श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “छोट्या रेषा मोठ्या रेषा” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

आमच्या घरचं वातावरण अस्सल मराठी. आधीच्या पिढ्या मराठी शाळेत, मराठी माध्यमातूनच शिकल्या. आम्हीही मराठी माध्यमातूनच शिकलो. पुढची पिढी सुद्धा मराठी माध्यमातूनच शिकतेय. तीही अगदी अभिमानानं.. घरात भरपूर मराठी पुस्तकं, आजही आकाशवाणीचं नित्य श्रवण, मराठी सणवार मराठी पद्धतीनंच साजरे होणारं आमचं घर. घरातले सगळे व्यवहारासाठी उत्तम हिंदी आणि इंग्रजी बोलत, वाचत, लिहित असले तरीही प्रेम मात्र मराठीवरच. हरिवंशराय बच्चन, कवी प्रदीप, नरेंद्र शर्मा, मैथिलीशरण गुप्त, मुन्शी प्रेमचंद यांचं साहित्य आम्हाला सगळ्यांनाच प्रिय असलं तरीही कुसुमाग्रज, वसंत बापट, विंदा, शांताबाई, शन्ना, भा. रा. भागवत, गोनिदा, पुलं यांच्यावर आमचा लोभ अधिक.. ! शेवटी तुमची नाळ जिथं, तुमचं आंतरिक प्रेमही तिथंच.. !

माझा मुलगा लहान होता तेव्हा, मराठी भाषेतली कार्टून्स मिळतात का, ते शोधत होतो. ॲनिमेटेड गाणी मिळाली, गोष्टी मिळाल्या, पण खास मराठी कार्टून मिळालंच नाही. अगदी लहान मुलं सुद्धा हिंदी कार्टून्स पाहतात, हिंदी गाणी ऐकतात. त्यांच्याशी नुसत्या गप्पा मारल्या किंवा त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या गप्पा ऐकल्या की, त्यात मराठी, हिंदी, इंग्लिश, मिंग्लिश, हिंग्लिश अशा अनेक प्रकारची शब्दसंपदा सापडेल. आता मुलांना शाळेत “मधली सुटी” नसते, “ब्रेक” असतो किंवा “रिसेस” असते. “कवायत” नसते, “पिटी” असते. “पाढे” नसतात, “टेबल्स” असतात. “शाळेचा डबा” नसतो, “टिफीन किंवा लंचबॉक्स” असतो. “निकालाचा दिवस” नसतो, “ओपन डे” असतो. “पालकसभा” नसते, “पीटीएम” असते. वर्गात “बाई” शिकवत नाहीत, “टीचर किंवा मिस” शिकवतात. “पाठ्यपुस्तक” नसतं, “टेक्स्ट” असतं. “गृहपाठ” नसतो, “होमवर्क” असतो. “शिकवणी” नसते, “कोचिंग क्लास किंवा ट्युशन” असते. शाळेत “असेम्ब्ली” असते, त्यात “प्रेअर” असते. इतकंच काय, ती खेळायला जात नाहीत, ग्राउंड ला जातात. त्यांना “कंटाळा” येत नाही, त्यांना “बोअर” होतं.

आजकाल लोक “भेळवाल्याकडे” जात नाहीत, तो “चाट वाला” असतो. “मधल्या वेळचं खाणं” नसतं, त्याला “टी टाईम स्नॅक्स” म्हणतात. “शेंगदाण्याची चिक्की” नसते, तिला “न्यूट्री बार” म्हणतात. “धिरडं” म्हणायचं नाही, त्याला “चिला” म्हणायचं. “फोडणी” म्हणायचं नाही, “तडका” म्हणायचं. “गोंदवण” म्हणायचं नाही, “टॅटू” म्हणायचं.

सर्दी-पडसं झाल्यावर “वाफ” घेत नाहीत, “स्टीम” घेतात. हॉटेलात गेल्यावर तर विचारूच नका. “थंड पाणी” मागत नाहीत, “चिल्ड वॉटर” लागतं. “मेन्यू कार्ड” मागतात, “सूप वन बाय टू” सांगतात, “भाजी” ऐवजी “सब्जी” मागतात, “भाकरी” मागवत नाहीत, “जोवार रोटी” मागवतात. शेवटी “फिंगर बाऊल” आहेच. “पोट तुडुंब भरलं” म्हणत नाहीत, “बल्की झालं” असं म्हणतात.

“खरेदी” नसते, तिला “शॉपिंग” म्हणतात. “वाण्याचं दुकान” नसतं, “सुपर मार्केट” असतं. “इस्त्रीवाला” नसतो, “लॉन्ड्रीवाला” असतो. “औषधाचं दुकान” नसतं, “मेडिकल स्टोअर” असतं. “कपड्यांचं दुकान” नसतं, “शोरुम” असतं. गणपतीची वर्गणी नसते, डोनेशन असतं. शाळांमध्ये “आषाढीची दिंडी” नसते, “आषाढी सेलिब्रेशन” असतं. गणपती फेस्टीव्हल असतो.

“साखरपुडा” नसतो, “रिंग सेरेमनी” असतो. “प्री वेडिंग शूट” असतं. “पंगत” नसते, “बुफे” असतो. जेवणात “दहीभात” नसतो, “कर्ड राईस” असतो. “जीरा राईस – दाल तडका” असतो. “भजी” नसतात, “पकोडे” असतात. व्हेज भूना, मसाला बेंगन, व्हेज अद्रकी, व्हेज मराठा, व्हेज दिलबहार, नर्गिसी कोफ्ता असली नावं असतात.
मराठी लग्नात मराठी गोड पदार्थ नसतातच, बंगाली स्वीट असतं.

आता तर “उपवासाचा फराळी चिवडा” म्हणणंसुद्धा संपलंय, “फलाहारी चिवडा” असं म्हणायचं म्हणे. “शेवपुरी दहीपुरी” नं तर त्यांचं इंग्रजी नामांतर केव्हाच स्वीकारलं आहे, त्या स्वतःला “एस्पीडिपी” असं मोठ्या झोकात म्हणवून घेतात. पाणीपुरी खाल्ल्यावर लोक ‘सुखी पुरी’ मागतात. मराठी पाणीपुरी वाल्याला सुद्धा “थोडा प्याज देना और तिखा पुरी बनाना भैय्या” असं म्हणतात.

आकाशवाणी आणि दूरदर्शन सोडलं तर शुद्ध मराठी भाषा माध्यमं सुद्धा वापरत नाहीत. एफ एम चॅनल्स चं मराठी तर अगाध असतं. बाकी ‘तो व्यक्ती, तो पेन, ती बुक’ हे तर ऐकून ऐकून कान किटले. “मिळालं, सापडलं आणि भेटलं” यांच्या वापराचा घोळ तर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पत्ता भेटला, मोबाईल भेटला, मार्क भेटले, जागा भेटली, तिकीट भेटलं, मार्कलिस्ट भेटली, निकाल भेटला, जेवण भेटलं, पाणी भेटलं, नाश्ता भेटला, कपडे भेटले, पार्सल भेटलं, कुरिअर भेटलं… औषध भेटतं, कॅब भेटते, ऍडमिशन भेटते.. पासवर्ड भेटतो, पैसे भेटतात, कर्ज भेटतं.. देवा रे देवा… !

आमच्याकडचे सणसुद्धा आता मराठीपण सोडून पल्याड निघालेत. अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा जेवणात पनीर? लग्नात सुद्धा नवरदेव मराठी पोशाख करत नाही. शेरवानी, जोधपुरीची चलती.. आता मराठी लग्नात पाठवणी होत नाही, बिदाई होते. राखीपौर्णिमेला राख्या सुद्धा डोरेमॉन, मिकी माऊस, टॉम अँड जेरी च्या मिळतात. पण पांडुरंगाची राखी मिळत नाही, शिवाजी महाराजांची राखी मिळत नाही, भगव्या झेंड्याची राखी मिळत नाही. महाराष्ट्रातल्या शाळेत आता हरतालिका, भोंडला, श्रावण शुक्रवार, पिठोरी अमावस्येचा मातृदिन होत नाही. पण ख्रिसमस होतो. गणपतीला पाच दिवस सुट्टी मिळत नाही, पण ख्रिसमसला पाच दिवस सुट्टी मिळते.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ आजही लाखो मराठी घरातून पाहिला जातो. मराठी बिग बॉस किंवा कॉमेडी शो यांनी मराठीची शोभा वाढवली आहे की हसं केलं आहे? ‘नक्षत्रांचे देणे’ सारखा दर्जेदार मराठी कार्यक्रम पुन्हा का होत नाही? मराठी वाहिन्यांवर ‘संतवाणी’ का लागत नाही? सह्याद्री वाहिनी वर पूर्वी संध्याकाळी प्रक्षेपण सुरु होताना संतवाणी लागत असे. मराठी वृत्तनिवेदक शुद्ध मराठीत बातम्या देत असत. एखादा शब्द चुकला तरी त्याक्षणी ‘माफ करा’ असं म्हणत. आता मराठी महिन्यांवर मराठीचाच आग्रह धरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ‘सावरकर नायक की खलनायक?’ असे कार्यक्रम मराठी संपादकच करतात. नाना पाटेकरांसारखा एखादा अपवाद वगळता, एकही तरुण मराठी सेलिब्रिटी अस्खलित मराठीत मिडियाशी बोलत नाही. दर वाक्यात भरमसाठ इंग्रजी शब्द.. ! कुठल्याही मराठी चित्रपट सोहळा किंवा मराठी वाहिन्यांचे पुरस्कार सोहळे पहा. कितीजण अस्सल मराठी पोशाखात पुरस्कार स्वीकारतात त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला उत्तर मिळेल.. !

अहो, उन्हाळ्यात आंब्याची खोकी सुद्धा इंग्रजी भाषेतली असतात. व्यापारी मराठी अन् मालाची खोकी मात्र इंग्रजी.. चितळे बंधूंची बाकरवडी इंग्रजी भाषेतल्या वेष्टणात मिळते. मॅगीचं पॅकिंग आजही इंग्रजीच आहे. त्यावर मराठी भाषा कुठंय? हल्दीराम चं उत्पादन महाराष्ट्रातच होतं, पण पॅकिंग मात्र पूर्ण इंग्रजी भाषेतच.. !

मराठी सिनेमे, मराठी जाहिराती, मराठी मालिका, मराठी अपार्टमेंट्सची नावं सगळीकडं मराठीचा लोपच दिसेल. “वरण भात लोनच्या अन् कोण नाही कोनच्या” असला मराठी चित्रपट करणाऱ्या मराठी माणसाला मराठी भाषा, मराठी संस्कृती याविषयी एक शब्द तरी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? हे सगळं शांतपणे, साकल्याने पाहिलं म्हणजे, आपल्या जीवनशैलीतलं मराठीपण हळूहळू कसं, कुठं आणि कुणामुळं सुटत चाललं आहे, हे लक्षात येईल.

मराठी टिकवायची असेल, जोपासायची असेल, समृद्ध करायची असेल तर, मराठीतून विचार करायला शिकवलं पाहिजे. मराठी वाचन वाढवलं पाहिजे. एकमेकांशी मराठीत बोललं पाहिजे. अभ्यासक्रमात हिंदी असो, इंग्रजी असो किंवा अन्य भाषा असो, कितीही पुस्तकी शिकवलं तरी कुठलीच भाषा मातृभाषेची जागा घेऊ शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे.

स्व. लता मंगेशकरांच्या सुरुवातीच्या काळातली आठवण आहे. त्यांचं गाणं ऐकल्यावर अभिनेते दिलीपकुमार असं म्हणाले होते की, “इस की आवाज से मराठी दाल भात की बू आती है”. लतादीदींनी त्यानंतर हिंदी उच्चारणात इतकं नैपुण्य प्राप्त केलं की, अख्खी हिंदी चित्रपटसृष्टी त्यांच्या आवाजापुढं नतमस्तक होऊन उभी होती. भाषा आत्मसात करायची असते ती अशी.. !

हिंदी भाषेच्या सक्तीमुळे जर मुलं मराठीचा संस्कार विसरणार असतील, तर मग पहिलीपासून इंग्रजीची सक्ती का केली आहे? की, हिंदीसाठी आणि इंग्रजीसाठी वेगवेगळा न्याय आहे? पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केल्यामुळे मुलं मराठीचा संस्कार विसरणार नाहीत का? जेव्हा मराठी मुलं फास्टर फेणे वाचण्याऐवजी हॅरी पॉटर वाचतात, तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला सुरुवात होते. रस्त्यावर, चौकात बाईक आडवी लावून त्यावर केक ठेवून वाढदिवस साजरा होताना इंग्रजी शुभेच्छा दिल्या जातात, तेंव्हा मराठीचा संस्कार पुसट होतो. मराठी माणसं दारात रांगोळी काढण्याऐवजी रांगोळीचं स्टिकर लावतात, रेडीमेड गुढीचं वस्त्र, नाडीचं किंवा इलास्टिकचं सोवळं, रेडीमेड नऊवारी साडी विकत आणतात, तेव्हा तिचं वरवरचं रुप जरी सोयशास्त्राचं असलं तरीही वास्तव मात्र मराठीपण न शिकल्याचंच असतं. गणपती उत्सवात आरती सुद्धा रेडीमेड म्युझिक सिस्टिमवर लावतात, दसऱ्याची पाटीपूजा विसरतात, ऐन दिवाळीत घराला कुलूपं लावून ट्रिपला जातात, घरातली संध्याकाळची शुभंकरोती बंद होते, तेंव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो. पिठलं भाकरी खाण्यासाठी जेंव्हा हॉटेल गाठायला लागतं, तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो.

ज्या दिवशी आपण सगळी मराठी माणसं फोनवर बोलताना हॅलो ऐवजी राम राम किंवा नमस्कार म्हणायला लागू, आपला वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला लागू, घरांची दारं उघडी ठेवायला लागू, घराघरात ज्ञानोबा तुकोबांचे अभंग ऐकले- म्हटले जातील, नित्य हरिपाठ होईल, सणावाराला अकरा अकरा आरत्या अख्खं कुटुंब एका सुरात म्हणेल, जेवणाची सुरुवात “वदनी कवळ घेतां” म्हणून होईल, शुभकार्याच्या पत्रिका फक्त मराठी भाषेतूनच छापल्या जातील, तेंव्हा मराठी पुन्हा रुजायला लागेल, तिला नव्यानं पालवी फुटेल.

मराठी घरांमधल्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः हरी तात्या, चितळे मास्तर व्हायला सुरुवात केली की, त्रिभाषा सूत्र असो किंवा बहुभाषा सूत्र, मराठी तिच्या स्थानी अढळ राहील. “ये रे पावसा” पासून ते मोरोपंतांच्या आर्यांपर्यंत मुलांपर्यंत प्रत्यक्ष शिक्षकांच्या, पालकांच्या मुखातून पोचेल, तेंव्हा मराठी टिकेल. मराठी कुमार साहित्य अधिकाधिक निर्माण होईल, तेव्हा मराठीचा पाया सिंधुदुर्गासारखा भक्कम होईल. मराठी कुटुंबं अडलॅब्स इमॅजिका ऐवजी शिवसृष्टी, झपूर्झा पहायला जातील, तेव्हा मराठीचा संस्कार ठळक होईल.

जेंव्हा आपल्याला आपलं स्वत्त्व, तत्त्व आणि सत्व टिकवायचं असतं ना, तेंव्हा स्वतःच्या रेषा ठळक करायच्या असतात, मोठ्या करायच्या असतात. दुसऱ्यांच्या रेषा खोडत बसायच्या नसतात. आपली रेषा मोठी करण्याचं तंत्र आणि मंत्र आपल्याला उमगलं असेल तर चिंतेचं कारणच काय?

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted