दीप्ती कोंदड कुलकर्णी
विविधा
☆ ज्ञान… ☆ दीप्ती कोंदड कुलकर्णी ☆
‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते?‘ खरोखर, ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. ज्ञानाच्या शाखा अमर्याद आहेत. ज्ञान लिपीतून, चित्रातून, लिखित स्वरूपात किंवा अगदी मौखिक स्वरूपात सुद्धा दिले जाते. पूर्वीची सर्व ग्रंथसंपदा संस्कृत भाषेत आहे. कारण संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. लॅटिन सुद्धा पुरातन भाषा आहे. आपले धर्मग्रंथ संस्कृत भाषेत आहेत तसेच प्राकृत भाषेतही आहेत. अलीकडे मात्र इंग्रजी (आंग्ल) भाषेला “Window of the World” म्हणतात. म्हणजे जगातील कोणत्याही देशाशी संवाद साधताना इंग्रजी भाषेचा सर्रास उपयोग केला जातो. आपण अनेक भाषांतून विविध देशातील ज्ञानाचा प्रसार होत असलेला पाहतो. इतिहास, भूगोल, कृषी, क्रीडा, उद्योग, वाणिज्य, वैद्यकशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कुंभारकला, चित्रकला, युद्धकला, शस्त्रनिर्मिती, वस्त्रविणणे, नाट्यशास्त्र, छायाचित्रण, इ. अनेक विषयांचे ज्ञान घ्यायचे म्हटले तर आपला जन्म अपुरा पडेल इतके ज्ञानाचे साठे अमर्याद आहेत.
पूर्वी मौखिक परंपरेनुसार गुरूकडून शिष्य ते पुढील पिढीपर्यंत असे ज्ञान पठण करून पोहोचवित. भूर्जपत्रावर लेखन करणे सुरू झाल्यानंतर ग्रंथनिर्मितीस प्रारंभ झाला. या लेखनानंतर मोडी लिपी किंवा पुढे मोडीचा वापर सुरू झाला. पूर्वी गुरूपदावर विराजमान झालेली व्यक्ती ज्ञानी, अनुभवी व विविध विषयात पारंगत असे. आजही शाळा व महाविद्यालयात अनेक पदव्या प्राप्त केलेले शिक्षक, प्राध्यापक आपण पाहतो. आज संगणकावर, मोबाईलवर, लॅपटॉपवर कोणत्याही विषयाचे अगदी अद्ययावत ज्ञान क्षणात मिळू शकते;
ही एक प्रकारची क्रांतीच आहे. खरी ज्ञानी व्यक्ती ही अहंकाररहित आणि विनम्र असते. याउलट ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या न्यायाने अनेक क्षेत्रातील ज्ञानातील थोडे थोडे मोजके ज्ञान असणारी व्यक्ती अहंकारी असू शकते.
मूलभूत ज्ञान मिळवून निरनिराळ्या साहित्यकृती निर्माण करून अनेक लेखक, संत आज अजरामर झालेले आपण पाहतो. कालिदासांचे ‘अभिज्ञान शाकुंतल’ भारतातच नव्हे तर जर्मनी व इतर देशात गाजले आहे. शेक्सपिअर ची लोकप्रियता जगन्मान्य आहे. ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचे अनेक भाषात भाषांतर झाले आहे. महाभारतास तरी ‘व्यासोच्छिष्टं’ असे म्हणतात कारण असा एकही विषय नाही की ज्याचा उहापोह महाभारतात झाला नाही. व्यासांनी सांगितलेले महाभारत साक्षात श्रीगणेशाने लिहून घेतले आहे.
दिल्याने वाढते ते ज्ञान आणि जे घेतले जात नाही ते अज्ञान असे म्हणणे अगदी योग्य ठरेल. ज्ञानाचा उपयोग करून व्यक्ती उच्च पदी विराजमान होते. ज्ञानामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते. पूर्वी ज्ञानसंपन्न अशा व्यक्तींना राजाश्रय मिळत असे. आजशी ज्ञानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणून ज्ञान हा माणसाला तिसरा डोळा आहे, असे म्हणतात.
© दीप्ती कोंदड कुलकर्णी
हैदराबाद
मो.नं. ९५५२४४८४६१
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





