image_print

? इंद्रधनुष्य ?

 ☆ पुष्टिपती विनायक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

(पुष्टिपती विनायक जयंती निमित्त) 

विघ्नहर्ता गजानन हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. गणेशाने महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीच्या आवाहनावरून वैशाखातील पौर्णिमेला पुष्टिपती विनायक म्हणून अवतार घेतला. 

नुकत्याच झालेल्या पुष्टिपती विनायक जयंती निमित्त गणरायाच्या या विशेष अवताराविषयी जाणून घेऊया.

सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून ओळख असलेला गणपती बाप्पा सर्वांचाच लाडका आहे. गणेशाच्या केवळ नावाने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात होतो. बुद्धीदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा काही पुराणांमध्ये आढळतात. 

भगवान गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. पैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. याशिवाय प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी विनायकी चतुर्थी आणि वद्य पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी हे गणपतीच्या व्रतोपवासाचे महत्त्वाचे दिवस मानले जातात. जाणून घेऊ या पुष्टिपती विनायक जन्माची पूर्वपीठिका. 

गणरायाने भक्तांच्या रक्षणार्थ, कल्याणासाठी आणि राक्षसांचा पाडाव करण्यासाठी अनेक अवतार घेतल्याचे मानले जाते. त्यापैकी पुष्टिपती विनायक हा एक अवतार असून, याचा उल्लेख मुद्गल पुराणात आढळून येतो. यातील कथेनुसार, प्राचीन काळी दुर्मती नावाच्या राक्षसाने तीनही लोकांत उच्छाद मांडला होता. या राक्षसाने आदिशक्ती जगदंबेची उग्र तपश्चर्या करून शक्ती संपादन केली. जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देव त्या राक्षसापुढे निष्प्रभ ठरू लागले. दुर्मतीने कैलासावर आक्रमण केले. दुर्मतीपुढे टिकाव न लागल्याने महादेव शिवशंकर व माता पार्वती कैलास पर्वत सोडून निघून गेले.

दुर्मतीला पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर देवऋषि नारदमुनींनी शिवनाथ व पार्वती यांनी गणेशाची उपासना करून त्यांचे आवाहन करण्यास सूचविले. दररोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करावी. तिचे पूजन करावे आणि सायंकाळी ती मूर्ती विसर्जित करावी, असे व्रत शिव-पार्वतीला सांगितले. नारदमुनींच्या सांगण्याप्रमाणे दररोज हे व्रत केल्यानंतर वैशाख शुद्ध पौर्णिमेस गणेश आपल्या अतिप्रचंड रुपात साक्षात शिव-पार्वतीसमोर प्रकट झाले. गणेशाचे अतिभव्य स्वरूप पाहून शिव-पार्वती भयभीत झाले. त्यांनी गणेशाला बालरुपात आपल्यासोबत राहण्याची सूचना केली. त्यानुसार गणेश बालरुप धारण करून शिव-पार्वती समवेत राहू लागले.

एका बाजूला हे घडत असताना, दुसरीकडे याच काळात भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांच्या पोटी पुष्टी नामक कन्येने जन्म घेतला. कालांतराने तिचा विवाह गणेशाशी झाला. यामुळे गणेशाच्या या अवताराचे नामकरण पुष्टिपती विनायक असे झाले. पुष्टिपती हे गणेशाच्या विद्येचे रूप आहे. एक दिवस पुष्टिपतीस दुर्मतीच्या अत्याचाराची सर्व हकीकत समजली. तेव्हा पुष्टिपतींनी दुर्मतीला राक्षसी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन केले. यासाठी गणेशाने भगवान विष्णूंना शिष्टाई करण्यास पाठविले. परंतु, दुर्मतीने उलट पुष्टिपती विनायकाला युद्धाचे आव्हान दिले.

दुर्मतीने दिलेल्या युद्धाच्या आव्हानाचा स्विकार पुष्टिपती विनायकांनी केला. ते दोघेही युद्धाला एकमेकांसमोर उभे ठाकले. या दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. दुर्मतीने पुष्टिपती विनायकाच्या दिशेने आपला परशू फेकला. तो परशू त्यांनी दाताने अडविला. या धुमश्चक्रीत पुष्टिपती विनायकाचा दात तुटला. तेव्हा तो तुटलेला दात फेकून विनायकाने दुर्मतीचा शिरच्छेद केला. दुर्मतीच्या वधाने सर्व देवगण भयमुक्त झाले.

कालांतराने द्वापारयुगात श्रीकृष्णानेही पुष्टिपती विनायकाला आवाहन केल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णानेही पुष्टिपती विनायकाचे आवाहन करून पूजन केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रुक्मिणी विवाहानंतर श्रीकृष्णांनी पुष्टिपती विनायकाचे पूजन केले. त्याठिकाणी एक मंदिर उभारण्यात आले आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या दारव्हा या गावात हे मंदिर आहे. एवढेच नव्हे, तर स्वमंतक मण्याच्या कथेत श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञान शक्तीच्या पुनःप्राप्तीसाठी पुष्टिपती विनायकाचे आवाहन केल्याची कथा आढळून येते. ते मंदिर पुणे जिल्ह्यातील सुपे येथे आहे. तसेच पुष्टिपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीत असलेला विनाशाचा शाप निष्प्रभ झाला. आणि अगस्त ऋषींनी समुद्र प्राशनाची शक्ती मिळवून समुद्राच्या तळाशी लपलेल्या ‘वातापी’ या राक्षसाचा नाश केला, अशीही एक उपकथा असल्याचे पुराणात आढळून येते. 

चित्र साभार : https://maharashtratimes.com ›

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments