प्रा. भरत खैरकर
🌸 विविधा 🌸
☆ इंडियन नाव्हल एव्हिएशन म्युझियम… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
दर दोन वर्षानंतर गोव्याला ह्या ना त्या कारणाने जाणं होतं.. मात्र दरवर्षी तेच ते बीचेस आणि चर्चेस बघून बघून एक प्रकारचा रटाळपणा ह्या टूरला यायचा.. म्हणून वेगळ्या पद्धतीने काही बघता येतो कां? म्हणून ह्या वर्षी मुद्दामच मडगावच्या पुढील एरिया आपण एक्सप्लोर करूया म्हणून पणजी पासून साधारण 40-50 किलोमीटर पुढे गेल्यावर काबो दी रामा फोर्ट, पेबल बीच, पोलोलीम बीच, बॉगमोला बीच, असे एकापेक्षा एक सरस स्थळं आम्हांला मिळाले.. त्यातीलच एक होतं ते “इंडियन नाव्हल एव्हिएशन म्युझियम”!!
हॉलीवुड, बॉलीवुड पिक्चर मधील फायटर एरोप्लेन, हेलिकॉप्टर्स आणि त्यातील यंत्रणा इत्यादी जवळून बघायची असेल तर वास्को मधील बागमालौ या ठिकाणी असलेल्या “इंडियन नावल एव्हिएशन म्युझियम” या संग्रहालयाला नक्की भेट द्या..
गोव्याला गेल्यावर बहुतेक वेळा बीचेस आणि चर्चेस शिवाय खाणे पिणे ह्या पलीकडे आपण अजून काही एन्जॉय करतो असं वाटत नाही.. पण पणजी पासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वास्को मध्ये आशियातील सर्वात मोठे आणि एकमेव असे नावल एव्हिएशन म्युझियम आहे. हे संपूर्ण कुटुंबासह नातेवाईकांसह मित्रांसह बघण्याचे एक अप्रतिम ठिकाण आहे.
ह्या संग्रहालयाचे उद्घाटन १९९८ साली करण्यात आले. इथे आपण भारतीय नौसेनेतून डीकमिशन्ड झालेले म्हणजेच एक प्रकारे रिटायर्ड झालेले.. फायटरप्लेन, एरोप्लेन, हेलिकॉप्टर्स मोठ्या प्रमाणात बघू शकतो..
या संग्रहालयाचे दोन भाग आहेत एक आउटडोर आणि दुसरा इंडोअर ! बाहेरच्या मैदानी भागामध्ये खूप एरोप्लेन, फायटरप्लेन, हेलिकॉप्टर्स, इंजिन्स, इत्यादी ठेवलेले आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने सुपर कॉन्स्टेलेशन विमान! प्रवासी विमान आपण बघू शकतो.. १९५१ ते १९६१ या कालावधीमध्ये ह्या विमानाने कमर्शियल फ्लाईट म्हणून सेवा दिलेली होती होती.. साधारण १३ ते १४ विमाने तसेच तेवढीच हेलिकॉप्टर्स या ठिकाणी आहेत.. त्यात प्रामुख्याने आय एन 083, डोव्ह, सीकिंग एम के 42, शी हॅरीअर, व्हॅम्पायर, आयएस ल्यांडर, किरण, फायरफ्लाय, कमोव 25, बी एक्स748, के ए25, हगेस, इत्यादी हेलिकॉप्टर्स, विमानासह त्या ठिकाणी विविध इंजिन्स, टोर्पिडोज, रडार, मिसाईल, बाॅम्बज, जे फायटर विमानातून किंवा पाणबुडी वरून लॉन्च केले जातात ते आपण बघू शकतो. “इंजिन बे” नावाने असलेल्या विभागामध्ये विविध प्रकारचे इंजिन्स ठेवलेले आहेत. त्यामध्ये रोल्स रॉयल कंपनीने बनवलेल्या भव्य इंजिनांचा समावेश आहे. विमानाचे इंजिन किती किचकट असते हे जवळून बघण्याची ही खूप मोठी संधी आहे कारण इथे इंजिनाचे ‘क्रॉस सेक्शन’ ठेवलेले आहेत.
बाहेर मैदानात असलेला प्रदर्शनी भाग बघितल्यावर इंनडोअर प्रदर्शनासाठी आपल्याला दोन मजली इमारतीत जायचे असते.. इंट्री सुद्धा आपण सबमरीनमध्ये.. पाणबुडी मध्ये प्रवेश करावा.. तशी आहे! खूप कल्पकतेने हे म्युझियम तयार केले आहे.. ह्या ठिकाणी आल्यावर आपण विविध नौदलाच्या सैनिकांचे, माॅरकोसचे पोशाख.. त्यांची आयुधे.. वापरात येणारे इन्स्ट्रुमेंट.. इत्यादी अगदी जवळून बघू शकतो.. ह्या ठिकाणी एक ‘ व्हर्च्युअल रियालिटी कॉर्नर’ आहे, तिथे आपण पाचशे रुपये एक्स्ट्रा देऊन दहा मिनिटांसाठी पाणबुडीच्या आतील अनुभव वर्चुअली घेऊ शकतो.
१९४७ पासून इंडियन एव्हिएशनची सुरुवात ते २०२३ पर्यंतचा सर्व इतिहास संग्रहालयात आपण बघू शकतो.. नौसेनेने गोवा मुक्ती संग्रामात बजावलेली महत्त्वाची भूमिकाही आपण या ठिकाणी इतिहास रूपात पाहू शकतो.. विविध ऍडमिरल्स आणि त्यांच्या काळात झालेल्या मोहिमा यांची माहिती चित्ररूपात आणि काही फोटो टाईप वापरून या ठिकाणी मांडण्यात आली आहे.
‘श्रद्धांजली’ नावाचा विभाग बघितल्यावर नौदलाने केलेल्या शौर्याची… पराक्रमाची.. दिलेल्या बलिदानाची.. आपल्याला ओळख होते. विविध लढाया, त्यांची माहिती, नौदलाने विविध चक्रीवादळांमध्ये.. नैसर्गिक आपत्तीमध्ये समुद्रात केलेल्या मोहिमा.. लोकांचे वाचविलेले जीव.. इत्यादी बघून पाहणारा चकित होतो.. ह्या ठिकाणी विराट, विक्रमादित्य आणि विक्रांत या विमानवाहू जहाजांच्या रिप्लीका म्हणजे प्रोटोटाईप खूप सुंदर प्रकारे तयार करून ठेवलेल्या आहेत.. बाहेर निघण्याआधी सर्व प्रकारच्या विमानांचे छोटे छोटे प्रोटोटाईप व माहिती बघण्याजोगी आहे. पूर्ण प्रदर्शन बघून झाल्यावर दहा मिनिटांचा “नौदल शो” व्हिडिओ रूपामध्ये आपण एका छोट्याशा थिएटरमध्ये बघू शकतो.. हा शो बघणे म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय नौदल आणि त्यांचा आजवरचा इतिहास समजावून घेणे आहे.
ज्या पालकांना आपल्या मुलांनी देशाभिमानी व्हावं शिवाय सैन्यामध्ये भरती व्हावं असं वाटत असेल तर गोव्याला गेल्यावर नक्की ह्या संग्रहालयाला भेट द्यावी… अन्य लोकांनी आपले सैन्यदल किती मेहनत करून आपणां सर्वांचे रक्षण करते हे बघणे गरजेचे आहे त्यासाठी गोव्यात गेल्यावर एक दिवस काढून इथे नक्की भेट द्यावी असे वाटते..
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






