डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ही तर एक ‘सुवर्णकथा’… लेखक : संदीप चव्हाण ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

डॉ. पांडुरंग खानखोजे

यंदाच्या फुटबॉल विश्वचषकाचा उद्घाटनीय सामना रंगला, तो मेक्सिको सिटीत. यजमान मेक्सिकोसह अमेरिका आणि कॅनडाही या स्पर्धेचे सहआयोजक आहेत. तब्बल ३२ तासांचा प्रवास करून मी अखेर या उद्घाटन सामन्याच्या वार्तांकनासाठी मेक्सिकोत पोहोचलो.

फुटबॉलची मजा काही औरच असते. मैदानावर चेंडू फिरत असताना जितका थरार असतो, त्यापेक्षाही अधिक जल्लोष सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर उसळतो. जणू तो एक बेधुंद करणारा कार्निव्हल असतो.

सामना संपताच, मीही त्या कार्निव्हलचा भाग झालो. पोटात भूक होतीच; पण स्टेडियमबाहेर सर्वत्र लागलेल्या मक्याच्या स्टॉलने ती आणखीच भडकावली. एका स्टॉलवर मी थांबलो. उकडवलेले टपोरे मक्याचे दाणे, त्यावर खास मेक्सिकन तिखट मसाल्याचा पहिला घास घेताच, जिभेवर मेक्सिको उतरल्यासारखे वाटले. माझ्यासोबत काही स्थानिक मेक्सिकन पत्रकार होते. त्यातील एकजण सहज म्हणाला,’Did you know Pandurang Khankhoje? The man from India. This crop is his gift. ‘

क्षणभर माझा घास अडकला. डोळ्यांसमोर फुटबॉलचा जल्लोष होता, हातात मेक्सिकन मका होता आणि कानांवर आलेले नाव होते, पांडुरंग खानखोजे!

स्वातंत्र्य लढ्यात ‘गदर पार्टी’ स्थापन करणार्‍या क्रांतिकारकांपैकी एक पांडुरंग सदाशिव खानखोजे महाराष्ट्रातील वर्ध्याचे होते, इतके जुजबी ज्ञान होतेच. पण मेक्सिकोच्या फुटबॉल कार्निव्हलमध्ये, मक्याच्या त्या स्टॉलपाशी, एका मेक्सिकन पत्रकाराकडून त्यांचे नाव ऐकणे, हा माझ्यासाठी आयुष्यभर जपावा, असा क्षण होता.

मेक्सिकोच्या हरित क्रांतीत महाराष्ट्रात जन्मलेल्या या सुपुत्राचा मोलाचा वाटा होता. मेक्सिकन टाको जितके प्रसिद्ध, तितकाच येथील मका लोकांच्या जगण्याचा भाग आहे आणि त्या मक्याच्या समृद्धीमागे एका मराठी माणसाचे संशोधन, परिश्रम आणि दूरदृष्टी आहे, ही गोष्ट अंगावर रोमांच उभे करणारी आहे.

१९२० साली खानखोजे मेक्सिकोत आले आणि मग जणू मेक्सिकोचेच झाले. वयाच्या १६व्या वर्षी लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी घर सोडले. जपानमार्गे अमेरिका गाठली. मजूर म्हणून काम केले. त्याचबरोबर शिक्षण घेतले. वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवी संपादन केली. लष्करी प्रशिक्षण घेतले. तेथेच लाला हरदयाल यांच्याशी त्यांची भेट झाली आणि ‘गदर चळवळी’चा प्रवास सुरू झाला.

क्रांतीच्या कार्यामुळे भारतात परतणे त्यांना शक्य नव्हते. अशा वेळी मेक्सिकन शेतकर्‍यांच्या ओळखीने त्यांनी मेक्सिको गाठले. तेथे राष्ट्रीय कृषी विद्यापीठात त्यांनी नोकरी स्वीकारली आणि सुरू झाला, एका मराठी क्रांतिकारकाचा दुसरा अवतार, अन्नक्रांतीचा, शेतीक्रांतीचा, माणुसकीच्या सेवेत झोकून देणार्‍या शास्त्रज्ञाचा!  

मेक्सिकोतील हवामानात मक्याच्या उत्पादनात होणारी घट त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यांनी त्यावर अथक संशोधन केले. मक्याचे नवे वाण विकसित केले; ते पुढे जगभर स्वीकारले गेले. त्यांच्या संशोधनामुळे मेक्सिकोतील असंख्य शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. एका परक्या देशात आलेल्या मराठी माणसाने तेथील मातीत स्वतःला मिसळून घेतले आणि त्या मातीतून लाखो लोकांच्या पोटाची भाकर उगवली.

मेक्सिकोनेही या ऋणाची जाण ठेवली. मेक्सिकोच्या शिक्षण सचिवालयाच्या इमारतीत खानखोजेंच्या सन्मानार्थ खास म्युरल साकारण्यात आले आहे. महान चित्रकार दिएगो रिव्हेरा यांनी ‘लास्ट सपर’च्या धर्तीवर हे म्युरल चितारले. त्यात खानखोजे मेक्सिकोच्या सामान्य शेतकर्‍यांसोबत मका आणि भाकरीची मेजवानी करताना दिसतात. हा केवळ चित्राचा सन्मान नाही; तो एका भारतीयाला, एका महाराष्ट्रीयाला, एका मराठी माणसाला मेक्सिकोने केलेले कृतज्ञ अभिवादन आहे.  

एक मराठी क्रांतिकारक विचारांनी जपान, पॅरिस, अमेरिका फिरत मेक्सिकोत येतो, तिथे स्थिरावतो आणि गरीब शेतकर्‍यांचा अन्नदूत बनतो, ही कथा छाती अभिमानाने फुलवणारी आहे. “खानखोजे माझ्या महाराष्ट्रातील आहेत,’ असे त्या मेक्सिकन पत्रकाराला सांगताना माझ्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या. त्याक्षणी मला वाटले, ही मेक्सिकोवारी सार्थकी लागली.  

खानखोजे यांच्या कृषिक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मेक्सिकोच्या ‘चॅपिंगो’ विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा केवळ दगडाचा नाही; तो मराठी कर्तृत्वाचा, भारतीय प्रतिभेचा आणि सीमांच्या पलीकडे जाणार्‍या मानवतेचा साक्षीदार आहे!

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर खानखोजे सहकुटुंब भारतात परतले. महाराष्ट्राच्या भूमीत, नागपुरात दि. २२ जानेवारी १९६७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सक्रिय राजकारणापासून ते शेवटपर्यंत दूर राहिले; पण त्यांनी केलेले कार्य कोणत्याही राजकीय पदापेक्षा मोठे होते. त्यांनी एका देशातील शेतकर्‍यांचे जीवन बदलले. त्यांनी भुकेशी लढणार्‍या माणसांच्या हातात आशेचा दाणा दिला.

मेक्सिकोत सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात भारत नाही. जागतिक क्रमवारीत भारत १३९व्या क्रमांकावर आहे. भारत फुटबॉल विश्वचषक कधी जिंकेल, हे माहीत नाही. पण १०० वर्षांपूर्वी एका मराठी माणसाने मेक्सिकोच्या मातीवर येऊन येथील लोकांची मने जिंकली, ही नोंद आचंद्रसूर्य राहील, हे नक्की!

फुटबॉलच्या जल्लोषात, मक्याच्या एका साध्या घासातून मला महाराष्ट्राची ही सुवर्णकथा भेटली. मेक्सिकोत खानखोजे आजही जिवंत आहेत, शेतकर्‍यांच्या स्मृतीत अन् मक्याच्या प्रत्येक दाण्यात! पांडुरंग खानखोजे यांची ही यशोगाथा अनुभवण्यासाठी एकदा तरी मेक्सिकोला आलेच पाहिजे.

धन्यवाद

लेखक : संदीप चव्हाण

प्रस्तुती : डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted