मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆

☆ हे दुर्गे माते… ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

‘गणेशोत्सव संपला की त्यासाठी उभारलेला मांडव पंधराच दिवसांनी येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी म्हणून तसाच ठेवायचा हा जणू नियमच.. आणि त्यामुळे रहदारीला होणाऱ्या अडथळ्याचा विचार करण्याचे काही कारणच नसते, कारण हा नवरात्र-उत्सवही “ सार्वजनिक “च असतो.. आणि एकदा ‘सार्वजनिक’ हा शिक्का मारला की खरं तर जनतेबद्दल कुठलाही विचार करणे हा शुद्ध मूर्खपणा ठरतो – –या सगळ्या गोष्टी सहज गृहीत धरल्या जायला लागल्यात कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षातच स्वातंत्र्याची व्याख्याच बघता बघता बदलली.. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार ही व्याख्या कधी रूढ झाली हे सामान्य जनतेला कळलेही नाही… याचबरोबर आणखी एका शब्दाची व्याख्याही बदलली.. तो शब्द म्हणजे ‘सार्वजनिकता‘. देशाला स्वातंत्र्य मिळायलाच हवे हा उदात्त विचार सामान्यांच्या मनावर ठसवण्यासाठी हा शब्द लोकमान्यांनी वापरला आणि जनतेला त्या उद्देश्याकडे नेण्याचा प्रयत्न केला…सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.. त्यासाठी जनतेला एकत्र आणण्याच्या हेतूने. इतर अनेकांच्याही वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे यथावकाश स्वातंत्र्य मिळालेही.. मग अनेक शब्दांच्या तोपर्यंत अभिप्रेत असलेल्या व्याख्याही बदलल्या.. त्यातलेच हे दोन ठळक शब्द.

बघता बघता ‘उत्सव’ या ऊर्जादायक शब्दाची व्याख्याही बदलली.. “ या टोपीखाली दडलंय काय ? “ हा प्रश्न सुरुवातीला नाही पडला कुणालाच.. आणि मग अनेक वर्षे घराघरात साजरा होणारा नवरात्रोत्सवही बघता बघता ‘सार्वजनिक’ झाला.. आणि सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची जणू स्पर्धा सुरू झाली.. संख्या प्रचंड वाढली.. पद्धती बदलल्या.. आणि हेतू तर कमालीचे बदलले…आणि सुजाण नागरिकांचे विचार पारतंत्र्यात गेले.

उत्सवाचा उपयोग तो आयोजित करणाऱ्यांच्या सोयीने.. त्यांच्या फायद्यानुसार ठरवला जातो हल्ली… आणि ही गोष्ट आता गृहितच धरली जायला लागली आहे हे इतरांचे दुर्दैव आहे. सामान्य जनता पुन्हा वेगवेगळ्या कारणांनी भरडलीच जायला लागली आहे… विचार असे सारखे भरकटायला लागले त्याचे कारण म्हणजे – –

– – आमच्या घरासमोरच असलेल्या मांडवात गेले ८-९ दिवस या उत्सवाच्या नावाने जो धुडगूस चालला आहे तो नाईलाजाने सहन करत बघतांना मनातही विचारांचा धुडगूस सुरू झाला होता आणि तो नकळतच शब्दरूप घेऊन कागदावर उतरला.. आपोआपच एका प्रार्थनेच्या रूपात.. तो असा – – – आणि तसंही हल्ली सामान्य माणूस फक्त प्रार्थनाच करू शकतो ना…

☆ हे दुर्गे माते.. ☆

जय जय दुर्गे माते.. भवदु:खेहरिते

नमितो तुजप्रति देवी.. हो प्रसन्न आम्हाते ।।

*

सकलांची जननी तू.. तू जगउद्धारिणी

किती असुरा मर्दियले.. तू संकटनाशिनी ।

महिषासुर मारलास.. पापच जगी ना उरले

… परि माते आता त्या.. पापाविण काही नुरले ।।

*

त्या असुरा मारून तू.. विसावलीस का.. कशी

ते हेरून असुर-सगे.. करु धजावती सरशी ।।

किती काळ लोटला.. महिषासूर पुनर्जन्मला

कलियुगात या माते.. तो अतीच गं मातला ।।

*

तेव्हा एकच होता.. आता प्रकटे विविध रुपात

भ्रष्टाचार नि दंगेधोपे.. रूपे कशी वर्णू शब्दात ।

बेकारी अन् महागाई ही.. बडगा जातियतेचा

किती अस्त्रे या असुरांलागी.. पार न लागे त्यांचा ।।

*

राक्षसरूपही किती बदलले.. दानव मानव झाले

भयावह आणि चेहरे त्यांचे.. मनास जणू लावले ।

मानव समजून जवळी जाता.. होई गं फसगत

भुई धोपटता सर्प निघावा.. तशीच गं ही गत ।।

*

तुझ्या कृपेने जरी जन्मती.. सगळे ‘माणूस’ म्हणुनी

तरी कुणी त्यातले कितीका छळती.. गौणच त्या गणूनी ।

मनामनात गं कलीच शिरला.. तुझे स्थान डळमळते

कुठे गुंतलीस माते इतकी.. तुला का न हे कळते ।।

*

का तूही भुललीस दिमाख पाहून.. तुझ्या पूजनाचा

पामर मी तुज कैसे सांगू.. देखावा गं हा वरचा ।

दुष्कृत्यांना दडविण्यास हा.. सार्वजनिकतेचा गं मुलामा

भीषण वास्तव प्रत्यक्षी.. जरी उदात्त गमते ही प्रतिमा ।।

…

माते जाग तू स्वयेच आता.. कारण शोधू नको कुठले

“दार उघड बया” ऐसे प्रार्थाया.. त्राणही ना आम्हा उरले ।।

तव भक्त असूनही किती त्रासलो.. सहन न हो काही आता

धाव घेऊनी तारी गं आई.. फिरुनी मग म्हणू “ तू जगमाता “ ।।।।

☆

©  मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted