मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “मागणे…” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
मागू का मी आज काही
सांग देवा तुजकडे
मागू की नाहीच मागू
आज पडले साकडे…
*
हे हवे परी ते नको
हे नित्यची चालू असे
ऐकतोस की नाही तू
हेही मला ठावे नसे…
*
आज एकची मागते
तू लक्ष दे माझ्याकडे
वृत्तीची निवृत्ती होवो
‘मीपणा‘ ने तुजकडे…
*
एव्हढे देशील तर
मी मागणे विसरेन
तव स्मरणी गुंगता
मी मलाच विसरेन …
☆
© मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





