सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ स्वीकार… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
समाजात वावरताना आपण बऱ्याच गोष्टीचा स्वीकार करतो. गर्दीची वेळ, ट्रॅफिक जॅम यामुळे होणारा वेळेचा जमा खर्च हे एकदा मनाने ठरवले की त्याचा मानसिक त्रास कमी होतो. हायवे वरून एखाद्या ठिकाणी जाताना एरवी जर पंधरा मिनिटे लागत असतील तर ट्रॅफिक जाममुळं चार तास लागले हे वास्तव ही आपल्याला पचवावे लागते आणि एकदा मनाला पटले की संयमाची किती आवश्यकता असते हेही लक्षात येते!
एखाद्या संकटाची कल्पना नसताना ते अचानक अंगावर आले की मन लगेच त्याचा स्वीकार करू शकत नाही, कारण त्याची तीव्रता मनापर्यंत पोहोचण्याइतका वेळच मिळत नाही! नुकतीच घडलेली पहेलगाम ची घटना घडली त्याबद्दल ज्यांनी तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवला, त्या गनबोटे बाईंचे विचार ऐकताना लक्षात आले की, केवढ्या भयंकर प्रसंगाला यांना तोंड द्यावे लागले आहे! प्रत्यक्ष पतीचा मृत्यू डोळ्यासमोर घडलेला स्वीकारताना त्यांना किती दुःख झाले असेल याची कल्पनाच करवत नाही! तशीच ती नवीन लग्न झालेली, हनीमूनला गेलेली जोडी! त्या मुलीला काय वाटले असेल, आठ दिवसापूर्वी ज्याच्याशी लग्न केले त्याची पूर्ण ओळख होण्याआधीच त्याचा मृत्यू! किती भयंकर सत्य स्वीकारावे लागले असेल या घटनेत अनेकांना!
केवळ ह्या घडणाऱ्या घटना नशिबात होते म्हणून पत्करायचे म्हणून त्याचा त्यांनी स्वीकार केला असेल.काळाबरोबर जखमा थोड्या भरतील, पण त्याचे व्रण मात्र मनावर कायमचेच राहतील! त्या जखमा पूर्णपणे कधीच भरणार नाहीत!
स्वीकारणे हे जगण्याचे एक तत्त्व आहे. निसर्ग, प्राणी सगळेच आपापल्या अनुकूल- प्रतिकूल परिस्थितीचा स्वीकार करत असतात!
साध्या साध्या गोष्टी असतात पण घरात असणाऱ्या बाईला कित्येक घटनांचा स्वीकार करावा लागतो. घरात नेहमी येणारी कामवाली बाई वेळेवर आली नाही तरी घरातल्या बाईला मात्र कामं करावीच लागतात.नुकताच आलेला माझा अनुभव मला हे शिकवत होता.आज बरेच दिवसांनी रमा कामावर आली होती. अजूनही तिचा चेहरा सुजलेला, हातापायावर ओरखडे आणि किरकोळ जखमा दिसत होत्या. तिला काही विचारावे असा मनात विचार येत होता, पण तिच्या चेहऱ्यावरची ती व्याकुळता आणि पाण्याने भरलेले डोळे पाहून तिची चौकशी करण्याचा मला धीरच होत नव्हता. आमच्या सोसायटीजवळ असलेल्या झोपडपट्टीत रमा राहत होती आणि सोसायटीतील काही घरांमध्ये भांडी, केर – फरशीची कामे ती करत होती. दिसायला बारीकशी असली तरी काटक होती. तिच्या पस्तीशी च्या वयातच तीन मुले पदरात घालून नवरा आता निरुद्योग्यासारखा फिरत होता आणि रमा संसाराचा गाडा ओढत होती. नवरा काम करून जे काही पैसे मिळवत असे ते बरेचसे दारू, जुगारावरच खर्च होत असत. तिची ही स्थिती पाहून मी तिला नेहमी म्हणायचे, ‘सोड चिठ्ठी दे त्या नवऱ्याला! काही त्याचा उपयोग नाही तुला..’ रमा म्हणायची,’ ताई, देवाने गाठ बांधली त्याच्याशी, ती निभवायला नको का? दारू पिला की वागतो जरा वंगाळ, पण एरवी त्याचे लई प्रेम आहे माझ्यावर आणि मुलांवर!’
आमच्यासाठी तो बी धडपडतोय ना, हे व्यसन लय वाईट बघा! त्यानंच काय बी सुधरत नाही, पण एकदा पत्करला आहे ना त्याला,आता सोडणार नाही!’
तिचं ते बोलणं ऐकून वाटे, किती आपल्या हिंदू संस्कृतीतील श्रद्धा! कसाही असला तरी नवरा देव आणि वाट्याला येईल ते स्वीकारायचं! वर म्हणणार काय, नारळ आणि नवरा जसं असेल तसं स्वीकारायला नको का?’
तिचं हे तत्त्वज्ञान ऐकून तर मी चाटच पडायची! अर्थात अगदी गरिबातच हे विचार आहेत असं नाही तर उच्चवर्णीयांमध्ये ही असेच विचार दिसतात! दिले ते स्वीकारायचं हेच ब्रीद असते. बऱ्याच व्यावसायिक मंडळींना जास्त येणाऱ्या पैशाबरोबरच बरीच व्यसने असतात, असेही आपण पाहतो पण त्यांच्या बायकाही हे स्वीकारणं करतच असतात ना?
