श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ६३ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- पॅकिंग उघडून त्यातले कपडे बाहेर काढताना नॅपकीनची घडी थोडी जड वाटली म्हणून मी उलगडून पाहिलं तर आत एक दत्ताची मूर्ती! ती नीट रहावी म्हणून अशी नॅपकिनमधे व्यवस्थित गुंडाळून ठेवलेली असावी. मी भान हरपून त्या मूर्तीकडे पहातच राहिलो…! )
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पोटापाण्याचं नियोजन सुरू झालं तरी मन त्या मूर्तीजवळच घुटमळत होतं. आठ वाजता जवळचं दुकान उघडताच आधी तीनचार दिवसांपुरतं वाणसामान आणलं. मग आंघोळ करून दत्ताची मूर्ती त्या रिकाम्या देवघरांत ठेवली आणि हात जोडून अलगद डोळे मिटले. मनातली अस्वस्थता क्षणार्धात नाहीशीच झाली. त्या मूर्तीला माझ्या मनात एक खास स्थान होतं त्याला कारणही तसंच होतं. ती मूर्ती मला चार वर्षांपूर्वी एखादा चमत्कार घडावा तशी मिळाली होती तेव्हाची ती तिन्हीसांज मी कधीच विसरणं शक्य नाही. एखादी गोष्ट अगदी निकडीची वाटत असूनही त्याक्षणी नाही मिळाली तर मन अस्वस्थ होणारच ना? माझंही तसंच झालं होतं. तेव्हाच्या माझ्या अस्वस्थतेला निमित्त झाला होता तो खूप वर्षांपूर्वी बाबांनी, मी घर सोडून नोकरीच्या शोधात आयुष्यांत प्रथमच मु़ंबईला निघालो तेव्हा आशीर्वाद म्हणून मला दिलेला दत्ताचा एक अगदी लहान कागदी फोटो! माझ्या आयुष्यातल्या माझ्या मनात घर करून राहिलेल्या कांही मोजक्या अशा अतिशय करूण प्रसंगांपैकी तो एक प्रसंग! या सदराच्या ८व्या भागात तो सविस्तर आलेला आहेच. बाबा तेव्हा अंथरुणाला खिळून होते. मुंबईत एक जुजबी पगाराची खाजगी नोकरी मिळायची संधी माझ्यासाठी चालून आली तेव्हा ती स्वीकारून मी चांगल्या नोकरीच्या शोधात रहावं असं ठरलं आणि मुंबईला जाण्यासाठी मी बॅग भरू लागलो. माझं वय तेव्हा जेमतेम १८/१९ वर्षांचं. निघायची वेळ आली तेव्हा विचित्र दडपण आणि अनामिक अशा भीतीमुळे मी खचूनच गेलो होतो. निघताना मी बाबांचा निरोप घ्यायला त्यांच्याजवळ गेलो तेव्हा आपल्या थरथरत्या हाताने माझा आधार घेत ते कसेबसे उठून बसले. मी त्यांना वाकून नमस्कार केला.
“तुला काय देऊ? “
त्यांनी विचारलं. पूर्णतः निष्कांचन असणाऱ्या त्यांनी मला उचलून काही द्यावं अशी आम्हा कुणाचीच अपेक्षा नव्हती.
“छे छे बाबा.. खरंच काही नको. आशीर्वाद द्या फक्त. “
“ते तर आहेतच रे… ” बोलत बोलत त्यांनी त्यांच्या गादीचा कोपरा अलगद वर दुमडला. तिथे ठेवलेली त्यांची डायरी उचलली. आणि त्या डायरीत निगुतीने जपून ठेवलेला एक फोटो अलगद बाहेर काढून तो मला दिला.
“घे. हा फोटो हेच माझे आशीर्वाद आहेत. नीट जपून ठेव. याचे नित्यदर्शन घेत जा. या फोटोच्या रूपात दत्तमहाराज तुझी पाठराखण करतील. ” ते म्हणाले होते. तो बोटाच्या दोन पेरांएवढ्या उंचीचा आणि एका पेराएवढ्या रुंदीचा दत्ताचा लहान फोटो होता. पिवळ्याधमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, हसतमुख प्रसन्न मुद्रा असलेलं ते दत्तरूप होतं! माझ्या आयुष्यांत आलेल्या असंख्य कसोटी पहाणाऱ्या प्रसंगांच्या वेळी फक्त मलाच जाणवेल असा आधार, दिलासा आणि माझ्या विचारांना योग्य दिशा देत आलं होतं ते हेच दत्तरूप!
आजही तो फोटो आणि त्याचे नित्यदर्शन घेताना मला आठवत रहाणारे माझे बाबा ही माझ्यासाठी अतिशय मोलाची अशी ठेव आहे!
वर्षानुवर्षे माझ्या डायरीत जपून ठेवलेल्या त्या दत्तरूपाचं नित्यदर्शन घेत पंचवीस वर्षं उलटून गेल्यानंतरची, अकोल्याला गेलो त्याच्या चार वर्षं आधीची ती संध्याकाळ! तोवर हा फोटो कांहीसा जीर्ण झाला होता. त्याच दरम्यान माझी इचलकरंजीहून आॅडिट डिपार्टमेंटला बदली होऊन मी एका शनिवारी रिलिव्ह झालो. रविवारच्या रात्रीचं पुण्याचं रिझर्वेशन. योगायोग असा की माझ्या कोल्हापूरला रहाणाऱ्या भावाकडे तेव्हा आई होती आणि ती तेव्हा मुंबईला माझ्या मावशीकडे गेलेली होती. त्यामुळे तिला भेटून पुण्याला जाणं मला शक्य होणार नसल्याची रूखरूख माझ्या मनात होती. आणि अचानक भावाचा निरोप आला. ‘आई मुंबईहून परतीच्या प्रवासाला निघालीय. ती थेट कोल्हापूरला न येता आधी सांगलीला तुझ्याकडे येईल आणि तुम्हा सर्वांना भेटून, शनिवारची रात्र राहून मग कोल्हापूरला येईल’ असं भावानं सांगितलं. माझ्या मनातली रूखरूख त्यामुळे नाहीशी झाली हे खरं तरीही आईचं येणं माझ्यासाठी एक शुभशकुनही ठरणार आहे याची मात्र मला तेव्हा कल्पना नव्हती. पण घडलं तसंच. आईचे आशीर्वाद घेऊन नवी जबाबदारी स्विकारायला जाण्याची माझी इच्छा पूर्ण होणाराय याचा आनंद होताच. मी इचलकरंजी ब्रॅंचमधून रिलिव्ह झाल्यानंतर निघताना ड्राॅवरमधली माझी डायरी आठवणीने सोबत घेतली. त्याच डायरीत मी बाबांनी दिलेला ‘तो’ फोटो ठेवलेला होता. दर नवीन वर्षाच्या सुरुवातीला डायरी बदलताना तो फोटो नव्या डायरीत आठवणीने ठेवणं गेली पंचवीस वर्षं माझ्या अंगवळणीच पडलं होतं. त्यादिवशी मात्र हातातल्या डायरीतला तो फोटो पहाताना अनेक शक्याशक्यतेंचे विचार मनात गर्दी करू लागले. आता ऑडिट डिपार्टमेंटला गेल्यावर सततची फिरती. नित्यपूजा, रोजचं गुरूचरित्र वाचन हे कांही आता शक्य होणार नव्हतंच. आणि हा फोटोही प्रवासात तेवढ्या निगुतीने जपता येणार नव्हता. म्हणूनच दत्ताची एखादी छोटी फोटोफ्रेम आपण विकत घ्यावी, जेणेकरून पोथी वगैरे नाही तरी सततच्या प्रवासात ती आपल्याला सोबत नेता येईल. त्यासाठी आता सांगलीला घरी गेल्याबरोबर लगेच बाहेर पडून मार्केटमधे जायला हवं. कारण रविवारी तिथली दुकानं बंद. ही खरेदी आजच करायला हवी. मी घरी पोचताच आरतीने चहा केला. ती स्वत:चं आवरून माझी वाट पहात होती. पाच वाजून गेले होते आणि मुंबईहून निघालेली आई सातच्या दरम्यान घरी येणं अपेक्षित होतं. तरीही दोन तास म्हणजे पुरेसा वेळ होता पण आता उशीर करून चालणार नव्हतं. आम्ही घराला कुलूप लावून निघालो. पेठेतल्या गिफ्ट सेंटर्सकडे मोर्चा वळवला. दत्ताच्या लहानमोठ्या अनेक फोटोफ्रेम्स बघितल्या पण त्यातली एकही पटकन् घ्यावी असं वाटेचना. प्रवासात नेण्यासाठी मला हवी होती तशा छोट्या आकाराच्या फ्रेम्स मोजक्याच होत्या, पण प्रत्येकवेळी डायरीतल्या फोटोतलं तेजस्वी दत्तरूप नजरेसमोर यायचं आणि समोरची फोटोफ्रेम बाजूला सारली जायची. मग छोट्या मूर्तीही पाहिल्या पण त्याही आवडतील अशा नव्हत्याच.
साडेसहा वाजून गेले तेव्हा आई यायच्या आत घरी पोचणं आवश्यक असल्याने आम्ही नाईलाजाने रिक्त हाताने परतीची वाट ठरली. थोडी नाराजी मनात होती पण पर्याय नव्हता. त्याक्षणी तातडीनं घरी पोचणं हेच महत्त्वाचं होतं.
घरापर्यंत गेलो तेवढ्यात आईही आमच्या पाठोपाठ रिक्षातून उतरली. तिची बॅग घेऊन आम्ही आत नेऊन ठेवली. चहापाणी झालं आणि आईने आतली बॅग आणायला सांगितलं.
“आधी तुझा ऐवज तुझ्याकडे सोपवते.. ” बॅग उघडताना ती म्हणाली.
” ऐवज? .. म्हणजे गं? “
” हे घे. तारामावशीनं खास तुला भेट म्हणून दिलंय. हे द्यायचं होतं म्हणून तर मी आधी इथं आले. ” आई म्हणाली. मी पुढे होऊन ते गिफ्टपॅक घेतलं. उत्सुकतेनं उघडून पाहिलं तर आत दत्ताची एक सुंदर मूर्ती! माझा विश्वासच बसेना. हवं ते हवं तेव्हा मिळण्यातला तो आनंद खरोखरंच अवर्णनीय होता!
“ही मूर्ती? तारामावशीनं दिलीय? मला? कां बरं? कारण काय सांगितलं? ” न रहावून मी विचारलं.
” खूप दिवसांपूर्वीच तिने घेऊन ठेवली होती म्हणे. आपल्यापैकी कुणी भेटेल तेव्हा द्यायचं ठरवलं होतंन्. मी गेलेच होते, म्हणून माझ्याकडे दिली.. ” आई म्हणाली.
मला गिफ्ट शाॅपीमधे मनासारखी फोटो फ्रेम किंवा मूर्ती न मिळणं, मुंबईला गेलेल्या आईचं नेमकं आजच परत येणं, तारामावशीला माझ्यासाठी भेटवस्तू म्हणून ही मूर्तीच द्यावीशी वाटणं आणि खूप आधीपासूनच तिने माझ्यासाठी ती घेऊन ठेवलेली असणं, आणि नेमकी मला हवी तेव्हाच ती मिळणं हे सगळे फक्त योगायोग असूच शकत नव्हते! त्या सगळ्यापेक्षाही खरंच वाटणार नाही असं आश्चर्य म्हणजे बाबांनी मला आशीर्वाद म्हणून कित्येक वर्षांपूर्वी दिलेल्या, मी डायरीत जपून ठेवलेल्या त्या फोटोचंच ही मूर्ती म्हणजे हुबेहूब मूर्तरूप होतं! तसंच पीतांबर, प्रसन्न चेहऱ्यावरचं तेच मंद स्मित, उभं रहाण्यातली तीच ढब. तो फोटो देऊन एखाद्या मूर्तीकाराकडून तशीच मूर्ती घडवून घेतलेली असावी तसं त्या फोटोचंच हे प्रतिरूप!! ती पहाताक्षणीच नजरेला जाणवलेल्या अद्भूत स्पर्शाने मी शहारलो! हे सगळंच अतर्क्यच नव्हतं फक्त तर माझ्यापुरतातरी तो एक चमत्कारच होता!!
त्याच मूर्तीला आज नमस्कार करून बॅंकेत जायला निघताना याच सगळ्या आठवणी मनात दाटून आल्या होत्या!
बॅंकेत जायला बाहेर पडलो तरी मनात गर्दी होती ती याच विचारांची! त्याच गर्दीतून वाट काढत वर झेपावले ते याच संदर्भातले नंतरचे कितीतरी प्रसंग! त्या घटनेच्या मुळाशी जात तिचा कार्यकारणभाव शोधण्याचे मी केलेले आटोकाट तरीही तितकेच केविलवाणे प्रयत्न आणि त्याला लगडलेले तारामावशीच्या संदर्भातले महत्त्वाचे धागेदोरे, ज्यांनी मला निरूत्तर करीत माझ्या मनातल्या श्रद्धेची वीण अधिकच घट्ट केलेली होती! त्या सगळ्याच आठवणी म्हणजे अकोल्यातल्या प्रतिकूल परिस्थितीने दिलेल्या चटक्यांवर घातलेली हळूवार फुंकरच ठरली माझ्यासाठी…!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





