सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ वारी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
भक्ती मार्गाचे दृश्य रूप म्हणजे वारी! ज्या वारीमध्ये प्रत्येक सामान्य माणूस विठ्ठलाच्या प्रेमाने भारावून जाऊन पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असतो. त्यावेळी गरीब- श्रीमंत, लहान- मोठा असे सर्व भेदभाव नाहीसे होतात.
‘ज्ञानदेवे रचिला पाया,तुका झालासे कळस’असे आपण म्हणतो कारण आपल्या भागवत धर्माचा पाया घालणारे हे संत आहेत.
आपली वारीची परंपरा तेराव्या शतकापासून चालू आहे!
ज्ञानदेवांपासून सुरू झालेला भागवत पंथ तुकाराम महाराजांच्या काळामध्ये कळसाला गेला!
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारी भावंडे ज्या काळात जन्मली त्या काळात ब्राह्मण- ब्राह्मणेतर भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत होता. या चारही मुलांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकले गेले. ज्ञानदेवांनी पैठण पर्यंत जाऊन यासाठी न्याय मागितला. तरीही पैठणच्या
ब्रम्ह वृंदा ने त्यांना न्याय दिला नाही पण त्यामुळेच ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानाने तसेच इतर लोकांना जागृत करण्यासाठी पैठण ते आळंदी या प्रवासात काही चमत्कारही केले आणि पुढे ज्ञानेश्वरी ही सांगितली. जेव्हा त्यांची महती कळून आली तेव्हा सामान्य लोकांनी त्यांना मानाचे स्थान दिले. त्या काळात पंढरपूरच्या विठोबाला जाण्यासाठी सर्व भक्त मंडळी पायी चालत जात असत. त्यामध्ये सावता माळी, गोरा कुंभार, तसेच चोखामेळा, सोपानदेव,बंका,
जनाबाई , बहिणाबाई, अशी
अठरा पगड जातीतील मंडळी वारीला जात असत. त्या भक्ती भावाने भारलेल्या वातावरणामुळे
समाजातील भेदाभेद कमी होऊन लोक एका समतेच्या पातळीवर एकत्र येत असत. वारीमुळे झालेला हा सर्वात मोठा परिवर्तनाचा विषय होता.
पुढे ही वारीची परंपरा कायम चालू राहिली. आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी तर देहू वरून तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघतात. आजच्या आधुनिक काळातही लाखो लोक या वारीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात.अगदी परदेशातूनही अशी वारी अनुभवण्यासाठी लोक येतात.अशा वारीच्या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर चालतात.वारी निमित्ताने प्रसादाची दुकाने, हळदी कुंकू,अबीर बुक्का, देवाच्या मूर्ती,टाळ,माळा अशा विविध वस्तूंचे बाजार भरतात.काही वेळा आपले मन हे बघून अचंबित होते.काय असेल या वारीची महती आणि अनुभूती! इतकी श्रद्धा, भक्तीभाव या लोकांना चालण्यासाठी ताकद देतो. कितीतरी वृद्ध माणसे वारीमध्ये कित्येक वर्षापासून चालत जात आलेली आहेत!
‘पंढरीची वारी’ या मराठी सिनेमाची कथा वारीतील भक्ती भावावर गुंफलेली आहे. श्रद्धेच्या जोरावर माणूस कोणतीही गोष्ट करू शकतो एवढे मात्र खरे!’
‘वारी’ म्हणजे सातत्य! एखादी गोष्ट सातत्याने घडते तेव्हा ती वारी असते!हाच शब्द दुसऱ्या अर्थाने ‘वाऱ्या करणे’ असा ही वापरला जातो.एखादा मुलगा
शिक्षणात कच्चा असेल तर
एकाच वर्गात अनेक वेळा रहातो, तेव्हा तो किती वर्ष दहावी ची किंवा बारावी ची वारी करतोय असे उपहासाने म्हटले जाते.
पण तीर्थक्षेत्राची वारी ही
आपल्या ला पुण्यदायी असते.
वारी मुळे मनोवृत्तीत बदल होतो हे मात्र निश्चित!
यात्रा ही एकदा घडली तरी
पुष्कळ,पण वारी मात्र वरचेवर सातत्याने घडणारी असते..
आता शाळा शाळांतून वारकरी दिंडी,वारी यासंबंधी बरीच जागरूकता दिसते.लहान मुलांना आवडणारा तो एक सोहळा असतो. छोटी छोटी मुले धोतर नेसून तर मुली,जरीचे,खणाचे परकर. पोलके,साडी अशा
वेशात शाळेत येतात.छोटीशी
पालखी, तुळशी वृंदावन, टाळ चिपळ्या , तुळशीची माळ अशा सर्व गोष्टी या लहान मुलांच्या वारीमध्ये असतात. असे कार्यक्रम मुलांना खूप आवडतात.आपला समाज हा उत्सव प्रिय आहे.धार्मिकतेला सामाजिक जोड दिली की ती गोष्ट चांगली रुजली जाते. नकळत त्यांच्यावर एक चांगला संस्कार घडत असतो. आपल्या हिंदू धर्मात असणाऱ्या अनेक सणावारांचा आपण मुलांवर संस्कारासाठी उपयोग केलाच पाहिजे. अर्थात अलीकडे या गोष्टीबाबत बरीचशी जागृती झालेली आहे. धार्मिक गोष्टींमुळे वागण्यामध्ये एक प्रकारचा सुसंस्कृतपणा, शिस्त येत असते.
तसेच अशा गोष्टी करताना शाळेत त्याविषयीच्या माहिती चा बोर्ड लिहिणे, गोष्टी सांगणे, छोट्या छोट्या स्पर्धा घेणे,
(उदा.सजावट,फॅन्सी ड्रेस,कथा कथन)
यामुळे मुलांचा चौकसपणा, एकत्रित काम करणे तसेच सहभाग घेण्याची प्रवृत्ती वाढीला लागते. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही हेतू असतो, तो हेतू समजून घेऊन कोणत्याही रूढी, परंपरा चालू ठेवणे हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजाचे वैशिष्ट्य असते. वारीच्या निमित्ताने येणारे बरेचसे विचार हे धार्मिक, सामाजिक तसेच शैक्षणिक या सर्व प्रकारे वृद्धिंगत झाले पाहिजेत.
ही समाजामधली वारी झाली. पण जन्मापासून मृत्यूपर्यंत अशी जीवाची वारी असते. जो मानव जन्म आपल्याला मिळालेला असतो तो आपण चांगल्या प्रकारे
व्यतीत केला पाहिजे. बालपण तरुणपण आणि वृद्धावस्था या आपल्या जीवन वारीचे तीन महत्त्वाच्या टप्पे आहेत. प्रत्येक टप्पा तितकाच महत्त्वाचा आहे. त्या त्या अवस्थेत आपल्याला आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण चांगल्या गोष्टीसाठी घालवायचा आहे ही खूण गाठ मनाशी बांधली पाहिजे. तेव्हाच ही जीवाची वारी ही यशस्वी होत जाईल. त्या साठी विठ्ठलाचे स्मरण करून आपण वारीची
वाटचाल सुरू ठेवायची असा
मी मनाशी संकल्प करते!
‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम!….’
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





