श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ अपराजिता… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
अपराजिता
चराचरात स्पंदणारी आदिशक्ती
देव पराभूत झाले होते!
स्वर्गाचे वैभव हिरावले गेले होते. शुम्भ-निशुम्भांच्या सामर्थ्यापुढे देवगण हतबल झाले होते. ज्यांच्या संकेतावर विश्वव्यवस्था चालत होती, तेच आज आश्रयाच्या शोधात होते.
तेव्हा त्यांना तिचे वचन आठवले— _‘संकटाच्या वेळी माझे स्मरण करा. ’_
देव हिमालयाकडे निघाले. पर्वतराजाच्या निःशब्द सान्निध्यात उभे राहून त्यांनी आदिशक्तीची स्तुती आरंभिली— _‘या देवी सर्वभूतेषु… ’_
आणि जणू विश्वाच्या अंतरंगाची एकेक कवाडे उघडत गेली.
देवी आकाशात नव्हती केवळ, ती सृष्टीत होती. जीवात होती. मनात होती. अस्तित्वाच्या प्रत्येक स्पंदनात होती.
विष्णुमाया — विश्वाच्या लीलेचे अधिष्ठान. जे दिसते, जे अदृश्य आहे, जे जाणवते आणि जे अजून उमगायचे आहे, त्या सर्वांना व्यापून राहिलेली तिचीच माया.
चेतना —जीवनातील पहिले जागरण. ‘मी आहे’ ही जाणीव. अंतर्मनात उमटणारा अस्तित्वाचा पहिला स्वर. चेतना म्हणजे तिचा अंतःस्पर्श.
आणि मग येते निद्रा जागृतीला विसावा देणारी. थकलेल्या जीवाला आपल्या अदृश्य कुशीत घेणारी. निद्रेतही तिचेच अस्तित्व.
क्षुधा — उदरातील हाक. जीवनाला पुढे नेणारी आदिम प्रेरणा. जागे झालेल्या जीवाला पुन्हा जगण्याची आठवण करून देणारी.
छाया — प्रकाशासोबत चालणारे गूढ अस्तित्व. जाणीवेला न उमगणारेही तिच्याच व्यापक सत्तेचा भाग. प्रकाशात ती आहे; अंधुकतेतही तीच.
शक्ती — अंकुरात दडलेली, प्रवाहात धावणारी, अग्नीत प्रज्वलित होणारी. सृष्टी निर्माण करणारी, संघर्षाला सामोरी जाणारी, जीवनाला गतिमान ठेवणारी.
तृष्णा — जाणण्याची, मिळविण्याची, घडविण्याची, पुढे जाण्याची ओढ. आणि त्या ओढीला संयम देणारी *क्षान्ति*— *क्षमा*, सहनशीलता आणि अंतःशांतीची मूक शक्ती.
जाति — जीवनाच्या अखंड प्रवाहाची खूण. अस्तित्वाची परंपरा पुढे नेणारी. तिच्याबरोबर *लज्जा*—अंतर्मनाला मर्यादेची जाणीव करून देणारी सूक्ष्म प्रहरी.
मग येते शान्ति. बाहेरचा गोंगाट थांबला की जी आत ऐकू येते. मनाच्या तळाशी निश्चल राहणारी.
अदृश्य सत्याकडे नेणारी श्रद्धा आणि अंतर्मनाला उजळविणारी कान्ति — या दोन्ही तिच्याच छटा. श्रद्धा अंधारात दीप लावते; कान्ति त्या दीपाचे प्रकाशरूप होते.
लक्ष्मी — समृद्धीचे, मंगलतेचे रूप. जीवनात जे काही पोषण करते, वाढवते, फुलवते, त्यामागे तिचीच प्रसन्न छाया.
आणि मग वृत्ति — मनाच्या असंख्य हालचाली. विचार, इच्छा, भावना, संकल्प-विकल्प; अंतःकरणात उठणाऱ्या प्रत्येक लहरीत तिचेच स्पंदन.
जे जगले ते जपून ठेवणारी स्मृति. काल निघून जातो; स्मृती त्याला वर्तमानात पुन्हा आणते.
दुःख पाहून अंतःकरण वितळविणारी दया. मिळालेल्या जीवनाकडे कृतज्ञतेने पाहायला शिकविणारी तुष्टि. दया हृदयाला माणूस ठेवते; तुष्टि त्याला अंतःसमृद्ध करते.
आणि मग तिचे सर्वाधिक जिव्हाळ्याचे रूप— मातृरूप.
जन्म देणारी. कवेत घेणारी. चुकांवर क्षमा करणारी. संकटात सावली होणारी. लेकरासाठी स्वतःला विसरणारी. जगदंबा म्हणून उभी राहणारी.
पण ती केवळ मंगलतेतच नाही. भ्रान्ति म्हणूनही तीच. जे क्षणभंगुर आहे त्याला शाश्वत समजणे, जे सत्य नाही त्यालाच सत्य मानणे—मानवी अनुभवातील हा पडदाही तिच्याच व्यापक सत्तेचा भाग.
या सर्व रूपांच्या पलीकडे, आणि तरीही त्या सर्वांत अंतर्भूत— चिति.
शुद्ध चैतन्य. जाणिवेचा मूलस्रोत. ज्यामुळे चेतना जागते, स्मृती टिकते, श्रद्धा उजळते, दया उमलते आणि संपूर्ण विश्वाचा अनुभव शक्य होतो.
_म्हणूनच ती अपराजिता! _
तिचा पराभव कोण करणार?
चेतनेचा पराभव करता येईल का? श्रद्धेची एक ठिणगी कायमची विझविता येईल का? मातेच्या ममतेला जिंकता येईल का? दयेचा प्रवाह थांबविता येईल का?
नाही.
कारण ती एखाद्या मंदिरात मर्यादित नाही. ती चराचरात आहे. जीवनाच्या प्रत्येक अनुभवात आहे. आपल्या श्वासात, विचारात, भावनेत आणि अस्तित्वाच्या प्रत्येक स्पंदनात आहे.
हिमालयावर देवांनी जिला हाक मारली, ती दूर नव्हती. ती त्यांच्या कंठातील स्तोत्रात होती. त्यांच्या अंतःकरणातील आशेत होती.
आणि आजही—
भूक लागते तेव्हा,
दया जागते तेव्हा,
स्मृती डोळे ओले करते तेव्हा,
श्रद्धा अंधारात दीप लावते तेव्हा,
मातेचे हृदय लेकरासाठी धडधडते तेव्हा—
ती तेथेच असते.
.. चराचरात स्पंदणारी.
.. जीवनात धडधडणारी.
.. अंतःकरणात जागी असलेली.
… *अपराजिता! *
टीप : _‘देवगणाकृत अपराजिता स्तुति’_ ही देवीमाहात्म्य अर्थात दुर्गासप्तशतीच्या पाचव्या अध्यायातील प्रसिद्ध देवीस्तुती आहे. वरील लेखाला या स्तुतीस्तोत्राचा संदर्भ आहे.
©️ दिवाकर बुरसे
पुणे.
संपर्कः ९५५२६२९२४५
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




