श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ७७ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- आज माझ्यासाठी सहस्त्रबुद्धे आजोबांच्या मनाची दारं थोडी कां होईना किलकिली झालेली होती. त्यामुळेच त्यांच्या घरून बाहेर पडताना फारसं काही हाती लागलेलं नसतानाही बरंच कांही गवसल्याचं समाधान माझ्या मनात भरून राहिलं होतं..!)
पण ते समाधान अल्पजीविच ठरलं. याला निमित्त झालं ते ज्यांच्याविरुद्ध ही तक्रार होती त्या आमच्या ब्रॅंच-मॅनेजर प्रभुदेसाईंचंच. या संदर्भात आम्हा दोघांचं बोलणं झालं होतं, तेव्हा तोवर त्यांच्या मनात कोंडून राहिलेला सहस्त्रबुध्देंबद्दलचा संताप त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरत होता. नेमकं काय घडलं होतं ते सगळं प्रभूदेसाई झपाटल्यासारखं सांगत राहिले होते. त्यातून आपोआपच ‘तक्रारदार सहस्त्रबुद्धे’ या व्यक्तीची एक नकारात्मक प्रतिमा माझ्या मनात कोरली गेली होती! म्हणूनच एका अतिशय हेकट, संतापी आणि आतयायी अशा म्हाताऱ्या माणसाला मी भेटायला जातोय याचं भान काल सकाळी त्यांच्या दाराची बेल वाजवताना मी घट्ट धरूनच ठेवलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी अपेक्षित केलेला आक्रस्ताळेपणा त्यांनी दाखवलेला नव्हता हे आश्चर्य वाटावं असंच होतं. शिवाय ते दत्तभक्त आहेत हे त्यांच्या गुरुचरित्र वाचनाच्या संदर्भामुळे माझ्या लक्षात आल्यामुळे निघताना मी कांहीसा समाधानी होतो हे खरं पण ते समाधान मनात सुरू झालेल्या त्या आजोबांबद्दलच्याच उलटसुलट विचारांमुळे जवळजवळ नाहीसंच झालं होतं. मनात गर्दी करू लागलेल्या त्या विचारांमधे मला तीव्रतेनं त्रास देत राहिला तो माझ्या मनात आधीच ठाण मांडून बसलेला सहस्त्रबुद्धे आजोबांचा तो नकारात्मक ठसाच! ती संपूर्ण रात्र या विचारांच्या गदारोळात अधांतरीच गेली. या माणसाकडून फार कांही अपेक्षा करण्यात अर्थ नाही ही स्पष्ट जाणीव मग सकाळपर्यंत अधिकाधिक दृढ होत गेलेली होती!
अर्थातच अशा मन:स्थितीत निर्माण झालेले विचारतरंग माझी उमेद आणि उत्साह प्रदूषित करणारेच ठरले. ‘त्यांनी प्रभूदेसाईंविरूध्द केलेली ती लेखी तक्रार, सातत्याने त्याचा केलेला शिस्तबध्द पाठपुरावा आणि प्रभूदेसाईंना कठोर शिक्षा होण्यासाठीचा यांचा टोकाचा आग्रह हे सगळं विचारपूर्वक रचलेल्या षडयंत्राचाच एक भाग नसेल कशावरून?’ हा प्रश्न तर माझी पाठच सोडेना. आता ठरल्याप्रमाणं त्यांना भेटायचं तर लगेचच निघायला हवं होतं पण जाऊन करायचं काय?सहस्त्रबुध्दे आजोबांना त्यांचं काय आणि कसं चुकलंय हे सांगायचं कसं? कांही करून त्यांना ती तक्रार मागं घ्यायला लावायचीच ही माझ्यावरची मुख्य जबाबदारी पार पाडणं आणि तेही दोन-चार दिवसांच्या अत्यल्प मुदतीत हे अशक्य कोटीतलंच होतं हे लख्ख जाणवलं आणि मी निराश झालो. अशा बिकट वाटेवर याच अस्वस्थ मनानं मी त्या सकाळी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच आत्मविश्वास हरवल्यासारखं लटपटत होतं आणि नंतर सहस्त्रबुद्धेंच्या दारावरची बेल वाजवताना माझा हातही थरथरत होता!
” या..” माझं स्वागत केलं ते दस्तुरखुद्द सहस्त्रबुध्दे आजोबांनीच. त्यांच्या चेहऱ्यावर ना हसू होतं ना मी आल्याचं समाधान. तरीही त्यांचा चेहरा शांत होता आणि माझ्यासाठी तेच खूप होतं.
“आज लवकर आवरलं कां गुरुचरित्र वाचन?” मी सहजच विचारलं.
“नाही. हीच माझी रोजची वेळ. काल अध्याय मोठा होता म्हणून थोडा उशीर झाला होता ” ते म्हणाले. त्यांचा मूड कसा आहे याची एवढी चाचपणी पुरेशी होती.
“तुम्ही केलेल्या तक्रारी बद्दल मी आवर्जून बोलायला आलोय याचं आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला?” मी फार वेळ न दवडता मुद्यालाच हात घातला.
“नाही.” माझ्याकडे रोखून पहात ते ठामपणे म्हणाले. “तसंच काही कारण असल्याशिवाय बँक तुम्हाला पाठवणार नाही हे ठाऊक आहे मला.”
हे ऐकून मी भांबावलोच.हे यांना कसं समजलं? मला प्रश्न पडला. ‘आपल्या ऑफिस मधल्याच कुणाशी संपर्क, साटंलोटं नसेल ना यांचं?’ या विचाराने क्षणभर अस्वस्थही झालो आणि तीच अस्वस्थता लपवण्यासाठी मी मोकळेपणानं हसलो. तसं कांही असण्याची शक्यता नाही हे माहित असूनही ती शक्यता गृहित धरूनच मी सहज हसण्यासारखी प्रतिक्रिया देणं आवश्यकच होतं. संवादाची सुरूवात अशी निसरड्या वाटेवरूनच झाली त्यामुळे पुढची पावलं मला हुशारीनेच टाकायला हवी होती.यांना मी इथं येण्यामागचं खरं कारण सांगणं योग्य नव्हतं हे खरं पण त्यासाठी खोटं बोलणंही मला योग्य वाटेना. आजोबा मी कांही बोलेन त्याची वाट पहात माझंच निरीक्षण करीत होते.
“तसंच काहीतरी कारण आहे हे खरं आहे आजोबा, पण मला बँकेनं पाठवलेलं नाहीय. तुम्हाला आवर्जून भेटावं आणि या विषयावर तुमच्याशी बोलावं असं मलाच मनापासून वाटलं आणि मी तसं सांगितल्यावर डीजीएम्. साहेबांनी मला परवानगी दिली एवढंच.”
” कमालच आहे. मला आवर्जून भेटावं असं कां वाटलं तुम्हाला?”
“या सर्व प्रकरणात ‘ह्युमन रिलेशन्स आस्पेक्ट’ कडं जाणीवपूर्वक नसेल पण थोडं दुर्लक्ष झालंय हे मला जाणवलं म्हणून तुमची भेट घ्यावी असं वाटलं.”
“यासाठी त्या मॅनेजरशीच बोलायचंत ना?वाट वाकडी करून इथं कशाला यायचं?”
” मी त्यांच्याशीही बोललोय ना. त्यांनी त्यांची बाजू सांगितली, पण ती त्यांच्या दृष्टिकोनातून. हा प्रश्न योग्यरितीने सोडवण्यासाठी कुणावरही अन्याय होऊ नये याची काळजी मीच घ्यायला हवी ना?”
“तो प्रभूदेसाई काय म्हणाला ते कळू दे तरी मला एकदा. माझ्या तक्रारखोर स्वभावावर ताशेरे ओढले असतील त्यानं. मी इतर कस्टमर्ससमोर त्याचा अपमान केला असंही तो म्हणाला असेल. स्वतःची कातडी बचावण्यासाठी तो यापेक्षा वेगळं करूच काय शकतोs..? ” संतापाने थरथरत ते ओरडले. त्यांचा आवाज ऐकून कानोसा घेत आत उभी असल्यासारखी त्यांची मुलगी धावत बाहेर आली.
” बाबाss, मी काय सांगितलं होतं तुम्हाला? जे बोलायचंय ते शांतपणे बोला. तेव्हासारखं आताही बीपी शूट झालं, तर त्रास बँकेला नाहीs तुम्हालाच होणाराय…” सात्विक संतापाने तिचा आवाज भरून आला.
आजोबा वरमले.
” हो गं बाई, शांतपणे बोलतो. मग तर झालं? तू आत जा बरं. यांच्यासाठी चहा टाक.” ते म्हणाले. ती क्षणभर घुटमळली न् आत निघून गेली..
“त्या दिवशी बी.पी. शूट झालं होतं?’त्या’ दिवशी म्हणजे कधी…?”
“या तक्रारीमागचं रामायण घडलं त्या दिवशी. तुमच्या बँकेतच. त्या प्रभूदेसाईच्या केबिनमधे…” बोलतानाही त्या आठवणींनी आजोबांचा आवाज थरथरत होता. ” प्रभूदेसाई बोलला असेलच ना तुम्हाला त्याबद्दल?” त्यांनी कडवटपणे विचारलं.
प्रभुदेसाई मला खूप कांही बोलले होते. ते सगळं त्यांच्याच शब्दांत यांना सांगणं मला शक्यच होणार नव्हतं. हे सहस्त्रबुध्दे एक रेल्वे पेन्शनर. प्रभूदेसाईंच्या ब्रॅंचमधे यांचा पेन्शन अकाऊंट होता. एक तारखेच्या पेन्शनसाठी होणाऱ्या गर्दीच्या वेळी, किंवा एरवीही इतर पेन्शनर्सच्या बाबतीतले कांही प्रश्न असले तरी हे केबिनमधे येऊन तावातवाने भांडायचे. बँकेत मॅनेजरशी किंवा स्टाफशी कसं बोलावं याचा त्यांना कांही विधिनिषेधच नसायचा. असं बरंच कांही
प्रभूदेसाई बोलले होते. सतत तक्रार करणारे कस्टमर्स सहसा बॅंकस्टाफच्या दृष्टीने अप्रिय असतात हे ओघानं आलंच. हे सगळं सांगून त्यादिवशी नेमकं काय झालं हे सांगताना प्रभूदेसाईना स्वतःच्या रागावर ताबा ठेवणंही मुश्किल झालं होतं.
“हवं तर माझ्याआधी त्या ब्रँचला काम केलेल्या इतर मॅनेजरना विचारा. ते हेच सांगतील. आजपर्यंत मी इतक्या ब्रॅंचेसमधे मॅनेजर म्हणून काम केलंय, तिथं एकाही ठिकाणी माझ्याबद्दल तक्रार आहे कां ते बघा.” प्रभुदेसाई जीव तोडून सांगत होते…..
” त्यादिवशी मी सकाळी नुकताच केबिनमधे गेलो असताना आपले एक चांगले डिपॉझिटर सपत्नीक केबिनमधे आले. त्यांची प्रॉपर्टी विकल्यानंतर येणारी ह्यूज अमाऊंट आपल्या बँकेत डिपाॅझीट करण्याबाबत त्यांना माझा सल्ला हवा होता. आमचं बोलणं सुरू असतानाच हे महाशय माझ्या केबिनमधे घुसले. मी त्यांना पाच मिनिटं बाहेर बसायची विनंती केली. हातातलं काम संपलं की तुम्हाला बोलावतो असं सांगितलं. त्यांना तो त्यांचा अपमान वाटला. डोकं फिरल्यासारखं ते चिडून मला अद्वातद्वा बोलू लागले. त्यांची समजूत घालून त्यांना शांत करायचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा आमचे अकौंटंट पुढे झाले. यांना केबिनमधून बाहेर घेऊन गेले, स्वत: त्यांचं काम करून दिलं. मी त्यांच्याविरूध्द तक्रार करेन या भितीपोटी माझ्याविरुद्धच खोटी तक्रार करून स्वतः साळसूद असल्याचा आव आणतायत ते.” प्रभूदेसाई म्हणाले होते.
बँक म्हटलं की अशी वेगवेगळ्या स्वभावाची असंख्य माणसं ग्राहकरूपांत संपर्कात येणं ही तशी माझ्यासाठी इतकी वर्षं नित्याचीच बाब होती. हे असं चिघळलेलं प्रकरण मात्र मी प्रथमच अनुभवत होतो.
प्रभूदेसाईंनी सांगितलेलं हे असंच सगळं मनात भिरभिरत असताना आजोबांच्या शब्दांनी मी भानावर आलो.
“त्यादिवशी नेमकं काय घडलं ते तो प्रभूदेसाई बोलला असेलच ना तुम्हाला..?” आजोबांनी पुन्हा विचारलं.
त्यांना काय उत्तर द्यावं तेच मला कळेना.
“हो, सांगितल़य ना…” मी कसेबसे शब्द जुळवू लागलो. ” पण त्यांनी जे सांगितलंय ते त्यांच्या स्वतःच्या वागण्याचं समर्थनही असू शकतं ना? रूजवात न करता मला ते खरं मानून नाही ना चालणार?” मी म्हणालो. ते समाधानाने हसले. सहस्त्रबुद्धे आजोबांना असं प्रसन्न हसताना मी प्रथमच पहात होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित क्षणभरच टिकलं. दुसऱ्याच क्षणी ते विरून गेलं. तो प्रसंग पुन्हा जगत असल्यासारखे ते एकटक समोर पहात राहिले. पहाता पहाता त्यांचा चेहरा विदीर्ण झाला. मनाला झालेल्या खोलवर जखमेला नकळत धक्का लागल्यासारखी ती जखम भळभळून वहात राहिली ….!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





