सौ अंजली दिलीप गोखले
मनमंजुषेतून
☆ जाहिरात : “हरवला आहे” – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
मी पेपर उघडला !!
त्यात मीच दिलेली
जाहिरात होती —-
हरवला आहे .. “आनंद”
पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …
रंग … दिसेल तो
उंची …भासेल ती
कपडे सुखाचे
बटण दुःखाचे !!
कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून
थकलो आहोत सगळीकडे शोधून शोधून !!
“आनंदा” परत ये
कुणीही तुझ्यावर रागावणार नाही
तुझ्यावर कसलीही सक्ती करणार नाही
घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट
दार उघडं ठेवलंय, वाढून ठेवलंय आशेचं ताट
शोधून आणणाऱ्याला दिलं जाईल इनाम
मग म्हटलं आपणच करावं हे काम !!
आणि काय आश्चर्य .. सापडला की गुलाम ….
एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड….
एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड ….
आठवणींच्या मोरपिसात ….
अगरबत्तीच्या मंद वासात ….
मोगऱ्याच्या मखमली स्पर्शात ….
अवेळी येणाऱ्या पावसात ….
त्यानेच मारला पाठीत धप्पा– जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा ..
मी म्हटलं अरे इथेच होतास उगाच दिली मी जाहिरात..
तो म्हणाला वेडी असता तुम्ही माणसं ..
मला बाहेर शोधता …पण मी तर असतो तुमच्याच मनात … !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






