डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ?

☆ दोन ध्रुव… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

काल स्नेहाला निरोप दिला आणि मिनीला अगदी हुश्श झालं. कुठून बोलावलं हिला घरी आणि ही आपत्ती आपणच ओढवून घेतली अंगावर असं झालं मिनीला.

त्याचं काय झालं, फारा वर्षामागची गोष्ट. मिनी आणि स्नेहा खरं तर गाण्याच्या क्लासमधल्या मैत्रिणी.

मिनीचा आवाज छान म्हणून आईनं तिला हौसेने क्लासला घातलं. तिथे मिनीची स्नेहाशी ओळख झाली.

स्नेहाचा आवाजही चांगला होता. स्नेहा क्लास समोरच्या चाळीत रहायची. दोनच खोल्या, चार भावंडं आणि आईवडील आजी. सदैव वैतागलेली आई आणि घरी दारिद्र्य सुद्धा.

मिनीची परिस्थिती चांगली होती. आईवडील नोकरी करणारे, दोनच भावंडं आणि आजी आजोबांच्या मोठ्या वाड्यात राहायचे ते.

मिनी आणि स्नेहा खूप चांगल्या मैत्रिणी. शाळा एकच दोघींची. मिनी स्वभावाने सरळ आणि निगर्वी. तिला सगळीच माणसं सरळ वाटायची

स्नेहा मात्र चाळीत राहून चांगलीच बनेल झाली होती. माणसं बरोबर ओळखता यायची तिला.

मिनी अतिशय हुशार होती. स्नेहाची बुद्धी बेताबेताची. म्हणायची, मला कुठे शिकून मोठं डॉक्टर इंजिनिअर व्हायचंय? बी ए होईन आणि मिळेल ती नोकरी करीन मी. ”

मिनी तिला समजावून सांगायची

”स्नेहा, असं नसतं ग. तू जरा जास्त कष्ट घेतलेस तर चांगली शिकू शकशील की. अग, ध्येय मोठं असलं की मार्ग सापडतो स्नेहा. तू सुद्धा हुशार आहेस की. जरा जास्त अभ्यास केलास की मग चांगली डिग्री घेता येते आणि मग नोकरी करायला अडचण येणार नाही. ”त्या नकळत्या वयात सुद्धा हे भान मिनीला होतं.

मिनी स्नेहा दोघी एसएससी झाल्या. मिनी तर रँक मधेच आली. स्नेहा चांगले गुण मिळवून आर्टस् ला गेली.

आता मात्र दोघी मैत्रिणींच्या वाटा वेगळ्या झाल्या. कधीतरी दोघी धावत पळत भेटत. स्नेहाला दुपारी भरपूर वेळ असायचा. मग तिने शिवणाचा, एम्ब्रॉयडरीचा असे निरनिराळे क्लासेस लावले. मिनी मात्र तिच्या बारावीत अतिशय बिझी होती.

त्या दिवशी अचानक स्नेहा मिनीच्या घरी आली. सुंदर भरतकाम केलेले ड्रेस मटेरियल मिनीच्या हातात ठेवून म्हणाली,

“बघ ग आवडलं का? तुझा वाढदिवस आहे ना पुढच्या आठवड्यात? नक्की शिव हं. ”

मिनीला ते भरतकाम अतिशयआवडलं. स्नेहाला मिठी मारून ती म्हणाली, किती ग सुंदर भरले आहेस तू. मला फार आवडलं बघ. नक्की शिवणार मी हा कुर्ता ग. ”स्नेहाला आनंद झाला.

मिनीची आई म्हणाली, गुणी पोर आहे हो, पण गरिबी माणसाला तोंड वर काढू देत नाही बघ. चांगलं होऊ दे हिचं सगळं. ”

दिवस भरभर उलटले. मिनीला तिला हवा तसा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. मिनी आता आणखीच बिझी झाली. तिचं नवीन कॉलेज, नवीन क्षितिज, नवीन मित्र मैत्रिणी. स्नेहाने आर्टस् लाच प्रवेश घेतला.

मध्ये एकदा मिनी मुद्दाम वेळ काढून स्नेहाच्या घरी गेली. ते घर होतं तसंच आणखी जुनं झालेलं दिसलं मिनीला. स्नेहाच्या पाठची भावंडं अजून शिकत होती. मोठा भाऊ बीकॉम् होऊन कुठेतरी खाजगी नोकरी करत होता.

स्नेहाच्या आईने अगत्याने खायला केलं. मिनीला चहा दिला.

स्नेहाने सांगितलं, मी आर्टस् ला गेलेय आणि मग बीएड करीन म्हणजे मला शाळेत चांगली नोकरी मिळेल. माझ्या काही फार अपेक्षा नाहीत आयुष्यात बाई. ”

मिनी काहीच बोलली नाही. घरी येऊन ती तिच्या विश्वात अत्यंत व्यग्र झाली. मिनीचे कॉलेज, निरनिराळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मिनीला इकडे तिकडे बघायलाही उसंत नव्हती.

स्नेहा बीए झाली. नंतर तिने ठरवल्याप्रमाणे बीएड ला प्रवेश घेतला.

मिनी चे इंजिनिअरिंग चे शेवटचे वर्ष पूर्ण झाले.

आई म्हणाली, ” मिने, आता काय विचार आहे तुझा? लग्नाचं बघायला लागायचं का? कोणी बघितला आहेस का? ”

“नाही ग आई. पण मला कॅम्पस् इंटरव्ह्यू मध्ये चांगला जॉब मिळालाय. मी दोन वर्षे नोकरी करते आणि मग लग्न. चालेल ना? ”आई हसली आणि म्हणाली, चालेल की. घे अनुभव बाहेरच्या जगाचा. ”

एक दिवस स्नेहा तिच्या लग्नाची पत्रिका घेऊन मिनीच्या घरी आली.

“मिने, माझं लग्न ठरलं. हे आहेत सरकारी नोकरीत. स्वतःचा दोन रूमचा फ्लॅट आहे. सासूसासरे गावी असतात. मुख्य म्हणजे त्यांची आमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. हुंडा आणि मानपान.

नक्की या ग माझ्या लग्नाला, तू आणि काकू. ”

स्नेहा आवर्जून बोलावून गेली. मिनी आणि तिची आई लग्नाला गेल्या. अगदी निम्नस्तरीय कुटुंब दिसत होतं स्नेहाच्या सासरचं.

स्नेहा खुशीत दिसत होती. बरा दिसला नवरा पण.

भरपूर आहेर करून मिनी आणि तिची आई घरी परतल्या.

“सुखी होऊ दे हो पोर सासरी. ”

मिनीची आई मनापासून म्हणाली.

दरम्यान खूप गोष्टी घडल्या.

मिनीच्या बाबांचे मित्र खरे काका सहज भेटायला आले होते घरी. मिनीला त्यांनी बघितलं आणि म्हणाले,

“वहिनी, करताय का लेकीचं लग्न? माझा मुलगा यंदा लग्न करतोय. छानच आहे आमचा समीर. एमटेक झालाय आणि अमेरिकेला असतो. बघा बुवा. मुलगी कायम अमेरिकेला पाठवावी लागेल मात्र.

समीर भारतात परत यायची शक्यता कमीच आहे. समीर सध्या आलाय भारतात. बघा. हवं तर घेऊन येतो उद्या तुमच्याकडे”खरेकाका हसत हसत म्हणाले.

मिनीला बाबांनी विचारलं. मिनी म्हणाली, ”काही हरकत नाही माझी त्याला भेटायला. ”

दुसऱ्या दिवशी खरेकाका काकू आणि समीर, मिनीच्या घरी आले. मिनी आणि समीर दोघेही बाहेर हॉटेलमध्ये गेले. समीरला मिनी आवडली आणि मिनीला समीर.

हे बघ मिनी, तुलाअमेरिकेत चांगला जॉब मिळेल. माझाही जॉब उत्तम आहे. पण तुला कायम अमेरिकेत रहायला आवडेल का? तरच आपण पुढे जाऊ. नंतर कटकट करत बसायचं नाही. नाहीतर आत्ताच आपण थांबू. ”समीर स्पष्ट म्हणाला.

मिनी म्हणाली, ”मला चालेल समीर. तू जॉब करू देशील ना मला? मी नुसती घरी नाही हं बसणार. माझं इकडेही उत्तम आहे करिअर. ’’

समीर हसला, म्हणाला, एवढी हुशार इंजिनिअर मुलगी घरी कशी बसवून ठेवेन मी? तुझं वर्क परमिट आलं की जॉब मिळेल तुला.”

दोघांच्या पसंतीने समीर मिनीचं लग्न ठरलं सुद्धा.

अगदी कमी वेळात मिनीच्या आईवडिलांनी मोठ्या हौसेने मिनीचं लग्न करून दिलं. समीर आधी अमेरिकेला गेला आणि मिनीचा व्हिसा झाल्यावर सहा महिन्यांनी मिनी अमेरिकेत पोचली.

तो सुंदर देश, समीरचं सुंदर घर बघून मिनी हरखून गेली.

समीरने हौसेने तिला बरंच फिरवून आणलं.

मिनीने मग कारचं लायसन्स मिळवलं.

मिनीचं वर्क परमिट आलं आणि तिला चांगला जॉबही मिळाला.

दिवस कसे सुखात जात होते त्यांचे.

मध्यंतरी मिनी भारतात येऊन गेली.

स्नेहाला तीआवर्जून भेटली. स्नेहाला मुलगा झाला होता. एक शाळेत ती नोकरी करत होती. मिनीने स्नेहाला माहेरी भेटायला बोलावलं. तिकडून आणलेल्या खूप खूप भेटी तिला दिल्या

“कशी आहेस स्नेहा? मुलगा केवढा झाला? ”तिने आपुलकीने विचारलं.

मुलगा दोन वर्षांचा झाला माझा.

तू मात्र खूप बदललीस ग मिने. किती मस्त दिसतेस. जणू फॉरिनरच.

माझं चाललंय ठीक ठीक. महागाई किती ग झालीय. त्या मानाने पगार कुठे वाढत आहेत आमचे? पुन्हा कोकणात सासूसासऱ्यांना पैसे पाठवावे लागतात. तुझं बरंय बाई. राजा राणींचा संसार.

मिनीला हे खटकलंच. ”स्नेहा, तिकडे मी अतिशय बिझी असते. सगळं काम करून मला ऑफिसला जावं लागतं. तिकडची अंतरे किती दूर असतात. जीव थकून जातो घरी आल्यावर. ”

मिनीच्या शब्दावर स्नेहाचा विश्वास बसलेला दिसला नाही.

जाते बाई. हे घरी आले असतील म्हणत स्नेहा उठलीच.

मिनी आईला म्हणाली, ”अशी कशी ग ही? मी एवढं आवर्जून हिला भेटायला बोलावलं तर माझी एका शब्दाने चौकशी पण केली नाही ग हिने! अशी कशी माणसं बदलतात ग आई? ”

आई हसली”. स्वाभाविक आहे हे बाळा. आपली मैत्रीण एकदम त्या मोहनगरीत गेली, एकदम उच्च रहाणीमान, सगळं सगळं बदललेलं तिला दिसलं. नकळत तिची स्वतःची आणि तुझी तुलना आली असेल मनात.

तिचं काही फार छान चाललेलं दिसत नाहीये.

मनुष्य स्वभाव आहे बरं हा. ज्या उंचीपर्यंत आपण पोचू शकत नाही त्याचा हेवा वाटतोच ग माणसाला. ”

मिनीला हे पटलं. तरी मिनी स्नेहाच्या घरी गेली. आपला फोन नंबर स्नेहाला दिला. तिचाही घेतला. मिनी परत अमेरिकेला गेली.

दरम्यान मिनीला दोन मुलं झाली.

काळाची पानं भरभर उलटली. मिनी आता चाळिशीला पोचली. तिचे आईबाबा थकत चालले. अनेक वेळा तेही मिनीकडे अमेरिकेला येऊन रहात. मिनीची मुलगी पंधरा आणि मुलगा तेरा वर्षाचे झाले.

मुलं पूर्ण तिकडच्याच पद्धतीने वाढत होती. मराठी बोलत घरात पण तरीही ती अमेरिकन संस्कृतीत वाढलेली मुलं.

शाळेत उत्तम प्रगती होत होती मुलांची.

अचानक एक दिवस मिनीला स्नेहाचा फोन आला. मिनी 

आश्चर्यचकितच झाली.

इतक्या वर्षांनी स्नेहाचा फोन?

स्नेहा म्हणत होती, अग मी तुमच्या शहरात आलेय. तीही गंमतच झाली बघ.

माझ्या पुतण्याच्या बायकोला दिवस गेले. त्यांच्या मदतीला कोणी येणारं नव्हतं. मग मला पुतण्याने चार महिने बोलावलं. त्यानेच तिकीट व्हिसा सगळं केलं. आता तिचं बाळंतपण होऊनही झाले तीन महिने.

आता सगळं उरकून माझी परत भारतात जायची वेळ झाली. तर सहज म्हटलं की. तू याच शहरात रहातेस ना? बे एरियात? तर जाताना तुला भेटून जावं सहज शक्य असलं तर.

किती लांब आहेस तू इथून?

मिनीं स्नेहाच्या पुतण्याशी बोलली. फार नाही पण दीड तासाच्या ड्राईव्हच्या अंतरावर होते तिच्या पुतण्याचे घर.

मिनी म्हणाली, स्नेहा, या रविवारी तुझा पुतण्या तुला माझ्या घरी आणून सोडेल दिवसभर. आणि संध्याकाळी घेऊन जाईल तुला परत. चालेल ना?

तू ये मग या रविवारी. मी आम्ही सगळे घरीच असू रविवारी. ’”

स्नेहाला आणि तिच्या पुतण्याला हा प्लॅन सोयीचा वाटला. खूप खूप वर्षांनी मैत्रिणी भेटणार होत्या म्हणून मिनीला मनापासून आनंद झाला.

मिनीने समीर आणि मुलांना सांगितलं की अशी अशी माझी मैत्रीण भेटायला येणार आहे. मुलांना सांगितलं नीट वागा जरा तिच्यासमोर. बरे कपडे घाला.

समीर हसलाआणि म्हणाला, मिने, आपलं घर जसं आहे तसंच बघू दे तुझ्या त्या मैत्रिणीला.

त्या रविवारी सकाळी अकरा वाजता स्नेहाचा पुतण्या तिला मिनीच्या घरी सोडून गेला.

“काकू, मी चार वाजता न्यायला येईन म्हणून निघून गेला. मिनीने उत्साहाने स्नेहाला आत घेतलं. अत्यंत प्रेमाने तिला मिठी मारली.

किती बदलली होती स्नेहा. पिकलेले केस, डोळ्याला चष्मा. अंगावर त्यातल्यात्यात जरा भारी साडी. पाठीत वाकली होती स्नेहा.

“मिने, तू मात्र आहेस तशीच आहेस हो. फ्रीजमध्ये ठेवल्यासारखी टवटवीत. माझं बघ काय भूत झालंय ते”हसून स्नेहा म्हणाली.

नाही ग स्नेहा. मीही झालेच की तुझ्याच एवढी. आता पंचेचाळीस वर्षाच्या होऊ आपण.

मिनीने अगत्याने स्नेहाला हॉल मध्ये नेलं.

बाई ग. खूप मोठं घर आहे ग तुझं.

माझ्या पुतण्याचं टाऊन हाऊस आहे. तो नाही इतका श्रीमंत. ” 

मिनीने स्नेहाला आपलं घर दाखवलं. मागे मोठी बाग लॉन, स्वीमिंग पूल बघून स्नेहाचे डोळे मोठे झाले.

“वावा. एवढं मोठं बारा खोल्यांचं घर लागतं कशाला बाई तुम्हाला? ”मिनी म्हणाली, अग, इकडे अशीच असतात मोठी मोठी घरं. ”

मीरा, जय, खाली या ना.

मिनीने मुलांना बोलावलं. मुलं खाली आली. तोंडातल्या तोंडात बोलत त्यांनी स्नेहाला नमस्कार केला. आणि वर निघून गेली

मिनीने समीरची ओळख करून दिली. काय बोलावे हे न समजल्याने थोडा वेळ बसून तोही निघून गेला.

चल. तुला भूक लागली असेल ना? आपण जेवून घेऊया. ”

आणि मुलं आणि समीर? ”स्नेहाने विचारलं. ती जेवतात त्यांच्या वेळेनुसार. इथे आम्ही एकत्र बसत नाही जेवायला.

मिनीने खूप खपून सुंदर स्वयंपाक केला होता.

काकडीची कोशिंबीर, पोळ्या, शेवयाची खीर, टोमॅटोचं सार पुलाव. सगळं अगदी साग्रसंगीत नीट नेटकं. पुन्हा आईस्क्रीम सुद्धा जेवल्यावर.

स्नेहा म्हणाली, ”इकडच्या भाज्यांना काही चवच नसते नाही? केवढे ते मोठे टोमॅटो बटाटे.. आणि कोथिंबीर पण बेचव. पोळ्या तू केल्या का विकत आणल्या? ” मिनी म्हणाली” इथे बायका देतात करून छान. त्याच आणते मी. मला अजिबात वेळ नसतो घरी करत बसायला.

आम्ही सगळे सकाळी लवकर घर सोडतो. खूप काम पडतं इथे आम्हाला. नोकर नाही मिळत इथे ग भारतात मिळतात तसे.

”बघ किती छान आहेत ना पोळ्या? इथल्या गुजराथी बायका सुंदर करून देतात अगदी. “

हं.

पण घरी केलेल्या त्या घरी केलेल्या ग. तू ये एकदा माझ्या हाताच्या तव्यावरच्या गरम पोळ्या खायला.

मिनी तिच्या प्रत्येक टिप्पणीवर नर्व्हस होत गेली. “शेवयाची खीर चांगली झालीय. पण या घरगुती नाहीत ना. मशीनच्या दिसतात. ”

मिनी म्हणाली” बाई, ही अमेरिका आहे. एकेकाळी इथे कोणतेही इंडियन पदार्थ मिळत नसत. इतकं सगळं मिळतं हे आम्ही भाग्यच समजतो.

स्नेहा मग अमेरिकन संस्कृतीवर घसरली.

काय ग त्या बायका. खुशाल टिचग्या पॅन्ट्स घालून बाहेर फिरतात. केवढ्या जाड त्या काळ्या बाया. लाजच वाटली बघून. आणि किती ते बाहेरचे आणून खायचे. माझ्या पुतण्याच्या घरी तसलंच. बाळंतीण बाई खुशाल पिझा खात होती. कठीण आहे हो.

अग ही माझी पुतणसून, नाही दहा दिवस झाले बाळंतीण होऊन तर खुशाल बाहेर हिंडायला गेली गाडी चालवत. म्हणे ग्रोसरी करते. सामान संपलंय.

मिनी हसली, म्हणाली” हे बघ.

इथे कोणी लाड करत नाहीत आपल्या भारतासारखे.

अग हो मिने. मुलांना तरी कुठे शिस्त आहे इथल्या? काय ते कपडे आणि काय त्या पोरी.

माझी मुलं नाहीत बरं बहकलेली. अगदी शिस्तीची आहेत.

मिनीने शांतपणे विचारलं, काय करतो तुझा मुलगा?

स्नेहा म्हणाली “बीकॉम झाला. आता नोकरी करतोय तो. मुलगी आता पुढे शिकायचं नाही म्हणते. कॉलेजची दोन वर्षे केली आणि आता फॅशन डिझायनिंग करणार म्हणते. अगदी साधी आहेत हो माझी मुलं.

मिनीच्या लक्षात एकंदर सगळं चित्र उभे राहिले. अतिसामान्य परिस्थितीतली स्नेहा. तिची मुलंही सामान्य निघालेली दिसत होती.

पुण्यासारख्या ठिकाणी फक्त बीकॉम झालेल्या मुलाला काय नोकरी मिळाली असणार हे तिच्या लक्षात आलंच.

जेवण झाल्यावर बाहेर हॉल मध्ये दोघी येऊन बसल्या.

“किती सुंदर क्रोकरी आहे ग तुझी. आणि हे सगळं फर्निचर पण खूप महाग असेल ना? मीही आता घेणार आहे अशी क्रोकरी. ”

तुम्हाला काय ग कमी. दोघेही मिळवताय ना.

पण मला आपलं साधं रहायलाच आवडतं. मला नाही बाई अमेरिका आवडली. पुतण्या म्हणत होता, आणखी रहा पण मीच नको म्हटलं. माझा भारत देशच छान ग बाई.

अर्थात माझा मुलगा म्हणत होता बरं का, की दादाला सांग ना माझ्यासाठी तिकडे जॉब बघायला. त्याला आहे हो इच्छा अमेरिकेत यायची. पुतण्या मनावर घेईल असं काही वाटत नाही.

मिने, तूच बघ की एखादा जॉब माझ्या दीपकला. ”

मिनी हसली. ”स्नेहा, फक्त बीकॉम झालेल्या तुझ्या सामान्य मुलाला इथे कोणताही जॉब मिळणार नाही. नाहीतरी तुला कुठे आवडली अमेरिका?

इथे आम्ही आठवड्याचे पाचही दिवस मरमर राबतो. तेव्हा दिसतो पैसा बरं. इथे काहीही सोपं नाहीये.

बरे आहात तुम्ही तिकडेच आणि आम्ही इकडेच. इकडचं जग खूप वेगळं आहे आणि आम्ही त्यात अत्यंत समाधानी आहोत. तुलना आमच्या मनातच येत नाही कधी. इथे मिळते त्यात आम्ही खुशीत रहातो. उगीच का लोक धडपडतात इथे यायला? Melting pot म्हणतात अमेरिकेला. जो येतो तो रमतोच. असो. दोन ध्रुवावर आहोत आता तू आणि मी…

तू सुखी आहेस ना तुझ्या जगात? मग मस्त की. ”मिनी म्हणाली.

मिनीला आता कधी चार वाजतील असं झालं. स्नेहाच्या वागण्या बोलण्याचा उबग आला मिनीला.

कौतुकाने आपण हिला का बोलावलं याचा पश्चातापच झाला मिनीला.

मिनीने चहा केला. स्नेहाला तो आवडला नाहीच. कोणती आहे चहा पावडर ग? जास्त स्ट्रॉंग वाटतोय चहा.. आणि दूधही वेगळंच असतं बाई इथलं.

दुर्लक्ष करत मिनी काहीच बोलली नाही. तिने स्नेहाची ओटी भरली. एक छानशी पर्स तिला दिली.

“सॉरी ग मिने. मला काही आणायला वेळच झाला नाही ग तुझ्यासाठी. ”स्नेहा म्हणाली.

”अग ठीक आहे स्नेहा. ”

बाहेर हॉर्न वाजला. स्नेहाचा पुतण्या आलेला दिसला मिनीला.

स्नेहाला निरोप देऊन मिनी बाय बाय म्हणाली आणि सुटकेचा निःश्वास टाकत सोफ्यावर बसली.

 

 डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted