सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ मोदक… ☆ सौ शालिनी जोशी

भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर येते प्रसन्न गणेश मूर्ती. आणि गणेश म्हटलं की मोदक हवाच. जिथे गणेश तिथे मोदक. मोदक करायला तसा अवघड. गृहिणीच्या कलागुणांना मुक्त वाव येथे आहे.

स्वच्छ धुतलेल्या बासमती तांदुळाची शुभ्र पिठी आणि गुळ व खोबरे यांचे योग्य प्रमाणातील मिश्रण शिजवून केलेले सारण ही याची पूर्वतयारी. त्या सारणात सुकामेवा, वेलदोडे, जायफळ, खसखस घातल्यास त्या खमंग सारणाला अपूर्व सुगंधही येतो. गणपतीच्या आधीच चार दिवसापासून ही तयारी सुरू असते. कारण स्वागताच्या पहिल्या दिवशीच्या नेवैद्याला २१ मोदकांचे ताट गणेशा पुढे ठेवायला गृहिणी उत्सुक असते. या मोदकाचे वैशिष्ट्य म्हणजे उकड. पीठ व पाणी यांच्या योग्य प्रमाणाला चांगली वाफ आली की उकड तयार. हाताने मळलेल्या उकडीचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पापडी करायची. त्यावर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि सुंदर कळ्या पाडून मोदकाचे तोंड बंद करायचे. कळ्या जेवढ्यां नाजूक आणि त्यांची संख्या जास्त, तेवढे करणाऱ्याचे कौशल्य जास्त. असा हा मोदक वाफेवर उकडला जातो. त्यामुळे त्याची चव वाढते. तुपाबरोबर तर छानच. असा हा मोदक गणपतीला आवडतो आणि त्याच्यामुळे सर्वांनाच मोदकाचा भोग घेता येतो. मोठ्या मोदकावर लहान मोदकही करतात. हे कौशल्याचे काम.

पुराण कथा मधूनही मोदकाचा उल्लेख आढळतो. त्यातील एक कथा. अत्री ऋषींची पत्नी अनुसया. तिने आदराने भगवान शंकर, देवी पार्वती आणि गणेश यांना भोजनाला निमंत्रित केले. विविध पक्वान्न युक्त भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पाची भूक भागली नाही. मग तिने झटपट करून एक नवीन पदार्थ तयार केला. आणि अहो आश्चर्य! त्याच्या सेवनाने बाप्पाचे पोट भरलं. त्याने २१ वेळा ढेकर देऊन तृप्तीची पोचपावती दिली. देवी पार्वतीने कुतूहुलाने पदार्थाची कृती व नाव विचारले. तोच हा मोदक. तेव्हापासून २१ मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवल्या जातो.

आता उकडीच्या आणि तळणीच्या मोदकाखेरीज सुकामेवा, चॉकलेट, खवा यांचे विविध रंगाचे मोदकही केले जातात. ओरिसा, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ मध्येही मोदक करतात. नावे वेगळी करण्याची पद्धत थोडी वेगळी.

परमार्थात मात्र या मोदकाला वेगळा अर्थ आहे मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे लहानसा भाग. म्हणून आनंद प्राप्त करून देणारा मोदक ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत गणेशाच्या सहा हाताना सहा दर्शने म्हणतात आणि त्यातील वेदांत दर्शन रूप हातात मोदक दाखवतात. वेदांत दर्शन हे परमानंदाची, ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देणारे, त्याची थोडीशी झलक किंवा थोडीशी अनुभूती देणारा हा मोदक. मोदक खाल्ल्यावर कुणाला आनंद होत नाही? मोदकाने मिळणाऱ्या आनंदाच्या कितीतरी पट आणि अखंड आनंद म्हणजे ब्रह्मानंद. मोदकाची चव थोडा वेळ जिभेवर राहते थोडा काळ आनंदाची अनुभूती देते पण ब्रह्मानंद अखंड आनंद देतो, प्रसन्नता देतो. म्हणून अशा आनंदाचे प्रतीक असा हा मोदक.

मोदक हे ज्ञानाचे प्रतीक. ज्ञान प्रथम थोडे वाटते. पण अभ्यास करू लागल्यावर त्याचा विस्तार लक्षात येतो. तसाच मोदक टोकाकडून खाली खाली मोठा मोठा होत जाणारा. गोडी व आनंद वाढविणारा. एकंदरीत गणेश व त्याचा मोदक म्हणजे ज्ञानाचा व आनंदाचा कंद.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
मंजिरी येडूरकर
0

वाव! खूप नवीन माहिती कळली.