श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ उगवतीचे रंग – नॉर्मन कझिन्स.. मूर्तिमंत सकारात्मकता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
नॉर्मन कझिन्स हा एक अमेरिकन पत्रकार, प्राध्यापक आणि जागतिक शांततेचा खंदा पुरस्कर्ता! त्याची कथा मोठी विलक्षण आणि प्रेरणा देणारी आहे. अमेरिकेतून निघणाऱ्या The Saturday Review चे ते दीर्घकाळ संपादक होते. त्यांची दोन पुस्तके म्हणजे कोणत्याही कारणाने आयुष्यात निराश झालेल्या माणसाला मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. The Anatomy of Illness, Head First आणि The Healing Heart ही त्यांची गाजलेली पुस्तके. या पुस्तकातून त्यांची जीवनगाथा लोकांसमोर आली.
नियती एखाद्या माणसाची किती कठोर परीक्षा घेऊ शकते ते नॉर्मन कझिन्स यांच्या आयुष्याकडे पाहिले म्हणजे लक्षात येते. १९६४ मध्ये त्यांना अँकीलोझिंग स्पॉन्डीलाईटीस हा दुर्मिळ आणि दुर्धर आजार झाला. स्नायू आणि सांध्यांच्या आजाराने या माणसाला बिछान्याला जखडून ठेवले. आपल्या कामात नेहमी कार्यरत राहणाऱ्या या उत्साही माणसाला अंथरुणाला खिळून राहावे लागले. डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे निदान केले आणि त्यांना सांगितले की हा अत्यंत दुर्मिळ आणि दुर्धर असा आजार आहे यातून बरे होण्याची शक्यता अत्यंत कमी. पाचशे व्यक्तीतून एखादीच व्यक्ती या आजारातून वाचू शकते.
त्याच्या आजाराचे हे निदान करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यात हा आजार झालेला एकही रुग्ण बरा झालेला पाहिला नव्हता. डॉक्टरांचे आपल्या आजाराविषयीचे हे बोलणे ऐकल्यानंतर एखादी व्यक्ती हादरून गेली असती, निराश झाली असती, खचली असती. अशा व्यक्तीने मग एकतर आता आपले काही खरे नाही म्हणून मृत्यूला तोंड देण्याची तयारी केली असती किंवा आत्महत्येचा मार्ग पत्करला असता. पण नॉर्मन कझिन्स यांची जगण्याची इच्छा दुर्दम्य होती, प्रचंड आशावाद होता, आजाराला आणि मृत्यूला हरवण्याची ताकद त्यांच्या मानसिकतेत होती. त्यांनी असा विचार केला की ५०० मधील एक व्यक्ती तरी वाचते ना! मग ती व्यक्ती आपणच का असू नये?
नॉर्मन यांचे वैद्यकीय ज्ञान तर अफाट होतेच परंतु मानवी मनाचा देखील त्यांचा अभ्यास होता. विचार करताना त्यांना असे आढळून आले की भय, दुःख, शोक यासारख्या भावनांचा आपल्या शरीरावर तात्काळ परिणाम दिसून येतो. जेव्हा प्रचंड भीतीची भावना मनात निर्माण होते तेव्हा हृदयाची धडधड वाढते, छातीचे ठोके वाढतात. दुःख आणि शोक या भावनांचे देखील विपरीत परिणाम लगेच जाणवतात. या नकारात्मक भावनांचे जर असे परिणाम होत असतील तर आनंद, हर्ष, उल्हास, उत्साह, प्रेम, आशा, विश्वास यासारख्या सकारात्मक भावना आपल्या शरीरावर चांगले परिणाम नक्कीच करू शकत असतील. आणि बरे होण्यासाठी याच भावनांचा आश्रय घेण्याचे त्यांनी ठरवले. रुग्णालयाच्या निराशाजनक वातावरणातून बाहेर पडून आपल्या स्वतःची उपचार पद्धती त्यांनी स्वतःच ठरवली. त्यात आशावादी राहणे, दिवसातून दहा मिनिटे तरी खळखळून हसणे आणि व्हिटॅमिन सीचा डोस घेणे या गोष्टींचा प्रयोग त्यांनी सुरू केला. या गोष्टींचे आश्चर्यकारक परिणाम त्यांना मिळाले. हास्यामुळे एंडॉर्फिन या सकारात्मक आणि उपयुक्त हार्मोन्स निर्मिती होते. त्यांना असे आढळून आले की दहा मिनिटांच्या खळखळून हसण्यामुळे आपल्या वेदना कमी होतात आणि शांत झोप लागते. त्यामुळे वेदनाशामक औषधे घेणे त्यांनी थांबवले. त्यांनी मग काही विनोदी चित्रपटांच्या कॅसेट्स मागवल्या. काही विनोदी पुस्तके मागवली. दुर्दम्य इच्छाशक्ती, सततचे प्रयत्न यामुळे ते चक्क या आजारातून बरे झाले.
त्यांच्या या अनुभवातून जन्माला आले ते Anatomy of Illness हे त्यांचे पुस्तक! आपल्या वेदनांचे रडगाणे न गात बसता या माणसाने त्याचे सुंदर गाणे केले आणि जगाला सकारात्मक राहिल्याने काय होऊ शकते याचा संदेश दिला. आपलं मन, शरीर आणि आत्मा यांचा अतूट संबंध आहे हा संदेश दिला. या गंभीर आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मेडिकल ह्युमॅनिटीजचे प्राध्यापक म्हणून काम केले.
या माणसाची पुढे नियतीने आणखी परीक्षा घेतली. या गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर १६ वर्षांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करून बायपास करायला सांगितले. परंतु त्यांनी डॉक्टरांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून आपल्या हृदयाची स्वतःच बायपास शोधण्याची क्षमता असते या गोष्टीवर विश्वास ठेवला. पुन्हा एकदा सकारात्मक जीवनशैली, आहार, व्यायाम या गोष्टींवर भर देऊन हृदय रोगावर मात केली. यावेळी त्यांचे वय ६५ वर्षे होते. यानंतर दहा वर्षे ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांनी आयुष्य व्यतित केले. त्यांना गोल्फ टेनिस खेळण्याचे आवड होती. ते खेळणेही त्यांनी सुरू ठेवले होते. त्यांच्या अनेटॉमी ऑफ या इलनेस या पुस्तकावर आधारित त्यांच्या जीवनावर एक चित्रपट देखील निघाला. ३० नोव्हेंबर १९९० रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीतून त्यांनी आधुनिक वैद्यक शास्त्राला हा संदेश दिला की बरे होण्यासाठी फक्त औषधोपचार आणि शस्त्रक्रिया याच गोष्टी पुरेशा नसतात तर मानवी मनाचा सहभाग त्यात अतिशय महत्त्वाचे काम बजावतो. त्यांनी जगाला हा संदेश दिला की एकदा तुमचे मन दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावादाने भरले की तुमचे शरीर देखील तुमच्या या इच्छाशक्तीला साथ देऊ लागते तुमचे सर्व अवयव त्यानुसार कार्य करू लागतात. कुठल्याही आजाराकडे संकट म्हणून न पाहता एक आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करा आणि हसतमुखाने त्याला सामोरे जा. आज छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होणाऱ्या आणि आत्महत्येचा सोपा मार्ग स्वीकारणाऱ्या तरुणांना नॉर्मन कझिन्स यांचे आयुष्य म्हणजे एक मोठा सकारात्मकतेचा संदेश आहे.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





