झाला आणि मातृसत्ताक पद्धती हळूहळू पितृसत्ताक पद्धतीत रूपांतरित व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर वेदकाळापासून आजवर ही संस्था सामाजिक रचना व मानवी संबंध यांचे एक प्रमुख केंद्र राहिली आहे. वेदांमध्ये विवाह हा ‘सहधर्मचारिणी’ संकल्पनेवर आधारित होता. पुरुष व स्त्री यांनी एकमेकांचे सहकारी होऊन जीवनाचे सर्व टप्पे पार करावेत, असा हेतू यामागे होता. मात्र, कालांतराने या संस्थेचे स्वरूप अधिकाधिक पितृसत्ताक होत गेले, स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत गेले. स्त्रीला फक्त उपभोग्य आणि वंश सातत्याला उपयुक्त असलेली वस्तू समजण्यात आले. म्हणून विवाह म्हणजे स्त्रीचा ‘कन्यादान’ करून तिला पतीच्या अधीन करणे, ही रुढी निर्माण झाली. संतती हे विवाहाचे केंद्रबिंदू बनले. अगदी शंभर वर्षांपूर्वी पर्यंतच्या लग्नपत्रिकांमध्ये ‘अमुक अमुकचे तमुक तमुकशी शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे’, असे शब्दप्रयोग केले जात असत. म्हणजे लग्न ही कायदेशीररित्या सेक्स करण्यासाठी आणि मुलं जन्म घालण्यासाठी निर्माण झालेली संस्था होती, असा समज सर्वत्र होता आणि काही प्रमाणात आजही आहेच. पतीपत्नीत समता असावी, हा विचार फारसा कोणाच्या खिजगणतीतही नसे. परिणामी, मूल होत नसल्यास स्त्रीवर दोषारोप होणे, तिला वांझ ठरवून समाजातून बहिष्कृत करणे ही क्रूर प्रथा समाजात रूढ झाली. विवाह म्हणजे वंशवृद्धीचे साधन हे समीकरण इतके खोलवर रुजले की, ते अनेक पिढ्यांनंतरही ढळले नाही. म्हणून अनेकदा स्त्रीला जर मूल होत नसेल तर नवरा बिनदिक्कतपणे दुसरे लग्न करतो.

असे असले तरी काळाच्या ओघात, विशेषतः १९व्या व २०व्या शतकात भारतीय समाज सुधारकांनी या मूल्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर अशा व्यक्तींनी स्त्री-पुरुष समतेसाठी आणि विवाहसंस्थेच्या नैतिक पुनर्रचनेसाठी लढा दिला. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, बालविवाह बंदी, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क, घटस्फोटाचा अधिकार या गोष्टी त्यामधून शक्य झाल्या. यामुळे विवाह ही केवळ मूल जन्माला घालण्यासाठी असलेली गोष्ट नसून, दोन व्यक्तींमधील समज, प्रेम, सहकार्य आणि आत्मिक संवाद यांचे केंद्र आहे, ही जाणीव समाजात रुजू लागली. तथापि, आजही अनेक समाजघटकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात किंवा पारंपरिक मानसिकता असलेल्या घरांमध्ये विवाहाच्या उद्देशाबाबत तीच जुनाट धारणा आढळते. “लग्न केवळ संततीसाठी” ही संकल्पना इतकी खोलवर रूजलेली आहे की मूल होणे शक्य नसलेल्या जोडप्यांकडे सहानुभूतीने न पाहता त्यांच्याकडे दोषारोपाने पाहिले जाते. हीच मानसिकता वयाच्या पन्नाशीनंतर लग्न करणाऱ्या व्यक्तींना अनुभवावी लागते. “आता वय काय राहिलंय? मूल होणार नाही, मग लग्न करून काय उपयोग?” हा प्रश्न त्यांच्या दिशेने सर्रास फेकला जातो. मात्र, असा विचार करताना लग्नामागील सर्वांगीण उद्देशांचा विचारच केला जात नाही.

माणूस केवळ जैविक गरजांसाठी लग्न करत नाही. एकाकीपणा, मानसिक आधार, संवाद, सहवास, आणि सामाजिक सुरक्षा या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या गरजा आहेत. पन्नाशीनंतर, अनेक जण एकटे पडलेले असतात, काहींचे घटस्फोट झालेले असतात, काही विधुर अथवा विधवा असतात, काही जण अपत्यांपासून वेगळे राहत असतात. अशा परिस्थितीत एक समवयस्क, समजूतदार, आणि आधार देणारा जोडीदार मिळणे म्हणजे जीवनाची एक नवी संधी असते. हे लग्न एखाद्या तरुण वयातील भावनिक उन्मादामुळे झालेले नसते; तर ते परिपक्व, आत्मपरीक्षण केलेल्या आणि आपली गरज स्पष्टपणे जाणलेल्या व्यक्तींचे निर्णय असतात. या वयातील लग्नामागे शारीरिक आकर्षणापेक्षा मानसिक, भावनिक आधार आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात सुखदुःख वाटून घेण्याची भावना अधिक महत्त्वाची असते. काही वेळा या जोडप्यांमध्ये दोघेही आपल्या आयुष्यातील अनेक संघर्ष पार केलेले असतात. त्यांना प्रेम आणि सहवास या शब्दांचे अधिक खोलार्थ ठाऊक असतात. म्हणून ते अपेक्षा ठेवत नाहीत, पण एकमेकांसोबत राहतात. ते मागणी करत नाहीत, पण समजून घेतात. ही परिपक्वता समाजाने ओळखली पाहिजे.

परंतु दुर्दैवाने, समाज अजूनही अशा लग्नांकडे संशयाच्या नजरेने पाहतो. विशेषतः जर स्त्रीने पन्नाशीनंतर दुसरे लग्न केले तर तिच्यावर अनेक अपमानास्पद टिप्पण्या केल्या जातात. “इतक्या वयात हे शोभतं का?”, “मुलांना काय तोंड दाखवणार?” अशा वाक्यांनी तिच्या निर्णयाला उठवळ ठरवले जाते. पती गमावलेली स्त्री एकटी राहून कर्तव्यपूर्ती करताना समाजाला अभिमान वाटतो, पण तीच स्त्री स्वतःच्या गरजांसाठी निर्णय घेतल्यास तिला अश्लील, आत्मकेंद्रित समजले जाते. हे दुहेरी मापदंड स्त्रियांना शोषणाच्या चक्रातून बाहेर येऊ देत नाहीत. या संदर्भात, विवाह म्हणजे केवळ संततीसाठी नव्हे, तर सोबत मिळवण्यासाठीदेखील असतो, हे समजणे अत्यंत गरजेचे आहे. वृद्धापकाळात भावनिक संवाद, दैनंदिन आयुष्यातील सहभागीपणा, आजारपणात आधार देणारा व्यक्ती, या सगळ्या गोष्टी जीवन सुसह्य बनवतात. याचे महत्त्व त्या लोकांना अधिक कळते जे एकाकी राहून मानसिक खिन्नतेचा अनुभव घेत असतात. मानसिक आरोग्याचा विचार केल्यास, अशा जोडप्यांना समाजाने प्रोत्साहन द्यायला हवे.

आजकाल विवाहसंस्थेचे स्वरूपही बदलले आहे. प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह, समलैंगिक विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप, या गोष्टी समाजात नुसत्या चर्चेपुरत्याच सीमित राहिलेल्या नसून प्रत्यक्षात असे संबंध घडताना दिसत आहेत. अनेक जोडपी विवाह न करताही एकत्र राहण्याचा निर्णय घेत आहेत. काहीजण मूल नको असेही ठरवतात, तर काहीजण मूल दत्तक घेतात. ही सगळी स्थित्यंतरे विवाहसंस्थेचा मूळ हेतू ‘केवळ मूल जन्माला घालणे’ नव्हे, तर परस्पर सहजीवन आहे, हे अधोरेखित करतात. आजची पिढी शिक्षित आहे, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे आणि मानसिकदृष्ट्या अधिक सजग आहे. त्यामुळे ती विवाहाकडे एक विकल्प म्हणून पाहते, बंधन म्हणून नव्हे. ही पिढी सहजीवन, एकमेकांप्रती आदर आणि भावनिक आधार या गोष्टींना अधिक प्राधान्य देते. परिणामी, केवळ मूल व्हावं म्हणून लग्न करायचं, किंवा मूल होणार नाही म्हणून लग्न नको, हा विचार त्यांना कालबाह्य वाटतो. शिवाय, विज्ञान व वैद्यकीय प्रगतीमुळे आज पन्नाशीच्या पुढेही मूल होणे शक्य आहे. पण मुद्दा केवळ मूल होऊ शकते का याचा नाही. मुद्दा असा आहे की मूल होणं ही विवाहाची अपरिहार्य गरजच का असावी? काही जोडप्यांना मूल नको असते, असा त्यांनी त्यांच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतलेला असतो. काही जोडप्यांना मूल होऊ शकत नाही; पण त्यांचे नातेसंबंध अत्यंत दृढ असतात. काही जोडप्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात सुखदुःख साथ देणारा सहचर हवा असतो, ते त्यांचं वैयक्तिक आणि भावनिक स्वातंत्र्य असतं. या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यास, लग्नाच्या व्याख्येचे बंधन सैल होते आणि अधिक मानवी दृष्टिकोनातून आपण या संस्थेकडे पाहू शकतो.

थोडक्यात, पन्नाशीनंतर केलेलं लग्न म्हणजे मूर्खपणा नाही, तर एक समजूतदार निवड आहे. ती निवड समाजाने मान्य केली पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. कारण, एकटेपणा, मानसिक खिन्नता, आणि सामाजिक उपेक्षा या समस्यांना सामोरे जाण्यापेक्षा परस्पर सहजीवनाचा मार्ग अधिक सुसंवादी आहे. आजच्या काळात, विवाह ही व्यक्तिनिष्ठ, परिपक्व निर्णय घेणाऱ्या व्यक्तींची संकल्पना आहे. ती केवळ अपत्योत्पत्तीची संस्था न राहता, मनुष्यस्वभावाच्या गूढतेचा एक भावनिक व सामाजिक प्रतिसाद आहे. म्हणूनच, वय कितीही असो, लग्नाची गरज कितीही वेगळी असो, ती गरज खरी असेल, परिपक्व असेल, तर त्या लग्नाला अर्थ आहे आणि त्या अर्थाला समाजानेही मान्यता द्यायला हवी. तुम्हाला काय वाटते?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted