सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ “पाऊस अंगणातला-पाऊस मनातला” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
व्हाट्सअप वर एक छान संवाद वाचण्यात आला पावसाबरोबरचा. एक माणूस पावसाला विचारतो’ “पावसा ‘पावसा तुझे वय किती? ” पावसाने छान उत्तर दिले” जर तू पावसात भिजत ;नाचत असशील तर माझे वय दहा वर्षे. जर तुला कविता सुचत असतील तर मी अठरा वर्षाचा. जर ट्रेकिंग ला जावेसे वाटत असेल तर मी वीस वर्षाचा आणि तुला बायकोसाठी गजरा घ्यावासा वाटत असेल तर मी तीस वर्षाचा”स्मित हास्य करून पावसाने उत्तर दिले. तू जसा अनुभवशील तेच माझे वय असेल.
प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या कारणासाठी पाऊस आवडत असतो. काहींना तो रोमँटिक वाटतो तर शेतकऱ्याला अमृतधारा वाटतो.
तसे पाहता प्रत्येकाला पाऊस आवडतोच. बालवयात मुलांना पावसात भिजायला, साठलेल्या पाण्याचे शिंतोडे इतरांच्या अंगावर उडवण्यात मजा वाटते मग त्यांचे बूट मोजे ओले झाले तरी त्यांना त्याचे भान नसते.
वय वाढत जाईल तसा पावसाचा आनंद वेगवेगळ्या वळणावर भेटत राहतो. धो धो पावसात मित्राबरोबर आईस्क्रीम खाण्यात मजा वाटते आणि घरी भिजून आल्यावर उबदार कपडे घालून गरम गरम भजी खाताना आनंद द्विगुणीत होतो. वर्षा सहली भिजताना तर वेगळीच अनुभूती मिळते.
आपल्या थेंबाने चातकाची भूक भागवणारा, मयूराला नाच करण्यास उद्युक्त करणारा पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो.
अंगणात पाणी साचले की छान वाटतं, अंगणातील झाड -वेली न्हाऊ -माखु घातलेल्या लेकरासारख्या टवटवीत दिसतात. पक्षी कुडकुडत वळचणीची जागा शोधतात. नदी नाले पाण्याने तुडुंब भरून वाहतात, डोंगरातून पांढरे शुभ्र धबधबे खाली येतात तेव्हा डोळ्याचे पारणे फिटते. झोपडीत पाणी गळत असले तरी पीक हाती येणार या विचाराने शेतकरी सुखावतो.
असा हा पाऊस सृष्टीला हिरवा शालू नेसवणारा, धरणी मातेला सृजनाचं समाधान देणारा, प्रत्येकाची तृष्णा भागवणारा आणि मनाला सुखावून टाकणारा असतो. पावसाने येणारा मृदगंधाने चित्त वृत्ती उल्हासित होतात पण जेव्हा तो रौद्ररूप धारण करतो तेव्हा माळीन सारख्या गावाचे होत्याचे नव्हते होते तेव्हा पुढील कविता मनात येते
☆
इकडे तिकडे चोहीकडे
संतत पडती पाऊस धारा
रानं गावं जलमय झाली
गुराढोरांना नाही निवारा… १
*
अरे पावसा असा कसा रे
थैमान घालून आलास
घरदार गेलं वाहून
हातचं पीक गेलं कुजून.. २
*
रस्त्यात कोसळल्या दरडी
वाहतुकीची झाली कोंडी
भिंत घराची कोसळली
कुटुंब गेलं गाडलं खाली… ३
*
शेतकरी राजा चिंतित
पावसा थांबव. हाहाःकार
बळी राजाला बळ दे
करून जरा सहकार… ४
☆
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




