तृप्ती देव
जीवनरंग
☆ “आठवणींची छोटी वाटी…“ ☆ तृप्ती देव ☆
परवा आईला फोन केला…
“आई, रविवारी येतोय बरं का… मी, मुलं आणि स्वाती. काही करू नकोस हं फार त्रास! फक्त भेटायला येतोय. ”
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तिचा नेहमीचा हक्काचा आणि घाईचा कार्यक्रम सुरू झाला…
“अरे मग मुलांना काय आवडतं आता? … त्या छोट्याला अजून पुरणपोळी आवडते का? की शहरातल्या पिझ्झा-बर्गरच्या नादात विसरला? … आणि स्वातीला तिखट कमीच ना? … तू येताना दही घेऊन येऊ नकोस हं बाहेरचं, मी कालच विरजण लावलंय घरी, छान घट्ट जमेल! ”तृप्ती देव
फोन ठेवला… पण तिचे फोन थांबले नाहीत. तिचं मन तिथेच घुटमळत होतं.
कधी — “तुला वांग्याचं भरीत करू का रे? गावची गावरान वांगी आणलीत गल्लीत आलेल्या गाडीवरून. ”
तर कधी — “अरे त्या जुन्या कपाटातल्या चिनी मातीच्या बरणीतलं लोणचं अजून आहे हं, तसंच मऊ आणि रसरशीत! ”
… आईचं प्रेम म्हणजे मेन्यू कार्ड नसतं… ते आठवणींनी गच्च भरलेलं स्वयंपाकघर असतं, जिथे प्रत्येक पदार्थाला मायेची फोडणी असते.
बाबांना जाऊन अजून काही महिनेच झाले होते. घरातलं मुख्य छत्र हरपलं होतं. बाबा गेल्यावर मी खूप प्रयत्न केला, “आई, चल माझ्यासोबत शहरात. तिथेच एकत्र राहू. इथे या मोठ्या घरात तू एकटी कशी राहणार? “
पण आई साफ नाकारायची. म्हणायची, “अरे राजा, माझं आयुष्य या घरात गेलंय. तुझ्या बाबांचा वावर आहे या भिंतींमध्ये. शहरातल्या त्या सिमेंटच्या फ्लॅटमध्ये कोंडल्यासारखं होतं मला, तिथे माझं मन करमत नाही. मी इथेच बरी आहे गावाला. आणि तू काळजी करू नकोस, शेजारी राहणारे जोशी काका आहेत ना, काही लागलं-सवारलं तर ते हक्काने उभे राहतात. “
जोशी काका खरंच देवासारखे शेजारी होते. दिवसातून दोनदा चक्कर माराचे, ‘वहिनी, काही आणायचं का बाजारातून? ‘ म्हणून विचारून जायचे. पण तरीही, नोकरीच्या जबाबदारीमुळे मला शहरात परत जावं लागलं होतं, आणि आई मागे या घरात एकटीच राहायची. मनात सतत तिची काळजी असायची, म्हणूनच या रविवारी वेळ काढून आम्ही सगळे गावाला आलो होतो.
रविवारी सकाळी आम्ही दारात उभे राहिलो. बेल वाजवल्या वाजवल्या आईने हसऱ्या चेहऱ्याने दार उघडलं. पाऊल आत पडताच, त्या बंद दाराआड साठलेला घराचा तोच जुना आणि ओळखीचा सुवास एका दमात छातीत भरला… स्वयंपाकघरातून येणारा मोहरीच्या खमंग फोडणीचा सुटलेला दरवळ, कोपऱ्यात तेवणाऱ्या उदबत्तीचा पवित्र सुगंध आणि त्याहूनही जास्त, आईच्या साध्या सुती साडीला लगटून राहिलेला तिचा हक्काचा, मायेचा स्पर्श! त्या एका श्वासाने शहरातला सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
मुलं तिच्या गळ्यात पडून धावत आत गेली. स्वाती नेहमीप्रमाणे पदर खोचून स्वयंपाकघरात शिरली. काही वेळ गप्पा झाल्या. बऱ्याच वेळ झाल्यानंतर
आणि मी सहजच डायनिंग टेबलवर नजर टाकली…
तिथे स्टीलची एक छोटी, जुनी वाटी ठेवलेली होती. कडा थोड्या घासून घासून झिजलेल्या, पण लख्ख स्वच्छ.
… ती रिकामी होती.
क्षणभर वाटलं स्वातीचं किंवा मुलांचं काही राहिलं असेल, धुवायची राहिली असेल. पण आईने मागून येत ती वाटी अलगद, जणू काही काचेची मौल्यवान वस्तू असल्यासारखी उचलली आणि कपाटातल्या एका कोपऱ्यात ठेवून दिली.
मी सहज विचारलं…
“काय गं आई, ही कोणाची वाटी? रोज तर नाही दिसत टेबलावर. ”
आई दोन सेकंद शांत राहिली. तिचा हात कपाटाच्या कड्यावरच रेंगाळला.
मग मागे वळून, डोळ्यातली आर्द्रता लपवत हलकंसं हसत म्हणाली…
“तुझ्या बाबांची…”
मी जागीच थबकलो.
ती पुढे म्हणाली…
“अरे, त्यांना जेवताना दही किंवा ताक वेगळ्या, अगदी याच छोट्या वाटीत लागायचं. ताटात कितीही पंचपक्वान्नं असली, तरी ही वाटी नसेल ना, तर तोंड वाकडं करायचे… म्हणायचे — ‘जेवणाला काय ती मजा नाही आली आज. ’ हट्टी होते गडी! ते गेल्यापासून ही वाटी मी वापरतच नाही रे. बाकी सगळी भांडी घासते, वापरते… पण ही वाटी हातात घेतली ना, की तिचा गारवा थेट काळजाला लागतो. नाही जमत रे हातात घ्यायला…”
माझ्या अंगावर सरसरून शहारा आला.
एखादं माणूस गेल्यावर… त्याचे कपडे, त्याचा चष्मा, त्याचा घोगरा आवाज आठवतोच… पण काही लोक घराच्या विटाविटांमध्ये आणि जगण्यात इतके मिसळलेले असतात, की त्यांच्या जाण्यानंतर घरातली निर्जीव भांडीसुद्धा एकाकी आणि पोरकी पडतात.
आई पुढे अगदी सहज, एका सुस्कारा सोडत बोलून गेली…
“पूर्वी रोज न विसरता दही लावायचे मी, त्यांना आवडायचं म्हणून. आता फारसं करत नाही रे. स्वतःसाठी कोण एवढा पसारा करणार? आणि कोण इतकं कौतुकाने खाणार? ”
त्या क्षणी अचानक माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला… आणि छातीत कुठेतरी गलबलून आलं.
बाबा गेल्यापासून गेल्या काही महिन्यांत आम्ही आईच्या हातचं श्रीखंड खाल्लंच नव्हतं. चक्का बांधणं, तो गाळणं, त्यात केशर-वेलची सुवास भरणं… हे सगळं कौतुक बाबांच्या ‘वाः! काय जमलंय श्रीखंड! ‘ या एका वाक्यासाठी होतं. बाबा नसताना आईने स्वतःच्या हातातील ती चव आणि ते कौतुक कपाटात बंद करून ठेवलं होतं. म्हणूनच तिला शहरातही यायचं नव्हतं, कारण तिथे बाबांच्या या आठवणी साठवून ठेवायला तिची हक्काची कपाटं आणि भांडी नव्हती.
मला अचानक आतून कसंसंच झालं. कृतज्ञतेची आणि एकाच वेळी अपराधीपणाची भावना दाटून आली.
दुपारी तृप्त जेवण झाल्यावर मुलं आणि स्वाती गप्पा मारत बसले. मी हळूच उठून स्वयंपाकघरात शिरलो. आई आवराआवर करत होती, मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो.
मी फ्रिज उघडला, सकाळी आईने कौतुकाने लावलेले घट्ट दही काढलं. एक स्वच्छ सुती कपडा किचन मधला घेतला.
आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं…
“काय करतोयस रे राजा? ”
मी हसत, तिचा हात हातात घेत म्हणालो…
“आज तुझ्यासाठी आणि बाबांसाठी… श्रीखंड करतोय. ”
“अरे वेड्या, आता या दुपारी? आणि मी कुठे एवढं गोड खाणारे आता—”
“तू शांत बस गं… काही बोलायचं नाही आज. आणि हो… हे श्रीखंड आज बाजाराच्या वाटीत नाही, तर त्या बाबांच्या आवडत्या वाटीतच वाढलं जाणार आहे! ”
आई काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त पदराने तिचे पाणावलेले डोळे टिपले आणि ती स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली. कदाचित तिला तिचं रडू लपवायचं होतं.
संध्याकाळी चहाच्या वेळी, मी फ्रिजमधून तो केशर-वेलचीचा सुवास सुटलेला मऊशार चक्का काढला. आणि कपाटातून ती छोटी, बाबांची स्टीलची वाटी काढून घेतली. त्यात चमचाभर श्रीखंड अगदी सुबकतेने वाढलं.
मी श्रीखंडाची ती वाटी आईच्या समोर नेऊन ठेवली.
आईने ती वाटी हातात घेतली… इतकी जपून, दोन्ही हातांचा द्रोण करून… जणू काही त्या स्टीलच्या स्पर्शात अजूनही बाबांच्या हाताचा उबदार स्पर्श शिल्लक होता.
जेव्हा आईने त्या वाटीतलं श्रीखंड खाल्लं, तेव्हा त्या वाटीचा तो परिचित आणि जिवंत स्पर्श आईला बाबांच्या अनेक गहिऱ्या स्मृतींमध्ये, त्यांच्या एकत्र घालवलेल्या सुखाच्या दिवसांत आणि न संपणाऱ्या अथांग प्रवासात परत घेऊन गेला… जणू बाबा तिथेच तिच्यासमोर बसून कौतुकाने म्हणत होते, ‘वाः! काय जमलंय श्रीखंड! ‘
खूप दिवसांनी… आई खऱ्या अर्थाने हसली होती.
त्या दिवशी मला एक अथांग सत्य कळलं…
काही पदार्थ हे फक्त जिभेच्या चवीसाठी किंवा भूक शमवण्यासाठी नसतात… ते ‘कोणीतरी आपल्यासोबत आहे, आपण कोणासाठी तरी हवं आहोत’ या अस्तित्वाच्या भावनेसाठी बनत असतात. भूतकाळ आणि वर्तमान का जोडण्यासाठी असतात.
माणूस गेल्यावर… त्याची आवड किंवा त्याची चव घरातून संपत नाही. ती शांतपणे कुठल्यातरी अंधाऱ्या कपाटात, एखाद्या रिकाम्या छोट्या वाटीत, एखाद्या न बोललेल्या आठवणीत आणि सांडलेल्या आसवांमध्ये जिवंत राहते. गरज असते ती फक्त, मुलाने आईचा हात धरून त्या आठवणीला पुन्हा एकदा मायेची चव देण्याची… मग ती गावाला असो वा शहरात!
© तृप्ती देव
भिलाई( छत्तीसगड)
मो ९१६५९८४३२२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





