गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ भारताच्या ‘विस्मृत’ वीरांना मान्यता! – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆
भारताच्या ‘विस्मृत’ वीरांना मान्यता! – – पहिले महायुद्ध
मागच्याच आठवड्यात बातमी आली की पहिल्या महायुद्धात लढणाऱ्या ब्रिटिश इंडियन आर्मीमधल्या ९,९०९ सैनिकांच्या बलिदानाला पुराव्यानिशी मान्यता देण्यात आली… भारतीय सैनिकांनी रक्ताने दिलेल्या बलिदानाला एका शतकानंतर शाईच्या काही थेंबांनी दिलेला हा न्याय समजायचा का? इतिहासाच्या पानांमधून या सैनिकांचं अस्तित्त्वच पुसून टाकणाऱ्या एका अन्यायकारक धोरणाबद्दल कबुली देत Commonwealth War Graves Commission(CWGC)ने या भारतीय हुतात्म्यांची नांवं त्यांच्या डेटाबेसमध्ये नुकतीच समाविष्ट केली. अथक संशोधनाच्या अंती घडवून आलेली ऐतिहासिक कागदपत्रांमधली ही सुधारणा दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी दुरुस्ती मानली जात आहे. नेमकं कोणतं धोरण कारणीभूत होतं या विस्मृतीला?
‘The great War’- भारताचं योगदान –
‘…the war to end all wars’ असं व्यापक (!) उद्दिष्ट ठेऊन जुलै १९१४ मध्ये सुरू झालेलं महायुद्ध चांगलंच पेटलं. ब्रिटिशांनी भारताचा सहभाग गृहीत धरून इंडियन आर्मी मधलं सैन्य तिथे पाचारण केलं. या महायुद्धात ब्रिटिशांसाठी अखंड भारतातून (आजचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश) सुमारे १४ लाख सैनिक लढले होते. यापैकी एकट्या पंजाब प्रांतातून ५ लाख सैनिक भरती झाले होते. घोडदळ, पायदळ, तोफखाना अशा कितीतरी गोष्टींचा यात समावेश होता. या सैन्यात कोवळ्या वयातल्या म्हणजे अगदी १० वर्षे वयाच्या मुलाचाही समावेश असल्याचे पुरावे आहेत!
सुरुवातीला सैन्यभरती आणि प्रशिक्षण यात ब्रिटिश गुंतलेले असतांना, जर्मन सैन्याचं मोठं आक्रमण भारतीयांनी थोपवलं.
फ्रान्स, गॅलीपोली(तुर्कस्थान), बेल्जियम, इजिप्त, पॅलेस्टाईन, पूर्व आफ्रिका… किती ठिकाणी भारतीय सैन्य आत्यंतिक शौर्याने लढलं! युरोपमधल्या जीवघेण्या, भीषण खंदकांनी किती भारतीयांचे जीव घेतले! अपरिचित युद्धभूमी, त्रस्त करणारं थंड हवामान, चालून येणारा क्रूर शत्रू, अपुरी साधनं, प्राण कंठाशी आणणारी लांबच लांब पायपीट, उपासमार, साथीचे रोग… कशाकशाशी लढले भारतीय? आणि कशासाठी? तिथे जिवाची बाजी लावण्यासाठी भाग पाडणारी, स्वतःला ‘सैनिक’ म्हणवून घेत लढण्यासाठी उद्युक्त करणारी कोणती प्रेरणा होती? स्वातंत्र्याची? मुळीच नाही!
ब्रिटिश इंडियन आर्मीमधल्या ७४,१८७ एवढ्या सैनिकांनी युद्धभूमीवर आपला जीव गमावला असा औपचारिक आकडा आहे, तेवढेच गंभीर जखमीही झाले. १. ७ लाख प्राणी (उंट आणि खेचर यांच्यासह मुख्यतः उमदे घोडे), ३. ७ लाख टन एवढा अन्नधान्याचा पुरवठा, १३० करोंड जुट सॅंडबॅग्स (खंदकांमद्धे वापरतात तशा), सुती कपडा, शस्त्रास्त्रं, रणगाडे… आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्थानांचा तसंच लादलेल्या करांच्या द्वारे लुटलेला प्रचंड पैसा… ही वाढत जाणारी यादी डोळे विस्फरणारी आहे! भारताच्या सहभागाशिवाय स्वतःच्या जिवावर जर्मनीला आव्हान देण्याची, वाढत गेलेलं हे युद्ध लढण्याची ब्रिटनची तयारी होती का? याचं उत्तर मिळतं. त्यामुळे काहीही संबंध नसतांना, स्व-बांधवांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांसाठी इंडियन आर्मीमधलं हे सैन्य प्राणपणाने लढत होतं.. गुलाम म्हणून!
अन्यायकारक वागणूक
वर्षानुवर्षे ब्रिटिश सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात पगार,रहाण्याच्या सोयी, नोकरीचे नियम,इतर सवलती अशा बहुतांश बाबतीत उघड उघड भेदभाव होताच. मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना या युद्धादरम्यान देखील घडल्या. जखमी झालेल्या तसंच winter kit न पोहोचल्यामुळे आजारी पडलेल्या,साथीच्या रोगाने पिडलेल्या भारतीय जवानांना ब्रिटिश परिचरिकांकडे उपचार करवून घेण्यास बंदी होती. उपचारांविना त्यात कित्येकजण गेले. घोंघावणाऱ्या मृत्यूला समोर बघत अनेकांनी घरी (शेवटची) पत्रं लिहिली पण ती तपासली (सेन्सॉर) केली जात असत. कारण युद्धाविषयी कोणतीही माहिती पत्रात लिहिण्याची सक्त मनाई होती. दिशाहीन युद्धनीती आणि अपुऱ्या साधनांमुळेही हजारो सैनिक बळी गेले.
बलिदान नाकारण्यासाठी नवा निकष
पहिलं महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय सैनिकांसाठी एक अन्यायकारक निकष लावला: “जे सैनिक थेट युद्धभूमीवर लढतांना मृत्युमुखी न पडता, तिथल्या जखमांमुळे किंवा आजारपणामुळे (operational zones च्या) बाहेर मृत्यू पावले, त्यांना ‘युद्ध शहीद’ (war dead) मानलं जाणार नाही. ” या निकषामुळे हजारो सैनिकांची नांवं हुतात्म्यांच्या यादीत लिहून पुढे मुख्यालयात पाठवण्यात आलीच नाहीत. ब्रिटिश साम्राज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता मानायची सोडा पण दोन ओळींची तार करून त्यांच्या मृत्यूची बातमी घरी कळवण्याची तसदीही ब्रिटिशांनी घेतली नाही ही केवढी टोकाची कृतघ्नता! या एका तांत्रिक नियमामुळे कित्येक वीर सैनिकांचा त्याग इतिहासातून बेदखल झाला. केवळ ‘बेपत्ता’ सैनिक एवढीच त्यांची ओळख मागे राहिली!
कुणाचा मुलगा,कुणाचा भाऊ,पती… अनेकजण घरी कधीच परतरले नाहीत! आज काही बातमी कळेल, उद्या कळेल… ते जिवंत आहेत की धारातीर्थी पडले? की शत्रूने डांबून ठेवले? एक पिढी… दुसरी पिढी… वाट बघता बघता कितीतरी डोळे कायमचे मिटले! अनाथ मुलं गरिबीत पिचत राहिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या सैनिकांविषयी काहाही कळलं नाही… गावांगावांमधलं ते औदासिन्य कधीच सरलं नाही आ णि दुर्दैव म्हणजे भारतीय वीरांची हजारो नावं इतिहासाच्या पानातून पुसली गेली!
युद्धानंतर… वचनभंग!
युद्ध संपल्यावर आम्ही ‘अर्ध स्वातंत्र्य’ (dominion status) देऊ असं भारतीय नेत्यांना कबूल करून ते सपशेल नाकारत इंग्रजांनी महायुद्धानंतर भारताला कृतज्ञतेपोटी काय दिलं? तर अत्यंत जाचक असा Rowlatt Act, १९१९ साली पारित करण्यात आला. याअंतर्गत बंडखोरीचं कारण दाखवत कोणालाही वॉरंटशिवाय अटक करता येत होती, नेत्यांना ट्रायल न घेताच तुरुंगात डांबता येत होतं… बरंच काही भयंकर घडत होतं! .. आणि जे सैनिक प्राणपणाने लढले त्याच पंजाबच्या पवित्र भूमीवर अत्यंत निर्घृण पद्धतीने एप्रिल १९१९ मध्ये जनरल डायरने घडवून आणलेलं रक्तरंजित जलियनवाला हत्याकांड! होय.. हेच फलित होतं महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या हजारो जिवांच्या समर्पणाचं…!
‘पंजाब रजिस्टर्स’ प्रकल्प आणि पुढील संशोधन प्रक्रिया
Commonwealth War Graves Commission (CWGC), Uk Punjab Heritage Association (UKPHA) आणि ग्रीनविच विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी २०२१ साली ‘पंजाब रजिस्टर्स’ हा प्रकल्प आकाराला आला. पुढे पाच वर्षे अथक मेहनत मोठं संशोधन केलं गेलं. लाहोरमधल्या संग्रहालयात जतन केलेल्या युद्धविषयक हस्तलिखितांचा अभ्यास आणि त्याची संगणकात नोंदणी केली गेली. या कागदपत्रांमध्ये पंजाबमधील सुमारे ३,२०,००० सैनिकांची नावं आणि त्यांच्या सेवेचा सविस्तर तपशील नोंदवलेला आहे. तिथे मिळालेली मुख्य यादी पडताळून ९,९०९ सैनिकांची नावं इतर पुराव्यानिशी हुतात्मा यादीत समाविष्ट करण्यात आली. ब्रिटीश साम्राज्यासाठी लढलेल्या हजारो भारतीय सैनिकांच्या बलिदानाची काही थेंबांच्या शाईने का होईना पण अखेरीस नोंद झाली आणि अंशतः त्यांची गौरवगाथा, समर्पण जगासमोर आलं.
कौटुंबिक वारसा आणि अस्तित्त्वासाठी संघर्ष
लेस्टरमधील (Uk) दंतवैद्य डॉ. सनी पलाही यांच्यासारख्या हजारो लोकांसाठी त्यांचे पूर्वज शोधण्याचा हा भावनिक प्रवास आहे. त्यांचे पणजोबा केसर सिंग युद्धात शहीद झाले, पण त्यांची कुठेही नोंद नव्हती. केवळ बेपत्ता एवढीच माहिती. आता अधिकृत नोंद झाल्यामुळे, “माझा पूर्वज अत्यंतिक शौर्याने लढला” हा अभिमान पुराव्यासह त्यांच्या पुढच्या पिढीला मिळेल. असे अनेक जण या प्रकल्पाशी भावनिक धाग्याने जोडले गेले आहेत.
भारतीय शौर्याचा अविभाज्य भाग आणि अखंड भारताचा वारसा
अनेक दशके पहिल्या महायुद्धाचा इतिहास केवळ युरोपीय दृष्टिकोनातून पाहिला गेला. भारतीय सैनिकांना केवळ ‘भाडोत्री’ मानले जात होते. पण हे संशोधन सिद्ध करतं की, हे युद्ध केवळ फ्रान्स किंवा बेल्जियमच्या रणक्षेत्रात नव्हे, तर पंजाबच्या खेड्यापाड्यातही लढलं गेलं. या सैनिकांचा त्याग हा भारतीय शौर्याचा एक अविभाज्य भाग आहे.
लाहोर संग्रहालयात जपून ठेवलेली जुनी कागदपत्रं म्हणजे भारत-पाकिस्तानच्या फाळणीपूर्वीचा, दोन्ही देशांना जोडणाऱ्या एका सामायिक इतिहासाचा पुरावा आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
सीडब्ल्यूजीसी (CWGC) च्या महासंचालिका क्लेअर हॉ्र्टन (Claire Horton) यांनी सांगितलं की “पहिले महायुद्ध संपून एक शतकाहून अधिक काळ लोटला असला तरी आमचं शोध अभियान अजून सुरूच आहे. राष्ट्रकुल (Commonwealth) देशांच्या सेवेत बलिदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य तो सन्मान आणि आदर मिळावा यासाठी हे प्रयत्न आहेत. ‘पंजाब रजिस्टर्स’ प्रकल्प हा या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या ९,९०९ नावांच्या शोधामुळे जगाच्या इतिहासातील गहाळ झालेली पाने पुन्हा भरून येण्यास मदत होत आहे. हे एक अजरामर स्मरणपत्रं आहे, ही केवळ त्यांना श्रद्धांजली नसून तो एक प्रकारे त्यांचा कौटुंबिक वारसाही आहे. युद्धासाठी दिली गेलेली ही मोठी किंमत आहे. ”
हा दृष्टिकोन ठेऊन इतिहासातली मोठी त्रुटी भरून काढण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह आहे. संशोधनासाठी घेतली गेलेली अथक मेहनत स्तुत्य आहे. मात्र याला न्याय म्हणता येईल का याविषयी शंका आहे. हा रक्तरंजित इतिहास पुसून टाकता येणार नाही.
स्वातंत्र्यानंतर प्रचंड मोठं अंतर कापत आज विश्वबंधुत्त्वाच्या तत्त्वावर सर्वांशी भारत मैत्रीपूर्ण व्यवहार करत असला तरी हा शोषणाचा इतिहास दोन्ही देशांच्या पुढच्या पिढ्यांना तसंच जगभरात पुढे सांगितला जाणार! ते ऐकून त्यांच्या मनांत काय भावना असतील, माहित नाही. मात्र दुसऱ्यांना गुलाम करून वर्षानुवर्षे त्यांचं शोषण करणाऱ्या देशांच्या यादीत ‘माझ्या राष्ट्राचं – भारताचं’ नांव नाही याचा आपल्याला आणि येणाऱ्या पिढ्यांनाही सदैव अभिमान वाटेल, याची खात्री आहे!
मा. अटलजींच्या ओळी किती समर्पक आहेत –
“होकर स्वतंत्र मैंने कब चाहा है कर लूं मैं सबको गुलाम
मैंने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम |
मैं तेज:पुंज तमलीन जगत में फैलाया मैंने प्रकाश |
जगती का रच कर विनाश, कब चाहा है निज का विकास?
शरणागत की रक्षा की है, मैंने अपना जीवन दे कर|
विश्वास नहीं यदि नहीं आता तो साक्षी है इतिहास अमर |”
जय हिंद!
–
लेखिका : मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)
प्रस्तुती : गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






