श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मीनाच्या घरून बाहेर पडलो तेव्हा मी खूप अस्वस्थ होतो. तारामावशीला भेटायला ठाण्याला जायचं हे आता ठरलंच होतं, पण ‘तिला पॅरॅलिसिसचा माईल्ड अॅटॅक आलाय’ हे मीनाचं वाक्य मनात जसं कांही रूतून बसलं होतं.)

प्रथम ऐकलं तेव्हा त्यातलं गांभीर्य जाणवलं नव्हतं पण रिकाम्या मनात जेव्हा तेच वाक्य ठाण मांडून बसलं तेव्हा मात्र नकारात्मक विचारांनी मन भरून गेलं. मीना आणि तिचा नवरा मावशीच्या आजारपणातलं गांभीर्य जाणीवपूर्वक कमी करत होते कां? सुरुवातीपेक्षा मावशीच्या तब्येतीत सुधारणा जाणवल्यामुळेही असेल कदाचित किंवा मला आत्तापासूनच विनाकारण दडपण नको असंही त्यांना वाटलं असेल, पण ती दोघं परस्परांचा अंदाज घेऊन मोजक्या शब्दांत सगळं व्यक्त करत होते असंच आता वाटत राहिलं. त्यामुळे ठाण्याला जाण्यासाठी मी लोकलमधे चढलो तरी त्या गर्दीतही मी एकटाच होतो. सोबत होती ती फक्त मावशीच्या संदर्भातल्या विचारांचीच.

माझ्याजवळच्या सविस्तर पत्त्यामुळे तिच्या धाकट्या मुलीचा फ्लॅट शोधायला त्रास जाणवलाच नाही. दारावरची बेल वाजवताना मात्र मनात चलबिचल होतीच. सारखं वाटत होतं नेहमीसारखं हसतमुखानं पुढे येत तारामावशीनंच दार उघडावं. माझं हसतमुखाने स्वागत झालं खरं पण ते मावशीनं नव्हतं केलं. दार उघडणाऱ्या तिच्या धाकट्या लेकीनं केलं होतं.

” ये. बैस. तुझीच वाट पहात होते. घर सापडायला त्रास नाही ना झाला? ”

मी सोफ्यावर टेकत असतानाच तिने विचारलं.

” अजिबातच नाही. तुझ्या ताईनं व्यवस्थित पत्ता आणि जवळपासच्या खुणाही लिहून दिल्या होत्या. त्यामुळे सापडलं लगेच. “

” मी आलेच. पाणी घेऊन येते… ” ती लगबगीने आत निघाली. जाताजाताच थांबली…

” तू असं कर. इकडं आत आईजवळच बैस. ये. ती केव्हापासून वाट पहातेय तुझी.. “

” कसं काय? तिला काय माहित? ” मी आश्चर्याने विचारलं.

” अरे, ताईचा फोन आला होता तू येतोयस म्हणून. अंथरूण धरल्यापासून खूप कंटाळलीय अरे ती. म्हणून मग सांगितलं तिला तू येतोस म्हणून. मुद्दाम तुला भेटायला येतोय म्हटलं तेव्हा तर खूश झाली ऐकून. “

“आणि काका कुठे आहेत? बाहेर गेलेत कां? “

” हो. आमचा चहा झाला सगळ्यांचा आणि पाय मोकळे करून येतो म्हणाले. ताईचा फोन आला तेव्हा ते आंघोळीला गेले होते. आणि नंतर आईच्या गडबडीत त्यांना तू येणारायस हे सांगायचं राहूनच गेलं. त्यामुळे तुझं येणं त्यांच्यासाठी मात्र सरप्राईजच असणाराय. खूप आनंद होईल त्यांनाही. ये, इथं या समोरच्या बेडरुममधे आहे बघ आई. तू बैस तिच्याजवळ.. मी पाणी घेऊन येते.. “

इथवर सगळं अगदी मनासारखंच घडलं होतं. आता चांगला तास दीडतास मावशीशी मनसोक्त गप्पा मारायला मिळणार होत्या. मुख्य म्हणजे तिने पाठवलेली दत्ताची मूर्ती मला कशी अचानक, योग्यवेळी मिळाली ते सगळं तिला सविस्तर सांगायचं होतं. तिला ती मूर्ती माझ्यासाठी कधी आणि कां घ्यावीशी वाटली, मुख्य म्हणजे अशी मूर्तीच कां, त्याऐवजी दुसरं कांही कां नाही? .. हे जाणून घ्यायचं होतं. मनातलं हे सगळं मोकळेपणाने बोलून तिला यामागची प्रेरणा नेमकी कशी झाली हे समजून घ्यायचं होतं. या सगळ्यामागचा कार्यकारणभाव जाणून घ्यायचा होता मला खूप दिवसांपासून.. आणि आज तो योग अगदी एका क्षणाच्या अंतरावर उभा होता!!

याच भारावल्या अवस्थेत मी झरकन् आत गेलो. मावशी काॅटवर डोळे मिटून झोपलेली होती. तिला हाक मारून उठवायचं माझ्या अगदी जीवावर आलं. मी तिथे काॅटजवळच्याच एका खुर्चीवर टेकलो. तेवढ्यांत पाण्याचं तांब्याभांडं घेऊन तिची मुलगी आली. तिने ते तांब्याभांडं माझ्या हातात देत जवळचा छोटा टी पाॅय पटकन् माझ्यासमोर आणून ठेवला. ती हळूच तिच्या आईजवळ गेली.

” झोपू दे तिला. नको डिस्टर्ब करू. ” मी म्हंटलं.

“कंटाळा आला कीं अशीच गुंगीत पडून असते. जागीच असेल… ” असं म्हणत तिने अलगद तिच्या कपाळावर हळूवारपणे थोपटलं. मावशीने अलगद डोळे उघडले. प्रश्नार्थक नजरेने आपल्या लेकीकडे पहात राहिली.

” बघितलंस कां कोण आलंय? ” तिने हळूवारपणे विचारलं. मी उठून तिच्याजवळ गेलो. मला पहाताच तिची हताश, निश्चल नजर आनंदाश्चर्याने भरून गेली.

” ओळखलंस कां मला..? ” मी अधिरतेने विचारलं. तिच्या केविलवाण्या चेहऱ्यावर अंधुकसं हसू तरंगत राहिलं. ती जीवाच्या कराराने अंथरूणावर उठून बसायची धडपड करू लागली.

” आईs.. , नाहीss नको. अजून बसता येणार नाहीय तुला, हो कीं नाही..? हे बघ, तोच इथं बसतोय तुझ्याजवळ. बोलतोय तुझ्याशी… ” म्हणत ती बाजूला झाली. ” तू.. तू इथं बैस तिच्याजवळ. बोल तिच्याशी… “

मी तिच्याजवळ टेकलो. तिचा निस्तेज, कृश हात हळूच हातात घेऊन तिला थोपटत राहिलो. ती अनिमिष नजरेने माझ्याकडे पहात राहिली.

” मी.. मी.. मुद्दाम तुला भेटायला.. तुझ्याशी गप्पा मारायला आलोय मावशी… ” मी म्हणालो. ते तिच्यापर्यंत नेमकं पोचल्यासारखं ती कसनुसं हसली. ओळखीचा ओझरता स्पर्श तिच्या नजरेत तरळून गेला. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कांहीशा थरथरल्या. आपला उजवा हात कष्टपूर्वक पुढे करीत तिने माझा हात अलगद हातात घेतला आणि अचानक तिचे भरून आलेले डोळे पाझरु लागले.

“अ.. अ.. ळ.. ख.. लं.. तू.. तू.. ”

भरभरून बरंच कांही बोलण्याच्या असोशीने ती कासावीस होत राहिली. पण तिच्या बोबड्या, केविलवाण्या अगतिकतेत ते सगळं व्यक्त न होताच विरून गेलं.

” एs.. तू आतच येतोस कां थोडा वेळ? तुझं खाणं होईपर्यंत बाबा येतीलच. ते आले कीं चहा करते… “

खरंतर मावशीची केविलवाणी अवस्था बघून कांही खाण्यापिण्याची भावना नाहीशीच झाली होती. मला जे हवं ते हातून निसटूनच गेलंय हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं. आता जे कांही खाणं, बसणं, बोलणं असेल ते सगळं उपचारापुरतंच होत रहाणार होतं हेही नाईलाजाने मी स्वीकारलं न् आत जाण्यासाठी उठू लागणार एवढ्यांत बाहेरून आलेल्या काकांनी आत डोकावून पाहिलं आणि मला बघताच थबकले.

” अरे… तू? असा अचानक..? ” ते आश्चर्याने म्हणाले. त्यांना झालेला आनंद मला थोडी उभारी देऊन गेला. मग खाणं, गप्पा, चहा यात विषय एकच होता तो म्हणजे तारामावशी आणि तिचं अचानक उद्भवलेलं आजारपण!

” ही आजारी आहे हे तुला कसं समजलं? नाही म्हणजे तू मुद्दाम धावपळ करून आवर्जून तिला भेटायला आलायस म्हणून विचारलं रे… ” ते सहजच म्हणाले.

“खरं सांगू कां? मी तिलाच भेटायला मुंबईला आलो होतो. ती आजारी आहे हे मी आल्यानंतर मला समजलं… “

ते अविश्वासाने माझ्याकडे पहातच राहिले.

” तिची ही अगतिक अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतंय. तिच्याशी न बोलताच परत जाणं हे खूप क्लेशकारक आहे माझ्यासाठी… ” माझा आवाज भरून आला तसा मी आवंढा गिळला. आता मन मोकळं केल्याशिवाय मलाच चैन पडणं शक्य नव्हतं आणि त्यासाठी भिडेकाका हीच एकमेव योग्य व्यक्ती आहे असं मला वाटलं. मी त्यांना विश्वासात घेऊन माझ्या येण्याचं नेमकं प्रयोजन उत्स्फूर्तपणे सांगून टाकलं.

” पण आता मावशीकडून या कशाचं नेमकं उत्तर मला मिळणं शक्यच नाही. अर्थात तिच्या या आकस्मिक आजारपणामुळे आपणा सर्वांनाच झालेल्या दुःखापुढे माझं हे दुःख कांहीच नाहीय. तरीही काहीतरी हरवल्याची रूखरूख मात्र माझ्या मनात रहाणारंच. “

ऐकून काकाही कांहीसे अस्वस्थ झाले..

” थांब, मी बोलतो तिच्याशी. सांगतो तिला सगळं. ती जे, जसं सांगेल, मला समजेल नक्कीच.. ” असं म्हणत ते उठलेच. आत गेले. पाठोपाठ मी. तिच्याजवळ बसून तिला समजेल अशा पद्धतीने ते सगळं तिला सांगत, विचारत राहिले. ऐकता ऐकता मावशीने माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत एक वेगळीच चमक होती. मग खूणेनेच तिने मला जवळ बोलावलं. मनात साठलेलं सगळं ती असोशीने मला सांगायचा, व्यक्त करायचा प्रयत्न करत राहिली. तिचं ते विचित्र आवाजातलं सांगणं शब्दरूप घेईनाच. तिची कासावीशी माझ्याच सहनशक्तीच्या पलीकडची होती. मी शांतपणे, तिला कळतील अशा खूणा करीत सगळं मला समजल्याचं तिला खोटंच सांगून टाकलं. ऐकून तिचेही डोळे समाधानानं हसले. काका आश्चर्याने माझ्याकडे पहातच राहिले.

“काका, तिच्याकडून सगळं जाणून घ्यायचा अट्टाहास आता नको करायला. तिला त्रास होतोय त्याचा खूप.. ” मी म्हटलं. त्यांनाही ते पटलं. मी त्या तिघांचा निरोप घेतला. काकांना नमस्कार करून जायला वळलो तेवढ्यांत काकांनी हाक मारून मला थांबवलं.

” तुझं पूर्ण समाधान होईल का नाही माहित नाही पण मला जे माहित आहे तेवढं तरी मी नक्कीच सांगू शकतो. ” ते म्हणाले. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पहातच राहिलो. ते आता काय बोलणार याची उत्सुकता होतीच.

“तीन वर्षापूर्वींची गोष्ट आहे. आम्ही संगमेश्वरला नेहमीप्रमाणे यात्रेला गेलो होतो. तिथे दर्शन घेऊन गर्दीतून कशीबशी वाट काढत घरी परतत असताना हिने मला थांबवलं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका हातगाडीकडे निर्देश करीत तिने मला बोलावलं. स्वत: लगबगीने पुढे गेली. त्या गाडीवर विकायला ठेवलेल्या खेळणी, देवांचे फोटो, मूर्ती यांच्या गर्दीत तिला नेमकी ती दत्तमूर्ती कशी दिसली ते तीच जाणे.

‘ किती छान आहे ना ही मूर्ती? मला घ्यायचीय. ‘ ती म्हणाली. मला तिचा थोडा रागच आला.

“अगं कशाला? घरी देव कमी आहेत का आपल्या? त्यात आणि ही मूर्ती ठेवणारायस कुठं? ” मी म्हणालो.

‘मला माझ्यासाठी नकोच आहे. अरविंदासाठी घ्यायचीय. माझ्या आजारपणात आपण त्याच्या घरी राहिलो होतो तेव्हा बघितलंयत ना तुम्ही? रोजच्या धावपळीतही नियमित गुरुचरित्र वाचन असायचं त्याचं. त्याला खूप दिवसापासून कांहीतरी द्यायचं मनात आहे हो माझ्या. योग येईल तेव्हा तेही देईन. पण ही मूर्ती पाहिली आणि त्याची आठवण झाली बघा. त्याला नक्की आवडेल ही. घेऊया? .. ‘ ती म्हणाली. तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर त्या मूर्तीकडे पहाण्याची माझी नजरच बदलली. अतिशय तजेलदार रंगांनी रंगवलेली, धातूची ती छोटीशी सुबक मूर्ती मलाही खूप आवडली. जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा तुला ती द्यायची असं ठरवून घेतलेली ती मूर्ती पुढं जवळजवळ तीन वर्षं तिने जपून ठेवलेली होती. नुकतीच तुझी आई मुंबईत असताना आवर्जून आम्हाला भेटायला आली, तेव्हा हिने आठवणीने ती तुझ्या आईकडे तुला देण्यासाठी दिली होती. तिला हीच मूर्ती कां घ्यावीशी वाटली याचं नेमकं उत्तर तिच्याकडेही नसेल कदाचित. ही सगळी त्या परमेश्वराचीच इच्छा म्हणायचं. त्यातून तुला जे समाधान मिळालं ते अतिशय मोलाचं आहेच. पण आज तू इथं येऊन तुझ्याही नकळत जे समाधान आम्हा दोघांना दिलंयस तेही तितकंच आनंददायी आहे आमच्यासाठी!”

“मी..? मी कसलं समाधान दिलंय? “

“तुला हवं ते योग्य वेळी तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दत्त महाराजांनी तुझ्या मावशीची निवड केली होती हे तू आलास म्हणूनच आम्हाला समजलं ना? यापेक्षा तिच्या न् माझ्यासाठी अधिक अपूर्वाईचं दुसरं काय असणार? ” ते मनापासून म्हणाले.

मघाशी निघतानाची माझ्या मनात निर्माण झालेली कांहीतरी निसटून गेल्याची भावना माझ्याही नकळत विरून गेली होती. कितीतरी प्रश्न मनात अजूनही अनुत्तरीत असतानासुद्धा अतिशय मोलाचं असं खूप कांही गवसल्याची भावनाच माझ्या मनात भरून राहिलेली होती…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments