श्री जगदीश काबरे
☆ “Self-deception म्हणजे काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆
“Self-deception” म्हणजे स्वतःची फसवणूक करणे किंवा स्वतःलाच चुकीचा विश्वास खरा आहे असे पटवून देणे होय. पण हे फक्त नैतिकदृष्ट्या चुकीचे वर्तन नसून, माणसाच्या मेंदूतील ती एक अतिशय गुंतागुंतीची संरक्षण यंत्रणा आहे. जेव्हा सत्य माणसाला भावनिकदृष्ट्या त्रासदायक वाटते, तेव्हा त्याचा मेंदू त्या वेदनेपासून स्वतःला वाचवण्यासाठी खोट्या विश्वासांची निर्मिती करतो. म्हणजेच, मेंदूचा एक भाग सत्य जाणतो, परंतु दुसरा भाग ते नाकारतो. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की, व्यक्तीला स्वतःलाही समजत नाही की, तो स्वतःलाच फसवत आहे.
मानवाच्या मेंदूत प्रिफ्रंटल कोर्टेक्स, अमिंग्डाला आणि इंटेरियर सिंग्युलेट कोर्टेक्स हे भाग वस्तुस्थिती तपासणे, भावनांचे नियमन करणे आणि आत्मसन्मान टिकवणे यासाठी जबाबदार असतात. जेव्हा एखादे सत्य आपल्या स्वप्रतिमेला धक्का देणारे असते, तेव्हा अमिंग्डाला मेंदूला भावनिक धोक्याचा सिग्नल देते. त्यामुळे प्रिफ्रंटल कोर्टेक्सचा तर्कशक्तीवरील प्रभाव कमी होतो. या अवस्थेत माणूस तर्क बाजूला ठेवून स्वतःलाच खोटा विश्वास देतो, जसे की “मी काही चुकीचे केले नाही” किंवा “मी अपयशी नाही, परिस्थितीच चुकीची होती. ” त्यामुळे मेंदूतील तात्पुरता भावनिक तणाव टाळला जातो. पण हीच सवय दीर्घकाळ सुरू राहिली तर ती माणसाला वास्तवापासून भरकटवते आणि स्वतःला भ्रमाच्या जाळ्यात अडकवते.
मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट ट्रिव्हर्स यांनी या प्रक्रियेचा उत्क्रांतीदृष्ट्या अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, स्वतःला फसवणे ही माणसाची जीव रक्षणासाठी विकसित झालेली युक्ती आहे. जर आपण आपल्याबद्दल एखादी गोष्ट खरी समजून सांगितली, तर ती सांगताना आपल्यामध्ये खोटेपणाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे इतरांना फसवताना आपण अधिक आत्मविश्वासपूर्ण, खात्रीशीर आणि प्रभावीपणे फसवायला लागतो. मग समाजात काही प्रमाणात स्वतःची फसवणूक करणे हेच त्याला सामाजिक अस्तित्वासाठी उपयुक्त वाटू लागते.
फ्रॉईडच्या मनोविश्लेषणानुसार, स्वतःची फसवणूक ही ego defense mechanism म्हणजे अहंकाराचे संरक्षण करणारी प्रक्रिया आहे. ती माणसाला अपराधभाव, भीती, अपयश आणि आत्मनिंदा यांपासून वाचवते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी नापास झाल्यावर म्हणतो, “मी अभ्यास केला असता तर नक्की पास झालो असतो. ” तो प्रत्यक्षात अभ्यास करत नाही, पण असे म्हणणे त्याला आत्मसन्मान टिकवण्यासाठी आवश्यक वाटते. तसेच एखादी व्यक्ती प्रिय व्यक्तीच्या वागण्यामुळे दुखावली गेली तरी स्वतःला समजावते की, “ती व्यक्ती व्यस्त आहे, म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करते आहे, ती काही रागावलेली नाही. ” हे तर्क खोटे असले तरी माणसांमध्ये भावनिक संतुलन राखण्यासाठी उपयोगी ठरतात.
वैज्ञानिकांनी Functional MRI तंत्राचा वापर करून असे सिद्ध केले आहे की, जेव्हा माणूस स्वतःलाच खोटा विश्वास देतो, तेव्हा मेंदूतील बक्षीस देणारी यंत्रणा म्हणजेच अधोस्ट्रायटम सक्रिय होते. त्यामुळे हा खोटा विश्वासही मेंदूला सुखद वाटतो. म्हणजेच सत्य टाळणे मेंदूसाठी थोडा वेळ आरामदायी ठरते. परंतु कालांतराने ही अवस्था कॉग्नेटिव्ह डीसओनन्स निर्माण करते, म्हणजेच त्यावेळी मनात दोन परस्परविरोधी विचार एकाच वेळी सक्रिय असतात, एक विचार सत्य दाखवत असतो तर दुसरा विचार दुसरा असत्य वा खोटेपणा. या विसंगतीमुळे व्यक्ती गोंधळते, अस्वस्थ होते आणि आत्मभ्रमित होते.
अनेक माणसांमध्ये त्यांनी केलेली स्वतःची फसवणूक आपल्याला अनेक स्वरूपात दिसते. काहीजण पूर्णपणे सत्य नाकारतात, काहीजण चुकीचा तर्क लावून आपल्या म्हणण्याला योग्य ठरवतात, काहीजण स्वतःच्या कमतरता इतरांवर ढकलतात, तर काहीजण फक्त आपल्याला सोयीस्कर असेल अशीच माहितीच स्वीकारतात. या सर्व प्रकारांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे सत्य टाळून स्वतःचे भावनिक रक्षण करणे. ह्यालाच वैज्ञानिक भाषेत “self-deceptive bias” म्हणजे स्वतःलाच फसवण्यासाठी केलेला युक्तिवाद असे म्हणतात.
या प्रक्रियेचे सामाजिक आणि वैयक्तिक दोन्ही परिणाम होतात. अल्प प्रमाणात स्वतःची फसवणूक मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरते, कारण ती आपल्याला भावनिक आघातांपासून वाचवते आणि आत्मसन्मान टिकवते. पण जास्त प्रमाणात ती हानिकारक ठरते. सतत स्वतःलाच खोटा विश्वास देणारा माणूस वास्तवापासून तुटतो, स्वतःच्या चुका दुरुस्त करत नाही आणि नात्यांमध्ये अप्रामाणिकपणाने जगू लागतो. परिणामी, त्याचे निर्णय चुकीचे ठरतात, आत्मविकास थांबतो आणि सत्याशी असलेले नाते कमकुवत होते.
अशी माणसे अर्धवट ज्ञानामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होत आपण अगाध ज्ञानी झालेलो आहोत असे समजत स्वतःलाच फसवू लागतात. तसेच एखादे सामान्यीकरण केलेले विधान आपल्यालाच उद्देशून केले आहे असे समजून ते थयथयाट करू लागतात. यावरून हे स्पष्ट होते की, “Self-deception” म्हणजे केवळ स्वतःची फसवणूक नव्हे, तर मेंदूची एक जटिल भावनिक आणि संज्ञानात्मक प्रक्रिया आहे. ती माणसाला तात्पुरता मानसिक आराम देते, पण ती सत्य नाकारण्याची सवय लावू शकते. या प्रक्रियेचा योग्य वापर म्हणजे स्वतःला भावनिकदृष्ट्या सावरणे, वास्तवाचे भान न हरवणे. जेव्हा आपण स्वतःविषयीचे खोटे वलय नाकारून आणि सत्य स्वीकारून त्यावर उपाय शोधतो, तेव्हाच आपण स्वतःची खरी प्रगती साधतो. अशा प्रकारे स्वतःची फसवणूक ही माणसाच्या मानसिक उत्क्रांतीचा भाग असली तरी तिच्यावर नियंत्रण ठेवणे हेच खऱ्या अर्थाने बौद्धिक प्रामाणिकतेचे लक्षण आहे.
*
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





