image_print

सौ कुंदा कुलकर्णी

??

☆ वारीचा अपूर्व सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सातारला असताना वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्याबरोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे काम करायला मिळाले. गुरूजी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं नेटकं आयोजन करत असत. एकदा त्यांनी आषाढी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना धोतरे , घोंगडी शाली व स्त्रियांना साड्या स्वखर्चाने वाटायचे ठरवले . आम्हालाही वारीचा सोहळा अनुभवायचा होता त्यामुळे आम्ही तीस-चाळीस जण त्यांच्या बरोबर निघालो. सातारला दोशी बंधू यांची पार्ले बिस्कीट कंपनी आहे. त्यांनीही भरपूर बिस्किटांचे बॉक्स वारकऱ्यांना देण्यासाठी पाठवले. सकाळी सातला आम्ही गुरुजींच्या पाठशाळेत जमलो. सगळे जमेपर्यंत  झिम्मा फुगडी गाणी फेर, विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला आणि वारी चा उत्साह ओसंडून वाहायला लागला. आठ वाजता दोन मोठ्या बसेस निघाल्या. वाटेत भजन भारूड गवळण जप रंगतदार किस्से यात चार तास कसे निघून गेले कळलेच नाही. माळशिरस च्या पठारावर उतरलो. पोटपूजा उरकून घेतली. आता मात्र” भेटी लागी जीवा लागलीसे आस ” अशी पालखीची तळमळ प्रत्येकाला लागली. आणि लांबून टाळ-मृदंगाच्या नादात विठ्ठल नामाचा गजर ऐकायला यायला लागला. अनेक भगव्या पताका फडकू लागल्या.” निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम ” म्हणत नाचत शुभ्र वेषातले वारकरी तल्लीन होऊन स्वयंशिस्तीने पुढे जाताना दिसू लागले. आपले वय विसरून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन नाचणाऱ्या महिला पाहून जागच्याजागी आम्हीसुद्धा नाचायला लागलो. मागून सुंदर धिप्पाड खिलारी बैल जोडी आपल्या खांद्यावर रथ ओढत आली. संपूर्ण रथ फुलांच्या माळांनी सुशोभित केलेला होता.  पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पादुकांची पूजा करण्यासाठी झुंबड उडाली. बिस्किटांचे बॉक्स उघडून प्रत्येकाला बिस्किट पुडा देताना खूप आनंद होत होता. गुरुजी व त्यांचे शिष्य गरजू वारकरी हेरून त्यांना कपडे वाटप करत होते. दोन तास कसे गेले कळलेच नाही. विठ्ठल भक्ती ची गंगा अखंड वाहत होती. वारकऱ्यांची रांग संपत नव्हती. अखेर आमच्याकडचे सामान संपले व आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तो अपूर्व अद्भुत एकमेवाद्वितीय अविस्मरणीय अवर्णनीय अद्वितीय असा सोहळा आजही आठवतो. वारीमध्ये उच्चशिक्षित भाविक सुद्धा होते. कुणीही कसलाही बडेजाव मिरवत नव्हते. मन मंदिरात जपून ठेवलेला हा वारीचा सोहळा आठवला की आजही खूप प्रसन्न वाटते.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments