image_print

? जीवनरंग ?

☆ लेडीज फर्स्ट — भाग – 2 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

(बऱ्याचश्या मुलांना पालकांनी भाषण लिहून दिल्याचं जाणवत होतं, तरी मुलांची स्मरण शक्ती, बोलण्यातले उतार चढाव, श्रोत्यांच्या नजरेत बघून बोलणं, प्रत्येक गोष्ट खरोखर कौतुकास्पद होती. ) इथून पुढे —–

जवळजवळ पाच ते सहा भाषणं झाल्यावर रोहितचा नंबर आला. त्याने मात्र स्वतःच भाषण तयार केलं होतं , कारण शोभनाला तेच अपेक्षित होतं.

“व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, मला सर्वांत प्रिय व्यक्ती म्हणजे माझे बाबा ! मी असे का म्हणतोय ते तुम्हाला माझे बोलणे ऐकून झाल्यावर समजेलच.

बाबा मला अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून खूप महत्वाच्या गोष्टी समजावून सांगतात. मी आपणासमोर काही प्रसंग सांगणार आहे. 

पहिली गोष्ट बाबांनी शिकवली ती म्हणजे, स्त्रीचा सन्मान. पण सन्मान म्हणजे नुसती पूजा नव्हे तर सक्षम बनवणं, संधी उपलब्ध करून देणे. बाबांनी जे शिकवले, तसंच ते स्वतः ही वागले.  

माझी आई जेव्हा लग्न होऊन घरी आली त्यावेळेस ती फक्त बारावी झालेली होती. घरात अगदी पुराणमतवादी वातावरण होते, पण बाबांनी सगळ्यांशी विरोध पत्करून आईला शिकवायचे ठरवले. तिला कॉलेजला अॅडमिशन घेऊन दिली आणि तिला स्वतःची स्कुटर दिली व ते स्वतः बसने जात. ते आईला म्हणत ‘ तुला घरातली सर्व कामं करून कॉलेजला जावे लागते खूप दमछाक होते तुझी. ‘ आणि  अश्याप्रकारे, आपल्या शाळेला लाभलेल्या ह्या आदर्श मुख्याध्यापिका साकारल्या.

एवढंच नाही तर तीन वर्षांपूवी बाबांना बँकेमार्फत फोर व्हिलर गाडी मिळाली, त्यावेळेस देखील बाबा आईला म्हटले ‘ तू गाडी वापरत जा, मी जाईन स्कुटरने. हे बघ तू शिक्षिका आहेस, शिक्षकांनी शाळेत कसं भरपूर ऊर्जेने जायला हवं, कारण तुम्ही शिक्षक लोक पिढ्या घडवायचं काम करता, तुम्ही जेवढे कम्फर्टेबल असणार तेवढं मुलांना चांगलं शिकायला मिळेल.’  

दुसरी गोष्ट सांगतो, त्यांनी नेहमी श्रमाला प्रतिष्ठा द्यायला शिकवले. घरी येणारा कोणीही कष्टकरी असो, त्याला प्रेमाने वागवायचे असे ते सांगत. कधीही छोट्या छोट्या व्यावसायिकाबरोबर पैशाची घासाघीस करू देत नसत. 

अगदी रस्त्यावरून जातांना एखादा ढकलगाडीवाला जरी जात असेल, तर ते त्याला आधी जाऊ देतात . ते म्हणतात,

 ‘ आपल्याला गाडीवर जायचं असतं, पण त्याला एवढं वजन स्वतः ढकलत न्यायचं असतं.’

त्यांनी शिकवलेली अजून एक गोष्ट सांगतो. खरं म्हणजे तो एक प्रसंग होता. माझी परीक्षा जवळ आली होती आणि मी आईला, पहाटे लवकर उठवायला सांगून झोपलो होतो, पण तिने उठवले नाही आणि मग मला उशिराने जाग आल्यावर जोरात भोंगा पसरवला. घरात मोठाच गोंधळ निर्माण झाला. मी काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, तेव्हा बाबा आले आणि मला बाजूला नेऊन म्हणाले, ‘ मी काय सांगतो ते नीट ऐक आणि मग ठरव, रडायचं की काय करायचं. हे बघ बाळा दुसरी मुलं अभ्यास करायला लागतो म्हणून रडतात.  पण आमचा मुलगा अभ्यास करायला मिळाला नाही म्हणून रडतो , किती भाग्यवान आहोत आम्ही. आणि दुसरं एक सांगतो, आपल्याला येणाऱ्या अडचणी, दुःख आणि सुख या सर्व गोष्टींना आपण स्वतःच जबाबदार असलं पाहिजे. असं असेल तरच आपल्याला त्यातून मार्ग काढायला सुचतं. दुसऱ्याला जबाबदार धरलं तर कधीही तो प्रश्न सुटत नाही. आता तूच ठरव, जे झालं त्याला कोण जबाबदार?’

बाबाचं म्हणणं ऐकून मला एकदम काहीतरी सुचलं, रडणं बिडणं कुठेच पळून गेलं. दुसऱ्या दिवसापासून मी घड्याळामध्ये अपेक्षित वेळेचा गजर लावून झोपू लागलो आणि तेव्हापासून अगदी वेळेवर, कुणीही न उठवता देखील उठतो.

असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. 

तर अशाप्रकारे बाबांनी मला बरीच अमूल्य अशी मूल्ये शिकवली. आईने शरीराचं संगोपन केलं तर बाबांनी संवेदनशील मन जोपासलं. 

आई ही हिऱ्याची खाण असेल तर बाबा त्यातला हिऱ्यांना पैलू पडणारे जवाहीर आहेत. 

आणि म्हणून माझी सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे माझे बाबा. आई तर प्रिय आहेच, परंतु आईपेक्षाही बाबा माझ्यासाठी माझे हिरो आहेत. माझे बाबा इज द ग्रेट..!

सर्वाना नमस्कार, जय हिंद !”

रोहितचं भाषण संपल्यावर सगळे उभे राहिले आणि बराच वेळ टाळ्या सुरू होत्या. 

बक्षीस अर्थात रोहितलाच मिळाले. बक्षीस वाटपाच्या वेळेस त्याच्या आई आणि बाबांना देखील स्टेजवर बोलवण्यात आले. कुलगुरूंच्या हस्ते बक्षीस वाटप होते. शोभनाला आज आपल्या नवऱ्याचा आणि मुलाचा खूप अभिमान वाटला.

विजयला तर जणू  जगण्याची नवी उमेद मिळाली, आणि रोहित– रोहितच्या आनंदाचे खरे कारण तर फक्त त्यालाच माहीत होते. 

बक्षीस वाटपाच्या वेळी विजय सर्वात मागे उभा होता तेव्हा कुलगुरू म्हटले, “विजयराव पुढे या .”

तेव्हा विजय नम्रपणे म्हणाला , “नाही सर,  लेडीज फर्स्ट.. !”

—  समाप्त —

लेखक : अज्ञात. 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments