प्रा. भरत खैरकर
🌸 विविधा 🌸
☆ प्राचीन कोकण… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
मागील कित्येक वर्षे कोकणात गणपतीपुळेला जाणं होतय.. साधारणतः २५-३० वर्षांपूर्वीचा कोकण आणि अलीकडच्या दशकातला कोकण फारच बदललेला आहे.. “पर्यटनातून रोजगाराची निर्मिती” तयार झाली आहे आणि ह्याच एक छानसं उदाहरण नुकत्याच गणपतीपुळेच्या झालेल्या भेटीत सापडलं..
गणपतीपुळ्याच्या बाजूलाच असलेल्या मालगुंड येथे कवी केशवसुतांचं घर व प्राचीन कोकण संग्रहालय ही दोन ठिकाणं मला खूप स्पर्शून गेली.. एवढी वर्षे कोकणात येऊन नुसते किनारे फिरून.. मासे खाऊन.. कोकणी माणूस समजून घेतला नव्हता..! पण प्राचीन कोकण संग्रहालयातील गाईड असलेल्या मुलीने जो कोकण समजावला तोच सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे..
संग्रहालयात प्रवेश करतानाच ज्याच्या त्याच्या ‘जन्मनक्षत्रा’नुसार त्या त्या व्यक्तीचे ‘आराध्यवृक्ष’ इथे बघायला मिळतात.. पिंपळपाराची पार जुनी परंपरा आपण येथे बघू शकतो.. प्रवेशगुहेच्या आधी अलीकडचा कोकण आणि आतमध्ये प्राचीन कोकण दाखविला आहे.. प्रवेशद्वारावर कवी माधव यांची “हिरवे तळकोकण” ही सुंदरशी कविता लावली आहे.. त्यानंतर लगेचच कोकणचं वैभव असलेलं कोकमच झाड आपलं लक्ष वेधून घेत.. त्याची औषधी उपयोगीता ऐकून आपण थक्क होतो.. शरबत, तेल, आमसूल, अशा विविध उपयोगासाठी आमसूल वापरलं जातं.
परशुरामभूमी असलेल्या ह्या कोकणात.. परशुरामाने ज्यावेळी पूर्ण भूमी जिंकली आणि ती लगेच दान देवून टाकली. त्यावेळी त्याला राहायला जागा उरली नाही.. मग तो ज्याठिकाणी चिपळूण, (गणपतीपुळे) आहे त्या ठिकाणी समुद्राला आव्हान करतो.. समुद्राशी लढाई करतो आणि त्याला जिंकून तिथला समुद्र ३०-४० किलोमीटर मागे जायला परावृत्त करतो.. हीच तयार झालेली किनारपट्टी वरची भूमी म्हणजे कोकण होय!
गुहेच्या आत प्रवेश केल्यावर जांभा ह्या लाल दगडात तयार केलेली ‘पाखाडी’ म्हणजे कच्चा रस्ता आपणास दिसतो.. हा रस्ता ग्रामदेवतेकडे जाण्याचा मार्ग आहे.. आजूबाजूला नानाविध मसाल्यांची झाडे.. त्यात काळीमिरी, दालचिनी, लवंग, वेखंड, वेलदोडा, हळद, इत्यादी मसाले आपण बघू शकतो.. सोबतच माडीवाला, ताडीवाला, यांचे पुतळे बघत बघत आपण कोकणी लोकांच दैवत असलेल्या ‘वाघजाई ‘ मंदिरात येतो.. ज्या ठिकाणी वाघांच जास्त प्रमाण असतं तिथला निसर्ग समृद्ध असतो असं म्हणतात.. कोकणी लोक हे
निसर्गपूजक असल्याने नाग, वड, पिंपळ इत्यादींची पूजा व त्यांची स्थापना आपण ठिकठिकाणी बघू शकतो.
कोळी समाजातील बांधव रात्रभर समुद्रात जाऊन पहाटे पहाटे मासे घेऊन येतात.. त्यानंतर ते मासे समुद्रकिनारी असलेल्या बाजारात विकतात.
बारा बलुतेदार, खोत व सामान्य जनता यांचा एकमेकांशी असलेला संबंध.. वैशिष्ट्यपूर्ण जीवन.. कोकणी समाज व्यवस्थेत दिसतं. त्यामध्ये खोत प्रामुख्याने न्यायदान करणे, महसूल जमा करणे, कायदा सुव्यवस्था बघणे व जमीनदारी सांभाळणे अशी महत्त्वाची कामे करायचे.
कोकणी माणसाच्या घराला ओसरी, पडवी, देवघर, स्वयंपाकघर, माजघर, छप्पर, अंगण आणि तुळस शिवाय आजूबाजूला ताड, माड आणि नारळ, सुपारीची झाडे आपण बघू शकतो. इथला शेतकरी सर्वांना अन्नधान्य पुरविणारा अन्नदाता.. त्याच्या घरात कणगी, भात, नाचणी, भात, वरई इत्यादी धान्य चिरफळाच्या पानांनी झाकून त्याला कणगी मध्ये लिंपून ठेवल्या जात असे. तीन-चार वर्षेपर्यंत हे धान्य कीड न लागता टिकून राहायचे.
इथला कुंभार गणपती.. देवी.. मडकी.. पणत्या.. दिवे..
इत्यादी संपूर्ण गावाला पुरवायचा.. त्यांनीच तयार केलेली अनेक मोजमापाची भांडी जशी की चवली, पावली चिपटं, मापटं, इत्यादी याठिकाणी आपण बघू शकतो. इथला सुतार लाकडी अवजारे, शेतीसाठीची नांगर, फाळ, तयार करून द्यायचा.. सावंतवाडीची लाकडी खेळणी आधीपासूनच तशीही जगप्रसिद्ध आहेत..
गावात येणारा अस्वलाचा खेळ दाखवणारा दरवेशी.. तसेच सापाचा खेळ दाखवणारा गारुडी.. आपण ह्या ठिकाणी बघू शकतो.. गावातला लोहार कोयती, विळी, नांगर, कुऱ्हाड, तलवारी इत्यादी अवजारे तयार करून धान्याच्या बदल्यात द्यायचा.. गावचा तेली व त्याची बायको तेलघाणा वापरून खोबऱ्याचं तेल काढून द्यायचे. त्याच्यातील घाण्यांमध्ये खुंट, सुके खोबरे, लाट, जोखड, दगड, अशी एक मशीनवजा यंत्रणा असायची ज्यावर बसून तो तेली पसा दिडपसा तेल दिडदोन तासात काढायचा!
बांबूच्या टोपल्या, सुपं, परडी, रोवडी, तयार करणारा बुरुड.. गावच्या शुभकार्यात महत्त्वाची भूमिका बजावायचा.. कोकणामध्ये भाजणीचे वडे, उकडीचे मोदक, भात-मासे, माशाची आमटी, हे मुख्य जेवणाचे पदार्थ आहे.. तांदूळ मुख्य धान्य असल्यामुळे धानातून तांदूळ आणि भुसा अलग करण्यासाठी… ‘घिरटं किंवा जातं ‘ वापरात यायचं.. वेगवेगळ्या शेवयायंत्र, किटली, टिफिन बॉक्स, चमचे, उखळ, दगडी मुसळ, अडकित्ते, इत्यादी प्राचीन वस्तू आपण ह्या संग्रहालयात बघू शकतो.. गावातला कासार मुली आठ दहा वर्षाच्या होईपर्यंत त्यांना मोफत बांगड्या भरून द्यायचा.. मात्र जेव्हा तिचं लग्न व्हायचं तेव्हा तिचे वडील कासाराला लहानसा सोन्याचा दागिना किंवा मणी भेट म्हणून द्यायचे ही पद्धत कोकणात होती..
कोकणी लोकांच्या ग्रामदेवता व पाणवठा ह्या दोन्ही मुख्य जागा.. या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येतो.. चर्चा करतो.. पाणवठा तर आंघोळीसाठी, पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, गुरांना पाणी पाजण्यासाठी, असलेलं हक्काचं ठिकाण… गावातला चांभार म्हणजे चर्मकार चामड्याची चप्पल जोडे शिवणारा.. कोकणातील सुप्रसिद्ध मार्लेश्वराच्या कथेमध्ये शंकराला चर्मकारानेच त्या गुहेपर्यंत पोहोचवल्याचं बोलल्या जातं.. तिथे प्रत्यक्ष शंकराने चर्मकाराला दर्शन दिल्याचं कथानक उपलब्ध आहे.. धनगर ही भरपूर धन असलेली जमात! चामड्याची वाहणं (चप्पल), घोंगडी आणि घुंगराची काठी असा पोशाख असलेला हा धनगर शंभर ते सव्वाशे गाईंचा मालक, तसेच पंधरा ते पंचवीस म्हशींचा मालक शिवाय अगणित मेंढ्या- बकऱ्या त्याच्याकडे असायच्या..!
अशी ही सर्व बारा बलुतेदारांची इतिहास वजा माहिती या ठिकाणी दीड ते दोन तासात आपणास सहज मिळते.. त्यामुळे गणपतीपुळ्याला जाणाऱ्या कुटुंबांनी.. पर्यटकांनी.. आवर्जून आपल्या मुलांसह ह्या संग्रहालयाला भेट द्यावी म्हणजे प्राचीन कोकणासह महाराष्ट्राचा इतिहास.. परंपरा.. संस्कृती.. मुलांना वेगळं शिकविण्याची.. सांगण्या गरज पडणार नाही असे वाटते..
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





