सुश्री अर्चना दादासाहेब मुळे
इंद्रधनुष्य
☆ दोन स्त्रिया.. एक जीव… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆
एक मुलगी दुसर्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवते तेव्हा अशा जोडप्यांना ‘लेस्बियन’ म्हणतात. जगभरात लेस्बियन प्रेम प्राचीन काळापासून अस्तित्त्वात आहे. अग्निपुराणात दोन राजकुमारींची कथा आहे. मोहिनी आणि इतर देवता, अप्सरा यांना आकर्षित करणार्या कथा आहेत. भारतात खजुराहो मंदिरातील शिल्पं याची जिवंत उदाहरणं वाटतात. लेस्बियन हा शब्द प्राचीन ग्रीसमधील लेस्बाॅस बेटावरील कवयित्री सॅफो हिच्यापासून आला. जिने स्रियांवरील प्रेमावर कविता केल्या. त्यातील कवितेच्या कडव्यामधे प्रियकरणीचा निरोप घेतानाचा संवाद आहे. त्यात तिने दु:ख व्यक्त केले आहे. शिवाय प्रियकरणीबद्दलच्या या प्रेमातील दु:ख कमी करण्यासाठी आणि तिचं प्रेम मिळवण्यासाठी ती ग्रीक देवी ॲफ्रोडाईट हिला आवाहन करणारी :ओड टू ॲफ्रोडाईट’ नावाची कविताही लिहिली होती. सॅफोच्या कविता, तिच्या दंतकथा यामधे ॲनाक्टोरिया, ॲट्थिस, एरिन्ना अशा तिच्या प्रेयसी किंवा शिष्या यांच्या नावांचा एकसारखा उल्लेख आढळतो. तिच्या प्रेयसीला जेव्हा ती दुसर्या पुरूषाबरोबर बघते तेव्हा तिच्या मनात ईर्षा, आकर्षण, शारीरिक मानसिक अस्वस्थता निर्माण होते. तेव्हा ती तिच्या कवितेत लिहिते..
जो मनुष्य तुझ्यासमोर बसतो..
आणि तुझं बोलणं ऐकतो..
तो देवासमान भाग्यवान आहे.
तो तुझं मधुर बोलणं ऐकतो..
आणि तुझं मनमोहक हसणं..
यामुळंच माझं हृदय माझ्या छातीतून थेट बाहेर पडतं.
सॅफोच्या कविता स्रीचं स्त्रीवरील प्रेम यावर बोलतात. या प्रेमालाच लेस्बियन प्रेम म्हटलं जातं. लेस्बियन्स यांच्या नात्यावर आधारित २००४ मधे ‘सेव्हिंग फेस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात एक चिनी आणि एक अमेरिकन महिला डाॅक्टर यांचं नातं दाखवलं आहे. २००५ मधे प्रदर्शित झालेल्या ‘इमॅजिन मी ॲंड यू’ या चित्रपटात लग्नानंतर लगेचच नवरी कशी दुसर्या स्रीच्या प्रेमात पडते याची हलकी फुलकी कथा आहे. २०१३ मधे ‘ब्ल्यू इज द वाॅर्मेस्ट कलर’ नावाचा चित्रपट आला. त्यात एक शालेय विद्यार्थीनी एका महिला कलाकाराच्या प्रेमात पडते. तिथं तिला स्वत:ची लैंगिक ओळख होते अशी कथा आहे. २०१५ मधे एक सेल्सवुमन आणि एक श्रीमंत महिला यांच्या प्रेमकथेवर आधारित ‘कॅरल’ नावाचा चित्रपट आला होता. २०१६ मधे ‘हॅंडमेडन’ नावाच्या चित्रपटात एक श्रीमंत वारसदार स्त्री आणि तिची नोकराणी यांच्या नात्याचं चित्रण आहे. २०१९ मधे प्रदर्शित झालेल्या ‘पोर्टेट ऑफ लेडी ऑन फायर’ या चित्रपटात एक चित्रकार महिला आणि जिचं चित्र काढायचं होतं ती महिला यांच्या नात्याची कथा आहे. या चित्रपटांची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली आहे.
अशा चित्रपटांविषयी वाचताना एक प्रश्न पडतो. चित्रपट बघून घटना घडतात की सामाजिक घटना चित्रपटात चित्रित होतात. ‘आधी अंडी की आधी कोंबडी’ प्रमाणे. कारण आता लेस्बियन्स स्वत:ची ओळख स्वीकारत आहेत. समाजापुढे येत आहेत. या नात्याला मान्यता मिळावी म्हणून धडपडत आहेत.
‘मी लेस्बियन आहे. मला माझ्या मैत्रिणीबद्दल लैंंगिक आकर्षण आहे. आमचं एकमेकींवर प्रेम आहे. ‘ असं नारायणी म्हणाली. त्याक्षणी तिच्या थोबाडीत बसली. तिच्या वडलांनी तिच्यावर पहिल्यांदा हात उगारला होता. खरंतर असं काहीतरी घडणार याची तिला कल्पना होती. पण तिच्या लग्नासंबंधात रोज होणार्या त्याच त्याच चर्चा, तेच तेच प्रश्न याला नारायणी कंटाळली होती. त्या दोघींनी लग्न करायचं ठरवलं होतं. तसंही त्या दोन वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मधे राहत होत्या. अर्थात घरात ही गोष्ट उघड करणं आव्हानात्मकच होतं. ही एका नारायणीची गोष्ट नाही. अशा अनेक मुली, महिला आहेत.
एका मुलीचे तिच्या मामीबरोबर सबंध होते. एका आठवीत शिकणार्या मुलीचं तिच्या शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम होतं. शेवटच्या वर्षात शिकणारी युवती आणि तिच्या काॅलेजमधील महिला प्राध्यापक यांचे संबंध होते. एका शाळेत एक मुलगी इतर मुलींवर बलात्काराच्या उद्देशाने आक्रमण करायची. इतकंच नाही कितीतरी मुली अशा आहेत त्या लहानपणापासूनच दुसर्या मैत्रिणीसोबत असे संबध ठेवत असतात. त्या दोन स्त्रिया जे अनुभवतात ते त्यांनाच माहीत असतं. एका मुलीच्या प्रेमात असलेली ती म्हणाली, “तिच्या स्पर्शात हजारो रात्रीची शांतता असते. मला समाजनियम समजूनही घ्यायचे नाहीत कारण आमच्या दोघींच्या हृदयाचे ठोके कधीच एक झाले आहेत. तिचं गालातल्या गालात हसणं हेच माझं जग आहे. त्या एका हास्यासाठी, तिच्यासाठी मी काहीही करू शकते. ” असं हे त्या दोघींचं प्रेम.
समलैंगिक आवड स्वीकारताना दडपण असतं. शारीरिक मानसिक भावनिक संघर्ष असतो. तरीही हळूहळू मुली हे नातं स्वीकारतात. एखादी मुलगी किंवा महिला लेस्बियन असण्यामागे अनुवंशिकता किंवा जन्मपूर्व घटक, जनुकं, संप्रेरकं, मेंदूची रचना, कुटुंबाचा प्रभाव, संस्कृती, व्यक्तीचे अनुभव – अपेक्षित प्रेमाचा अभाव, लैंगिक शिक्षणाचा अभाव, लहान वयात पाॅर्न फिल्म बघणे, वसतिगृहात मुलींनी बराच काळ एकत्र राहणे, पुरूषांसमोर कधीच न येणं आणि मानसिक आरोग्य अशी अनेक कारणं असू शकतात. पण याबाबतीत समाज काहीही समजून घ्यायला अजूनतरी तयार नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड सामाजिक ताण असतो.
लेस्बियन व्यक्तिंवर सामाजिक सांस्कृतिक भेदभावाचा ताण असतो. त्याना नैराश्य, चिंता यासारखे मानसिक आजार होऊ शकतात. या लोकांची संख्या कमी असते. त्यामुळे त्याना ‘मायनाॅरिटी स्ट्रेस’ असतो. अशा व्यक्तीना स्वत:ची लैंगिक ओळख स्वीकारणे आणि समाजात व्यक्त करणे ही मानसिक प्रक्रिया तणावाची असते. या व्यक्तींबाबत रोजगार, गृहनिर्माण, कायदेशीर अधिकार याबाबतीत असमानता आहे. लेस्बियन व्यक्ती त्यांचा स्वत:चा समुदाय तयार करतात. ते स्वत:ला आपल्यासारख्या सर्वसामान्य समूहापासून वेगळे राहण्याचा प्रयत्न करतात. कारण त्याना समाजात इतरांप्रमाणे सामावून घेतलं जात नाही. त्यांनाही सुरक्षितता, न्याय याची गरज असते. पण ती त्याना दिली जात नाही. भावनिक आधार मिळवण्यासाठी, त्यांचं अस्तित्त्व टिकवण्यासाठी ते स्वत:चे गट निर्माण करतात. स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी ते विशिष्ट शब्द, हावभाव, चिन्ह याचाही वापर करतात.
ज्या समाजात प्रेमविवाहाला विरोध असतो त्या समाजात लेस्बियन विवाह मान्य होणे महाकठीण आहे.
लेस्बियन किंवा गे हे समलैंगिकतेचे प्रकार आहेत. समलिंगी असणं हा कोणताही शारीरिक मानसिक आजार नाही. तर समलैंगिकता हा देखील इतर लैंगिक क्रिया प्रकारांप्रमाणं एक नैसर्गिक प्रकार आहे. विरूद्धलिंगी आकर्षणाप्रमाणेच समलिंगी व्यक्तींमधे भावनिक, लैंगिक आकर्षण असतं. हे प्रेम आकर्षण जाणीवपूर्वक निवडलं जात नाही. ‘प्यार किया नही जाता.. हो जाता है! ‘ अगदी तसंच. आपल्याला आपल्याच लिंगाची व्यक्ती आवडते हे समजायला लागतं तेव्हा मोकळेपणानं बोलण्याचं स्वातंत्र्य भारतात तरी अजूनही नाही. जिथं मोकळेपणाने या गोष्टी घडतात तिथं समलैंगिक व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. त्यातही लेस्बियनची संख्या हीं ‘गे’ व्यक्तीं पेक्षा कमी आहे.
लोकशाहीत मानवी हक्क आणि समानता याचं मूल्य अधिक आहे. लेस्बियन जोडप्यांचा सामाजिक स्वीकार झाला तर त्याना खर्या अर्थानं स्वातंत्र्य मिळेल. शाळा, प्रसार माध्यमं यातून लेस्बियन व्यक्तींचं सामान्यीकरण, त्यांच्याबद्दल सकारात्मक चित्रण, पालकांचा स्वीकार, कायदेशीर मदत, इतर नागरिकांप्रमाणे सन्मान आणि सुरक्षितता मिळाली तर या व्यक्तींना समाजातून मोठा आधार मिळेल. परदेशातील अनेक देशांमधे लेस्बियण सुरक्षित आणि समाजमान्य जोडपी आहेत. भारतात मात्र लेस्बियन्सना अनुकूल वातावारणासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
लेस्बियन जोडप्यांची कथा संघर्षाची आहेच. त्याहूनही ती प्रेम, धैर्य, आत्मसन्मानाची आहे.
© सुश्री अर्चना मुळे
समुपदेशन तज्ज्ञ, सांगली
संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415
फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





