श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “७७,४०० सुवर्ण नाण्यांनी झाकलेली स्मशानभूमी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(२६ डिसेंबर. साहिबजादा जोरावर सिंग, साहिबजादा फतेह सिंग बलिदान दिन – विशेष लेख!)
मातीतून जन्माला आलेला देह शेवटी मातीतच मिसळून जातो…. हे वैश्विक सत्य! मानवी देहाला जमीन किती लागते तर तीन हात उभी आणि दोन हात आडवी. जमिनीच्या पोटात देह गाडून ठेवले जातात ती जागा बराच काळ तशी अडवून ठेवली जाते…. पण जिथे देह अग्नीच्या स्वाधीन केले जातात, ती जमीन तर काही घटकांतच पुन्हा रिकामी होऊन जाते…. दुस-या देहाची राख करण्यासाठी!
‘श्म’ म्हणजे मृत देह आणि ‘शान’ म्हणजे शय्या… इति श्मशान! देहाच्या क्षणभराच्या शय्येची ही जमीन कुणी विकेल का? आणि कुणी विकत घेईल का?
आपल्या इतिहासाने मात्र हे आक्रीत उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे… आजपासून सुमारे ३२० वर्षांपूर्वी हा सौदा झाला होता!
परमेश्वराच्या शोधाच्या प्रयत्नांत गुरु नानक साहेबांना त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी आत्मबोध झाला आणि त्यांनी त्यांना लाभलेली शिकवण… सीखांच्या अर्थात त्यांच्या शिष्यांच्या हाती सोपवली… आणि एका नव्या धर्माचा… शीख धर्माचा उदय झाला! या जगात एका पेक्षा अधिक धर्म असावेत ही या जगाच्या निर्मात्याचीच योजना आहे, अशी या धर्माची धारणा आहे… परमेश्वराला जाणण्याचा आणखी एक मार्ग, जो दुस-या धर्माचा मार्ग छेदून जात नाही, अशी शिखांच्या गुरुंची शिकवण. पण ही शिकवण मान्य नसणा-या धर्माचे अनुयायीसुद्धा होतेच आणि आहेतही.
शिखांना १४६९ मध्ये गुरु नानक देव यांच्या रुपात पहिले गुरु लाभले. ही परंपरा १७०८ पर्यंत चालली ती दहावे गुरु श्री गुरु गोबिंद सिंग साहेबांपर्यंत. श्री गुरु गोबिंद सिंग साहेबांनी पवित्र ग्रंथ शिखांना प्राप्त करून दिला…. तोच ग्रंथ आता गुरु म्हणून प्राणांपलीकडे पूजला जातो.
प्रस्थापित धर्म आणि त्यांचे अनुयायी व सीख धर्माचा संघर्ष होणे अटळ ठरले. या संघर्षाची परिसीमा श्री गुरु गोबिंद सिंग साहेबांच्या कारकीर्दीत झाली. १६६५ मध्ये नववे गुरुजी तेग बहादूर साहेबांनी आनंदपूर साहिब राज्याची स्थापना केली. त्यांच्या हत्येनंतर श्री गुरु गोबिंद सिंग यांनी सूत्रे हाती घेत १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. मुघल आणि स्थानिक पहाडी हिंदू राजांनी खालसा विरोधात एकत्र येत युद्ध पुकारले आणि आनंदपूर येथे स्थित असलेल्या सीख सेनेची कोंडी केली. अनेक दिवस झाडपाल्यावर गुजराण करण्याची वेळ आल्यावर अगदी नाईलाजाने गुरु गोबिंद सिंग यांना मुघल आणि त्यांच्यासोबत असलेल्या राजांचा प्रस्ताव मान्य करावा लागला…. सुरक्षित निघून इतरत्र निघून जाण्याचा! पण मुघलांनी आणि या राजांनी विश्वासघात करीत श्री गुरुंचा पाठलाग करीत त्यांच्यावर हल्ला चढवला. श्री गुरुजी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यात ताटातूट झाली. युध्दाच्या धुमश्चक्रीत त्यांच्या चार पुत्रांपैकी दोन पुत्र, साहिबजादा (अर्थात गुरुंचे पुत्र) अजित सिंग आणि जुझार सिंग एका बाजूला आणि उर्वरीत दोन पुत्र, जोरावर सिंग आणि फतेह सिंग आणि श्री गुरुंच्या मातोश्री गुजरी दुस-या बाजूला पांगले. पैकी अजित सिंग आणि जुझार सिंग युद्धात कामी आले. ही बातमी श्री गुरु गोबिंद सिंग यांना समजताच त्यांनी ही घटना म्हणजे मुघलांच्या राज्याच्या अंताची नांदी ठरेल अशी भविष्यवाणी केली… जी पुढे प्रत्यक्षात आली!
पण इकडे साहिबाजादा जोरावर सिंग आणि फतेह सिंग दुर्दैवी घटनाक्रमामुळे मुघलांच्या तावडीत सापडले. मुघलांचा अधिकारी वजीर खान याने जोरावर सिंग, फतेह सिंग आणि माता गुजरी यांना अटक केली. इस्लामचा स्वीकार केल्यास जीवदान देऊ अशी लालूच दाखवली. त्याला जोरावर सिंग, फतेह सिंग आणि माता गुजरी बधले नाहीत. यावर, काही मोठ्या दरबा-यांचा विरोध असतानाही वजीर खानाने जोरावर सिंग, (वय ९ वर्षे))फतेह सिंग (वय ६ वर्षे) या दोन्ही अल्पवयीन मुलांना मृत्युदंड फर्मावला! इंग्रजी तारीख २६ डिसेंबर, १७०५ रोजी (हे वर्ष १७०४ होते, असेही काही अभ्यासक मानतात) भिंतीमध्ये चिणून त्यांना ठार मारण्याची आज्ञा दिली गेली.. पण ही दोन बालके अजिबात घाबरली नाहीत… ते पाहून संबंधित मुघल सैनिकांनी या दोघांचाही शिरच्छेद केला, असे सांगितले जाते! नातवांची हत्या झाल्याचे समजताच आजी माता गुजरी यांनी प्राणत्याग केला!
पूर्वी शाहजहांच्या पदरी महसूल खात्यात अधिकारी राहिलेले एक गर्भश्रीमंत व्यापारी तोडरमल जैन सरहिंद या वजीर खानाच्या राज्यात वास्तव्यास होते. यांनी हे दोन्ही गुरुपुत्र आणि गुरु माता यांच्या देहांवर विधीवत अंत्यसंस्कार करण्याची अनुमती मागितली. वजीर खानाने अंत्यसंस्काराची जागा विकत घ्यावी लागेल, असे छदमीपणाने सांगितले. जागेची किंमत म्हणून ती जमीन झाकली जाईल इतकी सोन्याची नाणी पाहिजेत, अशीही अट घातली…. आणि सोन्याची नाणी अधिक संख्येने लागावीत यासाठी ही नाणी पालथी न ठेवता उभी करून ठेवावीत, असाही आदेश दिला. तोडरमल जैन यांनी आपली सर्व संपत्ती यासाठी खर्ची घातली….. ती जागा सोन्याच्या नाण्यांच्या ऐवजात विकत घेतली…. आणि एक ऐतिहासिक कर्तव्य पार पाडले!
बालकांना मृत्यूदंड देणे, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमीनही विकत घ्यायला लावणे ही मनोवृत्ती एका बाजूला आणि स्वत:च्या धर्मासाठी प्राणांचे बलिदान देणे, मृतदेहांचा सन्मान राखण्यासाठी स्वत:ची सारी संपत्ती खर्च करणे ही मनोवृत्ती यांतील अंतर ध्यानात घेण्यासारखे आहे.
ज्या ठिकाणी हे अंत्यसंस्कार झाले त्याठिकाणी सांप्रत काळी फतेहपूर सिंग साहिब गुरुद्वारा हे तीर्थ स्थळ आहे. या स्थळातील एका सभागृहाला तोडरमल यांचे नाव दिले गेले आहे. तोडरमल यांना वजीर खानाने राज्यातून हद्दपार केल्याचा उल्लेख आहे. जेंव्हा श्री गुरु गोबिंद सिंग यांची आणि तोडरमल यांची भेट घडली, त्या भेटीत गुरुजींनी तोडरमल यांना वरदान मागावयास सांगितले… त्यावर मी निपुत्रिक राहो, जेणे करून माझ्या वंशात माझ्या संपत्तीवर गर्व सांगणारा कुणी उरणार नाही, असा वर मागितल्याचे सांगितले जाते!
वरील घटनाक्रमानंतर उलटून गेलेला कालावधी सुमारे तीनशे वर्षांचा आहे. यामुळे तपशीलात लक्षणीय बदल, मतभेद, दंतकथा संभवतात… पण बालकांचे बलिदान मात्र नि:संशय खरे आहे! या दोन्ही सुपुत्रांना वंदन!
या बलिदानांचा प्रतिशोध घेणा-या बंदा सिंग बहादूर यांची कहाणीही मोठी रोमांचकारी आहे.
२६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून जाहीर झाला आहे, ही महत्त्वाची बाब आहे. या दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण सीख बांधवांच्या भारताच्या संरक्षण आणि इतर क्षेत्रातील त्यागाचेही स्मरण व्हावे. सत श्री अकाल….!
(विविध लेख, बातम्या आणि उपलब्ध साहित्यावर आधारीत, केवळ सामान्य वाचकांच्या माहितीस्तव हा अराजकीय लेख आहे. लहान मुलांना ही कथा ऐकवली गेली तर उत्तम. ऐतिहासिक तथ्ये ज्यांना तपासायची असतील त्यांनी मूळ साहित्य स्वत: तपासून पहावे.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






