श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘मकर संक्रांति…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
– – – कालचक्राच्या तेजोरेषेवर उमटलेली मंगललिपी_
१४ जानेवारी… प्रतिवर्षी, न चुकता याच दिवशी सूर्यनारायण आपला मार्ग बदलतो. धनुराशीच्या परिभ्रमणातून मुक्त होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो. आज बुधवार, माघमासातील षट्तिला एकादशी. दक्षिणायनाच्या तमोमय सावल्या मागे पडायला लागून उत्तरायणाच्या तेजस्वी प्रभेने सृष्टी नवचैतन्याने पुलकित होते. ही केवळ खगोलीय संक्रांती नव्हे; ही भारतीय जीवनतत्त्वज्ञानाची, ऋतुसंवेदनशील संस्कृतीची मंगलघोषणा आहे!
*खगोलसिद्धांत आणि ऋतुनियती*
पृथ्वीचा अक्ष २३. ५ अंशांनी झुकलेला आहे. या सूक्ष्म विचलनातूनच ऋतूंची महाशृंखला जन्मास येते. हे भाग्य आपल्या सौरमालेतल्या केवळ पृथ्वीवासिनांच उपभोगता येते. सूर्याचे दक्षिणाभिमुख गमन म्हणजे दक्षिणायन, म्हणजे तमातील प्रवास. तर २१ डिसेंबर पासून आरंभ होणारे उत्तरायण, म्हणजे प्रकाशाभिमुख गमन. मकरसंक्रांती हा विशेष योग. आता यापुढे दिनमान दीर्घ होते, रात्र संकुचित होते. तमोगुणाचा क्षय आणि सत्त्वगुणाची वृद्धी, हा सृष्टीचा सनातन धर्म.
*भूमाता, कृषिसंस्कृती आणि धान्यवैभव*
मकरसंक्रांती ही भूमातेच्या उदरात दडलेल्या समृद्धीची आरती आहे. शेतांमध्ये ज्वारी, हरभरा, गहू इ. धान्यांची पुष्ट कणसे लहरत असतात. वावरात बसून आगटीत भाजलेला शाळूचा हुरडा हवेत खरपूस, रसना चाळवणारा सुगंध पसरवतो, आणि तरुणाईच्या हर्षोल्हासात ऋतू आपले अस्तित्व प्रकटवतो. भाजलेला लिंबोर (गव्हाच्या भाजलेल्या लोंब्या) आणि हरभऱ्याचे घाटे, सर्वांनी एकत्र बसून, हसतखेळत खाणे हे ग्रामीण जीवनातील सामूहिक आनंदाचे प्रतीक आहे.
उसाच्या रसातून सिद्ध झालेला गूळ म्हणजे सूर्यतेजाचे सघन मूर्तरूप. तीळ – एक अतिसूक्ष्म तैलबीज, पण उष्णता, स्निग्धता आणि ऐक्य यांचा अमृतकुंभच. शिशिर ऋतू शी संघर्ष करण्यासाठी निसर्गाने मानवाला दिलेले दिव्य रसायन आहे.
*ग्रामीण जीवनातील संस्कार आणि संक्रांतोत्सव*
गावाच्या प्रभाती संक्रांतीचे रूप अलौकिक असते. गोमयाने सारवलेल्या अंगणात रेखाटलेल्या रांगोळ्यांतून सप्ताश्वरथरूढ सूर्य, धान्यांची कणसे, ओंब्या, लोंब्या, काही ताठ उभी तर काही किंचित झुकलेली तृणपाती, आकाशात भ्रमणारे रंगीबेरंगी पतंग सजीव होतात. देव्हाऱ्यात आदित्य-नमस्कार, आणि अंतःकरणात प्रकाशाची आराधना होते. पुजेत कुंभाराने आणून दिलेल्या सुगडांना हळदकुंकू लावून, त्यात उसाचे कर्वे, पिकलेली आंबटगोड बोरे, बिब्याची फळे, हरभऱ्याचे घाटे, गव्हाच्या लोंब्या इ. वस्तू भरायच्या. तोंडावर पणत्या ठेऊन, त्याला सुताचे दोरे गुंडाळून ती सुगडे पुजायची.
*साखरेची आभूषणे व भेटवस्तूंची लयलूट*
महाराष्ट्रात नववधू, गर्भवती स्त्रिया आणि बालके यांना हलव्याची आभूषणे लेववून त्यांचे कौतुक केले जाते. हा हलवा म्हणजे जीवनाच्या नव्या अंकुरांना दिलेले अश्वासक, संरक्षक कवचच जणू! समाजाच्या सामूहिक ममतेचा आणि सौभाग्यकामनेचा सुस्वर उच्चार! मातृत्व, सुपीकता आणि ऐहिक-मंगलता या संकल्पना येथे एकरूप होतात.
महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवसांत अजून एक वैशिष्ठयपूर्ण प्रथा आहे. सुहासिनींचा हळदीकुंकवाचा सोहळा. हा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालू राहतो. हा स्त्रीजीवनाच्या आपुलकीचे, सौभाग्याच्या साखळ्यांचे आणि सामूहिक आनंदाचे लोभस दर्शन असते. मृदू पावलांनी, ओठांवर स्मित घेऊन स्त्रिया एकमेकींच्या उंबरठ्यांवर येतात. यजमानीणबाई त्यांच्या ओट्या भरतात—जणू शुभेच्छांचे धान्यच पदरात ओततात. तिळगुळाच्या गोडव्याने संवाद मधुर होतो, हलव्याच्या उबेत मायेचा ओलावा मिसळतो.
एखादी छानशी, संसारोपयोगी भेटवस्तू हातावर ठेवली जाते आणि या मंगल देण्याघेण्याला ‘वाण लुटणे’ असे अर्थगर्भ नाव लाभते. लढवय्या मराठ्यांच्या परंपरेतून जन्मलेला हा शब्द येथे रणाचा नाही, तर ऋणानुबंधांचा उद्घोष करतो. ही लूट असते—प्रेमाची, सौभाग्याच्या कामनांची, आणि नात्यांच्या बळकटीची. तलवारीऐवजी येथे मृदू हात उचलले जातात, विजयाचे प्रतीक म्हणून नाही, तर माणुसकीच्या, ऐक्याच्या आणि स्त्रीसौख्याच्या मंगल जपासाठी.
अशा प्रकारे संक्रांतीच्या या सोहळ्यात स्त्रीजीवनाचा अंतःप्रवाह उजळतो—परंपरा, संवेदना आणि संस्कार यांच्या संगमातून मराठी संस्कृतीचे एक नाजूक, पण तेजस्वी रूप प्रकट होते.
*भोगी : अन्नब्रह्माचा महोत्सव*
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी अवतरते. स्वयंपाकघरात साकारलेला ब्रह्मयज्ञ. बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकऱ्या, वांगी, गाजरे, मटार, पावटा यांची लेकुरवाळी भाजी, तांदूळ-मुगाची खिचडी, त्यावर शुभ्र खोबरे – कोथिंबिरीची भुरभूर आणि वरून अन्न शुद्धीची संतत धार! ताक, लोणी, तीळ -दाण्यांची चटणी, पापड असा षड्रसयुक्त आहार ऋतुनुकूल, शरीरबलवर्धक आणि सत्त्वप्रधान असतो. असे भोजन म्हणजे मातृस्नेहाचा रसास्वाद!
भारतातील विविध प्रांतांतही हाच भाव वेगवेगळ्या पाकसंस्कृतींत प्रकटतो. दक्षिणेत पोंगल, उत्तरेत लोहडी, पश्चिमेत उंधियू, पूर्वेत भोगाली बिहू. धान्य, डाळी, भाज्या, गूळ, ताक, लोणी, तूप या सर्वांतून अन्नब्रह्माची उपासना घडते.
*लोकजीवन, क्रीडा आणि नादसंस्कृती*
संक्रांतीच्या दिवशी नभांगण चंचल पतंगांनी गजबजते तेव्हा, भूमीवर आनंदाच्या लाटा उसळतात. कबड्डी, कुस्ती, खो-खो, बैलगाडा शर्यती अशा क्रीडांप्रकारांतून शौर्य, बल आणि संघभावना व्यक्त होते.
ओव्या, भारुडे, लावण्या, भलरीगीते, सुगीगीते अशी लोकगीते ऋतूंच्या शब्द-नादरूप अनुभूती आहेत. ढोलकीचा ताल, तुणतुण्याचा टणत्कार, हलगीची थाप शिशिरऋतूच्या शीतलतेवर उष्णतेची शिंपण करतात.
*कृष्णवस्त्रे, वेशभूषा : यामागचे विज्ञान आणि इतिहास*
महाराष्ट्रात संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान करण्याची परंपरा आहे. काळी वस्त्रे सूर्याची उबदार किरण अधिक प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे शीतापासून संरक्षण होते ही त्यामागील भौतिकशास्त्रीय संकल्पना. तथापि, या कृष्ण वस्त्र परिधान करण्यामागे एक इतिहासाची वेदनाही अंतरी ठसठसत असते.
पानिपतच्या तिसऱ्या संग्रामातील (सन १७६१) मराठ्यांचा याच संक्रांतीच्या दिवशी झालेला घोर पराभव! मराठ्यांचे हे केवळ सैनिकी अपयश नाही, तर तो संपूर्ण समाजमनावर उमटलेला खोल घाव आहे. त्या दुःखद स्मृतीचा, पण त्याच वेळी स्वाभिमानाचा रंग म्हणजे कृष्णवर्ण. दु:ख गिळून जीवनोत्सव साजरा करण्याची मराठी मानसिकता संक्रांतीच्या दिवशी या कृष्णवर्ण वस्त्रांतून व्यक्त होते.
*पौराणिक संदर्भ*
महाभारतीय महायुद्धात घायाळ झालेल्या पितामह भीष्माचार्यांनी उत्तरायणाची प्रतीक्षा करून देहत्याग केला, म्हणून हा काळ पुण्यप्रद मानला जातो. षट्तिला एकादशीला तीळस्नान, तीळदान, तीळहोम यांना विशेष महत्त्व आहे. सूर्यदेवाची उपासना म्हणजे तेज, आरोग्य आणि दीर्घायुष्याची कामना.
*संगीतातील ऋतु-प्रहर- स्वरसौंदर्ययुक्त संक्रात*
भारतीय शास्त्रीय संगीतात ऋतु आणि प्रहर यांचे नाते सनातन आहे. मकरसंक्रांतीच्या ब्रह्ममुहूर्तात राग भटियार, बैरागी, भैरव आपल्या गंभीर, स्थिर, सात्त्विक स्वरांनी वातावरण पवित्र करतात. हे राग म्हणजे उगवत्या सूर्याचे नादावतार! दिवसाच्या उत्तरार्धात आणि रात्रिप्रहरी भूप, यमन, शिवरंजनी यांसारखे राग आपापल्या समयमर्यादेत निसर्गाशी संवाद साधतात.
*समारोप : उत्तरायण अंतर्मनाचे*
मकरसंक्रांती म्हणजे केवळ सूर्याचे मकरसंक्रमण नव्हे; ते मानवाच्या चेतनेचे उत्तरायण आहे. तमातून तेजाकडे, शैत्यातून उष्णतेकडे, विसंवादातून माधुर्ययुक्त सुसंवादाकडे नेणारी ही पर्वणी आहे. निसर्ग, कृषी, अन्नधनधान्य, इतिहास, स्वर, नाद ताल आणि समाज, या सर्वांचा समन्वय येथे साकारतो.
सूर्य जसा उत्तराभिमुख होतो, तसाच मानवाचा अंतःप्रवाह सत्त्व, श्रम आणि सद्भावनेकडे प्रवाहित होवो, हीच मकरसंक्रांतीची मंगलकामना!
© श्री दिवाकर बुरसे
१४ जानेवारी २०२६
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






खूप छान आणि माहितीपूर्ण लेख.