संगीता कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – मी नृत्यांगना… – ?  संगीता कुलकर्णी ☆

☆

घुंगरांच्या नादात माझे आभाळ झंकारते

पावलांच्या तालावर चांदणेही थिरकते

लयीच्या लाटांवर स्वप्नांची नौका वाहते

माझ्या प्रत्येक मुद्रेत एक कहाणी गाते

*

मी नृत्यांगना देहातली दीपशिखा

अंधाराच्या वाटेवर उजळते अंतरीची रेखा

नयनी दडलेले शब्द ओठांवर न येती

हातांच्या मुद्रांतून मनोगते उमलती

*

रंगमंच माझा.. कधी रण.. कधी देव्हारा

टाळ्यांच्या गजराआड संघर्षांचा पसारा

कपाळावर घामाचे मोती ओठांवर हसू

हरलेल्या क्षणांनाही शिकवते मी नवे ऋतू

*

ठेचकाळले पाऊल तरी ताल सोडत नाही

तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा गुंफल्यावाचून राहात नाही

प्रकाशझोतात माझी सावलीही नाचते

माझ्यातली स्त्री स्वतःलाच नव्याने वाचते

*

घुंगरू माझे केवळ अलंकार नाहीत

ते माझ्या जिद्दीचे श्वास माझे संस्कार आहेत

मी नाचते तेव्हा काळही क्षणभर थांबतो

मी नृत्यांगना माझ्यातला आत्मा ताल धरतो..!

☆

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted