श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ८७ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- नाईकसरांचं फक्त एक दोन दिवसांच्या सवडीने पुण्यात येणं, त्यांना त्यावेळी माझी नेमकी आठवण होणं, त्यांनी मला आवर्जून फोन करणं, त्यांच्या लेक, जावयाच्या घरी आमची भेट होणं, त्या दोघांनी नेमकी अलिकडेच त्यांची नवीन प्रकाशन संस्था सुरु केलेली असणं, सरांचा माझ्यावर अतिशय लोभ असल्यामुळे त्यांना माझा नवीन कथासंग्रह या त्यांच्या घरच्याच प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित व्हावा असं वाटणं, यासारख्या फार फार तर महिन्याभरातच घडून गेलेल्या अचंबित करणाऱ्या घटनांच्या रूपातल्या ‘त्या’च्या कृपालोभाच्या असंख्य धाग्यादोऱ्यांनी घातली गेलेली घट्ट वीण अखेर माझ्या उर्वरित आयुष्याला एक अनोखी कलाटणी देऊन जाणार आहे हे मात्र माझ्या गावीही नव्हतं! …)
पण त्याची प्रचिती देणाऱ्या अशा कांही घटना नंतर घडत गेल्या कीं मनात हे सगळं खरंच सत्य कीं स्वप्न असा संभ्रम निर्माण व्हावा!
माझ्या बँकेचे रोजचे रुटीन आणि न संपणाऱ्या कामांच्या व्यापात एक प्रूफ रिडिंग (तेही मी माझ्या समाधानासाठीच केलेले..) वगळता माझा कथासंग्रह आकाराला येण्याच्या प्रोसेसमधे मी इच्छा असूनही माझा प्रत्यक्ष सहभाग फारसा देऊच शकलो नव्हतो. मुखपृष्ठ, चांगल्या मुद्रकाचा शोध, मुद्रितांच्या कॉपीज् काळजीपूर्वक तपासणे, प्रकाशन समारंभाचे नियोजन, त्यासाठी आमंत्रितांच्या येण्या-जाण्याच्या सोयीचा विचार करून पुण्यात मध्यवर्ती भागातला हॉल शोधणे, प्रमुख पाहुण्यांची निवड, त्यांच्याशी चर्चा, त्यांना आमंत्रण, त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या प्रवासाची, वास्तव्याची, स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे, या सगळ्याबरोबरच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छपाईच्या व्यवस्थेपर्यंतच्या सगळ्याच आघाड्या वेळोवेळी अतिशय व्यवस्थित सांभाळत होते ते स्वतः राजू आणि नितीन हेच दोघे!
मी पुण्यात फॅमिली शिफ्ट केलेली नसली तरी टिळक रोडवरील ‘अपूर्वा अपार्टमेंट’ मधे वन रूम किचनचा एक फ्लॅट भाड्याने घेतलेला होता. स्वैपाक न् भांड्याला बाई यायच्या. त्यामुळे शाळा/काॅलेजना सुट्ट्या असतील तेव्हा आरती/सलिल येऊ शकतील आणि बदल म्हणून आईही इथे येऊन सलग कांही दिवस राहू शकेल हा त्यामागे उद्देश होता. या कथासंग्रहाचं नियोजन सुरू झालं त्याच दरम्यान योगायोगाने आई इथे आलेलीच होती. प्रकाशन समारंभाचं नियोजन सुरू झालं त्याच दरम्यान माझ्या सासूसासऱ्यांचंही पुण्यात येणं होणार होतं. माझी मोठी बहिण-मेव्हणेही आवर्जून येणार होते. मोठा भाऊ तर पुण्यातच होता. या खेरीज अगदी जवळचे असे इतर बरेच नातेवाईकही पुण्यातच होते. ते सर्वजणही येणार होते. एरवी आवर्जून ठरवायचं म्हटलं तरी सर्वांना एकत्रित आणणारा अशा कौटुंबिक सोहळ्याचा योग सहजासहजी येणं शक्यच नव्हतं. आणि हे सगळं आता शक्य होणार होतं ते असं अगदी अचानक ठरलेलं असूनही अल्पकाळातच आकाराला येऊ लागलेल्या माझ्या ‘स्पर्श प्रकाशाचा’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा योग आला होता म्हणूनच!
या सगळ्या घटनांना निमित्त झाल्या त्या नाईकसरांच्या मनातल्या माझ्याबद्दलच्या सद्भावना आणि त्यामुळेच त्यांचा मला आलेला त्या दिवशीचा ‘तो’ अनपेक्षित फोन!
खरंतर आत्तापर्यंतच्या योगायोगानेच घडाव्यात तशा घडत गेलेल्या या घटनाही त्यामधे लपलेल्या ‘त्या’च्या कृपालोभाची जाणीव करून द्यायला पुरेशा होत्या माझ्यासाठी. पण याही पेक्षा आश्चर्यकारक आणि तितक्याच सुखद योगायोगाचे धागेदोरेही याच सगळ्या घडामोडींशी घट्ट जुळणार होते ज्यामुळे माझ्या उर्वरित आयुष्याला तोवर मी कधी कल्पनाही केली नव्हती असं अनोखं वळणही मिळणार होतं!!
ते सगळं आज आठवतानाही स्वप्नवतच वाटत रहातं!
याच संदर्भात त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आम्ही बसलो होतो तेव्हा नितीन म्हणाला,
” ‘स्पर्श प्रकाशाचा’ शं. ना. नवरे यांच्या हस्ते प्रकाशित व्हावं असं मला वाटतं. “
शं. ना. नवरे माझेही आवडते लेखक होतेच. पण तरीही या छोट्याशा कामासाठी ते डोंबिवलीहून पुण्यापर्यंत यायला तयार होतील का? हा प्रश्न होताच. पण नितीनने त्यांना फोन केल्यावर प्रकाशन समारंभ कधी आहे हे विचारून घेऊन, ते कसलेही आढेवेढे न घेता ‘हो’ म्हणाले, हा एक शुभशकूनच आहे असंच मला वाटलं. राजू, नितीन आणि मी तिघेही कार्यक्रम व्यवस्था, निमंत्रितांचं स्वागत, या सगळ्या देखभालीत व्यस्त असताना शं. नां. ची लोकप्रियता आणि त्यांचं वय लक्षात घेता त्यांना पुणे स्टेशनवर रिसीव्ह करण्यापासून परतीच्या प्रवासात निरोप देईपर्यंत त्यांच्या सोबत राहू शकणारी दुसरी एखादी जबाबदार व्यक्ती आवश्यक होती. पण सहज उपलब्ध होणारं त्यावेळी कुणीच नजरेसमोर येईना. अखेर नितीननेच शन्नांना कार्यक्रमाच्या दिवशी रविवारी सकाळी पुणे स्टेशनवर रिसिव्ह करण्यापासूनची सगळी जबाबदारी स्वत:कडे घेतली आणि प्रकाशक म्हणून राजू आणि लेखक म्हणून मी अशा आम्हा दोघांना त्याने प्रकाशन समारंभाच्या हॉलवरची सर्व व्यवस्था पहाण्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून दिला.
प्रकाशन समारंभ टिळक रोडवरच्या ‘टिळक स्मारक मंदिर’ मधील हाॅलमधे करायचं ठरलं तो रविवार होता.
अर्थात त्या आधीचे शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांच्या रजेचं नियोजनही मी आधीपासूनच करून ठेवलं होतं. पण… ऐनवेळी अचानक अशी विचित्र परिस्थिती उद्भवली कीं त्या दोन्ही दिवसांची रजा रद्द करून मला पूर्णवेळ आॅफिस अॅटेंड करणं अपरिहार्यच होऊन बसलं!
याला निमित्त झालं ते सेंट्रल आॅफिसमधून अचानक आलेला एक महत्वाचा फॅक्स आणि पाठोपाठ आलेल्या त्याला पुष्टी देणाऱ्या फोनचं! आमच्या जी. एम्. मॅडम नेमक्या शुक्रवारीच झोनल आॅफिस व्हिजीटसाठी येणार होत्या. आणि शनिवारी इथल्या लोकल ब्रॅंचेसपैकी दोन ब्रॅंचेस् ना भेट देऊन त्या पुढे कोल्हापूर रिजनल आॅफिसला मिटिंगसाठी जाणार होत्या! त्यामुळे आमच्या आॅफिसमधे महत्वाच्या बाबींबद्दल धोरणात्मक चर्चा, दुपारी उशीरपर्यंत सुरू राहू शकणारी लंच मिटींग आणि शनिवारच्या लोकल ब्रॅंच व्हिजीटची व्यवस्था यासाठी आम्हा सर्वांची उपस्थिती आणि सहभाग अपरिहार्यच होता हे ओघानं आलंच!
या सर्व अनिश्चिततेला सामोरं जाताना मी खूप अस्वस्थ होतो. हातातोंडाशी आलेलं खूप कांही हातून निसटून जात असल्याच्या भावनेने ती अस्वस्थता अधिकच वाढत गेली. हाकेच्या अंतरावर आलेल्या प्रकाशन समारंभाचा आनंद हिरावून घेणारी, फार मोठा अडसर होऊन बसलेली परिस्थिती निर्माण करणारी आमच्या जी. एम्. मॅडमची ही व्हिजीट मला त्या अस्वस्थतेत एखाद्या भयंकर संकटासारखीच वाटत राहिली! .. पण प्रत्यक्षात मात्र ती माझ्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणलेली इष्टापत्तीच ठरणार होती हे मला कुठं माहित होतं?
इष्टापत्तीच नाही तर काय? कारण ठरल्याप्रमाणे शुक्रवारी मॅडम आल्या आणि अचानक घटनाच अशा घडत गेल्या कीं मनातली अस्वस्थता क्षणार्धात विरूनच गेली..!
फार मोठ्ठं संकट भासणारी ही जी. एम्. मॅडमची व्हिजीट संकट नव्हे तर माझ्या पुरता तरी एक शुभशकूनच ठरला होता!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