अन्यायाविरुद्ध प्रतिकार करायची जिद्द कमी पडते की, सोशिकता आणि संयम याच्या नावाखाली आपण प्रत्येक गोष्ट स्वीकारतो हेच कळत नाही. कुटुंबातील स्वीकार हा तर असतोच पण घराबाहेर आणि समाजातही आपण कितीतरी गोष्टींचा स्वीकार करत असतो, चालवून घेतो आणि त्यामुळेच बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या जातात!
वेळेच्या बाबतीतही आपण असा स्वीकार करतो. “इंडियन टाईम” या नावाखाली बरेच लोक कामावर येण्यास थोडा उशीर करतात, कामाची हयगय करतात. अशावेळी तेथील बॉस सुद्धा काही वेळा बोलत नाही! तक्रार करत नाही! काही वेळा ट्रॅफिक जॅम, पाऊस ,तात्कालीक येणाऱ्या अडचणी यामुळे सुद्धा उशीर होऊ शकतो तर काही वेळा व्यक्तीची वैयक्तिक अडचण असल्यामुळेही उशीर होतो. तेवढ्यासाठी त्याला दोषी धरणे किंवा जरब दाखवणे आपल्याला जमत नाही. समोरचा जर खरा तर चांगला असेल तर तो चूक स्वीकारून पुन्हा तशा गोष्टी होऊ देणार नाही, पण जर संधी साधू असेल तर त्याच्या बरोब्बर लक्षात येते की आपण उशिरा आलं तरी चालतंय! त्यामुळे कोणत्या गोष्टीचा स्वीकार करावा किंवा न करावा याचे तारतम्य आपल्याला बाळगावे लागते.
असंच काहीसे आपल्या अपत्यांच्या बाबतीतही होऊ शकते. दोन /तीन मुले असली तर ती एका सारखी एक असतील असे नाही!पण प्रत्येकाच्या गुणावगुणांसह स्वीकार करावा लागतो! एखादे मुल शांत तर एखादं हुशार आणि एखादं धडपडे आणि दंगेखोर! यामध्ये शांत, हुशार मुलांमध्ये विशेष फरक दिसत नाही पण दंगेखोर मूल मात्र गैरफायदा घेऊ शकते. त्याला मार्क्स कमी पडले किंवा तो गैर वागला तर आई- वडील त्याला बोलतील पण मनात समजून घेतील की,’ याचा स्वभावच असा आहे.. अभ्यास करायला नको, दंगा हवा.. पण बाकी व्यवहारात हुशार आहे ना!’ म्हणून त्याच्या या वृत्तीचा स्वीकार केला जातो आणि त्यातूनही तो चांगला कसा वागेल, राहील याकडे पालक लक्ष देतात.
किंबहुना त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे असं मला वाटतं!
एकदा ‘स्वीकार’ हे जगण्याचे तत्व म्हणून स्वीकारले की, आपल्या लक्षात येते निसर्ग, प्राणी सगळेच आपल्या अनुकूल- प्रतिकूल परिस्थितीचा स्वीकार करत असतात. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे तीनही ऋतू एकमेकांच्या हातात हात गुंतवून येत असतात आणि नैसर्गिक परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे एक एक ऋतू आपले अस्तित्वही दाखवून देत असतो. म्हणूनच सृष्टीचे बदलते दिवस स्वीकारून आपण आनंद अनुभवत असतो. जोपर्यंत ही स्वीकारायची क्षमता असते तोपर्यंत मनुष्य उपभोग घेतो. अनुभवांना सामोरे जाऊन त्याचा उपयोग करून घेत असतो.
पण जेव्हा ही स्वीकारायची क्षमताच कमी होते तेव्हा नकळत उतरती कळा लागते! नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. शरीराबरोबर मन ही खचू लागते आणि नकळत मृत्यूचा स्वीकार कसा करायचा या विचाराने मन विषण्ण होते. जरी मृत्यू ही अटळ गोष्ट असली तरी त्याचा स्वीकार करणे माणसाला अवघड वाटते. मृत्यू हा अपरिहार्य आहे. ही अपरिहार्यता लक्षात आली की, माणसाचे मन त्या विचाराने खचणार नाही, तर मृत्यूचे स्वागतच करेल! लिहिता लिहिता हे स्वीकाराचे मूलभूत तत्व माझ्या मनात पूर्ण रुजले आणि कागदावर शब्दात व्यक्त होत गेले! नुकताच माननीय मोदींचा व्हिडिओ पाहिला. एका मुलाखतीत ‘जीवन और मृत्यू मे क्या निश्चित है?’ असा प्रश्न त्यांना विचारला गेला. तेव्हा ‘जन्म आपल्या हातात नाही,पण जन्माला आल्यावर मृत्यू निश्चित आहे, त्यामुळे त्याचा विचार करायचाच नाही! जन्माबरोबरच मृत्यूला जन्म मिळतो, त्यामुळे त्याची भीती कशाला? जीवन अनिश्चित आहे. त्यामुळे त्यासाठी कष्ट करा.काम करा, प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने घालवा..मृत्यू येणारच आहे, त्याचा विचार करू नका!’ केवढा मोठा विचार आहे हा! जीवनापेक्षा मृत्यूचा स्वीकार करायची तयारी हवी आणि जीवन जगण्यासाठी कष्टाची तयारी हवी!’ मोदीजींचे असे
विचार ऐकल्यावर जाणवले की,
हे खरोखरच किती वेगळे व्यक्तीमत्व आहे! अख्ख्या देशाचा भार ज्याच्या वर आहे ती व्यक्ती किती विचारी आणि मनाने संत आहे!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






उज्ज्वलाताई खूपच सुंदर विचार मांडलेत तुम्ही लेखा मधून .