श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “नांव, यादी, पुरावा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
सध्या चर्चा, आरडाओरड सुरु आहे ती नावं वगळण्यावरुन. यात नांंव का वगळलं… असं विचारणारे आणि तसं सांगणारे दोघंंही आपली बाजू मांडतांना दिसतात.
पण माझ्याबाबतीत नांव असणं किंवा वगळणं हे काही विशेष नाही. पण नावाचा पुरावा देणं हे एक वेगळंच प्रकरण आहे. म्हणजे काहीवेळा नांव यावं म्हणून पुरावा द्यावा लागला, तर काही वेळा नांव वगळण्यासाठी.
हवं तिथून माझं नांव वगळलं जाण्याचा आणि नको तिथे असण्याचा माझा अनुभव बराच जुना आहे. म्हणजे बराच आहे, आणि जुनासुध्दा आहे. बर्याच चांगल्या ठिकाणी माझं नांव वगळलं गेलं आहे, तर नको त्या ठिकाणी आपलं नांव वगळलं जावं असं वाटत असतांना ते आलं आहे.
मी माझं नांव यावं म्हणून जिथेजिथे प्रयत्न केले तिथे ते आलंच नाही. आणि मी प्रयत्न करतोय असं वाटलंच नाही तिथे मात्र माझं नांव न देतासुध्दा आलं आहे. त्यामुळे नांव येण्यासाठी प्रयत्न करावेत का सोडून द्यावे यातच गोंधळ होतो. आणि अशा गोंधळामुळेच काही ठिकाणी माझं नांव वगळलं जातं.
बर्याच कार्यक्रमात, अगदी घरगुती कार्यक्रमात सुध्दा, जबाबदार माणसांच्या यादीतून माझं नांव वगळतात. वरवर या वयात तुला काय जबाबदारी द्यायची असं म्हणत असले तरी माझ्याकडून होणारा गोंधळ नको असतो.
लांबच्या प्रवासात सुध्दा मित्र अगोदर माझं नांव वगळतात. पण मग गाडीत एक जागा आहे असं लक्षात आल्यावर माझं नांव घेतात.
शाळेत स्कॉलरशिपची परीक्षा, दहावीची परीक्षा आणि नंतर अनेक परीक्षा अगदी नौकरी मिळवण्याच्या सुध्दा. यात विशेेष प्राविण्य मिळवणार्यांच्या यादीतून माझं नांव वगळलंच गेलं. पण मला त्यात काही विशेष वाटलच नाही. माझं नांव वगळलं म्हणूनच दुसर्याच आलं हिच भावना मनात होती.
एकदा तर पात्रता नाही म्हणून माझं नांव परीक्षा अर्ज भरतानांच वगळलं होतं. त्यामुळेच परीक्षेनंतर ऊत्तीर्ण होणाऱ्याच्या यादितूून माझं नांव वगळण्याचा त्यांचा त्रास कमी झाला.
पण शाळेत दंगा केला, घरचा अभ्यास केला नाही, यापासून नोकरीच्या ठिकाणी ऊशीरा येणं, जास्त रजा घेणं, काम वेळेत पूर्ण न करणं यासारख्या अनेक ठिकाणी अनेक वेळा नांव वगळलं म्हणून नाही, तर माझं नांव का घेतलं यासाठीच मला आरडाओरड करावीशी वाटत होती.
मोठेपणी शिधापत्रिका, मतदार यादी, गाडी चालवायचा परवाना या सारख्या ठिकाणी माझं नांव याव म्हणून वेगवेगळी कागदपत्र भरून मला त्याबद्दल काही पुरावे पण जोडावे लागले. आणि शाळेत दंगा करतांना मी खरंच नव्हतो, किंवा अभ्यास केला होता पण पाटी पुसली गेली याचे पुरावे देत नांव वगळण्यासाठी धडपड होती.
प्रवासाला जातांनासुध्दा रिझर्वेशनच्या यादित बर्याचदा माझं नांव सुरुवातीला प्रतिक्षा यादितच येतं. आणि मगच ते कन्फर्म करतात. माझ्या नावाच्या बाबतीत ते सुध्दा सावधपणे वागतात. आणि मग तिथेही नांव येणार का वगळणार याची प्रतिक्षा असते. पण तिथे सुरुवातीपासून नांव येतं मग ते प्रतीक्षा यादित का असेना यातच आनंद असतो.
त्यामुळे नांव येण्यासाठी किंवा वगळण्यासाठी पुरावा लागतो इतकेच समजलं. नांव येण्यासाठी किंवा वगळलं जाण्यासाठी काय करावं याचा एखादा झटपट (क्रॅश) कोर्स आहे का याचाही शोध घेतोय.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




