डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
मनमंजुषेतून
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पात्र… की सत्पात्र…???” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
समाजात एक गट असा आहे, जो खाऊन पिऊन सुखी आहे, दुसरा गट आहे जो जगण्यासाठी खूप कष्ट घेत आहे परंतु तरीही ठीक ठाक पणे का होईना पण जगत आहे, तिसरा गट आहे जो घरातून बाहेर काढला गेलेला, फेकला गेलेला आहे… हा गट रस्त्यावर नाईलाजाने दुसऱ्याच्या दयेवर जगत आहे…!
– – या गटाला माणूस म्हणून जगवण्यासाठी आपणा सर्वांच्या साथीने प्रयत्न करत आहे परंतु हे एका रात्रीत संपणारं काम नव्हे…!
तर असे घरातल्या चार भिंतीला नको असलेले लोक, आभाळाखालच्या रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात पडून असतात, अन्नाची याचना करत…
समाजातील सात्विक मनाची माणसं, रस्त्यावरच्या या लोकांना आपापल्या परीने जेवण देत असतात. काही वेळा हे जेवण व्यवस्थित पॅक केलेलं असतं किंवा प्लास्टिकच्या भांड्यात ते दिलेलं असतं.
काही वेळा हे जेवण सुट्या स्वरूपात असतं… लोकांनी आपापलं भांडं / पात्र आणावं आणि लागेल तेवढं जेवण घेऊन जावं, अशी देणाऱ्याची भावना असते. ज्यांच्याकडे अशी भांडी / पात्रे आहेत ते लोक येतात, लाईन मध्ये उभे राहून जेवण घेतात.
परंतु यातल्या अनेकांकडे अशा प्रकारचे भांडे किंवा पात्र नसते, मग जेवण देणारी मंडळी आली की यांची गडबड सुरू होते, मग ते रस्त्यावर / उकिरड्यावर किंवा इकडे तिकडे पडलेली त्यातल्या त्यात बरी प्लास्टिकची कॅरीबॅग घेतात, लाईन मध्ये उभे राहतात आणि त्या एकाच कॅरीबॅगमध्ये मग संपूर्ण जेवण घेतात… म्हणजे त्या एकाच कॅरीबॅगमध्ये चपात्या, त्यावरच वरण, त्यावरच भात, त्यावरच पातळ भाजी… सर्वच एकत्र…!
कुणाकडे पूजा किंवा इतर सण समारंभ असतील तर त्यातील पदार्थ उदा. शिरा, जिलेबी, गुलाबजाम, पुलाव, खिचडी वगैरे वगैरे हे सर्व पदार्थ सुद्धा त्याच कॅरीबॅग मध्ये घेतले जातात.
आपल्या जागेवर बसेपर्यंत ती कॅरीबॅग वजनाने फाटणार नाही, याची जीवापाड काळजी घेवून ते कसेबसे आपल्या जागेवर पोहोचतात.
आता कल्पना करूयात, की त्या एका कॅरीबॅगमध्ये इतके सगळे पदार्थ जर एकत्र झाले असतील, तर त्या पदार्थांची त्या कॅरीबॅगमध्ये काय अवस्था होत असेल… असा हा सर्व एकत्र झालेला काला खाताना प्रत्यक्ष यांना पाहिलं, की पाहणाऱ्याच्या मनात गहिवर आल्याशिवाय राहत नाही…
एरव्ही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी ते पोटात एकत्रच होणार आहेत; याची जाणीव असली तरी सुद्धा, सर्व पदार्थ खाण्याअगोदरच, आपल्या पोटात अन्न सामावून घेणारी ती कॅरीबॅग केविलवाणी भासते…!
अशा भुकेल्या माणसाला दोन पोटं असतात, एक निसर्गानं दिलेलं, आणि दुसरं नियतीने कॅरीबॅगच्या रूपानं हातात ठेवलेलं…!!!
तर ; जेवण घेण्याच्या या तारांबळीमध्ये अनेकांना तर रस्त्यावरची ती कॅरीबॅग सुद्धा सापडत नाही, मग कुठेतरी एखाद्या वर्तमानपत्राचा तुकडा पडलेला असतो, हाच वर्तमानपत्राचा तुकडा घेऊन ते जेवणाच्या लाईनीत उभे राहतात.
हातातल्या ओंजळीत वर्तमानपत्र, वर्तमानपत्रात बातम्या… या बातम्यांमध्ये शहराचा विकास, सुधारणा, कुणाचा गौरव, मोटारींची धडक, दोन गटात मारामाऱ्या, विनयभंग, बलात्कार, खून दरोडे…
… ओंजळीतल्या वर्तमानपत्रावर याच बातम्यांच्या शाईवर वाढलं जातं एक शाश्वत सत्य… वरण आणि भात…!!!
पुन्हा सुरू होते मग दमछाक… वर्तमानपत्राचा कागद फाटायच्या आधी, मिळालेला हा वरण-भात घेऊन जागेवर पोहोचणं… वर्तमानपत्रातून सांडणारं वरणाचं “पाणी” आणि डोळ्यातले “अश्रू” दोन्ही एकजीव होऊन जातात…!
त्यानंतर वर्तमानपत्रातल्या बातम्यांच्या शाई सकट हा वरण-भात पोटात जातो.
एका बाजूला वरण-भात आणि बातम्यांसह शाई खाऊन पोट भरल्याची जाणीव घेऊन कुठल्यातरी कोपऱ्यात अस्ताव्यस्त पसरलेलं ते शरीर, तर दुसऱ्या कोपऱ्यात भिजून फाटलेलं, लगदा झालेलं, अंगावर वरण भाताची दोन-चार शीतं मिरवत बोळा होऊन पडलेला तो कागद…!
– – एकंदर रोज मी ही परिस्थिती पाहतो…
ज्येष्ठ भगिनीसम आदरणीय सुरेखाताई सुळे यांच्याशी हा विषय पूर्वी कधीतरी ओझरता मी बोललो होतो. पितृतुल्य, विंग कमांडर रवींद्र पारसनीस सर; यांच्याशी पुढे त्या हा विषय बोलल्या असाव्यात.
सुरेखाताईंच्या माध्यमातून, सर म्हणाले, ‘डॉक्टरांना सांगा, जेवण घेण्यासाठी ज्यांच्याकडे कोणतेही भांडं / पात्र नाही; त्यांना स्टेनलेस स्टीलचे तीन ताळी जेवणाचे डबे / पात्र द्यावीत, म्हणजे या लोकांना जेवण घेण्यासाठी अशा कचऱ्यातल्या कॅरीबॅग किंवा वर्तमानपत्रे घ्यायची गरज नाही. शिवाय तीन कप्पे असल्यामुळे अन्न असे एकत्र होणार नाही किंवा खाली सांडणार नाही. ‘
सरांचा आणि ताईंचा शब्द प्रमाण मानून आवंढा गिळत ‘हो’ तर म्हणालो; परंतु माझ्या नजरेसमोर स्टेनलेस स्टीलच्या डब्याच्या किंमती फेर धरून नाचत होत्या…
ज्यांच्याकडे कोणतंही पात्र नाही अशा लोकांची संख्या प्रचंड आहे…
लोकांची संख्या आणि डब्याची किंमत याची बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार माझ्या डोक्यात सुरू झाले…!
ताईंच्या ते लक्षात आलं असावं, त्यांनी पुन्हा बहुधा ते सरांच्या कानी घातलं असावं.
आदरणीय सर म्हणाले, ‘त्यात काय एवढं सुरुवात मी माझ्यापासून करतो, पुढे होईलच काहीतरी… ‘
सर फक्त एवढे म्हणून थांबले नाहीत, तर सुरेखाताईंच्या माध्यमातून त्यांनी स्टेनलेस स्टीलचे हे तीन ताळी डबे माझ्याकडे पोहोचवले सुद्धा.
– मग योग्य त्या व्यक्तींना शोधून हे डबे द्यायला आपण सुरुवात केली आहे.
माणसं आता माणसासारखं जेवतील इतकाच आनंद…!
घुसुमटलेल्या कॅरीबॅग आणि वर्तमानपत्राचे तुकडे सुद्धा आता समाधान पावतील…
माझ्या मनात ही भावना जागवल्याबद्दल, एक वेगळी दिशा दाखवल्याबद्दल, पितृतुल्य आदरणीय विंग कमांडर रवींद्र पारसनीस सर आणि आदरणीय सुरेखाताई सुळे, आपणा दोघांनाही माझा कडक सॅल्यूट…!
इथून पुढे सुद्धा हा उपक्रम शेवटच्या माणसाला हा डब्बा / पात्र मिळेपर्यंत सुरूच ठेवणार आहोत.
गुणाकार भागाकार, बेरीज वजाबाकी या तर जन्मभर चिकटलेल्याच आहेत, यांचं होईलच काही ना काहीतरी…
पण उकिरड्यातल्या कॅरीबॅगला आणि रस्त्यावर पडलेल्या कागदाला सुद्धा जर त्या लोकांचं हे जगणं पाहून लाज वाटते, तिथे मनातल्या मनात डब्यांच्या किमतीचे हिशोब मांडून, माणूस म्हणवून घेण्याचा मला स्वतःला तरी काय अधिकार आहे…???
आता अंतिम माणसाचा उदय होईपर्यंत हा प्रकल्प सुरूच राहील…!!!
कुणीही याचक म्हणून कोणाही पुढे हात पसरू नयेत, लाचारपणे जगू नये, माणूस म्हणून सन्मानाने जगावे या मताचा मी आहे आणि त्याच दृष्टीने सर्वांच्या साथीने प्रयत्न सुरू आहेत.
– – पण समाजापासून दूर फेकल्या गेलेल्या या लोकांच्या, “सन्मानानं जगणारा माणूस” होण्याच्या खडतर प्रवासात, माणूस म्हणून त्यांच्यासोबत थोडा वेळ चालायला काय हरकत आहे?
– – झाड होऊन, थोडा वेळ सावली द्यायला काय हरकत आहे??
– – – त्यांच्या रिकाम्या ओंजळीत, एक “पात्र” देऊन, मी सुद्धा “सत्पात्र माणूस” आहे हे स्वतःलाच सांगायला काय हरकत आहे…???
आपले स्नेहांकित,
डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





