श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७१ आणि ७२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७१ – – 

जयाचेनि नामें महादोष जाती।

जयाचेनि नामें गती पाविजेती।

जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७१।।

अर्थ :  भगवंताच्या नामस्मरणाने मोठमोठी पापे नाहीशी होतात. साधकाला उत्तम अवस्था प्राप्त होते. पुण्याचा संचय होत जातो. असे सर्व काही ज्यामुळे प्राप्त होते त्या भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन पहाटेच्या वेळी करावे.

(महादोष – मोठमोठी पापे/पातके/दोष, गती – अवस्था/मुक्ती/मोक्ष)

विवेचन : भगवंताच्या नामाचा महिमा अपार आहे. सतत नामस्मरण केल्याने महादोष म्हणजे महापापे नाहीशी होतात. भगवंतांचे नाम आपले अंतःकरण शुद्ध करते. वाईट गोष्टी, पापकर्म करण्याची इच्छाच होत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे, व्यभिचार करणे, हत्या करणे, अपेयपान (दारू)करणे या सारख्या गोष्टी या महापाप मानल्या जातात. परंतु सतत भगवंताचे नाम घेत राहिल्याने या गोष्टी करण्याची इच्छाच नाहीशी होते. व्यक्ती सदाचारी बनते. वाल्या कोळ्याचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. वाटमारी करणे, हत्या करणे यासारखी महापापे त्याच्या हातून घडली होती. परंतु महर्षी नारद आणि ऋषींच्या उपदेशामुळे त्याच्यात अंतर्बाह्य बदल झाला. आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन त्याने रामनामाचा आश्रय घेतला. रामनामाची जादू एवढी मोठी आहे की वाल्या कोळ्याचे रूपांतर महर्षी वाल्मिकीत झाले. रामायणासारखा अद्वितीय ग्रंथ लिहून ते जगासाठी वंदनीय ठरले.

रामनामामुळे गती म्हणजे उत्तम अवस्था प्राप्त होते. अंतकाळी भगवंताचे नाम मुखात येणे यासारखे भाग्य नाही. ‘ अंते मती सा गती: ‘ असे म्हटले जाते ते यामुळेच. शेवटचा दिस गोड व्हावा असे तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ हाच आहे. पण आयुष्याच्या अखेरच्या क्षणी माणसाच्या मुखात अचानक रामनाम येत नाही. त्यासाठी सतत मनाने भगवंताचे नामस्मरण करण्याची सवय असावी लागते. ही सवय असेल तरच अंतकाळी भगवंत आठवतो.

समर्थ तिसऱ्या ओळीत म्हणतात की नामाच्या योगाने पुण्यठेवा घडतो म्हणजे वाढतो. बँकेतील आपल्या खात्यात आपण बचत म्हणून थोडे थोडे पैसे टाकत राहतो. यात सातत्य असले तर ही पुंजी वाढत जाते. मुद्दलावरही व्याजही लागू होते. रामनाम ही तर अत्यंत मौल्यवान ठेव ! थोडीथोडी जमा करत गेलो की पुण्यसंचय वाढत जातो. संत मीराबाई म्हणतात, ” पायो जी मैने रामरतन धन पायो… ” हे असं अमोलिक धन आहे की ” खर्च न खुटे, चोर न लुटे. ” इतर धन खर्चल्याने संपतं. पण याची महती काही वेगळीच. हे तर दिवसेंदिवस वाढतच जातं. विशेष म्हणजे हे धन असं आहे की याला चोरही लुटू शकत नाही. सातत्याने रामनाम घेणाऱ्याचा पुण्यसंचय वाढतच राहतो.

नामस्मरणाने वासनांचा क्षय होतो. म्हणजे भगवंत प्राप्तीखेरीज इतर वासना हळूहळू नष्ट व्हायला लागतात. शेवटी केवळ भगवंत प्राप्तीची इच्छा उरते. आपल्या पुण्यसंचयानुसार ती या जन्मी किंवा पुढील जन्मी भगवंत नक्की पूर्ण करतो. तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन कर. दिवसभरही त्याचे नित्य स्मरण ठेव. हे नाम तुला मोक्षाकडे घेऊन जाईल.

स्वसंवाद ::

१. मी रोज माझ्या बँक खात्यातील शिल्लक (Balance) तपासतो, पण माझ्या खात्यात ‘पुण्यठेवा’ किंवा रामनामाची पुंजी किती जमा होत आहे, याचा हिशेब ठेवतो का ?

२. “शेवटचा दिस गोड व्हावा” असे मला वाटते, तर मग शेवटच्या क्षणी ते नाम सहज मुखात यावे म्हणून मी आजपासूनच अंतःकरणाला तशी सवय लावत आहे का?

३. माझ्या हातून कळत-नकळत होणारे छोटे-मोठे दोष किंवा वाईट विचार दूर व्हावेत म्हणून मी नामस्मरणाचा आधार घेतो का?

४. मीराबाईंनी म्हटल्याप्रमाणे, मला हे ‘अमोलिक धन’ मिळवण्याची खरी आस लागली आहे का की अजूनही चोरांनी लुटल्या जाणाऱ्या नश्वर धनामागेच धावत आहे ?

==========

श्लोक क्र. ७२ – – 

न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही।

मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही।

महा घोर संसार शत्रू जिणावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७२।।

अर्थ : रामनाम घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागत नाहीत. मुखाने रामनाम घेताना काही कष्ट पडत नाहीत. या रामनामाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा संसाररूपी शत्रूवर मात करता येते. त्यासाठी प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.

(न वेचे – खर्च करावे लागत नाहीत, ग्रंथीचे – पदरचे, अर्थ – पैसा, घोर – कठीण, जिणावा – जिंकावा)

विवेचन :  माणसाची देहबुद्धी फार प्रबळ असते. देहासाठी आणि देहाच्या सुखासाठी जे जे लागेल, ते मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस असतो. सगळी ऐहिक सुखे उपभोगण्यासाठी पैशाची मोठी गरज असते. त्यामुळे माणूस पैशाला फार जपतो. प्रसंगी देहापेक्षाही पैशाला महत्व देणारी माणसे व्यवहारात पाहायला मिळतात. आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून ती पैसा मिळवण्याच्या मागे लागलेली असते. सामान्य माणूस स्वतःच्या मौजमजेसाठी हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार असतो पण दानधर्माची वेळ आली की हात आखडता घेतो. सर्वसामान्य माणसांची ही मानसिकता समर्थ उत्तम प्रकारे जाणून आहेत. म्हणून रामनाम घेण्याबद्दल ते सांगतात की यासाठी पदरचा एक पैसाही खर्च करावा लागत नाही. वरील ओळीचा अर्थ आणखी एका प्रकारे घेता येईल. ते म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी वेगवेगळे ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करतो. आपली पारमार्थिक बैठक तयार होण्यासाठी आवश्यक त्या ग्रंथांचे वाचन अवश्य करावे. पण तेवढे झाल्यानंतर अधिक ग्रंथ वाचण्यात वेळ न घालवता नामस्मरण करावे. नामस्मरणासाठी ग्रंथ वाचनाची आवश्यकता नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, “वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा… “नुसते पुस्तकी ज्ञान किंवा शब्दपांडित्य महत्त्वाचे नसून, भगवंताच्या नामाची अनुभूती घेणे आणि अंतःकरणात भक्ती बाळगणे हेच वेदांचे खरे सार आहे हेच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगायचे आहे.

दुसरी गोष्ट अशी की हे रामनाम मुखाने घेण्यास कोणतेही कष्ट पडत नाही. इतर तपसाधनेत तरी देहाला कष्ट पडतात. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा वगैरे करायची म्हटले तरी देहाला कष्ट घ्यावेच लागतात. पदरचा पैसा खर्च करावा लागतो. पण रामनाम घेण्यासाठी यातील काहीही करावे लागत नाही. फक्त आपली इच्छा मात्र हवी. त्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याची आवश्यकता नाही. सर्व संतांनी आपापली कामे करताना मुखाने हरिनामाचा जप सुरु ठेवला होता. आपणही आपली नित्यकर्मे करताना वाचेने किंवा मनाने भगवंताचे नाम घेऊ शकतो.

आपण सामान्य माणसे ! संसारात अडकलेलो असतो. बांधले गेलेलो असतो. पण हे बंधन दिसत नाही आणि कळतही नाही. आपले आयुष्य शेवटपर्यंत संसारासाठी धावाधाव करण्यातच जाते. शेवटी एक वेळ अशी येते की आपण हे सगळे कोणासाठी आणि कशासाठी केले असे वाटून पश्चाताप होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. संसार म्हणजे विवाहित माणसाचा पती, पत्नी, मुले, नातेवाईक असा साधारण अर्थ आपण घेतो. पण जो माणूस जन्माला आला तो या संसारात अडकला. मग तो विवाहित असो वा अविवाहित. एका संसार या शब्दाचा व्यापक अर्थ हे जग असाही आहे. जीवनाबद्दल एका हिंदी गीतात फार सुंदर ओळी आहेत. ‘ संसार हैं एक नदिया, दु:ख सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं… ‘अशा या संसाररूपी नदीतून तरून जायचं असेल तर रामनामाशिवाय तरणोपाय नाही.

संसार गोड वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो पण तो आपला मोठाच शत्रू आहे हे लक्षात येत नाही. ते लक्षात येते तेव्हा आयुष्याची किंमत आपण मोजलेली असते. एखाद्या गोष्टीचे माणसाला जेव्हा व्यसन लागते, तेव्हा ती गोष्ट त्याला अती प्रिय होते. मग ती वाईट आहे हे कळले तरी ती त्याला सोडवत नाही. तंबाखू, दारू इ. चे व्यसन लागलेल्यांची अशीच अवस्था होते.

समर्थ श्रीरामस्तुती करताना म्हणतात, ” संसारसंगे बहू शीणलों मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. ” संसार हा आपला महाशत्रू आहे हे लक्षात घेऊन वागणाऱ्याला संसार बाधत नाही. तो संसारात असतो पण साक्षीभावाने प्रपंचाकडे पाहतो. हे सगळे प्रारब्धाचे खेळ आहेत हे तो जाणून असतो. सर्वसामान्यांना तो संसारात रमलेला दिसेलही पण त्याचे चित्त भगवंताकडे असते. आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करीत असतो. काहीवेळा सोबत असलेल्या सहप्रवाशांशी आपल्या छान गप्पा होतात. पण आपले स्टेशन आले की आपल्याला उतरावे लागणार हे आपण जाणून असतो. त्यामुळे त्या सहप्रवाशाना सोडून जाताना विशेष दुःख होत नाही. असेच आपण संसारातही असावे. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त असणाऱ्या कमलदलांप्रमाणे ! हे सगळे सांगणे सोपे पण आचरणे कठीण आहे. पण रामनाम घ्यायला तर सुरुवात करू या. तेव्हा हे मना, अधिक वेळ दवडू नकोस. प्रभात समयापासून भगवंताचे चिंतन कर असेच समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगू इच्छितात.

स्वसंवाद :: 

१. ज्या ऐहिक सुखांसाठी आणि पैशासाठी मी रात्रं-दिवस देह झिजवतो, ते सुख मला कधी चिरंतन शांतता देऊ शकेल का?

२. नामस्मरणासाठी पैशांचा खर्च नाही आणि देहाला कष्टही नाहीत, तरीही मी ते टाळण्यासाठी वेळेचे किंवा थकव्याचे निमित्त शोधतो का?

३. संसारातील नाती आणि कर्तव्यांमध्ये मी इतका गुरफटलो आहे का, की मला या सगळ्याकडे ‘साक्षीभावाने’ किंवा अलिप्तपणे पाहता येत नाहीये?

४. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे, मी संसारात राहूनही माझे चित्त भगवंतचरणी ठेवण्याचा प्रयत्न करतो का?

– क्रमशः श्लोक ७१ आणि ७२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted