मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ हू विल क्राय व्हेन यू डाय? ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

Who Will Cry When You Die? हे पुस्तकाचं नाव वाचलं की पहिल्यांदा वाटतं—हे मृत्यूबद्दलचं पुस्तक असावं. पण पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि लक्षात आलं, की हा मृत्यूचा प्रश्न नाहीच. हा तर आपण जगलो कसे आणि आपल्या जगण्याचा इतरांच्या आयुष्यावर किती परिणाम झाला, याचा प्रश्न आहे. खरं तर प्रश्न असा आहे—तुम्ही नसाल, तर कोणाला तुमची उणीव भासेल? आपण आयुष्यभर कितीतरी माणसांना भेटतो. काही माणसं येतात, थोडा वेळ थांबतात आणि निघून जातात. काहींची फक्त ओळख राहते. काही मित्र होतात, काही सहकारी, काही नातेवाईक. पण या सगळ्या गर्दीत अशी किती माणसं असतात, ज्यांच्याशी आपला खरा जिव्हाळ्याचा बंध निर्माण होतो?

किती जणांना आपल्या फोनची वाट पाहावीशी वाटते? किती जण आपल्या सल्ल्यावर विश्वास ठेवतात?

कुणाला आपल्या मदतीची गरज असते? कुणाला आपल्या दोन शब्दांच्या आशीर्वादाने धीर मिळतो?

आपल्याला मात्र याची कल्पना नसते. आपण मोठ्या गोष्टी लक्षात ठेवतो—पद, पैसा, पुरस्कार, यश, प्रतिष्ठा. पण एखाद्याच्या आयुष्यात आपण केलेली छोटीशी मदत मात्र आपल्याच लक्षात राहत नाही. कुणाला दिलेला वेळ, ऐकून घेतलेलं दुःख, योग्य वेळी दिलेला सल्ला किंवा खांद्यावर ठेवलेला हात—कधी कधी एवढंच एखाद्याला आयुष्यभर पुरतं. वाचताना एक विचार मनात येतो—आपण एखाद्याच्या आयुष्यात किती मोठी व्यक्ती आहोत, हे आपल्याला कधीच कळत नाही. कारण आपली किंमत आपण स्वतः ठरवत नसतो; ती कुणाच्या मनात हळूच तयार झालेली असते.

कधी एखादा तरुण आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहत असतो. कुणाला आपला अनुभव हवा असतो. कुणाला आपली मदत. कुणाला फक्त एवढंच जाणून घ्यायचं असतं की, “हो, मी आहे तुझ्यासाठी. ” आणि गंमत अशी की, आपण ज्याला साधं कर्तव्य समजतो, तेच दुसऱ्यासाठी आयुष्यभराची आठवण असू शकतं.

माणूस आयुष्यात किती लोकांना भेटला, याला फारसं महत्त्व नाही. किती माणसांना त्याने मनापासून जोडून घेतलं, याला अर्थ आहे. वय वाढत जातं तसं कदाचित हे अधिक जाणवतं. सुरुवातीला आपण विचार करतो—“माझ्यासाठी कोण आहे? ” नंतर कधीतरी प्रश्न बदलतो—“मी कोणासाठी आहे? ” आणि हा बदल फार सुंदर असतो

हे पुस्तक आपल्याला अनेक साधे पण खोल विचार सांगतं—नाती जपा, प्रेम व्यक्त करा, क्षमा करा, वर्तमानात जगा, इतरांना मदत करा, आपल्या अनुभवाचा उपयोग पुढच्या पिढीसाठी करा आणि आपल्या अस्तित्वाचा उपयोग केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. आपण किती लोकांना मदत केली, किती लोकांना उभं केलं, किती मनांना धीर दिला आणि किती जणांना आपल्या अस्तित्वामुळे सुरक्षित वाटलं—यातून आपल्या आयुष्याची खरी किंमत ठरते. मला या पुस्तकाच्या शीर्षकाचा म्हणूनच थोडा वेगळा अर्थ जाणवतो. “Who Will Cry When You Die? ” म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर किती लोक रडतील, हा प्रश्न नाही. तर तुम्ही जिवंत असताना किती लोकांच्या आयुष्यात तुमच्यामुळे काहीतरी चांगलं घडलं, हा प्रश्न आहे.

आणि कदाचित त्याहून सुंदर प्रश्न असा— तुम्ही नसाल, तर कोणाच्या आयुष्यात एक छोटीशी पोकळी निर्माण होईल? कारण मृत्यू हा शेवट असतो; पण आपण दिलेलं प्रेम, दिलेला आधार आणि केलेली माणुसकी—हीच आपली पुढची ओळख असते.

श्वास सुरू आहे, तोपर्यंत वेळ गेलेली नाही.

एखाद्याला फोन करूया.

एखाद्याची चौकशी करूया.

ज्याला मदत हवी आहे त्याला हात देऊया.

ज्याच्यावर प्रेम आहे त्याला ते सांगूया.

आणि ज्याला आपला आशीर्वाद हवा आहे, त्याच्या डोक्यावर हात ठेवूया.

कारण शेवटी— मरणानंतर कोण रडेल यापेक्षा, आपण जिवंत असताना कोणाच्या चेहऱ्यावर आपल्या अस्तित्वामुळे हसू आलं, कोणाचे अश्रु पुसता आले, हेच कदाचित आयुष्याचं खरं पुस्तक परीक्षण आहे.

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted